Submitted by ऋषिकेश on
नंदन

उपक्रम. यानिमित्ताने वाचायची राहून गेलेली चांगली पुस्तकं समजतील. सविस्तर प्रतिसाद मग लिहितोच. सध्या आठवली तशी यादी लिहितो (कोणत्याही क्रमाने/भाजणीने नाही) -

१. स्टुडिओ - सुभाष अवचट
२. मौनराग - महेश एलकुंचवार
३. ब्र - कविता महाजन
४. तूर्तास - दासू वैद्य
५. बरेच काही उगवून आलेले - द. भा. धामणस्कर
६. अर्धी मुंबई - युनिक फीचर्स
७. बारोमास - सदानंद देशमुख
८. आयदान - उर्मिला पवार
९. शाळा - मिलिंद बोकील
१०. आपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर

नेगल, कार्यरत (किंवा माणसं), आमचा बाप अन् आम्ही, भूमी*, कुबेरांची पुस्तकं, टिकेकरांचं स्थलकाल (हे पुस्तकस्वरूपात वाचलेलं नसलं, तरी लोकसत्तेतले लेख वाचले होते), चकवाचांदण, बापलेकी, अच्युत आठवले आणि आठवणी ही काही अजून डोक्यात डोकावून गेलेली पुस्तकं**. (लंपन, हंस अकेला, आंधळ्याच्या गायी, एका रानवेड्याची शोधयात्रा इ. मंडळी नव्वदीतली ना? इतर नावाजलेली म्हणजे हिंदू, बाकी शून्य, बाराला दहा कमी, दुर्दम्य, निशाणी डावा अंगठा अजून वाचली नाहीत.)

*हे फार थोर नसलं तरी साहित्याच्या मुख्य धारेतलं पुस्तक म्हणून उल्लेख करावासा वाटतो. नाहीतर पुलंच्या म्हणण्याप्रमाणे मराठी साहित्याला नवीन वळण देणारी इतकी पुस्तकं आहेत की मुख्य रस्ताच हरवून गेला आहे :).

** एकही नाव घेण्याजोगं विनोदी पुस्तक आठवू नये हे दुर्दैव :(.

Tue, 25/01/2011 - 12:09 Permalink
यशोधरा

In reply to by नंदन

मघाशी वाचला तेह्वाच तुझा प्रतिसाद जामच आवडला. १० पुस्तकं हे फारच अन्य्यायकारक खरंतर. मागे वल्लीनी टाकला होता का २० पुस्तकांचा वा तत्सम धागा?

माझीही यादी टाकायला आवडेल, पण एका पुस्तकाचं नाव लिहिताना दुसरं कोणतं सुटलं तर, अशी धास्ती वाटते. काही न वाचल्या पुस्तकांची नावं कळून जाताहेत ही मोठी जमेची बाजू आणि प्लस पॉईंट.

Tue, 25/01/2011 - 15:17 Permalink
यशोधरा

In reply to by ऋषिकेश

थॅंक्यूच रे ऋ. :)

ही माझी यादी. ही उत्तम पुस्तकं आहेत का? तर उत्तम अगदी सापेक्ष कॅटेगरीतला शब्द आहे. मला जी उत्तम वाटतील, ती अजून कोणाला वाटणारही नाहीत कदाचित, पण मला ही आवडली आहेत,तेह्वा माझ्यासाठी महत्वाची आणि उत्तम. ह्या सर्व पुस्तकांमधून मला जाणवलेला एक समान धागा म्हणजे सुरेख, साधी, सरळ आणि त्याचमुळे असावी, मनाला हात घालणारी भाषा. हे माझ्यासाठी मुख्य. अजूनही आहेत, ती नंतर पुन्हा कधीतरी.

अगस्तीचे अंगण - प्रभाकर पाध्यांचे निवडक साहित्य एकत्र संकलित आणि संपादित केलेले हे पुस्तक. ह्यात त्यांचे प्रवासलेख आहेत, ललितं, व्यक्तिचित्रणं आहेत. वैचारीक लेखन,कथा अणि समीक्षा हेही आहे. पुस्तकाच्या सुरुवातीचं मनोगत, संपादकीय आणि परीघही वाचनीय.

जगण्यातील काही -अनिल अवचट. कोणताही आव न आणता लिहिलेले साध्या माणसांच्या आयुष्यात येणारे साधेसे अनुभव. कदाचित म्हणूनच मला जास्त आपलंस वाटलेलं पुस्तक.

सर्वोत्तम रवींद्र पिंगे - मंगेश पाडगावकरांच्या प्रस्तावनेपासूनच पुस्तक मनाची पकड घेतं - मला प्रस्तावनेसकट पुस्तक वाचायची सवय आहे -पिंग्यांची अतिशय घरंदाज आणि ऋजू भाषा. मनापासून लिहिलेले लेख आणि ललितं. कधीही हे पुस्तक वाचायला घ्यावं आणि वाचता वाचता जीव शांत व्हावा. निव्वळ नितळ लेखन.

मौनराग - एलकुंचवार. पुस्तकाच्या सगळ्यात मागच्या पानावर ह्या लेखनाला 'मनोज्ञ' म्हटलंय. खरं आहे.

कवितेच्या वाटेवर - अरुणा ढेरे. लाडकं पुस्तक. बस्स. :)

मनातलं अवकाश - सुनीता देशपांडे - मनापासून उमटलेले शब्द.

आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे - अफाट व्यक्तीचं अफाट, परखड लेखन.

दुर्गदर्शन -गोनीदा - दुर्गभ्रमंतीच्या निमित्ताने केलेले लेखन. शब्दाशब्दातून गोनीदांनी दर्‍या खोर्‍या आणि गडांवर केलेले प्रेम, माया जाणवते.

बापलेकी - संपादित - हृद्य पुस्तक.

नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर - आजवर मी जितकी नर्मदा यात्रेवरची पुस्तकं वाचली आहेत, त्यातील हे मला सगळ्यात भावलेलं पुस्तक. अतिशय प्रामाणिक.

झालीपण दहा ? :)

अकराचा आकडा बरा असतोय ;) म्हणून, अजून एकच जास्तीचं देते. :)

शोध मर्ढेकरांचा - विजया राजाध्यक्ष.

असाच एक धागा कवितांवर टाका रे कोणीतरी. :) आवडत्या कविता आणि रसग्रहण.

Wed, 26/01/2011 - 08:47 Permalink
सागर

In reply to by यशोधरा

यशोधरा,

यादी छानच आहे.
आहे मनोहर तरी आणि दुर्गदर्शन सोडले तर तुझ्या यादीतील एकही पुस्तक मी वाचले नाहिये.

नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर
आणि
शोध मर्ढेकरांचा - विजया राजाध्यक्ष

ही दोन पुस्तके नेहमी मला मोह घालतात. तरी अजून वाचलेली नाहियेत हे माझे दुर्दैव. हे देखील तुझ्या यादीवरुनच माझ्या लक्षात आले. वाचली असती ही २ पुस्तके तर माझ्याही यादीत आली असती :)

एलकुंचवारांचे मौनराग आणि अगस्तीचे अंगण या दोन्ही पुस्तकांबद्दल ऐकले आहेच. पण अजून पाहण्याचा योग नाही आलेला.
या धाग्यावरची सगळी न वाचलेली पुस्तके मी माझ्या यादीत नोंदवतो आहे. घेतलेली सर्व वाचून झाली की या पुस्तकांकडे वळेनच. :)

Thu, 27/01/2011 - 17:37 Permalink
सागर

In reply to by नंदन

नंदन,

तुझ्या यादीतील
कविताबाईंचे ब्र मी वाचले आहे. माझ्या यादीत आहेच. पण तुझ्याही यादीत हे पुस्तक असेन याची खात्री हा धागा ऋ ने तयार केला तेव्हाच होती. :)

बाकी मग मिलिंद बोकील यांची शाळा आणि सदानंद देशमुखांचं बारोमास माझ्याकडे आहेत पण अजून वाचायला मुहूर्त लागलेला नाहिये :(

तुझ्या लेखात उल्लेखिलेले महत्त्वाचे पुस्तक "आमचा बाप अन् आम्ही" केवळ अप्रतिम पुस्तक आहे. २००० च्या थोडे अलिकडे बहुतेक हे प्रकाशित झाले आहे. पण अप्रतिम पुस्तक आहे. माझ्या यादीत अ‍ॅडवले होते पण प्रकाशनकाळ या दशकातील नव्हता म्हणून वगळले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या एका कुटुंबाची एक अत्भुत कहाणी आहे. नक्की वाचावे असेच हे पुस्तक आहे. नरेन्द्र जाधव यांनी हे सुरेख पुस्तक कसे लिहिले असेन याचे मला आजही आश्चर्य वाटते. खरोखरच अत्भुत आणि वाचावेच असे हे पुस्तक आहे.

Thu, 27/01/2011 - 17:31 Permalink
यशोधरा

In reply to by सागर

आमचा बाप अन् आम्ही हे पुस्तक मी वाचलेय आणि ह्या कुटुंबाने काढलेल्या खस्तांची आणि जाधव आणि त्यांच्या भावडांनी काढलेले कष्ट ह्याविषयी पूर्ण जाणीव आणि आदर असूनही मला हे पुस्तक सुरेख नाही वाटले. जाधवांची लेखन शैली मला तरी भावली नाही वा स्पष्टच बोलायचे झाले तर काहीशी उर्मट अशी वाटते. त्यांनी जेवढी झेप घेतली आहे, ते अफाटच आहे आणि त्याबद्दल अभिमान त्यांनाही असणे चूक नव्हे, तरीही पुस्तकातली भाषा खटकली खरी.अर्थात, हे माझे वैयक्तिक मत.

एका अंकात त्यांनी आपल्या मोठ्या भावाबद्दलही लिहिले होते, कौतुकाच्या अंगाने जाणार्‍या वा निदान तसे भासणार्‍या लेखात भावाच्या चुकांवरच बोट अधिक ठेवलेले पाहिले होते. आत्ता आठवत नाही कोणता अंक ते, पण असला तर नंतर जरुर रेफरन्स देईन तुला. मग ते सारे लिखाण उतरलेच मनातून. :( असो.

नंदन, तूर्तासबद्दल सांगशील का?

Thu, 27/01/2011 - 18:30 Permalink

बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी जे त्या परिवारात स्फुल्लिंग पेटवले त्यातून जी कहाणी निर्माण झाली ती अद्वितीय अशीच आहे. बाकी लेखकाने बाहेर मुलाखतींत काय सांगितले हे मला माहिती नाही. पण यशोधरा एक साहित्यकृती म्हणून 'आमचा बाप अन् आम्ही' जबरदस्त आहे हे मात्र नक्की.
भाषा काही ठिकाणी खटकतेच पण त्याहीपेक्षा मोठे जे विचार या पुस्तकाने दिले ते अतुलनीय असेच आहेत.
चांगले ते घ्यायचे आणि वाईट ते सोडायचे :) काय???

Fri, 28/01/2011 - 13:22 Permalink

ह्या कुटुंबाने काढलेल्या खस्तांची आणि जाधव आणि त्यांच्या भावडांनी काढलेले कष्ट ह्याविषयी पूर्ण जाणीव आणि आदर असूनही हे वाचले नाहीस का? असो.

Fri, 28/01/2011 - 14:57 Permalink
वल्ली

१. शाळा - मिलिंद बोकील
२. संभाजी - विश्वास पाटील
३. स्टार हंटर्स - सुहास शिरवळकर (बॅ. अमर विश्वासची वापसी)
४. प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे
५. बालकांड - ह. मो. मराठे
६. राजा शिवछत्रपती -भाग १ व २ - गजानन भास्कर मेहेंदळे (अभ्यासू ग्रंथ)
७. मुखवटा - अरूण साधू
८. हिंदू - भालचंद्र नेमाडे

मुद्दामहून आठ पुस्तकांचीच यादी दिलीय. एकतर नंदन ने म्हटल्याप्रमाणे बाकी शून्य, बाराला दहा कमी, दुर्दम्य, निशाणी डावा अंगठा, भिन्न, ब्र आदी कादंबर्‍या वाचलेल्या नाहीत शिवाय दशकातील १० म्हणून पटकन डोळ्यांसमोर यावीत अशी पुस्तके तर फारच कमी. याचाच अर्थ असा नाही का की आधीच्या तुलनेत नवीन पिढीत फारसे लेखक (दर्जेदार) तयार झाले नाहीत. नवीन लेखक जोमाने पुढे येत आहेत, असतीलही. पण प्रकाशकांच्या गळेकापू स्पर्धेत त्यांच्या पुस्तकांना इतका वाव मिळत नसावा व कित्येक पुस्तके नजरेसमोर न येताच झाकोळून जात असावीत.

आता मला ॠ ने दिलेल्या किमान ३ पुस्तकांच्या माहितीविषयी-

शाळा - याबाबत तर ते का आवडले ते सांगण्याविषयी आवश्यकता भासत नाही ते तर सगळ्यांनाच माहीत आहे. सगळ्यांच्याच आवडीचे आहे.

मुखवटा - वैदर्भीय पार्श्वभूमीवर एक कथानक पेरून एका वृद्धेलाच साधूबुवांनी नायक केले आहे. पुस्तकात एकेक घटना घडत जातात, विविध पात्रे, त्यांचे विचार, वागणे, एकमेकात गुंतलेले नातेसंबंध याचे सुरेख चित्रण कादंबरीत केले आहे.

हिंदू - जरी ही कादंबरी कितीही वादग्रस्त असली, जरी नेमाड्यांनी त्यांची स्वत:ची मते खंडेरावाच्या माध्यमातून वाचकांवर लादलेली असली, जरी कादंबरी कधी संपेल असे वाटत असले, अशी ही कादंबरी नावडती असूनही माझी ती आवडतीच आहे कारण कंटाळवाणी, असंबद्ध असूनही वाचकाला ती भरभरून देतेच. एका अर्थी समृद्ध करतेच.

Tue, 25/01/2011 - 12:53 Permalink
सागर

In reply to by वल्ली

छान आहे यादी हे सांगणे न लगे ;)

हिंदू तुझ्या यादीत आहे हे पाहून थोडे आश्चर्य वाटले. कारण नेमाडेंची एक फसलेली कादंबरी म्हणून केवळ टीकाच मी ऐकत आलो आहे. वाचत आलो आहे. अर्थात तू खुलासा दिला आहे व तो व्यक्तीसापेक्ष मानून मी देखील हिंदू वाचणारच आहे :)

स्टार हंटर्स आणि संभाजी सुंदरच आहेत. संभाजीपेक्षा मला छावा थोडी उजवी वाटली. पण तेवढेच. पानिपतकारांनी संभाजी पण सुंदर आणि अफाट ताकदीने उभा केला आहे यात शंकाच नाही.

शाळा आणि प्रकाशवाटा आहेच संग्रहात. लवकरच वाचेन.

तुझ्या यादीतले
७. मुखवटा - अरूण साधू
हे पुस्तक तू सुचवले म्हणूनच घेतले आहे मी. आणि लवकरच वाचणारही आहे.

Thu, 27/01/2011 - 17:48 Permalink
मेघना भुस्कुटे

नंदनला दुजोरा. ज्यातून काहीतरी भरीव आणि उपयुक्त हाती लागेल असा आणि विचार करायला लावणारा उपक्रम आहे खरा.

ही माझी दहा (अर्थातच गुणानुक्रम वगैरे न लावता) -

१) कोबाल्ट ब्लू - सचिन कुंडलकर (कादंबरी)
समलिंगी संबंध हा विषय याआधीही सुमेध वडावालांनी त्यांच्या पुस्तकातून हाताळलेला होता. पण असे संबंध असलेली प्रमुख पात्र असूनही 'कोबाल्ट ब्लू' सनसनाटी होत नाही आणि माहितीपर होत नाही. नात्यांमधले लिंगभावनिरपेक्ष ताणेबाणे उलगडणारं हे पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं. जागतिकीकरणातून आलेल्या समृद्धीमागे धावत सुटलेला आपला (या पुस्तकात प्रामुख्याने मध्यमवर्गीय) समाज आणि त्याच वेळी त्याने उराशी चोंबाळून ठेवलेलं परंपरा-संस्कृती इत्यादींचं सोईस्कर गाठोडं यांतल्या विसंगतीवर हे पुस्तक बोट ठेवतं - अगदी सहजपणे आणि बोचर्‍या उपरोधिक शैलीत.
२) नातिचरामि - मेघना पेठे (कादंबरी)
३) भिन्न - कविता महाजन (कादंबरी)
४) सिगारेट्स - मन:स्विनी लता रवीन्द्र (नाटक / एकांकिका)
आपले गंड, इच्छा, आवडी-निवडी आणि आपली नैतिकता याला अनुसरून आपण आपला जोडीदार निवडत असतो. या सार्‍यात शरीराला कुठे बसवायचं असतं? की वर्षानुवर्षे चालत आलेल्या रीतीप्रमाणे हा विषय कधीही न उच्चारता आपल्या वाट्याला येईल ते निमूटपणे स्वीकारायचं असतं? की निमूटपणे न स्वीकारता सोईस्कर पळवाटा शोधायच्या असतात, पण 'दृष्टीआड सृष्टी' या न्यायानं त्याबद्दल अवाक्षरही न काढता समाजाची नीतीमत्ता कसोशीनं सांभाळायची असते? 'सिगारेट्स'नं हे सगळे प्रश्न उघड उघड विचारले. तरीही नाटक कुठेही अवघडलेलं, बिचकणारं, तथाकथित बोल्ड आणि पर्यायानं अश्लील झालं नाही, हे विशेष.
५) माझी लाडकी पूतना मावशी - सतीश तांबे (कथासंग्रह)
६) बरेच काही उगवून आलेले - द. भा. धामणस्कर (कवितासंग्रह)
७) मौनराग - महेश एलकुंचवार (ललित निबंध)
८) लिहावे नेटके - माधुरी पुरंदरे (निवडक मराठी वेचे आणि भाषिक व्यवसाय)
९) स्टुडिओ - सुभाष अवचट (ललित निबंध)
१०) नाटक - एक पडदा तीन घंटा - राजीव नाईक (नाटकातील सौंदर्यशास्त्राचा अभ्यास)
परिचय इतरत्र. :)

दहा पुस्तकांची मर्यादा पाळणं अर्थातच अवघड आहे. शिवाय प्रकाशनकालाबद्दल चूकभूलदेणेघेणे, मी वाचनकालाला अनुसरून 'दशकातली दहा' दिली आहेत. (पण मी तीन पुस्तकांचा परिचय करून देण्याचा नियम पाळलाय, याची नोंद घ्यावी!)

ही अजून काही महत्त्वाची पुस्तकं-

खाली जमीन वर आकाश - सुनीलकुमार लवटे (आत्मचरित्र),
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर - जयंत पवार (कथासंग्रह),
पिवळ्या छत्रीतली मुलगी - उदयप्रकाश (कादंबरी - अनुवाद कुणी केलात ते आत्ता आठवत नाही. बहुधा जयप्रकाश सावंत, पण सरस अनुवाद आहे),
नांगरल्याविण भुई - नंदा खरे (वैज्ञानिक / सामाजिक / अद्भुत कादंबरी - लेबल नाही बुवा लावता येत!)
निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे उत्रादकर (कादंबरी) (नंदन, ही कादंबरी काळ्या विनोदाच्या चाचणीला उतरेल का?! तू विनोदी पुस्तकासाठी कुरकुरत होतास...)
वाचणार्‍याची रोजनिशी - सतीश काळसेकर (ललित निबंध)
कृष्णकिनारा - अरुणा ढेरे (महाभारततल्या व्यक्तिरेखा वापरून लिहिलेल्या कथा?! काय की. नो लेबल अगेन.)

Tue, 25/01/2011 - 13:26 Permalink
सागर

In reply to by मेघना भुस्कुटे

मेघना,

तुझी यादी व सविस्तर विवेचन वाचून मस्तच वाटले. लै भारीच आहे.

कोबाल्ट ब्लू काय आहे ते एकदा सविस्तर तू लिहिच. अशी माझी विनंती आहे.
कारण विषय पाहून कोबाल्ट ब्लू मी घेतलेली ३ वेळा खाली ठेवून दिली आहे. मला त्या विषयामुळे असेन कदाचित पण पुस्तक घ्यायची हिम्मत नाही झालेली. एकदा त्यावर सविस्तर वाचले की मग ठरवणे सोपे पडेल मला.

तुझ्याही यादीत मौनराग आणि स्टुडिओ दिसल्यामुळे या दोन पुस्तकांनी माझ्या नजरेत घर केले आहे.
बहुतेक पुण्यनगरीच्या पुढच्या भेटीत ही २ व या धाग्यावरील काही पुस्तके घेईन :)

Thu, 27/01/2011 - 17:54 Permalink
ऋषिकेश

वा! अवघ्या तीन प्रतिसादान मी न वाचलेली न ऐकलेली किमान १० पुस्तकांची नावे आली आहेत. मेघनाच्या लै भारी प्रतिसादाने तर धागा आताच वसूल झाला आहे :)

बाकीच्या महारथी वाचकांच्या प्रतिक्रीयांची वाट पाहतो आहेच

Tue, 25/01/2011 - 14:27 Permalink
वल्ली

In reply to by ऋषिकेश

अर्थातच ऋ. आता तुला बाकीच्यांच्याही प्रतिक्रिया जमा झाल्यावर धागाकर्ता म्हणून प्रतिसादांचे सविस्तर विश्लेषण करून निष्कर्ष काढावा लागेल.

Tue, 25/01/2011 - 14:36 Permalink
ऋषिकेश

In reply to by सागर

कितीही डोळे मारणार्‍या स्मायली टाकल्यास तरी तुझ्याही यादीची वाट पाहतोय एवढं लक्षात असु दे म्हंजे झालं :P

Tue, 25/01/2011 - 20:07 Permalink
सागर

In reply to by ऋषिकेश

ऋ,

अरे माझी यादी थोडा विचार करुन देतो रे.
कारण टॉप २० देणे त्या तुलनेने थोडे सोपे होते. या दशकातीलच पुस्तके सांगायची म्हणजे आधी खात्री करुन घ्यावी लागेल की माझ्या यादीतले पुस्तक याच दशकातले आहे ते :)

शक्यतो उद्या देईन. नाहीतर मग परवा सकाळी नक्की
माझ्या यादीत कविताबाईंचे 'ब्र' आहेच. पण अजून खूप चांगली पुस्तके आहेत.
लवकरच देतो

Tue, 25/01/2011 - 21:23 Permalink
मणिकर्णिका

ही माझी यादी. पसंतीक्रमानुसार-

१.त्या वर्षी-शांता गोखले

कॅन्व्हासवर यच्चयावत सगळे रंग उधळून दिलेले असावेत तसं मला हे पुस्तक वाचताना नेहमी वाटतं.
'त्या वर्षी' म्हणजे बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंग्यात अनिमाचा नवरा सिद्धार्थच्या मारले जाण्यानंतरच्या वर्षाचा, आणि त्या वर्षी या घटनेची झळ पोहोचलेली-न पोहोचलेली लोकं-त्यांच्या आयुष्यांचा घेतलेला मागोवा.
अनिमाच्या भरकटलेपणापासून सुरु होऊन अनेक समांतर कथांचा प्रवास आहे. अशेष, हरिदास, जानकी, फ़िरोज, शारदा, शेखर. पण तरीही या सर्वांना जोडणारा एक समान धागा आहे- तो म्हणजे सर्जनशीलतेचा. निर्मितीचा क्षण, आपल्याला हे असं-असंच का वाटत असावं या विचार-प्रक्रियेबद्दलची आस्था, कधीकधी उत्तरं शोधताना होणारी फरफट, निष्ठा-मूल्ये यांची आजची पिढी करु पाहात असलेली नवी परिभाषा हे आपल्या पिढीचं जास्त आश्वासक रुप शांता गोखलेंनी मांडलं आहे.
आता आहे तर उद्या नाही-नसू शकतं हे कळल्याने आजचं आयुष्य अधिकाधिक समजून घेत पुढे जाणारी ही सगळी तरुण मंडळी, चित्रात कॉन्ट्रास्ट असावा त्याप्रमाणे जनसामान्यांची कलाकार लोकांकडे बघायची उपरोधिक, उपहासगर्भ वृत्ती, कलेच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी, अण्णा, बच्चूकाका या मावळत्या पिढीने तटस्थपणे आजच्या पिढीकडे बघत स्वतःच्या आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा, क्वचित जुळवून घ्यायची केलेली धडपड इत्यादी इत्यादी म्हणजे 'त्या वर्षी'.
शांता गोखलेंचं 'रिटा वेलिणकर'ही यादीत होतं. पण ते गेल्या १०-१५ वर्षातलं नाहीये.

२.उत्खनन-गौरी देशपांडे

:)
माझं नावच सांगतं की मला ही कादंबरी का आवडते ते.
शांता गोखलें नी पहिलं स्थान पटकवायच्या आधी कितीतरी वर्षं हीच कादंबरी माझी सर्वात आवडती राहिलेली आहे.
ह्या पुस्तकाची ’ओळख’ मी करुन देणे हा फ़ार मोठ्ठा विनोद होईल. का आवडलं ते सांगू शकेन.
’मणिकर्णिका’ उर्फ़ मणि. तिचे ठाम सुस्पष्ट विचार, आपल्याला काय हवं आहे-काय करायचं आहे याची विलक्षण खात्री आणि त्यामुळेच चार लोकं कुचकटपणे काही बोलतील त्याला अजिबात भीक न घालता स्वत:ला हवं तेच-आणि हव्या त्या पद्धतीनेच करायची पद्धत, आणि एव्हढी खात्री असूनही शक्यतांसाठी जपलेली जागा, जबरदस्त आत्मविश्वास हे सगळंच मला भावतं, जवळचं वाटतं. या कादंबरीतल्या पात्रांमध्ये आणि माझ्या प्रियजनांमध्ये बरीच साम्यस्थळं आहेत. आणि म्हणूनच मी या कादंबरीतल्या पात्रांशी-मणिशी स्वत:ला रिलेट करु शकले (तादात्म्य पावू शकले?)
गौरी देशपांडेंच्या ’थांग आणि दुस्तर हा घाट’ आणि ’उत्खनन’ मध्ये जास्त कोणतं आवडतं हा मुद्दा माझ्यालेखी खूपच विवाद्य राहिलेला आहे. थां-दु.ह.घा वनमाळी आणि दिमित्रीसाठी जास्त आवडतं की उत्खनन ’मणि’साठी? आणि नेहमीच ’मणि’चे पारडे जड राहिलेय हे सांगायला नकोच.

३.सेतू-आशा बगे
४.युगांत-महेश एलकुंचवार
५.ओश्तोरीज- अनंत सामंत

६.महर्षी ते गौरी (स्त्री स्वातंत्र्याची वाटचाल)-मंगला आठलेकर

धोंडो केशव कर्वे, र.धों.क र्वे आणि गौरी देशपांडे या कर्वे घराण्याच्या तीन पिढ्या. प्रत्येकाने स्त्री-स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यासाठी उभं आयुष्य वेचलं.
महिला शिक्षणाचा आग्रह धरणारे धोंडो केशव ,समागम-स्वातंत्र्य आणि संततीमियमन या त्या काळातल्या 'अब्रह्मण्यम!' म्हणवल्या जाणारया कल्पनांच्या पुरस्काराकरता एकाकी झुंज देणारे र.धों, त्याहीपलीकडे जाऊन व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारया गौरी देशपांडे. सामाजिक रुढी-बंधनं-चौकटींना यातलं कोणीही कधीही बधलं नाही.
स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचं पुरोगामित्व वारसाहक्काने कसं पुढच्या पिढीकडे आलं, काळानुसार नवीन पिढीच्या स्त्री-स्वातंत्र्याबद्दलच्या कल्पनांमध्ये कशी स्थित्यंतरं घडत गेली हे जाणून घेण्याकरता तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

७.कोबाल्ट ब्लू-सचिन कुंडलकर

८.भिंतीत एक खिडकी असायची- विनोदकुमार शुक्ल. अनुवाद-निशिकांत ठकार
विनोदकुमार शुक्लांची 'दीवार में एक खिडकी रहती थी' निशिकांत ठकार यांनी मराठीत आणलीये. अप्रतिम आणि निर्दोष अनुवाद. ठकारांना १०० पैकी १०० मार्क.
चाकोरीबद्ध आयुष्य जगताना सामान्य माणसाची सतत काही ना काही नावीन्य शोधायची धडपड, कादंबरीचा नायक रघुवर प्रसाद-त्याचं वास्तवातलं अद्भुत शोधणं, ते शोधता शोधता फिरुन वास्तवातच येणं, वरवर विनोदी वाटणारया सिच्युएशन्समध्ये ओतप्रोत भरलेला, हसणं थांबल्याच्या पुढच्याच क्षणी कळणारा,आणि विलक्षण अस्वस्थ करणारा दुसराच अर्थ, हे सर्व दैनंदिन घडमोडीच्या स्वरुपात या कादंबरीत मांडलंय.
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेली कादंबरी.

९.प्रिय जी.ए- (सुनीताबाईंनी जी.एंना लिहीलेली पत्रं)
१०.जन्मलेल्या प्रत्येकाला-प्रिया तेंडुलकर

याशिवाय आणखीही पुस्तकं आहेत ज्यांचा उल्लेख नाही केला तर मी सुखाने झोपू शकणार नाही.
यामध्ये मात्र पसंतीक्रम नाही. सर्व पुस्तकं तेव्ह्ढीच, तितकीच आणि सारखीच आवडतात.

आंधळ्याच्या गायी-मेघना पेठे
भिजकी वही-अरुण कोलटकर
विंचुर्णीचे धडे-गौरी देशपांडे
बखर बिम्मची-जी.ए-हे पुस्तक कोणत्या सालचं आहे हे मला माहीत नाही. पण या पुस्तकाला काळात जखडू नये असं मला वाटतं. अगदी टाईमलेस पुस्तक आहे.
ओक्टोबर एण्ड-अनंत सामंत
भूमी-आशा बगे

---
समाप्त :)

Wed, 26/01/2011 - 08:23 Permalink
मणिकर्णिका

In reply to by मेघना भुस्कुटे

एनीटाईम!,जी.एन्ना पत्रांबद्दल मला माहीत नाही,पण 'त्या वर्षी' तुझ्याकडून सुटलं तेव्हाच आश्चर्य वाटलं.
आणि 'त्या वर्षी 'चा उल्लेख पहिल्यांदा आपल्याला करायला मिळणार याने हुरळायला पण झालं. 'कोबाल्ट ब्लू' बद्दल मात्र माझा सपशेल पोपट.

Wed, 26/01/2011 - 11:43 Permalink
मेघना भुस्कुटे

In reply to by मणिकर्णिका

बाकी 'भिजकी वही'बद्दल सविस्तर लिहिणार का? अजून वाचायला घ्यायची हिंमत होत नाही, कारण मला कविता जरा जड जातात...

Wed, 26/01/2011 - 11:49 Permalink
मणिकर्णिका

In reply to by मेघना भुस्कुटे

अगं मेघना, भलतंच धाडस करायला सांगते आहेस.
मला आवडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला लिहीता आलं असतं तर पुस्तकविश्ववर रोजच्या रोज एक नवी पोस्ट टाकली असती मी.
प्रयत्न जरुर करीन.

Wed, 26/01/2011 - 11:57 Permalink
सागर

In reply to by मणिकर्णिका

काहीतरी भारी प्रकरण दिसते आहे हे कोबाल्ट ब्लू

बाकी मणिकर्णिका तुझ्या यादीतले प्रिय जीए आणि एलकुंचवारांचे युगांत सोडले तर बाकीची सगळी अपरिचीत आहेत माझ्यासाठीतरी.
बाकी तुझ्या यादीतील ४ पुस्तकांवर तू सविस्तर लिहिले असल्याने मला या पुस्तकांची छान ओळख झाली
त्याबद्दल तुला धन्यवाद. :)

Thu, 27/01/2011 - 17:58 Permalink
शमिश

या दशकातील फारशी पुस्तके वाचलेली नाहीत. त्यामुळे माझी यादी अशी नाहीच :(
पण अत्तिशय आवडलेलं पुस्तक म्हणजे 'बाकी शून्य'.

बारोमास कित्येक दिवसांपासून पडून आहे, पण अजून वाचायचा मुहूर्त शोधतोय!

Wed, 26/01/2011 - 09:08 Permalink
ऋषिकेश

मेघना वा मणिकर्णिका यांपैकी कोणी तरी कोबाल्ट ब्लूबद्दल अधिक विस्ताराने वेगळ्या धाग्यात लिहाल का? या पुस्तकाबद्दल एका मित्राकडून बरंच ऐकलं होतं. विकत तर घेईनच.. पण विस्ताराने परिचय वाचायलाही आवडेल

Wed, 26/01/2011 - 14:49 Permalink
सागर

मी खरे तर पुस्तक वाचताना ते कधी प्रकाशित झाले याकडे अजिबात लक्ष देत नाही.
या निमित्ताने हे अवलोकन झाले खरे.

यादी देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे पण माझी यादी परीपूर्ण असेनच असे नाही , नंतर आठवले की त्यात नक्की भर टाकेन.

विचार न करता पहिली सहा लगेच डोळ्यांसमोर आली, व बाकीची शोधावी लागली. त्यात अनुवादीत पुस्तके जास्त आहेत याचा नक्कीच खेद आहे मला. पण ही वस्तुस्थिती आहे. बहुतेक अजून ५-६ महिन्यांनी मला मागील दशकातील पुस्तके जास्त अधिकाराने देता येतील.

२००० ते २०१० या दशकातील मला आवडलेल्या पुस्तकांची यादी

१. प्रतिस्पर्धी - किरण नगरकर (ककल्ड चा अनुवाद) - रेखा सबनीस - पहिली आवृत्ती : २००८
२. ब्र - कविता महाजन - पहिली आवृत्ती : मे २००५
३.१ अभयारण्य - डॉ. जयंत नारळीकर - (पहिली आवृत्ती : २००२ )
३.२ व्हायरस - डॉ. जयंत नारळीकर
४. पूर्वांचल - अविनाश बिनिवाले (जबरदस्त आणि प्रत्येकाने वाचावे असेच पुस्तक)
५. दा विंची कोड - डॅन ब्राऊन - अनु: अजित ठाकूर
६. एन्जेल्स अ‍ॅन्ड डेमन्स - डॅन ब्राऊन - अनु: बाळ भागवत
-----
७. द अल्केमिस्ट - पाओलो कोएलो - अनु: नितीन कोत्तापल्ले
८. नभात हसरे तारे - जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, अजित केंभावी
९. कालगणना - मोहन आपटे
१०.किमयागार - अच्युत गोडबोले.
११.साधनामस्त - जगन्नाथ कुंटे

अजून वाचले नाहीत पण २००० - २०१० या दशकातील सर्वोत्तम माझ्या यादीत नक्की आले असते याची खात्री असल्याने ही पण यादी देतो आहे.

१. शाळा - मिलिंद बोकील
२. बारोमास - सदानंद देशमुख
३. आदिबंध - बापू करंदीकर
४. नांगरल्याविण भुई - नंदा खरे
५. उर्जेच्या शोधात - प्रियदर्शनी कर्वे
६. प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
७. समिधा - साधना आमटे
८. दूरदर्शी - माणिक कोतवाल ( गॅलिलिओ वर आहे)

Thu, 27/01/2011 - 15:04 Permalink
सागर

In reply to by ऋषिकेश

अभयारण्य - डॉ. जयंत नारळीकर
जयंत नारळीकरांच्या सर्वच पुस्तकांचा मी चाहता आहे. अभयारण्य आणि व्हायरस विशेष आवडण्याचे कारण म्हणजे त्यातील वैज्ञानिक तार्किकता. असे होऊ शकते व बौद्धीक कसोटीवर पटणारी अशी ही दोन पुस्तके आहेत. नारळीकरांच्या कादंबर्‍यांवर मी भाष्य करणे म्हणजे प्रखर सूर्यापुढे काजव्याने चमकण्याचा प्रयत्न करणे आहे. यातले व्हायरस या कादंबरीत वापरलेली शत्रूच्या संगणकप्रणालीत व्हायरस सोडायची कल्पना आपल्याला इंडिपेन्डन्स डे या चित्रपटात जशीच्या तशी बघायला मिळते.
अभयारण्य या कादंबरीत एका परकीय जीवसृष्टीचे २ प्रतिनिधी मानवाची प्रगती पडद्याआड राहून बघत असतात. वेळोवेळी मदतही करत असतात. पण मानव शेवटी अण्वस्त्रे तयार करुन थांबत नाही तर ही अण्वस्त्रे उपयोगात आणू बघतो. त्याचवेळी पडद्याआड राहणारे हे परकीय जीव राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत आवाजाच्या माध्यमाने जाहीर करतात की त्यांनी जगातील सर्व अण्वस्त्रे एका तंत्राने निकामी केली आहेत. आणि आता तरी मानवाने सुधारावे अशी ते विनंती करतात. त्यांनी मानव प्रगत होईपर्यंत जे निरिक्षण केलेले असते ते वाया जाऊ नये असेही त्यांचे म्हणणे असते. एक कळ दाबून जशी त्यांनी अण्वस्त्रे निकामी केली तद्वतच मानव नष्ट करण्याची वेळ येऊ नये हा गर्भित संदेशही ते देतात. कितीही पारायणे केली तरी ही कादंबरी मी आजही तेवढ्याच तल्लीनतेने वाचतो.
या दोन पुस्तकांबद्दल एवढेच.

साधनामस्त - जगन्नाथ कुंटे
जगन्नाथ कुंटे हे नर्मदा परिक्रमावासी म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्यांच्या अनुभवांवर त्यांनी नर्मदे हर पुस्तक लिहिल्यानंतर, साधनामस्त हे केवळ साधनामार्गावर प्रवास करणार्‍या मुमुक्षुंना मार्गदर्शन ठरेल असे पुस्तक लिहिले होते. हा हेतू साधनामस्त मधून साध्य होतोच. पण साधना मार्गावर प्रवास करु इच्छिणार्‍यांना एक सकारात्मक दृष्टीकोन हे पुस्तक नक्कीच देते. त्यामुळे अध्यात्म, योग या मार्गात रस असणार्‍यांनी अवश्य वाचावे असेच आहे हे पुस्तक.

पूर्वांचल - अविनाश बिनिवाले (जबरदस्त आणि प्रत्येकाने वाचावे असेच पुस्तक)

पूर्वांचल मी वाचायला घेतले आणि पहिल्या काही पानांतच झपाटला गेलो. भारताच्या भौगोलिकदृष्ट्या निसर्गाची प्रचंड कृपा असलेल्या पूर्वेकडील प्रदेशाकडे सरकारने दाखवलेला दुर्लक्षपणा आणि तेथील अडचणी यांबरोबरच आपल्या ज्ञानातही चांगली भर पडते. उदाहरणार्थ, ब्रह्मपुत्रा नदीला आपण सर्वजण नदी म्हणतो. प्रत्यक्षात पुर्वेकडे तिला 'नद' असे म्हणतात. आणि 'नद' हेच नाव कसे योग्य आहे हे ही बिनिवाले व्यवस्थितपणे स्पष्ट करुन सांगतात. तीच गोष्ट असम ची. आपल्या मुखात 'आसाम' व आसाम ची भाषा आसामी असेच बसलेले असते. खरा उच्चार असम व असमी असा आहे.
तसेच असमचे सर्वात मोठे शहर गुवाहाटी हे कसे सार्थ नामाभिधान आहे हेही सोप्या भाषेत अविनाश बिनिवाले समजावून देतात. "गुवा" + "हाटी" अशी ती फोड आहे. हाटी म्हणजे बाजार. असममध्ये त्या परिसरात सर्वात जास्त उत्पादन होते ते 'गुवा' याचे. व एक मोठा बाजार तिथे भरतो. त्यातूनच 'गुवाहाटी' ही असम ची (आर्थिक) राजधानी झाली. ही सर्व माहिती अवघ्या पहिल्या प्रकरणात मिळाली तर पुढील सर्व प्रकरणे कशी असतील याचा अंदाज यावा :). अफाट ज्ञानाने भरलेले हे पुस्तक वाचावे असेच आहे.

Thu, 27/01/2011 - 16:38 Permalink
यशोधरा

In reply to by सागर

अरे सहीच रे सागर.

तुला आता तेच लिहित होते की थट्टा राहूदेत, पण नारळीकरांच्या पुस्तकांबद्दल लिही बरं - असं.
किमयागारबद्द्लही लिहायचेस. पूर्वांचलबद्दल लिहिलेस, त्याबद्दल धन्यवाद. ही पुस्तकं मी वाचलेली नाहीत. पूर्वांचल मला घ्यायचे आहे. आता नक्की घेईन.
आणि
मला भाष्य वगैरे करायला सांगितलेस? भलतेच ग्रेट वाटले मला! धन्यचवाद. :) पण उगाच काय?:)

Thu, 27/01/2011 - 16:41 Permalink
सागर

In reply to by यशोधरा

तू प्रश्न विचारला होतास म्हणून तुला तुझे मत विचारलेच होते गं यशोधरा. पण मला बाकीच्या दिग्गजांच्याही प्रतिक्रियांची वाट बघतो आहे.
अरे कुठे गेलेत सगळे?

नंदन,
वल्ली,
मेघना,
यशोधरा,
मणिकर्णिका,
आणि मी

यांनीच फक्त आतापर्यंत गेल्या दशकातील त्यांच्या आवडीची पुस्तके दिली आहेत

पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चाही नक्की करुयात.
मजा येईल.

इंद्रराज, श्रामो, निखिल, टण्या, ऑरागॉर्न, दिगम्भा, वेदश्री, शमिश, नीधप, चिंतातुर जंतू, प्रभाकर नानावटी, चित्रा, शर्मिला, ... अजून काही राहिले असतील तर तेही सर्वजण आणि मुख्य करुन धागाकर्ता ऋषिकेश :)

आपण सर्वांनी आपली यादी लवकरात लवकर द्यावी ही विनंती.

Thu, 27/01/2011 - 18:29 Permalink
मणिकर्णिका

In reply to by सागर

सागर,
प्रतिस्पर्धी माझ्याही यादीत होते. पण त्याहूनही जास्त मला मी दिलेली पुस्तकं आवडलीत असं आहे.
तुझ्या यादीतील ओळखीची आहेत पुस्तकं. किमयागार मात्र नाही वाचलेलं.
२००८च्या अक्षरधारामध्ये त्यावर काहीतरी सवलत होती तेव्हा घेता आलं असतं पण तेव्हा पण प्रायोरिटी वेगळ्याच पुस्तकांना होती.
तुझ्या 'विचारही न करता पहिले डोळ्यासमोर' आलेल्या यादीमध्ये अनुवादच जास्त आढळले मला. का रे बाबा? या मातीतली पुस्तकं आवडत नाही का तुला ब्वा? :)
आणि तुला खरं सांगू का? म्हणजे तुझी आवड असेल तर ठिकच पण 'द अल्केमिस्ट' एकदा इंग्रजीत वाचून बघ ना. अगदी साधीसोप्पी भाषा आहे.
अजित ठाकूरांचा अनुवाद सरस पण बाळ भागवतांबद्दल नाही ऐकलेलं फारसं. जसं आपण (म्हणजे मी!)रविंद्र गुर्जर, अपर्णा वेलणकर, अजित ठाकूर, उमा कुलकर्णी म्हटलं की विचारही न करता पुस्तक उचलते,तसं बाळ भागवतांबद्दल नाही ऐकलेलं फारसं. खूप चांगला अनुवाद केलाय का त्यांनी?
बाकी शाळा तुझ्या यादीत एव्हढं खाली बघून आश्चर्य वाटलं.

Thu, 27/01/2011 - 19:12 Permalink
सागर

In reply to by मणिकर्णिका

मणिकर्णिका,

खुद्द मलाच माझ्या यादीबद्दल खेद वाटतो आहे हे मी प्रामाणिकपणे नमूद करतो. तसे मी माझ्या यादीच्या सुरुवातीला म्हटलेही आहे. या मातीशी माझी जी नाळ जुळली आहे ती कधीच तुटणार नाही.

पण गेल्या काही वर्षांत अनुवादीत पुस्तकांचे वाचन जास्त झाले आहे एवढे नक्की. म्हणून असेन कदाचित पण इतरही अनेक पुस्तके अजून वाचलीच नाहियेत. म्हणून माझ्या यादीत नाहियेत.

बाकी शाळा तुझ्या यादीत एव्हढं खाली बघून आश्चर्य वाटलं
तू असे म्हणालीस यातच सगळे आले. शाळा माझ्याकडे अनेक महिने पडून आहे पण अजून वाचलेले नाहिये.
वाचले असते तर नक्की हे पुस्तक माझ्या यादीत आले असते. अशीच अजून कित्येक पुस्तके वाचायची आहेत. अजून ५-६ महिन्यांनी माझी गेल्या दशकातील यादी बदललेली असेन याची मलाच खात्री आहे :)

अल्केमिस्ट इंग्रजीतून नक्की वाचून बघेन आता. आवडतात मला तशी पुस्तके. सेवन इयर्स इन तिबेट हे देखील असेच छान पुस्तक आहे. अर्थात दोन्हीत बराच फरक आहे.

बाळ भागवतांनी तशी कमीच पुस्तके अनुवादित केली आहेत.
ली चाईल्ड चे वन शॉट
फ्रेडरिक फोर्सिथ चे द अफगाण
शैली मला आवडली. छान अनुवाद करतात.
डॅन ब्राऊनचे दा विंची अजित ठाकूरांनी तितक्याच ताकदीने मराठीत आणले. व त्यांची शैली पण छान आहे अनुवादाची. अशोक पाध्येंना मात्र तो सूर मिळाला नाही असे वाटते. डॅन ब्राऊन ची डिजिटल फोर्ट्रेस आणि डिसेप्शन पॉईंट या दोन्हीचा अनुवाद मला फारसा नाही आवडला.
एन्जल्स अ‍ॅन्ड डेमन्स मला दा विंची पेक्षा जास्त आवडली. मस्तच आहे ती.

Fri, 28/01/2011 - 13:18 Permalink
सागर

वरील दिग्गजांच्या यादीत मना सर्जना दिसले नाही म्हणून केवळ एक शंका म्हणून विचारतो आहे.
मना सर्जना मीही नाही वाचलेले पण बद्दल खूप सुंदर असे अभिप्राय आहेत म्हणून लक्षात आणून देतो आहे इतकंच. :)

Thu, 27/01/2011 - 18:01 Permalink
इंद्रराज पवार

ऋषिकेश यानी सदस्यांनी वाचलेल्या दहा "उत्तम" पुस्तकांची यादी देण्याचे आवाहन केले आहे. इथे 'उत्तम' चे प्रयोजन माझ्यापुरते मी 'मला उत्तम वाटलेले' असेच घेतो....(बाकीच्यांचीही तीच भावना असेल). हे अशासाठी म्हणत आहे की, मला 'हिंदू' उत्तम वाटली म्हणजे ते एकजात सर्वाना तशी वाटेल असे बिलकुल होत नाही. तसे पाहिले तर 'हिंदू' कादंबरी मला आवडली असे म्हणायचीदेखील चोरी झाली आहे अशी सांप्रत महाराष्ट्रदेशा सध्या अवस्था झाली आहे. त्याला कारण ३०-३५ वर्षे वाट पाहायला लावूनही अपेक्षापूर्तीचे समाधान या कादंबरीने दिले नाही आणि हकनाक गाजावाजा झालेले एक पुस्तक असा नजरेने तीकडे पाहण्याचा जणू ट्रेंडच पडला आहे. असो....वाचन स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर मतस्वातंत्र्यही असल्याने 'मला हिंदू उत्तम वाटली तर त्याची कारणेही माझ्यापुरतीच सीमित राहतील असेच काहीसे या कादंबरीचे झाले आहे. पण कसेही असली तरी या दशकातील ते एक बहुचर्चित पुस्तक ठरले हे मात्र निखळपणे सर्वच मान्य करतील. 'हिंदू' निमित्ताने का होईना लोक आगावू पैसे भरून कादंबरीची वाट पाहात राहिलेले दिसले ही मराठी साहित्याच्या उलाढालीतील एक ठळक घटनाच या दशकाने दिली.

तर मला उत्तम वाटलेली दहा पुस्तके :
१. हिंदू : भालचंद्र नेमाडे
२. संध्यामग्न पुरुषाची लक्षणे : ग्रेस [यावर स्वतंत्रपणे लिहिण्याचा मनात विचार आहे, त्यामुळे आता त्रोटकपणे इथे लिहिणे रद्द करतो.]
३. पुन्हा मर्ढेकर : विजया राजाध्यक्ष
४. शोध मर्ढेकरांचा : विजया राजाध्यक्ष
[मर्ढेकर हा विजयाबाईंच्या मनाचा हळवा कोपरा आहे, हे पदोपदी जाणवतेच. इतकेच काय त्याना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तोही 'मर्ढेकरांची कविता' याच पुस्तकाबद्दल. वरील दोन्ही पुस्तके वाचताना वाचकाला सातत्याने वाटत राहते की तो खुद्द मर्ढेकरांसमवेत प्रवासास निघाला आहे. बाईंनी किती कष्ट घेतले आहे संशोधनासाठी हे प्रत्येक पानावर जाणवते. अप्रतिम संशोधन आणि तितकीच मौजेची देखणी निर्मिती.....केव्हाही वाचायला घ्या....अन् कुठूनही सुरू करा... एक विलक्षण अनुभूती नि:संशय !]
५. प्रिय जी.ए. ~ सुनीता देशपांडे
६. लमाण ~ डॉ.श्रीराम लागू [स्वतंत्र लिहिन, पुढे]
७. महाभारताचा मूल्यवेध ~ डॉ.रवींद्र शोभणे
८. शाळा ~ मिलिंद बोकील [प्रत्येक घरात असावी अशी ही कादंबरी.....आणि विशेष म्हणजे दशकातील ही एकमेव कादंबरी असावी की जिच्या उत्तमतेबद्दल दुसरे वाकडे मत प्रदर्शीत झालेले नाही...सर्वार्थाने सर्वानी आपलीशी केलेली ही निर्मिती ठरली आहे.]
९. एका तेलियाने ~ गिरिश कुबेर ~ जागतिक अर्थव्यवस्थेच्या किल्ल्या ज्याच्या हाती आहेत अशा अफलातून तेलियाची ही सत्यकथा....कादंबरीही फिकी पडावी असे जीवन आणि जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेलाही जाब विचारू शकणारी मनोवृत्ती निर्माण करणारा एक अफलातून तेलिया.....फार सुंदर पुस्तक लिहिले आहे श्री.कुबेर यानी.
१०. भिन्न ~ कविता महाजन.

Thu, 27/01/2011 - 22:28 Permalink
ऋषिकेश

माझी आवडती दहा (कोणत्याही क्रमाने नाही):

१. ब्र - कविता महाजन
२. बरेच काही उगवून आलेले - द. भा. धामणस्कर
३. प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे
४.१ गार्गी अजून जिवंत आहे- मंगला आठलेकर
४.२ मुलगा माझाच - विजया जोशी
५. समिधा - साधना आमटे
६. उर्जेच्या शोधात - प्रियदर्शनी कर्वे
७. मराठी भाषेचे मुळ - चंद्रकांत खैरे
८.१ एका तेलियाने
८.२ अधर्मयुद्ध
९. कार्यरत
१०.१ मेक्सिकोपर्व
१०.२ दक्षिणरंग

Fri, 28/01/2011 - 09:09 Permalink
यशोधरा

देवांची जन्मकथा - पुषपा त्रिलोकेकर. पुस्तकाबद्दल नंतर थोड्या विस्ताराने लिहिते ह्याच प्रतिसादात. मी आताच वाचायला घेतले आहे, आणि अतिशय आवडत आहे. श्रीविद्या प्रकाशनाचे हे पुस्तक. २००७, २००८ आणि २००९ मधे लागोपाठ वर्षावर्षाच्या आत ह्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघाल्या आहेत.

Fri, 28/01/2011 - 12:52 Permalink
सागर

In reply to by यशोधरा

यशोधरा,

हे पुस्तक मी वाचलेले आहे. अगदी सुंदर आहे.
मलाही आवडले होते हे पुस्तक.
पुष्पा त्रिलोकेकरांनी हे पुस्तक खूप छान लिहिले आहे.
सुंदर निवड :)

Fri, 28/01/2011 - 18:21 Permalink
टण्या

ह्या धाग्यामुळे बर्‍याच नवीन पुस्तकांचा परिचय होत आहे. म्हणजे बरीचशी पुस्तके ऐकलेली आहेत पण आवर्जून वाचलेली नाहीत. एका चौकटीत अडकून पडल्याप्रमाणे माझे मराठीचे वाचन खुंटले आहे. झटकन नवीन पुस्तक उचलले जात नाही आणि गेली दहा वर्षे लायब्री वापरत नसल्याने एखाद्या नवीन लेखकाचे पुस्तक पटकन विकत घेतले जात नाही. तुम्हा लोकांमुळे माझ्यासारख्या त्यामानाने कमी वाचणार्‍या वाचकाला खूप मदत होते आहे.

Fri, 28/01/2011 - 17:34 Permalink
मुक्तसुनीत

In reply to by टण्या

पूर्णतः , शब्दशः सहमत.

वर आलेल्या अनेकानेक पुस्तकांच्या उत्तम याद्या वाचताना मनात आलेले काही विचार.

नव्वदीच्या दशकाने मराठी साहित्याला बोकील, पेठे हे महत्त्वाचे लेखक दिले. या दशकात जीएंची पत्रे आली. लेखकांच्या पत्नींच्या आत्मचरित्रांचा ट्रेंड या दशकातलाच. ("आहे मनोहर तरी" , "रास" आणि इतर). नव्वदोत्तरी पिढीची पहिली लाट या दशकातली.

या पार्श्वभूमीवर , एकविसाव्या शतकातल्या पहिल्या १०-११ वर्षांनी मराठी लिखाणात कुठले नवे लेखक/ट्रेंड्स आले याचा सम्यक् विचार करता येईल.

काही नवे लेखक या शतकात प्रकाशात आलेले दिसतात.
रमेश इंगळे उत्रादकर : कवितांनी हे नाव पुढे आले नि कादंबरीने मोठा ठसा उमटवला.
कविता महाजन : दोन कादंबर्‍यांनी या दशकातल्या महत्त्वाच्या पुस्तकात स्थान मिळविले.
सचिन कुंडलकर : कादंबरी, नाटक नि आता चित्रपटही. गेल्या दशकात उदयाला आलेले महत्त्वाचे नाव.
(माझी यादी अपुरी असण्याची दाट शक्यता आहे. अन्य जाणकाराना निश्चितच भर टाकता येईल. )

या दशकात दिसलेले ट्रेंड्स कुठले ?
१. "अभिधानंतर" : या अनियतकालिकाचे योगदान महत्त्वाचे आहे असे म्हणता येईल. हे नाव उच्चारल्यावरच दिवटे, केतकर, मन्या जोशी सलील वाघ आदिंची मांदियाळी डोळ्यासमोर येते. या मूळ ग्रूपपासूनच वेगळे झालेले मंगेश काळे , नितीन रिंढे यांसारखे लोक याच चळवळीचे घटक ठरतात. या सर्वांची प्रतिमा कवी अशी असली तरी अनेक वेळा यांनी आपल्या पिढीची आयडेंटीटी, त्यांच्या अवकाशाची त्याना झालेली जाणीव, बदलत्या वास्तवातले साहित्याचे स्थान याबद्दल वेळोवेळी लिहिलेले आहे.

२. "मौज", "पॉप्युलर" , "मॅजिस्टिक" या सारख्या प्रकाशनांचे स्थान "राजहंस" आणि "लोकवाङ्मयगृह" या प्रकाशनांनी घेतल्याचे दिसते. जुनी प्रकाशने अर्थातच बंद पडलेली नाहीत; परंतु नव्या दमाच्या लिखाणाकरता आज नव्या प्रकाशनांकडे पाहिले जाते हेही खरे. आजसुद्धा नेमाड्यांसारखा जुना बालेकिल्ला जरी पॉप्युलरकडे शाबूत असला तरी नवनवे लेखक येतात ते नव्या प्रकाशनांकडून. (किंबहुना "जुने" नि "नवे" किल्ले यातल्या फरकाचीच निदर्शक अशी ही गोष्ट आहे. ) जुनी प्रकाशने जिथे पुलं , नेमाडे आणि इतरांच्या नवनव्या आवृत्त्या काढत आहेत तिथे नव्यांचे लिखाण नव्या प्रकाशनांकडून येण्याचा ट्रेंड निश्चित होताना दिसतो.

हीच गोष्ट मग दिवाळी अंकांमधेही प्रतिबिंबित होताना दिसते. जिथे मटा , लोकसत्ता नि ललित आपल्या जुन्या पुण्याईवर तग धरण्याचा प्रयत्न करतात तिकडे "शब्द" सारखे प्रकाशन नवनव्या लेखकांना वाव देते. (शब्द च्या प्रकाशकांना म्हणूनच मग मुद्दाम , मॅजेस्टिक गप्पांच्या दिवशी नि वेळीच "शब्द" गप्पा भरवण्याची खुमखुमी येते. )

३. कुणाला आवडो न आवडो, पण सलील-संदीप ही घटना या दशकाचीच. खरे यांच्या कविता/गाण्यांची लोकप्रियता हा घटक दृष्टीआड करता येत नाही - त्यातल्या गुणवत्तेबद्दल बरेच बोलता येत असले तरी :)

४. नंदन ने मांडलेले विनोदाचे निरीक्षण योग्यच आहे. "मराठी विनोद कसा मेला" किंवा तो "मृतवत् का झाला आहे" हा अत्यंत रोचक विषय होईल. काही उपनिरीक्षणे नोंदवतो.

अ. पुलंचे जाणे : आता एका व्यक्तीच्या जाण्याने एखादा लेखनप्रकार बंद कसा होईल ? पण या घटनेचा काही संबंध लागतो का ? हे पाहणे रोचक होईल.
आ. "जत्रा", रमेश मंत्री, वि आ बुवा यांच्या सारख्यांचे अजीर्ण : नव्वदीच्या दशकाखेरीज या असल्या घटकांना शेवटी वाचक निर्णायक स्वरूपात कंटाळले असे म्हणता येईल का ?
इ. प्रतिष्ठा : या मुद्द्याचा संबंध अ आणि आ शी लावता येईल. विनोदी लिहिण्याला असलेला लोकाश्रय संपला तसा या प्रकारातली प्रतिष्टाही लोप पावली असावी काय ?

५. नॉन फिक्शन या गटाबद्दल थोडे : अच्युत गोडबोले यांच्या सारख्यांचा (लेखक म्हणून) उदय या कालावधीतला. त्यांच्या जोडीला, माहितीपर लिखाण नियमितपणे नि दर्जेदाररीत्या करणारे कुणी आहे काय ? (अनिल अवचट हे नाव घेता येईल. पण अ. त्यांचे लिखाण सुरु होऊन ३० वर्षे झालीत आ. त्यांच्या या दशकातल्या लिखाणाच्या दर्जाबद्दल थोडी चर्चा संभवू शकते :) )

वर उल्लेखलेल्या घटकांशिवाय इतर काही विषय सुचतात, ज्याबद्दलची माझी माहिती तोकडी आहे.
१. अनुवाद : या प्रकाराने मूळ पकडलेले दिसते. इंग्रजी आणि भारतीय भाषांमधले बरेच लिखाण या दशकात आले असे दिसते. अशोक जैन, अपर्णा वेलणकर, जयप्रकाश सावंत , उमा कुलकर्णी ही अनुवादकांमधली मला माहिती असलेली काही ठळक नावे. उदयप्रकाश, अरुंधती रॉय, (कन्नडामधल्या लेखकाचे नाव विसरतो आहे !) असे महत्त्वाचे लेखक मराठीत आलेले दिसतात.

२. स्त्रीवादी साहित्य आणि विद्रोही साहित्य या प्रकारात भरीव कामगिरी या दशकात झाली नाही असे म्हणावेसे वाटते. (आयदान हे पुस्तक वगळता. ) या माझ्या विधानाचा प्रतिवाद कुणी केल्यास मी आनंदाने ऐकेन.

Sat, 29/01/2011 - 00:43 Permalink
ऋषिकेश

In reply to by मुक्तसुनीत

टण्या यांच्याशी +१
आणि मुसु, प्रतिसाद आवडला आणि 'विनोदाच्या मृत्यूवर' वेगळा धागा तुम्हीच तुमच्या मतासहीत सुरू करावात असे सुचवत

Sat, 29/01/2011 - 10:45 Permalink
आरागॉर्न

In reply to by टण्या

असेच म्हणतो. एकाहून अधिक कारणांमुळे व्हावे तेवढे मराठी वाचन झालेले नाही. आणि जे झाले ती पुस्तके बहुतांशी वर आलेली आहेत. या धाग्यातून बरेच काही मिळते आहे त्याबद्दल ऋषिकेशचे अनेक आभार.

विनोदाला आलेल्या अवकळेबद्दल सहमत आहे. सध्या कणेकर-संझगिरी लोकप्रभेत जे लिहीतात त्यावर समाधान मानायची वेळ आली आहे.

Sat, 29/01/2011 - 11:25 Permalink
मुक्तसुनीत

What started as a mundane reply ended up as ruminating about the decade.

वरचा माझा प्रतिसाद वाचत होतो आणि जाणवले की एखाद दोन (माझ्या दृष्टीने) थोड्या उल्लेखनीय गोष्टी सांगता येईल.

गेल्या दशकात नवे कोण, गुणी कोण याचा मागोवा घेत असतानाच, गेल्या दशकात कोणाच्या लिखाणाची विक्री अधिक झाली असावी असाही विचार आला. माझ्यासमोर दोन तीन ठळक नावे आहेत.

१. अर्थातच अवचट. यांचे लेख येत राहिले आणि नवनवी पुस्तके निघत राहिली. माझ्याकडे आकडेवारी नाही पण अवचटांचे नाव शीअर नंबर्स मधे आघाडीवर असणार. एकेकाळी परिघाकडे असलेला हा लेखक केंद्रस्थानी आलेला दिसतो. इतका की त्याच्यावर आयकनोक्लास्टिक , "डिस्मँटल द जायंट" असे पवित्रेवजा लिखाण येऊ लागले.

२. दुसरे जे नाव घेतो आहे त्याने आश्चर्य वाटू शकेल पण मुद्दा लोकप्रियतेचा आहे. तर शिरीष कणेकर यात असावेत असे दिसते. मी ज्या काय प्रदर्शनाना नि दुकानाना चकरा मारल्या त्यात मला त्यांची किमान बारा नवी पुस्तके दिसली. अनेक लेखांमधला त्यांचा सूर निवृत्तीपर, उदासवाणा लागलेला दिसतो. शिरीष कणेकरांचे नाव घेणे म्हणजे अभिरुचिहीनतेचे लक्षण ठरते असे मला दिसते खरे, पण मला त्यांचे त्यांच्या वडलांबद्दलचे लिखाण आवडलेच.

लोकप्रियतेच्या मुद्द्याचा अँटाय-डोस म्हणून म्हणा, पण एक विरुद्ध दिशेचे नाव सुचते : शाम मनोहर. शीतयुद्ध सदानंद, हे ईश्वरराव... या पुस्तकांनी त्यांनी नव्वदीचे पडघम वाजविले. कळ, आणि उत्सुकतेने .. , खेकसत म्हणणे ही त्यांची या दशकातली पुस्तके. नव्वदीमधले मनोहर आणि या दशकातले मनोहर यात एक अत्यंत ठळक फरक दिसतो. पहिल्या दोन कादंबर्‍यांमधे जिथे वैयक्तिक नीतीमत्तेचा, आयडेंटिटीचा, विसंगतींचा धांडोळा ते घेतात तेच मनोहर या दशकामधे एकदम समष्टीकडेच वळलेले दिसत आहेत. शाम मनोहर या लेखकाचा गेल्या नि या दशकातला काँट्रास्ट हा एक अतिशय रोचक विषय ठरू शकतो.

आणखी एका प्रकाशनाचा उदय माझ्या माहितीप्रमाणे या दशकातला आहे आणि तो महत्त्वाचा आहे. "युनिक फीचर्स" हे नाव या दशकाआधीही नक्कीच अस्तित्त्वात होते; मात्र त्यांनी "समकालीन" प्रकाशन म्हणून जे काम केले ते या दशकातले (चूभूदेघे) या एका प्रकाशनाने महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात चाललेल्या विधायक कामांबद्दल जितकी माहिती माझयसारख्या वाचकाना दिली तितकी अन्य कुठल्या प्रकाशनाने दिली असेल काय याबद्दल मला दाट शंका आहे. त्यांची किमान सहा पुस्तके माझ्याकडे आहेत आणि समाजकारण, राजकारण आणि एकंदर विचारांची घुसळण यांचा उत्तम लेखाजोखा यातून दिसतो.

ज्याप्रमाणे काही नावे उदयाला आली त्याप्रमाणे काही ठळक नावे किंवा गोष्टी अस्तंगत झाल्याप्रमाणेही जाणवतात. निखिल वागळे यांनी सुरु केलेले महानगर हे सायंप्रकाशन त्यांनी विकले इतकेच मला ठाऊक आहे.बाकीची सायंदैनसायंआता कितपत अस्तित्त्वात नि चलनात आहेत मला कल्पना नाही. अजूनही अक्षर वार्षिक निघते (आणि उत्तम निघते !) परंतु या मागे कर्णिक बंधुभगिनीच आहेत असे चित्र दिसते. (बाय द वे , नव्या शतकाची तुतारी फुंकायच्या आधीच "षटकार" आणि "चंदेरी" ही प्रकाशने - आणि त्यांची स्पर्धक छोटी छोटी प्रकाशने अस्तंगत झालेली होती. ही देखील एकंदर अभिरुचि आणि वाचनव्यवहाराच्या संदर्भातली अभ्यसनीय घटना आहे असे मला वाटते. )

Sat, 29/01/2011 - 11:41 Permalink

लोकसत्तामधे आलेला दशकातील दहा हा लेख काल वाचनात आला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे समाजातील वाचनसंस्कृती पार लयास जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात मात्र हे दशक संपताना परिस्थिती वेगळी दिसते आहे. या काळात विविध कारणांनी वाचकांची ‘चव’ बदललेली जाणवत असली तरी त्यामागे निश्चित असा ‘दृष्टिकोन’ आहे. या दशकात गाजलेली वा न गाजलेली, परंतु प्रभावशाली अशा निवडक दहा मराठी पुस्तकांचा, तसेच (अन्य पानावर) वेचक जागतिक पुस्तकांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.. अर्थात् वैयक्तिक स्वरूपातला!

ह्या लोकसत्तामधील सुरेश सोनटक्के यांच्या धांदोळ्यामधे हिंदूसारखी गाजलेली/गाजवलेली/खपलेली पुस्तके आहेत, भिन्न सारखी रसिकमान्य पुस्तकेही आहेत. अर्थात प्रत्येकाची यादी ही वेगळी असेल. इथे अशीच तुमच्या मनातली यादी द्यायची आहे.

तुम्ही वाचलेल्या नव्या १० उत्तम पुस्तकांची यादी.

अटी:

  • ही पुस्तके गेल्या १०-१५ वर्षांत प्रसिद्ध झाली असावीत.
  • यातील किमान तीन पुस्तकांची ओळख/तुम्हाला ते का आवडले वगैरे माहिती वाचकांना करून देणे गरजेचे आहे.

यानिमित्ताने एक चांगल्या व नव्या पुस्तकांचा संग्रह होईल अशी अपेक्षा आहे.

मी माझी यादी प्रतिसादात यथावकाश देईनच.. तर करा सुरवात.. तुमची आवडती गेल्या दशकातील दहा पुस्तके कोणती?