भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम
प्रकाशक

महाराष्ट्रातील विविध भागातील कष्टकऱ्यांचा, लहान व्यावसायिकांचा, रोजंदारीवर काम करणा-या व्यक्तिंचा ख्यातनाम छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला वेध 'असाही एक महाराष्ट्र' च्या निमित्ताने मिळणार आहे.

सर्वसाधारणपणे शहरी माणसाच्या डोक्यात असलेल्या महाराष्ट्राहून वेगळा महाराष्ट्र 'असाही एक महाराष्ट्र'च्या माध्यमातून भंडारे यांनी साकार केला आहे. 'असाही एक महाराष्ट्र'च्या निमित्ताने महाराष्ट्रातील समाजाचा अस्सल चेहराच भंडारे यांनी लोकांसमोर आणला आहे. महाराष्ट्रातील नागरी व महानगरी विकासापासून खूप दूर पण तरीही तितक्याच व्यापक असलेल्या एका बाजूकडे संदेश भंडारे यांनी लक्ष वेधले आहे. या सगळ्यांच्या आयुष्यभराच्या श्रमातून उपजीविकेतून आजचे महाराष्ट्राचे खरे वैभव साकार झाले आहे.

विविध कलांच्या माध्यमातून कलाकार समाजाचे मनोरंजन करण्याचे व माहिती पुरविण्याचे काम करत असतो. पण त्याही पलिकडे जाऊन सामान्य माणसाच्या नजरेतून सुटलेल्या संवेदनशील वास्तवाचे चित्रण संदेश भंडारे यांनी या प्रदर्शनातून केले आहे. रोजच्या रहाटगाड्यात विसरुन गेलेल्या किंवा आथिर्क संपन्नतेच्या जंजाळात दुर्लक्षित राहिलेले बिनचेहऱ्यांचे चेहरे, त्यांचे आयुष्य आणि त्यांचे जगणे, त्यांची सुख-दु:खे आपल्यासमोर परिणामकारक छायाचित्रांतून त्यांनी मांडली आहेत.

छाया प्रकाशाच्या माध्यमातून, मानवी स्थितीची अवस्था कॅमेऱ्यात अचूकपणे टिपणारे छायाचित्रकार म्हणून संदेश भंडारे सर्वांना परिचित आहेत. मानव त्याच्या भोवतीचे पर्यावरण नित्याच्या वापरातील वस्तू असे विषय त्यांच्या छायाचित्रणातून समोर येतात. 'पुणेरी ब्राह्माण, देवळी-कोनाडे, कुस्तीचा आखाडा, बहुरुपी, वारी-एक आनंदयात्रा, तमाशा-एक रांगडी गंमत' अशा छायाचित्र मालिकांतून त्यांनी छायाचित्रण कलेतले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांच्या छायाचित्रांकडे कलाकृती म्हणून पाहण्याबरोबर त्यातील सामाजिक संदर्भही महत्त्वाचा आहे. त्यांनी 'प्लॅन इंटरनॅशनल' या संस्थेसाठी केलेल्या बालकांच्या शारीरिक व मानसिक विकास अवस्थांचे छायाचित्रण ही सामाजिक छायाचित्रणाच्या क्षेत्रातील महत्त्वाची उपलब्धी आहे. पुणेरी ब्राह्माण, मुंबई विद्यापीठ, वारी-एक आनंद यात्रा, तमाशा-एक रांगडी गंमत, असाही एक महाराष्ट्र ही त्यांची पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत.