भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली (२०१०)
किंमत
400.00
पृष्ठसंख्या
600

भाषा हा केवळ कथा-कादंबर्‍या-कविता लिहिणार्‍यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपापल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते. भाषा मुळातच कच्ची राहिली, तर कोणताही विषय समजणे कठीण होऊन बसते; इतर भाषा शिकतानाही खूप अडचणी येतात. म्हणून लेखन सुधारण्यासाठी मुलांना उपयोग व्हावा आणि त्यांना मदत करणे मोठ्यांना सोपे व्हावे, अशा उद्देशाने हा पुस्तकांचा संच तयार केला आहे.
मराठी भाषा लिहिण्यासाठीचे सचित्र, रंगीत, आकर्षक सरावपाठ असे पुस्तकाचे स्वरूप आहे. मुख्य पुस्तकांचे दोन खंड आणि एक उत्तरपुस्तिका असा तीन पुस्तकांचा हा संच आहे. वेगवेगळ्या अंगांनी भाषेचा सराव करणे, हा या खटाटोपामागील मुख्य उद्देश आहे. स्वाभाविकच ही पुस्तके भाषेची अधिक आणि व्याकरणाची कमी आहेत. याचा अर्थ त्यात व्याकरण टाळले आहे, असा अजिबातच नाही; पण त्याची काटेकोर भाषा फारशी वापरलेली नाही. व्याकरणाचे ज्या मुलांना दडपण वाटते, त्यांनाही झेपेल आणि सोसेल इतपतच त्या भाषेचा उपयोग केला आहे. पाठांची आणि स्वाध्यायांची भाषा शक्य तेवढी समकालीन, मुलांच्या परिचयाची असावी, याची काळजी घेतली आहे; पण ती विनाकारण सोपी आणि बाळबोधही केलेली नाही. विषयांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असावे आणि त्यातून मुलांचा शब्दसंग्रह वाढावा, असाही प्रयत्न केला आहे. थोडक्यात - मुलांनी हे पुस्तक स्वत:चे स्वत: वापरायचे आहे, हे लक्षात घेऊन त्याची रचना केली आहे. त्यांना भाषेबद्दल पडणारे अनेक प्रश्न त्यात हाताळले गेले आहेत. भाषेचा सराव करता करता भाषा शिकण्याच्या पुढील टप्प्याकडे जाण्यासाठी मुलांच्या मनाची तयारी व्हावी अशी अपेक्षा आहे.