• '

एका तेलियाने

ऋषिकेश
रवीवार, 29 August, 2010 - 23:48
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

 

आंतरराष्ट्रीय राजकारण हे जितकं रोचक तितकंच क्लिष्ट. तिथे एकाच वेळी प्रत्येक जण आपला पट मांडतो, आपली चाल खेळतो आणि त्याच वेळी प्रत्येक जण इतरांच्या पटावरचे प्यादे असतो. अश्या ह्या बहुआयामी राजकारणात जसजसं जग जवळ येऊ लागलं तसतशी अधिक क्लिष्टता व प्रसंगी अधिक रोचकता येऊ लागली. त्याच बरोबर हा पट शांत डोक्याने मांडून व इतरांच्या पटांवरील आपली परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांनी हा खेळ खेळला ते त्या त्या मार्गाने पुढे गेले व इतर अनेक जण त्या खेळात वाईट प्रकारे भरडले गेले.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर कोणत्या एका गोष्टीभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरलं हा प्रश्न विचाराल तर "तेल" हे उत्तर कोणीही देईल. पण केवळ हे उत्तर माहित असण आणि तो खेळ समजून घेणं आणि दुसर्‍याला समजावणं हे अधिक कठीण. आणि ज्यांनी हा तेलाचा खेळ खेळला त्या "तेलियां" बद्दल काय बोलावे? अश्याच एका तेलियाबद्द्ल "शेख अहमद झाकी यामानी" यांच्याबद्दल श्री. गिरिष कुबेर यांनी लिहिलेले दमदार व रोचक पुस्तक म्हणज "एका तेलियाने". या पुस्तकात लेखक आपल्याला केवळ यामानी यांच्याबरोबरच इतर अनेक तेलियांची ओळख तर करून देतातच व त्याचबरोबर वाचक करतो ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची एक अत्यंत रोचक, डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी सफर!

यामानी हा सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री. आखातातील सौदी अरेबियासारख्या तेलावर तरंगणार्‍या देशाचे तेलमंत्री व तेही पुरी २५ वर्षे पदभार सांभाळणारा हा तेलिया वाचकाला गुंग करून ठेवतो. सौदी अरेबियाच्या जन्मापासून सूरू होणारी ही कथा अरबांच्या मागासलेपणापासूनही सुरू होते. वाळवंटातील टोळ्यांचे तेलामुळे अचानक होणार्‍या मिळकतीने दिवस बदलतात. अर्थातच पश्चिमी जग ही ताक्द ओळखून तिथे आपले बस्तान बसवते व अरबांच्या तोंडाला पाने पुसून केवळ काहि पैसे व सुंदर बायकांच्या बदल्यात खोर्‍याने तेल ओढत असते. अश्यावेळी यामानींच्या रुपाने सौदी अरेबियाला तेलमंत्री मिळतो व एकुणच अरबस्थानाच्या नशीबाने राजे फैजल त्यावेळी सत्तेवर असतात.

पुढे ओपेक, ओआपेकचे राजकारण. गडाफी, इराणी शहा वगैरे तेलिये, ओपेकच्या एकजुटीने पाश्चिमात्यांचे घटते वर्चस्व, त्याच दरम्यान उफाळु लागलेला इस्त्रायल वाद, इजिप्तच्या खेळ्या, अमेरिका, ब्रिटन च्या चाली, रशियाची प्रत्युत्तरे, फ्रेंच, जर्मन, नेदरलंड, अल्जेरिया, इराक, कुवेत, इराण, इस्त्रायल, येमेन, जॉर्डन, जपान अश्या बहुविध खेळाडुंनी व त्याच वेळी प्याद्यांनी, रचलेले व्युह व ते राजे फैजल यांच्या मदतीने भेदणारे यामानी वाचाकाला पुस्तक संपेपर्यंत खिळवून ठेवतात.

एकतर ह्या पुस्तकात उल्लेख असलेले बरेच जण नेहमीचे ऐकलेले-वाचलेले आहेत. तेलसंकट, इराण-इराक युद्धे, शीतयुद्धे, इस्त्रायल प्रश्न वगैरे तर अनेकांनी अनुभवलेली आहेत. त्यामुळे त्यातील संदर्भ, प्रसंग, व्यक्ती, शहरे यांचे उल्लेख वाचकाची त्या राजकारणाची सहज नाळ बांधतात. एक उदा. देतो. अमेरिका तेलबंदी आल्यावर ओपेकप्रमाणे तेल खरेदीदारांची संघटना बांधण्यासाठी परिषद घेणार होती. तसे काहि झाले असते तर तो तेल उत्पादक देशांना झटका असता. अश्यावेळी यामानी यांची मुत्सद्देगिरी सगळ्यांना आठवत असेलच. आता हा परिच्छेद बघा तो वाचून अनेकांनी ही बातमी वाचल्याचं आठवेल

" सा सार्‍या पार्श्वभूमीवर यामानी जेव्हा पॅरीसला उतरले तेव्हा फ्रान्सचे अध्यक्ष जॉर्जेस पापेंदू यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जातीने हजर होते. हा प्रकार आता वारंवार घडणार होता. ह्या दौर्‍यात एका साध्या मंत्र्याच्या स्वागताला राष्ट्रप्रमुखांनी जाणं साजेसं होणार होतं. सारी माध्यमं हे तेलमंत्री काय बोलतात त्याकडे डोळे लाऊन होती. फ्रान्सने आपली आधीचीच भुमिका मांडली. इस्त्रायलने १९६७च्या युद्धापासून व्यापलेला अरब देश व पॅलेस्टाईन भुभाग परत करावा अशी स्वच्छ भुमिका घेतली. याला प्रतिसाद म्हणून यामानींनी लगेच घोषणा केली फ्रान्सला तेलकपातीतून वगळायची. दुसर्‍या दिवशी फ्रान्सच काय जगातील सार्‍या वृत्तपत्रांनी यामानींची बातमी छायाचित्रासकट छापली"
"पुढच मुक्काम होता लंडन. या देशाची भुमिकाही स्वछ होती. कधी नव्हे ते अमेरिकाच्या कच्छपी असलेल्या इंग्लंडनं आता महासत्तेची कास सोडली व इस्त्रायलचा निषेध केला. त्यामुळे इंग्लंडचं काय करायचं ते यामानींना माहित होतं. ते लंडनला उतरले तेव्हा इंग्लंड मध्ययुगीन मागास भागासारखं वाटत होतं. वीज नाही , बँका कोलमडलेल्या, कोळसा संपामुळे रेल्वे बंद आणि नाताळचा सण. यामानींनी इंग्लंडला पूर्वी होता तितका तेल पुरवठा सूरू करण्याचं घोषित केलं व पुन्हा यालाही प्रसिद्धी मिळाली"

हे सारं वाचकाला लख्ख आठवतं, पुढे बेल्जियम, जर्मनी इतकंच काय राजनैतिक संकेत झुगारून तेलमंत्र्यांच्या भेटीला आलेले जपानचे सम्राट काय सगळं वाचक आठवतो आणि पुढे झालेल्या अमेरिकेच्या पचक्याची आठवण होऊन वाचक मनात हसतो आणि उत्कंठेने पुढचे पान उलटतो.

ज्या यामानींना नुसता ताप जरी आला तरी वॉल स्ट्रीट गडगडायचा त्यांची कार्यपद्धती, व्युहरचना आणि मुख्य मणजे देशाभिमान व देशप्रेम बघितलं की त्यांना सलाम ठोकावासा वाटतो. आणि ही राजकारणाची व्याप्ती व त्याचे गरीब देशांवरचे भयावह परिणाम बघितल्यावर त्याकाळी तुलनेने गरीब असलेल्या भारताने ना खेळिया होऊन ना प्यादे बनून म्हणजेच बरेचसे अलिप्त राहून किती बरं केलं असंही वाटून जातं.

थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची रंजक शैलीत मजा घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचणे मस्ट आहे. अगदी मिळवून वाचावे असे!

उत्तम पुस्तक परिचय.

आर्वजून वाचावं

पुढील अनेक वर्षे तेल या संपत्तीच महत्व राहणार आहे. आणि या तेलाचे बसिक फाक्ट्स व राजकारण माहीत असण गरजेच आहे. सुरवातीला त्यातील व्यक्तीची नावं, संदर्भ यामूळे त्रास झाला तरी शेवटपर्यंत पुस्तक रोचक होत जात.

नक्की वाचेन

ऋषिकेश,

मस्त ओळख करुन दिलीस पुस्तकाची.
वाचले नाहिये. पण आता नक्की वाचेन. जगाच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक प्रत्येक अभ्यासकाने वाचलेच पाहिजे अशी माझी धारणा केवळ तुझ्या परिक्षणावरुन झाली आहे.
नक्की वाचेन मी हे पुस्तक. Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

तेलाबद्द्लचे सुन्दर पुस्तक

सुन्दर, प्रत्येक घरात हे पुस्तक असायला हवे

छान पुस्तक परिचय.

पुस्तक चार महिन्यांपूर्वीच मिपावरचा पुप वाचून विकत घेतले होते. पण बरीच पुस्तके सोबत घेतल्याने एका तेलियाने आणि ऐसपैस गप्पा वाचायच्या राहून गेल्या आहेत. पुस्तकाचे नांव वाचून ते गंभीर असावे आणि येताजाता बसमध्ये वाचायला नको असे मत बनले होते.
आता घेते लवकरच वाचायला. Smile

धन्यवाद ॠ या पुस्तकाचा तु इथे

धन्यवाद ॠ
या पुस्तकाचा तु इथे परिचय करुन दिला हे उत्तम झाले.
पुस्तक हे प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे आहेच. पुस्तकाबद्दल अधिक काही लिहित नाही पुस्तकाच्या ब्लर्बचाच इथे आधार घेतो.

हा आजारी पडला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला, तर अनेक देहांत दिवाळी साजरी व्हायची. कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या कृपाप्रसादासाठी तासन्तास तिष्ठत बसायला तयार असायचे.
हा शेख अहमद झाकी यामानी.
सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरुण. 'ओपेक', 'ओओपेक' सारख्या संघटनांचा ३५ वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ञ.
कार्लोससारख्या कुप्रसिद्ध दहशतवाद्यालाही शह देउ शकणारा सौदी तेलमंत्री.
तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवुन टाकणारा अवलिया.
एक अफलातुन तेलिया.
त्याची हि कथा...

निखिल देशपांडे

किती

किती दिवसांपासुन वाचायचे म्हणुन ठरवलेय.
ओळख उत्तम आहे आवडली.
अजुन एक पुस्तक याच विषयावर अशातच आले आहे .. कोणते बरे ते ?

अशातील

अशातच आलेले कोणते पुस्तक माहिती नाही. पण याआधीचे एक - हा तेल नावाचा इतिहास आहे!

हेच हेच

हेच हेच ! ते आधीचे आहे होय. ते पुस्तकही खुप वाचनीय आहे असे ऐकुन आहे.

त्यच्या अधिचे अधर्म युद्ध!!

त्यच्याही आधीचे अधर्म युद्ध!! आणि अशातच आलेले पुस्तक म्हणजे "युद्ध जिवांचे"
रासायनिक आणि जैविक अस्त्रांवर आहे ते!!

गिरिश कुबेर

कुबेरांनी एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, अधर्मयुद्ध आणि आता युद्ध जीवांचे (ह्यातले शेवटचे अजून वाचायचे आहे) ही पुस्तके लिहून मराठीत साधारण दुर्भिक्ष असलेल्या 'चालू घडामोडींवरील' पुस्तकात चांगलीच भर घातली आहे. अर्थात कुबेरांची मते मला थोडी एकांगी वाटतात. किंवा असेही असेल की आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांचा ओढा हा थोडा मोरॅलीटी आधारीत आंतरराष्ट्रीय संबंधांकडे वाटतो तर मला स्वतःला realpolitik हे अधिक जवळचे वाटते म्हणुन असेल. अर्थात माहिती देण्याची त्यांची पद्धत उत्तम आहे.

@रोचीन, अधर्मयुद्ध तिसरे पुस्तक त्यांचे. सर्वात पहिले बहुतेक एका तेलियाने आणि नंतर हा तेल नावाचा इतिहास आहे.

पुर्वी मटामध्ये पण लिहायचे हे. नेमाड्यांची एक मुलाखत त्यांनी घेतल्याचे आठवते.

हो का??

असेल! कदचीत माझी काही गफलत झाली असेल!!Smile

सर्वात पहिले बहुतेक एका

सर्वात पहिले बहुतेक एका तेलियाने आणि नंतर हा तेल नावाचा इतिहास आहे

नाही या उलट आहे बहुदा. एका तेलियानेच्या प्रस्तावनेत 'हा तेल नावाचा इतिहास आहे'चा उल्लेख आहे, तेव्हा एका तेलियाने नंतरचे असणार.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

धन्यवाद

सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्दल आभार Smile

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

अरे वा मित्रा

मी तुझ्या लेखाबद्दल वाचलं होतं पण लेख वाचला नव्हता Smile
तू म्हणालास तसं प्रत्येकाला ह्या पुस्तकात नवं काहीतरी सापडतंच.
तुझा लेख आवडला हे वे सां न ल !

अरे दोन दोन लेख एक पुस्तकावर.

अरे दोन दोन लेख एक पुस्तकावर. छान!! Smile.