Submitted by चिंतातुर जंतू on
आनंदयात्री

सुरेख विवेचन. वाचतांना तन्मय झालो होतो, विचारचक्रात अडकलो आणि माझ्या आवडीच्या अनेक पुस्तकांची याद जागली.

Sun, 13/02/2011 - 03:54 Permalink
श्रावण मोडक

खरं तर मूळ धाग्यावर लिहायचं होतं. पण तिथं चर्चा वाढत गेली आहे आणि अनायासे तेच मुद्दे धरत हा धागा आल्याने इथं लिहितोय...
अंबरिश मिश्र यांच्याकडून थोडं उधार घेत - धूसर काही जीवघेणे!
हे लेखन या प्रकारातले आहे. म्हटलं तर बरंच काही कळल्यासारखं वाटलं. जे कळलंय असं वाटतंय ते तितक्यातच हातून निसटलं आहे हेही लगेचच कळतं आणि तेच फक्त टिकतं.
उदाहरणार्थ -

हे विवेचन वाचल्यावर आता एक गोष्ट स्पष्ट व्हावी की लोकप्रियतेपेक्षा दूरगामी आणि बहुपेडी परिणामांवर इथे भर आहे. उदा: आज शेक्सपिअर किंवा तुकाराम किती लोकप्रिय आहे यापेक्षा कळत-नकळत तो आपल्या रोजच्या भाषेत किंवा संस्कृतीत किती आहे याला इथे महत्त्व आहे. त्या बरोबरच वेगवेगळे अर्थ ज्यातून काढता येतील किंवा वेगवेगळ्या अंगांनी ज्याचा अभ्यास करता येईल अशा गोष्टींना इथे महत्त्व आहे.

दूरगामी आणि बहुपेडित्वावरचा भर समजू शकतो. पण लोकप्रियतेत असा दूरगामी परिणाम साध्य होत नसतो, असे काही आहे का? हां, आता बहुपेडी आणि दूरगामी असते ते अभिजात हे एकदा मान्य केलं की बाकी सारे प्रश्न झूट ठरतात. पण मग पुढे, यातली भाषा आणि संस्कृती कोणी आणि कशी ठरवायची. "'नव्हतं' चालतं तर 'व्हतं' का चालत नाही," या प्रश्नापाशी हा अभिजाततेचा मुद्दा काटेकोरपणे किमान दोन भागांत विभागला जाऊ शकतो. "'नव्हतं' हेच उचित, 'व्हतं' हे अनुचित" असं म्हणणारा अभिजातता वगैरेंची जी अभ्यासपूर्ण चौकट मांडण्याचा प्रयत्न करू शकतो, तशी मांडणी "'व्हतं' हेही उचितच, कारण ती आमची भाषा आहे" असं म्हणणारा करू शकत नसावा. अशावेळी ही अभिजातता इतकी व्यामिश्र होत जाते की, त्यातून एक वेगळाच 'वर्ग'संघर्ष उभा राहतो. मग "तुमचं ते भारीच, आम्ही काय..." वगैरे प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होत जातं. वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळ्या अंगानी अभ्यास या दोन्ही गोष्टी करणाऱ्याच्याच हाती असतात. त्याने ते करायचे नाकारलेच तर तिथं त्याच्या एकारलेपणामुळे अभिजातता नाही, असा निष्कर्ष निघण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी काय करायचे?

या विवेचनातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एका ठिकाणी कॅल्विनो असंही मान्य करतो की रसिकमान्यतेद्वारे एक प्रकारचं बाळकडू म्हणून आपल्याला अभिजात अशी जी काही यादी मिळते त्यातून (आणि त्या व्यतिरिक्तही) आपल्याजवळ जाणारं असं अभिजात साहित्य आपण धुंडाळायचं असतं.

हे सर्वात खरं. बाकी सारा व्याप म्हणजे चौकटी मांडण्याचा, व्याख्यांचा आणि त्यातून काही साध्य करण्याच्या खटाटोपांचा सोस. एकदा का व्यक्तिसापेक्षता मान्य केली की मग पुन्हा चौकट मांडण्याचा खटाटोप का करावा? एकाने तयार करून मांडलेली चौकट दुसऱ्याला मंजूर होणारच असे काही नाहीच. कारण व्यक्तिसापेक्षता. उद्या एखादा "सुशिंची दुनियादारी अभिजातच आहे, कारण त्यात माझं त्या वयाच्या कालखंडातलं बहुपेडी जगणं दिसतं, ते अधिक खोलवर कळतं, त्यातूनच मला पुढं जगण्यासंदर्भातील माझेच काही संदर्भ अधिक नीट करून घेता आले," असं काही म्हणेल. ते म्हणणे दुसऱ्या एखाद्याला (इथं मलाच) मान्य होणार नाही. पण म्हणून त्याची आ/निवड ही कमअस्सल (इथं 'अभिजात ते भारी आणि लोकप्रिय ते कमअस्सल' असा अनेकदा या क्षेत्रातील मंडळींचा जो पवित्रा असतो, तो मुळाशी गृहीत धरला आहे) ठरते का?
एवढे सगळे लिहिल्यानंतर पुन्हा हे सांगावेच लागेल की, या लेखनातून काही हाती गवसले आणि निसटले अशी भावना झाली आहे. कारण मी स्वतः अनेकदा अनेक प्रकारचे लोकप्रिय असणारे साहित्य दुय्यम मानतो. ते वाचणाऱ्याला दुय्यम किंवा कमअस्सल मानत नाही. पण ते साहित्य दुय्यम मानतोच. म्हणजे, मला 'आऊटसायडर' भिडते. तेच 'दुनियादारी'चे होईल असे नाही. पण मीच कॉलेजलाईफ ज्याला म्हणतात ते अनुभवलेले नाही, त्यामुळं असं होत असेलही. आता हे ध्यानी घेतले तर व्यक्तिसापेक्षतेचा मुद्दाच महत्त्वाचा ठरत जातो. मग प्रश्न येतो, एखादी गोष्ट अभिजात असे नुसतेच मानता येणार नाही का? ते मानल्यानंतर जे अभिजात नाही ते कमअस्सल असा सूर लावण्याची गरज असतेच का?
(हाच प्रतिसाद तिकडेही दिला आहे).

Sun, 13/02/2011 - 11:42 Permalink
चिंतातुर जंतू

दूरगामी आणि बहुपेडित्वावरचा भर समजू शकतो. पण लोकप्रियतेत असा दूरगामी परिणाम साध्य होत नसतो, असे काही आहे का?

माझ्या मते 'लोकप्रियता' या संकल्पनेमध्ये दोन गोष्टींचा विचार होतो.
१. आज मराठीवर थोडंबहुत प्रभुत्व असणार्‍या कुणाच्याही तोंडी कळत-नकळत तुकारामानं घडवलेले किंवा पानिपताच्या बखरीतले वाक्प्रचार येतात. ही लोकप्रियता अभिजाततेच्या वरच्या विवेचनात समाविष्ट आहे.
२. विश्वास पाटलांच्या 'पानिपता'च्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या ही दुसर्‍या प्रकारची (आणि मला वाटतं अशा वादात लोकांना अभिप्रेत असणारी) लोकप्रियता आहे. कॅल्विनोचं विवेचन याबद्दल बोलत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अभिजाततेला लोकप्रियतेचं वावडं आहे. अशी लोकप्रियता ही अभिजाततेसाठी आवश्यक नाही आणि पुरेशीही नाही एवढाच निष्कर्ष कॅल्विनोच्या विवेचनावरून काढता येईल असं मला वाटतं. पण याचा अर्थ एखादी कलाकृती लोकप्रिय असली तर ती अभिजात नसेलच असा होत नाही.

"'नव्हतं' हेच उचित, 'व्हतं' हे अनुचित" असं म्हणणारा अभिजातता वगैरेंची जी अभ्यासपूर्ण चौकट मांडण्याचा प्रयत्न करू शकतो, तशी मांडणी "'व्हतं' हेही उचितच, कारण ती आमची भाषा आहे" असं म्हणणारा करू शकत नसावा. अशावेळी ही अभिजातता इतकी व्यामिश्र होत जाते की, त्यातून एक वेगळाच 'वर्ग'संघर्ष उभा राहतो. मग "तुमचं ते भारीच, आम्ही काय..." वगैरे प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होत जातं. वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळ्या अंगानी अभ्यास या दोन्ही गोष्टी करणाऱ्याच्याच हाती असतात. त्याने ते करायचे नाकारलेच तर तिथं त्याच्या एकारलेपणामुळे अभिजातता नाही, असा निष्कर्ष निघण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी काय करायचे?

हा प्रश्न वेळोवेळी येत रहाणार. यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती ही की प्रस्थापितांविरोधात बंडखोरी ही अभिजाततेला वर्ज्य नाही. म्हणून मी मुद्दामच उदाहरणं देताना 'तुकाराम', 'कोसला' आणि 'राडा'ची दिली. हे तिन्ही लेखक आपापल्या काळच्या अभिजाततेच्या कल्पनेला छेदून लिहीत होते. त्या काळच्या प्रस्थापितांनी त्यांना त्रासही दिला. इथे मुद्दा उरतो तो बुद्धिवाद्यांच्या जबाबदारीचा. नेमाड्यांना आणि भाऊ पाध्यांना पु.लं., अशोक शहाणे, दिलीप चित्रे अशा अनेकांनी तेव्हा उचलून धरलं आणि त्यांचं लिखाण महत्त्वाचं आणि पथदर्शी का आणि कसं आहे हे सांगून आपल्यावरची ही जबाबदारी सांभाळली. ज्या समाजात असे लोक नसतील त्या समाजात कदाचित अभिजात होण्याच्या आधीच कलाकृती दडपली किंवा दुर्लक्षिली जाईल. त्यांचे परिणाम तो समाज भोगेल. किंबहुना त्यातच त्या समाजाच्या बौद्धिक र्‍हासाची मुळंसुद्धा असू शकतील. म्हणूनच असा उहापोह वेळोवेळी होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी खुलं वातावरण निर्माण करणं आणि ते टिकवून ठेवणं हीदेखील त्या बुद्धिवाद्यांची (आणि ते ज्या समाजाचा भाग असतात त्या समाजाचीसुद्धा) जबाबदारी असते. म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा कळीचा ठरतो. अत्र्यांच्या दमदाटीपुढे भाऊ पाध्यांची तळी उचलून धरता यावी; यासाठीचा अवकाश समाजात हवा.

व्यक्तिसापेक्षता: या बाबतीत हे लक्षात घ्यायला हवं की वरच्या विवेचनात अभिप्रेत असणारी व्यक्तिसापेक्षता ही इतर मुद्द्यांच्या अनुषंगानं आहे. ते सर्व मुद्दे दुर्लक्षून 'मला आवडतं म्हणून ते चांगलं' इतकीच व्यक्तिसापेक्षता त्यात अभिप्रेत नाही. अशी व्यक्तिसापेक्षता ही काहीशी स्वमग्न (आणि म्हणून आंधळी) ठरेल. अर्थात, त्याउलट 'अभिजन म्हणतात म्हणून ते अभिजात' इतकंही ते व्यक्तिनिरपेक्ष नसावं आणि स्वानंदाशी त्याची कुठेतरी नाळ जुळावी एवढीच त्यात अपेक्षा आहे असं मला वाटतं.

Sun, 13/02/2011 - 15:42 Permalink
आरागॉर्न

सुरेख विवेचन. बहुतेक सर्व मुद्दे पटले. कलाकृतीचा (या संदर्भात साहित्याचा) आनंद घेणार्‍यावर तिचा कितपत परिणाम होऊ शकतो किंवा इतका परिणाम होऊ शकतो का की त्यामुळे त्याच्यात काही बदल होतील? काफ्का ऑन द शोरमधील एक पात्र हाच प्रश्न संगीताच्या बाबतीत विचारते. संगीतामुळे एखाद्याच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल होऊ शकतात का?

लाज वाटण्याचा मुद्दा तितका पटला नाही कारण तो व्यक्तिसापेक्ष आहे असे वाटते. आणि म्हणूनच त्याचे सामान्यीकरण करता येईल का याबद्दल साशंकता वाटते. (काल्व्हिनो हा मुद्दा टंग-इन-चीक अर्थाने तर मांडत नाही ना अशीही शंका आली. ;) )

अभिजात कलाकृतींच्या संदर्भात पूर्वतयारीचा मुद्दा एलकुंचवारांनी मांडला आहे. हा सर्वच बाबतीत लागू होतो असे नाही मात्र काही कलाकृतींसाठी नक्कीच आवश्यक आहे असे वाटते.

समजा, मी जर्मनीत गेलो किंवा ऑस्ट्रीयात आणि पाश्चात्य संगीताच्या मैफलीचा अनुभव मला घ्यायचा आहे. तिथे बेथोवनचा पाचवा कंचेर्टो श्री. कारयान कंडक्ट करणार आहेत. पण असे संगीत ऐकण्याची माझी प्राथमिक तयारीही नसली तर त्या संगीताचा मला अल्पावकाशातच कंटाळा येईल. आता 'कंटाळा' हा ही अनुभवच आहे हे खरे, पण इथे कंटाळा येतो कारण त्या अनुभवासाठी माझी पूर्वतयारी काही नाही आणि त्यामुळे त्या अनुभवाच्या पोटात ज्या अनेक शक्यता आहेत त्यातला एक अंशही माझ्या वाट्याला आलेला नाही. 'फार कंटाळा आला' यावर एक चटकदार लेख लिहीता येईल पण ह्यात मी स्वतःची आणि त्या अनुभवाचीही फसगत करत असेन किंवा ती लपवण्यासाठी खोटा 'अनुभव' रचून वाचकांची फसगत करेन.

Tue, 15/02/2011 - 19:53 Permalink
चिंतातुर जंतू

लाज वाटण्याचा मुद्दा तितका पटला नाही कारण तो व्यक्तिसापेक्ष आहे असे वाटते. आणि म्हणूनच त्याचे सामान्यीकरण करता येईल का याबद्दल साशंकता वाटते. (काल्व्हिनो हा मुद्दा टंग-इन-चीक अर्थाने तर मांडत नाही ना अशीही शंका आली. ;-))

शक्यता नाकारता येत नाही :-) पण मला असं वाटतं की सरसकटीकरण करण्यापेक्षा कॅल्विनोचा भर विविध क्षमता आणि स्वभाववैशिष्ट्यांमुळे एकाच गोष्टीला येणार्‍या विविध प्रतिक्रिया जोखण्याचा असावा. म्हणजे कुणी हट्टानं विरोधात बोलतात (त्यांना विरोधातली का होईना, पण भूमिका ही घ्यायलाच लागते.), कुणाला वाचलेलं नाही हे कबूल करायची लाज वाटते, कुणाला इतर अभिजात कलाकृतींशी तुलना करावीशी वाटते, तर कुणी अर्थबोधनांच्या वेढ्यात हरवून जातं.

संगीतामुळे एखाद्याच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल होऊ शकतात का?

हा मुद्दा वादग्रस्त ठरत आलेला आहे. स्वप्नाळू, आदर्शवादी स्वभावाच्या लोकांना असं व्हावं असं वाटतं; पुरेशी संवेदनशीलता बाळगणारे लोक खरंच बदलतात; असुरक्षित राजकारण्यांना कलाकृती गैरसोयीच्या वाटू शकतात कारण त्यांत समाज बदलायची ताकद असेल अशी भीती त्यांना वाटत रहाते. याउलट कलाकृतींमध्ये अशी क्षमता असल्याचं आजकाल अनेक उपयुक्ततावादी/चंगळवादी/बाजारव्यवस्थावादी नाकारतात. पण मुळात हा मुद्दा काहीसा 'कलेसाठी कला की जीवनासाठी कला' अशा बाजूला झुकू लागतो.

पूर्वतयारी: मी पूर्वतयारीपेक्षाही योग्य मनःस्थिती आणि परिस्थिती हवी असं म्हणेन. उदा: पॉपकॉर्न खाता खाता एस.एम.एस. पाठवता पाठवता पाहिला तर कळणार नाही पण नीट मन एकाग्र करून पाहिला तर कळेल, असे अनेक सिनेमे पाहिले आहेत. किंवा, प्रवासात वाचायची पुस्तकं वेगळी असतात आणि शांत, स्तब्ध घरात वाचायची पुस्तकं वेगळी असतात. ज्याच्या ठेक्यावर नाचायचं ते संगीत वेगळं आणि चर्चच्या थंड, अंधार्‍या वातावरणात ज्यामुळे अंगावर शहारे येतात ते संगीत वेगळं असतं. थोडे कष्ट घेतले तर अगदी परक्या संस्कृतीतली कलाकृतीही (सर्व संदर्भांसहित कळली नाही तरीही) हळूहळू स्पर्श करू शकते असा अनुभव आहे. पुनर्वाचन म्हणूनही महत्त्वाचं ठरतं.

Tue, 15/02/2011 - 23:52 Permalink
मणिकर्णिका

अभिजाततेचा मुद्दा आला की शेक्सपियर हा यायलाच पाहिजे.
शेक्सपियरला अभिजात म्हणताना त्याचे लेखन वाचलेलं असणं मी गृहीत धरते. आणि फोरम्स मध्ये चर्चा करताना असं घडेलच याची खात्री देता येत नाही.

माझ्याकडे समग्र शेक्सपियर आहे. तीन वर्षं झाली- फक्त हॅम्लेट झालंय आणि विशाल भारद्वाजने 'ऑथेल्लो' वर 'ओंकारा' बनवला तेव्हापासून आजपर्यंत फक्त ’ऑथेल्लो’च वाचतेय. मोकळेपणी सांगायचे झाले तर शेक्सपियर वाचताना ’फाटते’. शेक्सपियर वाचताना माझंतरी झालेलं मत असं की शेक्सपियरच्या लिखाणातली सौंदर्यस्थळं दाखवून देणारया माणसाच्या मदतीशिवाय शेक्सपियर समजणे केवळ अवघड.

आपल्याकडे बी.ए,एम.ए वाल्यांना शेक्सपियर 'लावलेला’ असतो. त्यामुळे शेक्सपियरच्या लिखाणातले दाखले देणं, त्याच्या लिखाणाचं रसग्रहण करणं त्यांना जमतं आणि नाकबूल का करा? इंप्रेसिव्ह सुद्धा वाटतं. त्यांच्याकडून ऐकून, त्यांचं वाचून आणि ते लईच भारी वाटून, शेक्सपियर न वाचताही बरेच जण ’शेक्सपियर का? सॉलिड बरं का!’ असं म्हणताना दिसतात, बेधडक कमेंट्स करतात. आणि ते समोरच्यालाही तात्काळ मान्य होतं कारण ते त्याने वाचलेलं नसतंच किंवा शेक्सपियर म्हटल्याने तो माणूस awe मध्ये आलेला असतो. शतकानुशतके चालत आलेल्या ’अभिजाततेच्या’ शिक्क्याचा फायदा शेक्सपियरला मिळतो तो असा.
बरयाच पुस्तकांमध्ये शेक्सपियर आणि त्याच्या नाटकांविषयी इतकं काही लिहून ठेवलंय की ते वाचून आपण शेक्सपियर वाचलाय अशा थाटात तीन-चार चर्चा सहज करु शकतो. थोड्या काळानंतर आपण खरंच शेक्सपियर वाचलाय असं वाटायला लागतं.
शेक्सपियर अभिजात आहेच पण अभिजाततेच्या संकल्पना बनवणं खूप सोप्पं आहे हे मला सांगायचं आहे. त्यासाठी पुस्तकं वाचलीच पाहिजे ही पूर्व अट असतेच असं नाही.

डिटेक्टीव्ह कादंबरयांचंच म्हणायचं झालं तर 'एडगर पो' ते 'अगथा खिस्ती' पर्यंत सगळे क्लासिक म्हणवले जातात पण नंतरच्या 'अर्ल स्टॅनली गार्डनर'ला, 'जेम्स हॅडली चेस' ला तेव्हढा भाव मिळत नाही. प्रिझन ब्रेक वरच्या 'पॅपिलॉन' आणि' रिटा हेवर्थ ऍंड श्वाशांक रिडेंप्शन' वर मोशन फ़िल्मसही बनल्या पण क्लासिक मात्र 'द काऊंट ऑफ़ मॉंते क्रिस्तो'. का? मला तिन्हीही कादंबरया तितक्याच आणि तेवढ्याच आवडल्या. मग 'जुनं ते सोनं' न्यायाने ’अभिजात’ चा दर्जा फ़क्त अलेक्झांडर द्युमाला द्यायचा का? मला नाही वाटत. माझ्यालेखी तिन्ही अभिजातच.

अशी बरीच वर्गवारी आणि बरीच उदाहरणं आहेत.

उदा.-'कोसला'.
पांडुरंग सांगवीकरशी माझा पुरुष मित्र जितका रिलेट करु शकतो तितकी मी नाही करत. त्यामुळे माझ्यासाठी 'कोसला' फक्त 'एकदा वाचनमात्रे'च आहे. आणि हीच परिस्थिती बरयाच अंशी बरयाच स्त्री-वाचकांना लागू आहे. जिथे पुस्तक आवडण्याला, पटण्याला किंवा रिलेट करण्याच्या प्रमाणालाही पुरुष-स्त्री वर्गाची बंधनं पडतात त्या कादंबरीला मी अभिजात म्हणत नाही. पण याचा अर्थ ती दुसरयाच्या लेखीसुद्धा अभिजात नसलीच पाहिजे ही अपेक्षा मी बाळगणं आणि त्यावर तावातावाने आपला मुद्दा पटवून द्यायला बघणं म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे.

शुद्रकाचे 'मृच्छकटीक' मला आजही त्या काळात घेऊन जाते. त्यामुळे इतर लोक त्याला 'सेंटीमारु', 'बिग बोअर' म्हणत असले, इतरांचं ऐकून वाचण्याच्याही भानगडीत पडले नसले आणि जुनं असूनही त्यांच्यालेखी ते 'अभिजात' मध्ये बसत नसले तरी मला ते 'अभिजातच' वाटते. दुसरयांनी तसं म्हणावं असा आग्रह अर्थातच नाही.

मला शब्दबंबाळ करणारी पुस्तकं आवडत नाही आणि म्हणूनच मला 'प्राईड & प्रेज्युडीस' आवडले नाही. त्याचा कितीही उदो उदो झालेला असला तरी. दुसरयांनी 'अभिजात' म्हटलेल्या साहित्यकृतीला आपण तोलून (वाचून बघून- गूगल सर्च वर 'प्राईड & प्रेज्युडीस' टाकून नाही) आपलं मत बनवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकानेच जपलं पाहिजे असं मला वाटतं. इतरांचं मला माहीत नाही.

या सगळ्या क्लासिक्समध्ये मला एक एक गोष्ट समान दिसली की ही पुस्तकं अभ्यासक्रमात ठेवली गेलीयेत म्हणून वर्षानुवर्षे ओळखली जातायेत (जसं फ़्रेंच लिटरेचर मध्ये थ्री मस्केटीयर्स, व्हिक्टर ह्युगो,सार्त्र) किंवा मग त्या इतिहास घडवणारया, कशाततरी कसलातरी पायंडा पाडणारया, नोबेल पुरस्कार विजेत्या किंवा संस्कृतीचे सार वगैरे असणारया (म्हणून inevitable) अशी पुस्तकं आहेत.

प्रगल्भ होणे म्हणजे माझ्या लेखी 'माणूस म्हणून जास्त संकुचित दृष्टीकोनातून कमी संकुचित दृष्टीकोनाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणे, काहीतरी नवं शिकायला मिळाल्यासारखं वाटणे'- जे मला कुठल्याही साधंसुधं पुस्तक वाचल्यावरही वाटू शकतं आणि म्हणूनच मागच्या चर्चेत माझा रोख
<<<लोकप्रिय साहित्य हे रंजनासाठीच वाचले जाते. तर अभिजात साहित्य मात्र आपल्याला बरेच समृद्ध करून जाते हेच खरे
या वाक्यावर होता.प्रगल्भ आणि समृद्ध करणे ही फक्त अभिजात साहित्याचीच मक्तेदारी नाही.

लोकांच्या दृष्टीतून जे अभिजात आहे, ते अभिजात म्हणून आवडलेच पाहिजे असा मी स्वतःकडे आग्रह धरत नाही पण ते 'बहुधा' आवडतंच असा अनुभव आहे. पण त्यांच्या दृष्टीने जे अभिजात नाही आणि जे मला आवडेल, प्रगल्भ करेल आणि जे मला वर्षानुवर्षे पुरुन उरेल ते सुद्धा माझ्यालेखी अभिजातच.

Wed, 16/02/2011 - 09:23 Permalink
चिंतातुर जंतू

शेक्सपियर अभिजात आहेच पण अभिजाततेच्या संकल्पना बनवणं खूप सोप्पं आहे हे मला सांगायचं आहे. त्यासाठी पुस्तकं वाचलीच पाहिजे ही पूर्व अट असतेच असं नाही.

खरं सांगायचं तर तुम्ही कॅल्विनोचा मुद्दाच आपल्या शब्दांत सांगत आहात. तुम्ही ज्या पद्धतीनं 'शेक्सपिअर'च्या मिथक म्हणून असण्याचं वर्णन केलेलं आहे त्याचा संबंध कॅल्विनोच्या अनेक मुद्द्यांशी लागतो. उदा: वाचलेला नसतानाही वाचलेला आहे असं सांगायची गरज, वाचताना ’फाटणं’ (म्हणून पुन्हा पुन्हा वाचून नवं नवं कळत रहाणं), इतरांच्या अर्थबोधनावर विसंबून इतरांना इम्प्रेस करणं (अर्थबोधनांच्या धुक्यात हरवून जाणं) किंवा -

जे मला आवडेल, प्रगल्भ करेल आणि जे मला वर्षानुवर्षे पुरुन उरेल ते सुद्धा माझ्यालेखी अभिजातच.

कॅल्विनोसुद्धा हे म्हणतो आहेच: _आपल्याजवळ_ जाणारं असं अभिजात साहित्य _आपण_ धुंडाळायचं असतं.

थोडक्यात, मूळ लेखातले मुद्दे आपल्या शब्दांत अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे कदाचित ते विवेचन अधिक सुस्पष्ट होण्यास मदत होईल.

Wed, 16/02/2011 - 11:40 Permalink
आरागॉर्न

शेक्सपियर वाचताना माझंतरी झालेलं मत असं की शेक्सपियरच्या लिखाणातली सौंदर्यस्थळं दाखवून देणारया माणसाच्या मदतीशिवाय शेक्सपियर समजणे केवळ अवघड. आपल्याकडे बी.ए,एम.ए वाल्यांना शेक्सपियर 'लावलेला’ असतो.

हा विचार मनात आला होता. किंबहुना बीए-यमएला जे साहित्य 'लावले' जाते ते अभिजात अशी व्याख्या करावी असेही वाटले होते. :)

थोडक्यात, असे साहित्य वाचून, उमजून घ्यायचे तर थोडे अधिक कष्ट करण्याची तयारी हवी. शेक्सपिअरच नव्हे, तुकाराम, ज्ञानेश्वर ही सर्व मंडळी निरूपणाशिवाय वाचणे दुष्कर आहे. आणि निरूपणासहित वाचतानादेखील वाचनाचा वेग नेहेमीपेक्षा काहीपट कमी असतो. इतके कष्ट घ्यायचे किंवा नाही हे अर्थातच ज्याचे त्याने ठरवायला हवे.

हीच गोष्ट इतर कलांच्या बाबतीतही अनुभवाला येते. मागे बीबीसीवर चित्रकलेवर एक मालिका पाहिली होती. दर वेळेस एका प्रसिद्ध चित्रकाराचे एक चित्र घेऊन त्यावर एक तास विवेचन. (रेंब्रांटचे नाइटवॉच, रेन्वारचे ल मूलां द ला गॅलेत.) आधी चित्रकाराची ओळख, त्याकाळची परिस्थिती, त्याची शैली, चित्रामागची त्याची भूमिका, चित्रामध्ये त्याचा ठसा दाखवणार्‍या गोष्टी. हे सगळे पाहिल्यावर एका चित्रामध्ये विश्वरूपदर्शन घडते. शिवाय हे ही जाणवते की नुसते दोन मिनिटे असे चित्र पाहून पुढे जाणे हा त्या कलाकृतीवर एक प्रकारचा अन्याय केल्यासारखे आहे.

सध्या व्हर्जिनिया वूल्फचे मिसेस डॉलोवे वाचतो आहे. याआधी तिचे लेखन वाचलेले नाही. तिची लेखनशैली नेहेमीपेक्षा अत्यंत वेगळी आहे. कर्ता-कर्म-क्रियापद अशी नेहेमीची सवय असल्याने सुरूवातीला भंजाळून जायला होते. नीट संगती लागत नाही. पहिली काही पाने माझेही असेच झाले. मग योगायोगाने दुसर्‍या एका पुस्तकात वूल्फच्या डायरीचे एक पान वाचायला मिळाले. यात वादळानंतर तिच्या बागेच्या अवस्थेचे वर्णन तिने केले आहे.

A violent rain storm on the pond. The pond is covered with little white thorns; springing up and down; the pond is bristling with leaping white thorns, like the thorns on a small porcupine; bristles; then black waves; cross it; black shudders; and the little water thorns are white; a helter skelter rain and the elms tossing it up and down; the pond overflowing on one side; lily leaves tugging; the red flower swimming about; one leaf flapping; then completely smooth for a moment; then prickled; thorns like glass; but leaping up and down incessantly; a rapid smirch of shadow. Now light from the sun; green and red; shiny; the pond a sage green; the grass brilliant green; red berries on the hedges; the cows very white; purple over Asheham.

इथे वूल्फने जशा घटना दिसत आहेत तसे वर्णन केले आहे. प्रत्येक छोटे वाक्य जणू एक स्नॅपशॉट आहे. जर तिने प्रत्येक वाक्य कर्ता-कर्म-क्रियापद असे पूर्ण केले असते तर हा परिणाम साधता आला नसता. हे वाचल्यावर लक्षात आले की तिच्या कादंबर्‍याही तिने अशाच प्रकारे लिहील्या आहेत. मग मिसेस डॉलोवे थोडी-थोडी कळायला लागली. :)

अर्थात यात किती वेळ घालवायचा हा ही प्रश्न आहे पण आधी म्हटल्याप्रमाणे हे व्यक्तीसापेक्ष आहे.

Wed, 16/02/2011 - 20:27 Permalink

माझ्या आसपास असणाऱ्या पुष्कळ जणांना वाचनाची किंवा चित्रपट पाहण्याची आवड असते. काहीतरी सकस पहावं/वाचावं अशी इच्छाही असते. स्वत:ची अशी काहीएक आवडनिवडसुद्धा असते. पण विशिष्ट प्रकारच्या पुस्तक/चित्रपटांविषयी त्यांच्या मनात अढी म्हणा, संशय म्हणा असं काहीतरी असतं. ते का वाचावं/पहावं याविषयी त्यांच्या मनात संभ्रम किंवा कधी कधी सरळ नकारच असतो, पण त्याविषयी जाणून घेण्याची इच्छाही असते. किंवा ते कळायला कठीण जाईल असं वाटत असतं, पण कळून घ्यायचे कष्टदेखील घेण्याच्या लायकीचं ते आहे का याची खात्री नसते. मग ते उदा. असे काही प्रश्न विचारतात.

आधुनिकोत्तर कादंबरी का वाचावी?
पाश्चिमात्य साहित्य का वाचावं?
समांतर प्रवाहातले चित्रपट का पहावे?
हॉलिवूड सोडून इतर देशांचे सिनेमे का पहावे?
लोकप्रिय साहित्य चांगलं मानावं का? की वाईटच मानावं?
माझी आवड आणि चांगलं साहित्य याचा मेळ कसा घालावा?

या सर्व प्रश्नांना माझं साधं उत्तर असं असतं की जे जे उत्तम असू शकेल असं वाटतं ते ते वाचत/पहात जावं. पण मग अर्थात प्रश्न पडतो की उत्तम काय ते कसं ठरवावं? आणि ते व्यक्तिनिरपेक्ष किंवा कालातीत किंवा संस्कृतीनिरपेक्ष असतं का?

या सर्वाची आणि माझ्या एका आवडत्या लेखकाची आठवण 'लोकप्रिय आणि अभिजात साहित्य' या धाग्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा झाली. धाग्यावर प्रतिसाद देता देता तो फार लांब होऊ लागला. म्हणून एक स्वतंत्र धागा काढण्याचं ठरवलं.

इटालो कॅल्विनो या लेखकाचे काही पूर्वप्रकाशित निबंध ‘व्हाय रीड द क्लासिक्स?’ या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यात विविध जुन्या-नव्या, त्याच्या मते अभिजात अशा लेखकांविषयी विवेचन आहे. पण त्याशिवाय अभिजात साहित्याची व्यवच्छेदक लक्षणंसुद्धा सांगितली आहेत. ती समजून घेतली तर कदाचित वरच्या प्रश्नांची काहीतरी तड लावता येईल असं वाटतं. कारण जर एखादी गोष्ट (उदा. आधुनिकोत्तर कादंबरी किंवा रंजक न वाटणारा समांतर सिनेमा, वगैरे) अभिजात म्हणता येईल अशी (किमान काही) लक्षणं तीत असतील, तर ती उत्तम/चांगली असेल आणि उत्तम असेल तर मग त्याच्या आस्वादासाठी ते एक पुरेसं कारण ठरेल. म्हणून कॅल्विनोचं निरुपण इथे माझ्या शब्दांत देतो आहे.

(यापुढचं विवेचन पुस्तकाच्या अंगानं केलेलं आहे, पण ते उदा. चित्रपटालाही लागू व्हावं.)

एखादं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं का? – एखादं पुस्तक तरुण वयात वाचलेलं असतं आणि तेव्हा ते तेव्हाच्या समजेनुसार समजलेलं असतं/नसतं; आवडलेलं असतं/नसतं. पण वय/अनुभव/समज वाढल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याकडे जावंसं वाटतं का? ते पुन्हा वाचल्यावर आवडेल असंही नाही. तरीही हे पुन्हा त्याकडे जावंसं वाटणं महत्त्वाचं आहे. कारण नव्यानं जाणवतील अशा पातळ्या, तपशील किंवा अर्थ त्या पुस्तकात असू शकतात याचं हे निर्देशक आहे. कधी कधी असंही होतं की एखादं पुस्तक पुन्हा वाचायला घेतोय असं कुणीतरी म्हणतं तेव्हा खरंतर ते पुस्तक त्यांनी पहिल्यांदाच वाचायला घेतलेलं असतं; पण इतकं वय होईपर्यंत आपण ते वाचलेलंच नाही हे सांगायलासुद्धा लाज वाटत असते. अशी लाज वाटणं हीदेखील त्या पुस्तकाच्या अभिजाततेची एक खूण मानता येईल.

कधीकधी एखाद्या पुस्तकाच्या पूर्वीच्या वाचनानं आपल्यावर नकळत ठसा उमटवलेला असतो. आपल्याला त्याची जाणीवही नसते. पण पुन्हा वाचण्यानं आपल्यावरचा हा परिणाम अधोरेखित होतो आणि लक्षात येतो. किंवा असंही होऊ शकतं की एखादी व्यक्ती, घटना किंवा संवेदना आपल्याला एखाद्या पुस्तकाची आठवण करून देते. तेव्हा आपल्याला त्या पुस्तकाचा आपल्यावर नकळत झालेला परिणाम जाणवतो. उदा: अजिंठ्याच्या एखाद्या गुंफेत आपल्याला जे वाटतं ते ‘कोसला’मध्ये नेमाड्यांनी आधीच नेमकेपणानं आणि द्रष्टेपणानं लिहून ठेवलेलं आहे असं एखाद्याला कोसला वाचल्यानंतर अनेक वर्षांनी जाणवू शकतं.

यामुळे अजून एक गोष्ट सांगता येते. त्या पुस्तकाच्या प्रत्येक वाचनातून काहीतरी नवीन शोध लागत असावा असं वाटतं का? म्हणजे प्रत्येक वाचन हे नव्यानं वाचन केल्यासारखंच होतं का?

आता याच्या उलट जाऊन असं म्हणूया की अगदी पहिल्या वाचनातही काहीतरी ओळख पटल्यासारखं होतं का? एखादा अपरिचित माणूस पहिल्यांदा भेटतो तेव्हाच कधी कधी एखाद्या सुहृदाप्रमाणे गप्पा होतात, कारण काहीतरी नाळ जुळते; तसं काहीसं हे आहे.

अभिजात पुस्तकं ज्या भाषांत किंवा संस्कृतींत पोचतात तिथे ती आपल्यामागे काही पाऊलखुणा ठेवून जातात. उदा: ‘एक दूजे के लिए’ आणि ‘टायटॅनिक’पर्यंत अनेकांना ‘रोमिओ-ज्युलिएट’नं खाद्य पुरवलं. तुकारामानं मराठीला कितीतरी वाक्प्रचार दिले. हे केवळ जुन्या साहित्याला लागू होतं असं नाही. आपापल्या लिखाणात नव्यानं आलेल्या संवेदनांमुळे काफ्कानं ‘काफ्काएस्क’ आणि हॅरॉल्ड पिंटरनं ‘पिंटरेस्क’ अशी विशेषणं इंग्रजीला दिली. ही विसाव्या शतकाची देणगी आहे. भाऊ पाध्ये यांच्या ‘राडा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत (दुसरी आवृत्ती) भालचंद्र नेमाडे ‘राडा’च्या वैशिष्ट्यांविषयी लिहितात. श्याम मनोहर आणि राजन गवस या लेखकांच्या कथा-कादंबऱ्यांमधली पात्रं ‘राडा’विषयी काय बोलतात आणि त्यातून व्यक्तिचित्रण कसं केलं आहे हे त्या प्रस्तावनेत एका ठिकाणी नेमाडे सांगतात. ‘भाऊ पाध्ये वाचणारं किंवा त्यांच्याविषयी नाखुषी व्यक्त करणारं पात्र त्या कृतीतून कळत-नकळत स्वत:विषयी वाचकाला काहीतरी सांगत असणं’, या वाङ्मयीन रचनेत भाऊ पाध्ये यांच्या लिखाणामुळे मराठी साहित्यात आलेली क्रांती वाचकाला माहीत आहे, हे गृहित असतं. ते एक सांस्कृतिक संचित असतं.

अभिजात पुस्तकांचं अजून एक लक्षण म्हणजे ती आपल्या विविध अर्थबोधनांना (इंटरप्रिटेशन्स) मिरवत येतात. कधीकधी असंही होतं की वेगवेगळ्या लोकांनी वेळोवेळी काढलेले वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ, पुस्तकाच्या आसपासची माहिती (उदा. लेखकाची लफडी आणि त्यांचा पुस्तकावर असलेला परिणाम वगैरे), अशा पुष्कळ अंगांनी उपलब्ध असणाऱ्या पुस्तकाविषयीच्या गोष्टी जणू एखाद्या धुक्याप्रमाणे त्या पुस्तकाला वेढून बसलेल्या असतात.

इतरांनी केलेलं हे बाकीचं सर्व (अर्थबोधनं, रसग्रहण, नक्कल वगैरे) सोडून मूळ पुस्तक वाचायचा आग्रह लोक पुन्हा पुन्हा धरतात. म्हणजे इतकी अर्थबोधनं मिरवत असूनदेखील मूळ पुस्तक वाचण्याचा अनुभव हा त्याबद्दलचं कोणतंही अर्थबोधन किंवा रसग्रहण यांहून वेगळाच असा एक विलक्षण अनुभव असतो. म्हणजे सांगोवांगीवरून आपल्या मनात त्या पुस्तकाविषयी जी प्रतिमा किंवा जे मत असतं त्यापेक्षा ते प्रत्यक्ष वाचणं हा एक अनोखा आणि अनपेक्षित अनुभव असतो.

याचाच अर्थ असा होतो की कर्तव्य किंवा आदराच्या भावनेनं वाचण्यापेक्षा ते पुस्तक प्रेमापोटी वाचलं जातं. म्हणजेच त्या पुस्तकाचं आणि आपलं काहीतरी व्यक्तिगत संधान बनतं किंवा त्याच्याशी काहीतरी एकतानता निर्माण होते.

अभिजात पुस्तकातून एक अख्खं विश्व उभं केल्याचा भास होतो. ते तुमचंच आहे असं वाटेलच असं नाही. तुम्ही त्याच्याबद्दल उदासीन (न्यूट्रल) मात्र राहू शकत नाही. जणू त्याच्या बाजूनं किंवा विरोधात उभं राहण्यानं तुम्ही स्वत:ला सिद्ध करत असता किंवा आपण कोण आहोत आणि काय आहोत याची ओळख पटवून देत असता. (म्हणजे आधुनिकोत्तर कादंबरीच्या ठाम विरोधात राहूनसुद्धा कदाचित तुम्ही तिचं महत्त्वच अधोरेखित करत असू शकता! ;-))

अनेकदा असंही होतं की अनेक अभिजात पुस्तकं वाचलेले लोक एखाद्या पुस्तकाबद्दल बोलताना त्या इतर अभिजात पुस्तकांच्या संदर्भचौकटींत हे पुस्तक कुठे आहे हे दाखवू लागतात. म्हणजे त्या मांदियाळीत एखाद्या पुस्तकाचं स्थान चर्चिलं जाणं किंवा अधोरेखित होणं हीदेखील ते पुस्तक अभिजात असल्याची एक खूण असते.

समकालीन वास्तव हे सतत आपल्यापर्यंत येऊन आदळत असतं. यात आपलं दैनंदिन आयुष्य, दहशतवादी हल्ले, जाहिराती किंवा वृत्तपत्रांसारख्या अनेक गोष्टी असतात. पण या सर्व गोष्टी दुरून येणाऱ्या रहदारीच्या आवाजासारख्या वाटाव्यात, असं अभिजात साहित्य वाचताना होतं. आणि तरीही आपल्या समकालीन वास्तवात आपण जे असतो त्या आपल्या अस्तित्वामुळेच अभिजात साहित्य आपल्यावर हा परिणाम करू शकतं. म्हणजे समकालीनतेला पर्यायही नाही आणि तरीही निव्वळ त्यात अडकून न राहता अभिजात साहित्य आपल्याला त्या पलीकडे नेतं.

आणि निव्वळ एवढंच नाही तर आपण आपलं (समकालीन) आयुष्य जगत असताना हे अभिजात साहित्य पार्श्वभूमीवर का होईना, पण आपल्यासोबत असतं.

असं सगळं सांगून कॅल्विनो म्हणतो की प्रत्येकानं आपापल्या पसंतीच्या अभिजात पुस्तकांच्या ग्रंथालयाचा शोध घेत राहिला पाहिजे. त्यातला अर्धा भाग आपण वाचलेली आणि आपल्याला अभिजात वाटलेली पुस्तकं यांच्यासाठी राखून ठेवायला हवा, पण कधीतरी आपण नक्की वाचून काढायची असं ठरवलेली, ज्यांचा आपल्याशी काही संबंध लागू शकेल असं ज्यांच्याविषयी वाटतं अशांसाठीही त्यातला अर्धा भाग ठेवला पाहिजे. आणि शिवाय अनपेक्षितरीत्या त्यात समाविष्ट होतील अशा काही पुस्तकांचा शोध लागेल, त्यांच्यासाठीही थोडी जागा शिल्लक ठेवली पाहिजे.

आपण कोण आहोत आणि आत्ता आपण कुठे आहोत हे आपल्याला आपल्या आसपासच्या (स्थानिक) अभिजात पुस्तकांमुळे समजतं तसंच त्याच्याशी तुलना करण्यासाठी आपल्याहून वेगळं काय आहे/होतं हे आपल्याला दूरच्या संस्कृतीतल्या पुस्तकांपासून समजतं त्यामुळे त्या दोहोंची (स्थानिक आणि परकीय अभिजात पुस्तकं) आपल्याला गरज आहे.

शेवटी कॅल्विनो म्हणतो की अभिजात पुस्तकांतून काही हेतू साध्य होतो का यावर भर देण्यापेक्षा मी असं म्हणेन की अभिजात साहित्य वाचणं हे ते न वाचण्यापेक्षा चांगलं असतं.

हे विवेचन वाचल्यावर आता एक गोष्ट स्पष्ट व्हावी की लोकप्रियतेपेक्षा दूरगामी आणि बहुपेडी परिणामांवर इथे भर आहे. उदा: आज शेक्सपिअर किंवा तुकाराम किती लोकप्रिय आहे यापेक्षा कळत-नकळत तो आपल्या रोजच्या भाषेत किंवा संस्कृतीत किती आहे याला इथे महत्त्व आहे. त्या बरोबरच वेगवेगळे अर्थ ज्यातून काढता येतील किंवा वेगवेगळ्या अंगांनी ज्याचा अभ्यास करता येईल अशा गोष्टींना इथे महत्त्व आहे.

या विवेचनातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एका ठिकाणी कॅल्विनो असंही मान्य करतो की रसिकमान्यतेद्वारे एक प्रकारचं बाळकडू म्हणून आपल्याला अभिजात अशी जी काही यादी मिळते त्यातून (आणि त्या व्यतिरिक्तही) _आपल्याजवळ_जाणारं असं अभिजात साहित्य _आपण_धुंडाळायचं असतं.

विरोधाचा मुद्दाही मला रोचक वाटतो. म्हणजे रसिकमान्य अशा एखाद्या अभिजात पुस्तकाविषयी मला विशेष काही वाटत नाही हे मला पुन्हा पुन्हा अधोरेखित करायला लागणं हेदेखील एक अभिजाततेचं लक्षण असणं हे मला रोचक वाटलं. मात्र विरोधाच्या मुद्दयामुळे इथे हेदेखील लक्षात घ्यायला हवं की एखादा साहित्यप्रकारच मला आवडत नाही म्हणून ते अभिजात होऊच शकत नाही अशी आणि एवढी व्यापक सूट मात्र यात दिसत नाही. ‘लघुकथा हे काय साहित्य आहे का’ असं म्हणून नेमाडे त्याला झिडकारतात. तितकी व्यक्तिसापेक्षता इथे अभिप्रेत नसावी असं वाटतं.

हे विवेचन थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकेल याची मला जाणीव आहे; पण साहित्य आणि त्याचं आकलन ही गोष्ट गणिताप्रमाणे काटेकोर, नियमबद्ध आणि सूत्रबद्ध करता येईल अशी अपेक्षा अवाजवी आहे असंही वाटतं. मुळात मानवी जाणिवा आणि संवेदना यांचं थोडंफार विश्लेषण करता येईल पण त्यांची काटेकोर प्रतवारी करता येणं (सध्या तरी) कठीण आहे. त्यामुळे त्या दृग्गोचर करणाऱ्या साहित्याबाबतीतदेखील असंच म्हणावं लागेल. अखेर एवढंच म्हणतो की यातून थोडा गोंधळ जरी झाला तरीही काही सुस्पष्टता आली असेल तर त्याचं श्रेय माझं नसून कॅल्विनोचं आहे.