'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
एका साधनेची समिधा
मुखपृष्ठ
|
आतापर्यंत अनेक मोठ्या, कर्तृत्त्वावान पुरुषांच्या पत्नींनी आपापले आत्मचरीत्र लिहिले आहे आणि प्रत्येकवेळी त्या त्या पुरुषांच्या एका नव्या आयामाची ओळख समाजाला झाली. अशाच काहिश्या आशेने साधनाताई आमटेंचं "समिधा" वाचायला घेतलं. वाचु लागलो आणि वाचतच गेलो. बर्याच गोष्टी वाचताना स्तब्ध झालो पण तरीही न थांबता पुढचा शब्द वाचत गेलो. पुस्तक एका बैठकीत संपलं आणि शेवटी हाती बरंच काहि लागूनही ते आपल्याला पेलवेल का या भीतीने त्या हाती लागलेल्या खजिन्याकडे विस्फारून बघत राहिलो.
प्रांजळ लेखन कशास म्हणावे असे विचाराल तर मी या पुस्तकाचे नाव घेईन. जसे आठवेल तसे, त्या क्रमात लेखिकेने ते मांडले आहे. लेखिकेच्याच भाषेत सांगायचे तर "स्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलताना जे हाती लागले ते तुमच्या समोर देत आहे, जे विस्मृतीत गेले ते प्रभुचे देणे होते. त्याचे त्याने परत नेले."
एका उच्चभ्रु, सनातनी, धार्मिक कुटुंबांत जन्मलेल्या इंदुच्या आणि ब्रह्मचारी राहण्याचे ठरवलेल्या दाढी वाढवून फिरणार्या मुरली आमटेच्या प्रेमविवाहाच्या रोचक कहाणीपासून साधनाताईंचा प्रवास सुरू होतो. बाबांशी लग्न लागल्यावर सुरवातीला त्यांच्या सावलीप्रमाणे त्या त्यांच्या मागे जातात, मात्र बाबांच्या सहवात त्यांना स्वत्त्व गवसते आणि त्या मग नुसत्याच मागे जात नाहित तर त्यांच्या बरोबरीने त्यांची सावली न बनता त्या प्रकाशामागची शक्ती बनतात.
बाबांच्या जीवनातील संघर्ष हा सर्वांना ज्ञात आहे. या पुस्तकातही तो आपल्याला दिसतो. हे पुस्तक साधनाताईंबरोबर आपल्यालाही बाबांच्या दुनियेत फिरवते. बाबांची दुनिया एका तिर्हाईताच्या नजरेला जशी दिसते त्यापेक्षा कितीतरी व्यापक आणि स्तिमित करणारी दुनिया पत्नीच्या नजरेतून दिसते.
तसं पाहता साधनाताई देवाला मानणार्या तरीही नवर्यासाठी देवापासून दूर रहाणार्या. जेव्हा घरात देव येतात तेव्हाचा त्यांचा आनंद आपल्यालाही जाणवतो. बाबांना सर्पदंश झाल्यावर, वादळाने घरे उडाल्यावर, बाबांनी वाघाशी झुंजल्यावर त्यांच्यातली पत्नी सारा कारभार बाबांच्या अनुपस्थितीत उत्तम सांभाळते. दुध काढण्यापासून शेण सारवणे- सगळ्यांची जेवणे करण्याची ताक्द त्या बाळगून असतात. पत्नी प्रमाणे त्यांच्यातील आई आपल्याला भेटते. त्यांचा आणि लहानग्यांच्या दुनियेत आपणही शिरतो. त्यांची कधीही न आटणारी माया चकीत करते. बाबांप्रमाणेच आपल्याला प्रकाश भेटतो, विकास भेटतो, रेणूका भेटते.. साधनाताईंच्य नजरेतून त्यांचं कार्य भेटतं.. हेमलकसा भेटतं आणि तिथे प्रकाशने मांडलेल्या नव्या आणि अधिक खडतर दुनियेची प्रशंसा करताना मात्र साधनाताईंचे शब्दही कमी पडताना दिसतात.
अगदी शुन्यातून उभे राहीलेले समाजसेवेचे साम्राज्य उभारताना बाबांना झालेले अतोनात कष्ट, स्वतःच्या तब्येतीची झालेली परवड, त्यांची प्रयत्नवादी भुमिका, त्यांची जिद्द, त्यांची (प्रसंगी वेड्या) साहसाबद्दलची ओढ, त्यांच्यातील पती, पिता, आणि कुष्टरोग्यांचे घेतलेले पितृत्त्व जसे दिसते, त्याचवेळेला साधनाताईंच्या एक स्त्री म्हणून उपसावे लागणारे कष्ट आणि असंख्य अग्निदिव्यांना पार करण्याचे अचंभित करणारे कसब साधनाताई अगदी प्रांजळपणे सोप्या, चित्रदर्शी शब्दांत सांगतात.. पुस्तक वाचल्यावर वाचकाबरोबर राहते ती त्या दुनियेची ओढ. बाबांनी सुरु केलेल्या या यज्ञात एखाद्या समिधेप्रमाणे आपण होऊन शिरून आपलेच जीवन प्रकाशित करण्याचा हा प्रवास साधनाताईंबरोबर वाचकही करतो.
कालिदासाने अज राजाच्या इंदुमतीचे वर्णन करताना रघुवंशाच्या आठव्या सर्गात एका आदर्श पत्नीचे, सहधर्मचारिणीचे वर्णन केले आहे.
गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ ।
करूणाविमुखेन मृत्युना हरता त्वां वद किं न मे हृतम्||
तर अशी गृहिणी, सचिव, सखी, प्रियशिष्या, विविधकलागुणसंपन्न अशी सहधर्मचारीणी हल्लीच्या आत्मकेंद्रीत जगात असेल का असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे आत्मचरीत्र वाचल्यावर त्याचे उत्तर तुम्ही नक्कीच होकारार्थी द्याल!
शाब्बास!
ऋ,
आईने कालच वाचून संपवले हे पुस्तक आणि आज फोनवर भरभरून बोलत होती ती आमटेकुटुंबियांबद्दल. असे प्रसंग एकामागे एक पेलायला जड आहे त्यामुळे एका बैठकीत वाचणे जमणार नाही असे वाटत होते तरी पुस्तक अर्ध्यातून काही खाली ठेववत नव्हते म्हणाली. ती अत्यंत उत्साहात असल्याचे तिच्या शब्दाशब्दातून जाणवत होते. पुस्तकनिवडीबद्दल तिने दिलेली शाबासकी माझी नसून तुझी आहे, त्यामुळे ती इथे पोहोचती करते आहे. शाब्बास!
असेच अजून झकास पुस्तकपरीचय करून देत रहा.
शाबासकीबद्दल अनेक आभार! बाकी
शाबासकीबद्दल अनेक आभार! 
बाकी नुसते 'ह' म्हणेपर्यंत मी हरभर्याचे झाड गाठलेले असते. इथे तर काय अख्खी प्रोत्साहित करणारी प्रतिक्रीया आहे 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
खरेच चांगला परिचय.. वाचायला
खरेच चांगला परिचय.. वाचायला आवडेल.. नाहीतरी आता तू परत आल्यावर आपलं देवघेव ग्रंथालय चालू होईलच.. वाट पाहातेय!!! 
सुंदर
परिचय. शैली आवडली. हे पुस्तक वाचलेले आहे.
पुस्तक वाचताना आलेली स्तिमित अवस्था परिचय वाचताना पुन्हा आठवली. लिहीत रहा.
--अदिती
--अदिती
गुणाः सर्वत्र पूज्यन्ते दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगंधमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदाः ॥
ऋषिकेश, मस्त जमलाय पुस्तक
ऋषिकेश, मस्त जमलाय पुस्तक परीचय. मी पाहिले आहे हे पुस्तक पण अजून घ्यायला जमलेले नाही. जब जब, तब तब हे पुस्तकांबाबतही खरे आहे... पण आता घेणार आणि वाचणार. धन्यवाद.
छान
ऋषिकेश अजुन एका उत्तम परिचयाबद्दल धन्यवाद. परिचय एकदम उत्स्फुर्त वाटला.
>>प्रांजळ लेखन कशास म्हणावे असे विचाराल तर मी या पुस्तकाचे नाव घेईन.
>>तसं पाहता साधनाताई देवाला मानणार्या तरीही नवर्यासाठी देवापासून दूर रहाणार्या. जेव्हा घरात देव येतात तेव्हाचा त्यांचा आनंद आपल्यालाही जाणवतो.
>>बाबांप्रमाणेच आपल्याला प्रकाश भेटतो, विकास भेटतो, रेणूका भेटते.. साधनाताईंच्य नजरेतून त्यांचं कार्य भेटतं.. हेमलकसा भेटतं आणि तिथे प्रकाशने मांडलेल्या नव्या आणि अधिक खडतर दुनियेची प्रशंसा करताना मात्र साधनाताईंचे शब्दही कमी पडताना दिसतात.
ही काही आवडलेली वाक्यं. छान परिचय.
प्रकाशवाटा जेव्हा वाचले तेव्हाचे हेही पुस्तक वाचायचे हे ठरवुन टाकले होते, आता हा आनंद चाखल्यावर तर थांबवणार नाही, लवकर वाचायलाच हवे.
हे पुस्तक नक्की वाचणार
हे पुस्तक नक्की वाचणार
निखिल देशपांडे
छान परिचय !! हे पुस्तक खूप
छान परिचय !!
हे पुस्तक खूप आवडले होते.
भारावून गेलो
अप्रतिम परिचय ऋषिकेश,
माहितीच नव्हते या पुस्तकाबद्दल. नक्की वाचेन हे मी
तुला धन्यवाद की एवढ्या सुंदर पुस्तकाची ओळख करुन दिलीस
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/






छान
वाह! असे काहितरी वाचायला मला प्रचंड आवडते. उत्तम पुस्तकाच्या छान पुस्तकपरीचयाबद्दल धन्यवाद, ऋषिकेश!