नुकतीच या धाग्यावर लोकप्रिय आणि अभिजात साहित्यावर एक छोटेखानी चर्चा झाली होती. त्या धाग्यावर तो विषय अप्रस्तुत वाटल्याने या नविन धाग्यावर ही चर्चा सुरु करत आहे.
तर चर्चा विषय असा होता. लोकप्रिय साहित्य आणि अभिजात साहित्य म्हणजे नेमके काय ? अभिजात साहित्य हे लोकप्रिय असलेच पाहिजे काय किंवा लोकप्रिय साहित्य हे अभिजात नसले तरी ते लोकप्रिय का? अभिजात साहित्याची नेमकी व्याख्या काय?
पुविच्या दिग्गज सदस्यांकडून अधिक जाणून घेण्यास नक्कीच आवडेल.
मदतनीसांनाही विनंती की त्यांनी त्या धाग्यावरील चर्चा या धाग्यावर पोहोचवून द्यावी.
मुळ चर्चा इथे हलवली आहे. धन्यवाद. - मदतनीस
थोडे विचार
अभिजात साहित्य हे मुख्यकरुन समाजाला दिशा दाखवणारे व प्रगल्भ करणारे साहित्य मानले जाते.
तर लोकप्रिय साहित्य हे नावाजले असले तरी त्याला अभिजात साहित्याचा दर्जा मिळेलच असे नाही.
अर्थात मराठी साहित्यात अशा अनेक कलाकृती आहेत की ज्या अभिजातही आहेत आणि लोकप्रियही आहेत.
अभिजात साहित्याचे उदाहरण द्यायचे झाले तर भालचंद्र नेमाड्यांची कोसला
लोकप्रिय साहित्याचे उदाहरण द्यायचे झाले तर सुहास शिरवळकरांचे साहित्य (रहस्यकथा, भयकथा, विस्मयकथा इ...)
लोकप्रिय आणि अभिजात अशा साहित्याचे उदाहरण द्यायचे झाले तर विश्वास पाटिल यांची पानिपत डोळ्यासमोर येते
माझे विचार कितपत योग्य वा अयोग्य आहेत यावर येथील दिग्गज सांगतीलच.
पुस्तकविश्वच्या सर्व सदस्यांना या धाग्यावर सहभागी होण्याची मी विनंती करतो. या चर्चेमुळे अनेक साहित्यप्रेमी वाचकांना एक दिशाज्ञान नक्की होईल याची खात्री आहे
तूर्तास एवढे पुरे... बाकी नंतर सहभागी होईनच :)
विषयावर प्रतिसाद....!
श्री.वल्ली....आणि श्री.सागर....
~ हा विषय ज्या क्षणी पु.वि. वर आला त्याचवेळी निश्चित केले होते की, विषयावरील आपले मत इथे मांडायचे, पण तुम्ही दोघेही जाणत असालच की फार मोठी व्याप्ती आहे याची आणि लिहायचे तर विस्तृत प्रमाणावरच लिहिले पाहिजे. त्यामुळे थोडा जादाचा वेळ (निवांतपणासाठी) घेत आहे.
(श्री.सागर यांच्यासाठी ~ तसं पाहिलं गेलं तर इथले खरे दिग्गज तुम्हीच आहात...हे प्रत्येक सदस्य जाणतोच.)
इन्द्रा
अजून काही
अभिजात साहित्याची व्याख्या तशी जटील आहे. अभिजात साहित्य हे नेहमीच चिरंतन साहित्य असते अशा अर्थाने की पिढ्यान् पिढ्या त्या साहित्याचा आस्वाद घेतला जात असतो. येथे शेरलॉक होम्स आजही अभिजात साहित्यकृतींत गणला जातो मात्र तेच भाग्य पेरी मेसनच्या नशिबी येत नाही. अर्नाळकरांचे साहित्य आज किती जण वाचतात? मागच्या पिढीत तर त्यावर अगदी तूटून पडणारी माणसे होती. शिरवळकर आजही तितकेच लोकप्रिय आहेत पण कदाचित काही वर्षांनी त्यांचेही साहित्य कालबाह्य होईल.
होम्सचे उदाहरण मी मुद्दामून घेतले. जरी त्या रहस्यकथा असल्या तरी त्या अभिजात साहित्यकृतीच. मग अभिजात साहित्य म्हणजे नेमके काय? की त्या प्रकारच्या साहित्यकृतींचा ट्रेंड त्याने सुरु केला म्हणून त्या अभिजात गणल्या जातात. जसे हिचकॉकचे सायको, व्हर्टिगो, रिअर विंडो किंवा फ्रेडकिनचा एक्झोरसिस्ट हे चित्रपट आजही अभिजात चित्रपट म्हणून ओळखले जातात. पण तशाच प्रकारच्या नंतरच्या चित्रपटांना ते भाग्य लाभले नाही जरी त्यांना लोकप्रियता जास्त मिळाली. कारण या चित्रपटांनी सुरु केलेल्या कल्पनांवरच ते काहीअंशी बेतलेले होते.
साहित्यातही असेच होत असावे. नेमाड्यांनी "कोसला" करून त्याकाळच्या समाजाच्या कादंबरीबाबतच्या जाणिवाच बदलून टाकल्या व एका नवीनच प्रकाराला सुरुवात केली. पण त्यांचीच आजची "हिंदू" एव्ढ्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासातून आलेली. पण ती अभिजात होउ शकते का? जरी कितीही लोकप्रिय(खपाच्या बाबतीत) व वादग्रस्त असली तरीही.
......तूर्त येथेच थांबतो. चर्चा जशी जशी पुढे पुढे सरकेल तसा तसा भाग घेत राहिनच.
In reply to अजून काही by वल्ली
+१ असेच म्हणतो
अभिजात साहित्याची व्याख्या तशी जटील आहे.
असेच म्हणतो.
अभिजात साहित्याची स्पष्ट व्याख्या करणे खरेच जटील आहे.
अभिजात साहित्याचे निकषही व्यक्तीसापेक्ष असतात.
ढोबळमानाने असे म्हणता येईल की एखाद्या साहित्यकृतीने मोठ्या समूहाला प्रभावित केले किंवा हेलावून सोडले तर ती कलाकृती आपण अभिजात म्हणू शकू. हा मोठा समूह काही पिढ्यां देखील असू शकतो. किंबहुना असावा असे मला तरी वाटते. वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये वेगवेगळी विचारधारा वहात असते, आणि ती उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाते (खरे तर बदलत जाते)या बदलत्या विचारधारेतही जे साहित्य टिकून राहते ते अभिजात साहित्य मानण्यास हरकत नसावी
वल्ली मित्रा तू म्हणतोस ते बर्याच प्रमाणात बरोबर आहे.
शेरलॉक होम्स काय किंवा जेम्स बॉन्ड काय, हे आपल्या अचाट साहसांनी रहस्यभेद करणारे नायक प्रचंड लोकप्रिय झालेत. ते अभिजात मानता येतील का नाही हा देखील एक चर्चेचा मुद्दा आहे. पण मला वाटते की मानण्यास हरकत नसावी.
माझे आवडते लेखक सुहास शिरवळकर मला आवडत असतील किंवा आजच्या पिढीला आवडत असले तरी पुढील पिढीला ते आवडतीलच असे नाही. कालौघात सुशिंचं साहित्य टिकून राहिले तर ते देखील नक्की अभिजात होईन. मला वाटते काही पुस्तके कालसापेक्ष असतात ती अभिजात होऊन अजरामर होतात. बाबुराव अर्नाळकरांचे साहित्य मी आजही वाचतो, पण ग्रंथालयांतून त्यांचे हवे ते पुस्तक तुम्हाला लगेच मिळते. यावरुनच बदलत्या काळानुसार लोकांच्या आवडी निवडी बदलत जातात हे लक्षात येते. फडके, आपटे, अर्नाळकरांची जागा हळूहळू शिरवळकर, बाबा कदम, सडेकर अशा नव्या दमाच्या लेखकांनी घेतली. उद्या त्यांचीही जागा अजून नवे लेखक घेतील.
मला आजही बाबुराव अर्नाळकरांचा झुंझार...काळापहाड खुणावतो.... हरि नारायण आपटेंची पण लक्षात कोण घेतो विचारांस प्रवृत्त करते... ना.सी. फडकेंच्या प्रेमाने ओथंबलेल्या कादंबर्या स्वप्नांच्या दुनियेत नेतात. नाथमाधवांची वीरधवल वाचताना तर विस्मय रसाचा आविष्कार म्हणजे काय याचा अनुभव घेतो. तर गो.ना.दातारशास्त्रींच्या कादंबर्या केवळ अत्भुत या सदरात मोडतात. त्यांच्या सर्व कादंबर्या ही मला विस्मय, अत्भुत, रौद्र, आश्चर्य, भय, स्वप्न, मोह... अशा सर्व रसांच्या रसायनात वितळवून टाकतात.
तरीही मी सुहास शिरवळकरांच्या अमर विश्वास, फिरोज इराणी, दारा बुलंद ... अशा हिरोंमध्ये रमतो. त्याच बरोबर दुनियादारी देखील वाचताना भान हरपतो. अनुवादित साहित्यात रमतो... नारळीकरांच्या विज्ञानकादंबर्यांत डुंबुन जातो... शशी भागवतांची मर्मभेद, देवकीनंदन खत्रींची मराठीत आलेली चंद्रकांता तोच सर्व रसांचा अनुभव देतात.
हा काळातील बदल आहे. तरी या सर्व साहित्यातील वेगवेगळ्या चवी आहेत. आणि त्या सर्व मला आजही तितक्याच आवडतात. पुढच्या पिढीची आवड कदाचित बदलली जाऊ शकते.
@इंद्रराज तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय.
@मेघना नंदनचे विचार देऊन एक छान काम केलेस तू.
पण नंदन कुठे हरवला न कळे. नंदनही इथे आला तर चर्चेला अजून मजा येईल.
@नंदन - ये रे मित्रा या धाग्यावर
In reply to +१ असेच म्हणतो by सागर
अतिशय उत्तम प्रतिसाद
सागर खूपच सुरेख प्रतिसाद दिला आहेस तू.
अभिजात साहित्याचे निकषही व्यक्तीसापेक्ष असतात.
याच्याशी किंचित असहमत. अभिजात साहित्य हे व्यक्तीसापे़क्ष कसे असू शकते ते तितकेसे समजले नाही. पुविवरच्या सर्वांच्या मते 'कोसला' अभिजात साहित्यात गणली जाते. याला मीही अपवाद नाही. पण जर माझ्यासमोर एक प्रत कोसलाची आणि एक प्रत दुनियादारीची ठेवली तर माझे प्राधान्य दुनियादारीलाच असेल पण म्हणून कोसलाचे स्थान खालावत नाही किंवा दुनियादारी पण अभिजात साहित्यात समाविष्ट होत नाही. आता मी जी.ए. फारसे वाचत नाही किंबहुना अगदी एखादेच पुस्तक तेही फार पुर्वी. पण तरीही जी.ए. मराठीतीलच नव्हे तर भारतातील एक श्रेष्ठ अभिजात लेखक आहेत यावर माझेही दुमत व्हायचे काही कारण नाही. तात्पर्य अभिजात साहित्य हे अभिजातच असते त्याला व्यक्तीसापेक्षतेच्या कसोट्या लावता येणार नाहीत.
मदतनीसांचे आभार. पुस्तकांच्या धाग्यावरील चर्चा इकडे वर्ग केल्याबद्दल.
@आनंदयात्री, @निखील देशपांडे -- हे सध्या चुकून एखाद्याच एकोळी प्रतिसादापुरतेच का मर्यादीत असतात ब्वा?
In reply to अतिशय उत्तम प्रतिसाद by वल्ली
आडातच नाही
>>@आनंदयात्री, @निखील देशपांडे -- हे सध्या चुकून एखाद्याच एकोळी प्रतिसादापुरतेच का मर्यादीत असतात ब्वा?
आडातच नाही तर पोहर्यात कुठुन येणार ?
;-)
(निख्या हलके घे रे)
In reply to अतिशय उत्तम प्रतिसाद by वल्ली
व्यक्तीसापेक्ष बद्दल थोडा खुलासा
वल्ली मित्रा,
अभिजात साहित्याचे निकष व्यक्तीसापेक्ष मी म्हटले ते वेगळ्या अर्थाने.
आता तुझ्या उदाहरणातलेच घे
कोसला आणि दुनियादारी
या दोन्ही कादंबर्या तुला तितक्याच प्रिय आहेत पण दुनियादारीला तू झुकते माप देतोस. पण दुनियादारी झाली की कोसला देखील वाचून वाचनाचा आनंद मिळवशीलच ना.
पण असेही लोक आहेत की ज्यांना कोसलाने समाजाला कोणते विचार दिले हे अजिबात कळले नाही. किंबहुना कोसला कळलीच नसल्यामुळे त्याला एक भंपक पुस्तक ठरवतात आणि बाजूला ठेवतात.
उदाहरणार्थ समजा त्या वाचकाला जर केवळ विनोदी साहित्यच आवडत असेन तर त्या वाचकाच्या दृष्टीने द.पा. खांबेटे, द.मा.मिरासदार, चि.वि. जोशी, पु.ल.देशपांडे, वि.आ.बुवा ही मंडळी अभिजात साहित्य निर्माण करणारी दैवते असतील. कारण त्या वाचकाला या लेखकांची पुस्तके कोणत्याही काळी वाचली तरी तितकाच आनंद देतील.
माझ्या प्रतिसादात मी म्हटल्याप्रमाणे अनेक व्यक्तीसमूहांचे ज्या साहित्यकृतीवर एकमत होते ती साहित्यकृतीच अभिजात म्हणून ओळखली जाते. पण जी अभिजात साहित्यकृती आहे ती प्रत्येकाला आवडेलच किंवा त्यातून बोध होईलच असेहोईलच, फक्त यासाठीच व्यक्तीसापेक्षता मी गृहीत धरली होती.
याच विषयावर नंदनने त्याच्या
याच विषयावर नंदनने त्याच्या ब्लॉगवर उद्धृत केलेल्या विंदांच्या मुलाखतीतला काही भागः
या तटस्थतेचा (लेखननिवृत्तीचा) आणखी काही परिणाम?
- फार महत्त्वाचा एक परिणाम आहे. सांगतो. आता मी स्वतः त्या खेळात नाही. हिरीरी उरलेली नाही. त्यामुळे भोवती जे काही चाललं आहे ते तटस्थपणे बघतो. ज्यांच्या लेखनाला काडीमात्र अर्थ नाही असे वाटत होते, त्यातला अर्थही जाणवू लागतो.
तो कसा काय?
- काही लोकप्रिय लेखकांचं उदाहरण घेऊ. मी ते वाचलेले नाहीत, वाचू शकत नाही, हे सोडा. पण असं वाटतं की, नवशिक्षित समाजासाठी या लेखकांची आवश्यकता आहे. त्यांची सांस्कृतिक भूक हे लेखक भागवतात. त्यांची वाचनाची सवय वाढवतात. सामान्य वाचक बिचारे स्वतःच्या आनंदासाठी वाचतात; कसलाही आव नसतो. 'उच्चभ्रू'पणाची ऐट आणणारी माणसं त्यांच्याहून अधिक घातक असतात. सामान्य माणूसही आपल्या कुवतीनुसार निवड करत असतो. आपण त्यांना काहीच कळत नाही असं कसं म्हणायचं? आणि उच्चभ्रूंना तरी सगळं कळतं असं कुठं आहे? वाचकांचे अनेक थर आहेत, यांतला कोणताही एक थर वंचित ठेवणं हे पाप आहे. म्हणून त्या लोकप्रिय लेखकांनी लिहू नये असं म्हणण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. आपल्याला ते आवडत नसेल तर आपण वाचू नये. ही गुळमुळीत तडजोड नव्हे; ही जीवनाच्या वस्तुस्थितीची थोडी उशिराच घेतलेली दखल आहे. मी जोपर्यंत लिहीत होतो तोपर्यंत ही दखल मी घेतलेली नव्हती. लोकांनी हे वाचू नये, ते लिहूही नये, असा आग्रह असे. पण आता अनेक प्रकारच्या व अनेक दर्जाच्या लेखनव्यापारांची अर्थपूर्णता पटू लागली आहे.
आजच्या मराठी वाङ्मयाबद्दल तुम्ही एकंदरीने समाधानी आहात!
- अशी कल्पना करा की, वाङ्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते, त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणेच जंगलंही पाहिजेत, वाळवंटं पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडं पाहिजेत. जंगलाची शोभा त्यातच आहे! मराठी वाङ्मयाचं दुर्दैव हे, की या जंगलात महावृक्ष नाहीत. याचा अर्थ मराठीत व्यास-शेक्सपिअर-टॉलस्टॉय-डोस्टोव्हस्की नाहीत. ती तक्रार नाही. ते युगा-युगांनंतर येतात. पण आपल्याकडे त्यांच्या आसपास पोचतील असे वृक्षही नाहीत. याचं दुःख वाटलं पाहिजे. त्याऐवजी आपण दुःख कशाचं करतो? तर अमुक लेखक सामान्य लिहितात आणि ते वाचलं जातं, याचं! आपल्या साहित्यव्यवहाराचा एक भाग - एकमेकांना मोठं करणं, आणि दुसरा भाग - सामान्य लेखक सामान्य आहेत, हे पुनःपुन्हा सांगणं. खासगीत त्यांची टिंगल करणं. प्रत्येकालाच 'हॅम्लेट' आवडेल असं कुठे आहे हो? शेक्सपिअरनं असामान्यांना दिलं तसं सामान्यांनाही भरपूर दिलं. तो अभिरुचीच्या अधोगतीबद्दल कुढत बसला नाही. काव्यक्रांत्या वगैरे भानगडीतही पडला नाही. त्या तोलामोलाची प्रतिभा असली की अनेक गोष्टी आपोआप साधतात. जुन्या मराठी काव्यातील ज्ञानेश्वर व तुकाराम हीच दोन नावं मराठीनं जगात मिरवावी अशी. पण आमच्या ज्ञानबा-तुकारामाच्या गजराला आता ते संतही कंटाळले असतील! त्या जागतिक तोलामोलाचं आम्ही काय केलं?
यावर काही उपाययोजना?
- कवीनं मोकळ्या मनानं, कोणतेही पूर्वग्रह न बाळगता, समीक्षकांची किंवा इतर कसलीही दडपणं येऊ न देता - म्हणजेच आपल्या मस्तीत लिहीत राहावं अन् वाचकानं ते वाचत राहावं. मोठे कलावंत कोणत्याही बाह्य कारणामुळे निर्माण होत नाहीत. आपण मात्र साहित्याचा इतिहास शिकवताना ती कारणमीमांसा करतो. संगती लावून दाखवणं हे माणसाचं व्यसन असतं. रिनेसान्सची मूव्हमेंट, त्यातून मिळालेल्या प्रेरणा, इंग्लंडमधली वाङ्मयाची परंपरा, वगैरे. पण हे सगळं स्ट्रॅटफर्डमधल्या एका अर्धशिक्षित माणसापर्यंत कसं येऊन थडकलं हो? आणि तिथेच का भडकलं हो? त्याच्या ठिकाणीच हा उद्रेक का झाला? 'त्याच्या प्रतिभेमुळे' एवढंच त्याचं खरं उत्तर! किंवा त्याहूनही - त्याला उत्तर नाही, हेच खरं उत्तर!
(हे इथे (http://marathisahitya.blogspot.com/2006/03/blog-post_24.html) वाचता येईल.)
सहमत!
इंद्रराज,
सहमत!
त्यांच्या भयकथा कितीही अंगावर काटा आणणारया असल्या तरी त्यांच्यावर 'भयकथा लेखक' असा शिक्का बसायला नको होता. अतिमानवी अस्तित्व, पिशाच्च, हडळी यांच्याबद्दल लिहीणारे धारप स्वतः सायन्स पदवीधर होते हे ठाऊक आहे का लोकांना!
आणि तुम्ही माना अथवा मानू नका, म्हणूनच, या शिक्क्यामुळेच धारपांची पुस्तकं आवडणारया मंडळींच्या 'साहित्यीक अभिरुची'बद्दल जरा शंकेनेच पाहिलं जातं.
सु.शि, बाबा कदम आणि बाबुराव अर्नाळकरांच्या बाबतीतही तोच प्रकार होतो!
In reply to सहमत! by मणिकर्णिका
योग्य माप न दिले गेलेली काही नावे...!
होय...मणिकर्णिका....असे होते मात्र...दुर्दैवाने !
"टेलीपथी....टेलिकायनेसीस...व्हर्च्युअल रिअॅलिटी....सोल कम्युनिकेशन..." आदी संकल्पना ज्या आपण आज स्टीव्हन स्पिएलबर्ग, जेम्स कॅमेरून आदी दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटातून पाहतो, त्या श्री.धारप यानी चक्क चाळीस वर्षापूर्वी आपल्या कथा-कादंबरीतून मांडल्या होत्या....पण होते असे की, 'नवल' सारख्या रहस्य, अदभूत आणि कल्पनाविश्वाची सफर यामुळे नाव असलेल्या मासिकातून त्यांचे (बहुतेक सर्व) लेखन प्रसिद्ध होत गेल्यामुळे त्यांच्यावर 'दोन घटकांची करमणूक' करणारा लेखक असा अन्यायकारक शिक्का बसला, तो बसलाच...! हेच साहित्य कमीजास्त प्रमाणात 'सत्यकथा', 'अभिरूची', 'हंस', 'वीणा', 'युगवाणी' अशा नावाजलेल्या मासिकातून त्या काळी प्रकाशित झाले असते तर कोण जाणे पुढे पुस्तकरुपात प्रकाशित झालेल्या त्यांच्या एखाद्या कादंबरीचा 'साहित्य अकादमी' पुरस्कारासाठीही विचार झाला असता.
सु.शि....बाबा कदम...यांच्याबाबतीतही तेच. इतकी प्रसिद्धी या दोघांच्या वाट्याला येऊनही त्यांच्या नावासमोर 'खटाववाडी' चा शिक्का नसल्याने ते 'अभिजात' चाळणीत येणार नाही हा अलिखित नियम ठरलेला. त्यातही निदान आजकाल सु.शि.साहित्याच्या मागणीला चांगले दिवस आले आहेत. खुद्द इथे श्री.सागर आणि श्री.वल्ली दहा दहा पाने लिखाण करू शकतील एकट्या सु.शि. वर.. इतके ते सुशिप्रेमी आहेत.
त्यातल्यात्यात निदान बाबुराव अर्नाळकर यांना अ पासून ज्ञ पर्यंत सर्व थरावरील वाचकवर्ग लाभला होता असा वाङ्मयीन इतिहास सांगतो..... साहित्य 'टिकाऊ' या सदरात येत नसेल, पण त्यांचा असा एक काळ होताच हे मान्य करावे लागेल.
आजच्या 'फास्ट फॉरवर्ड' च्या जमान्यात या गटातील लेखकांचे अस्तित्व जणू पुसूनच गेले आहे....तरीही निदानपक्षी तुमच्यासारखी काही जाणकार मंडळी त्यांच्या साहित्यावर चर्चा तरी करताच....हेही नसे थोडके !
इन्द्रा
In reply to योग्य माप न दिले गेलेली काही नावे...! by इंद्रराज पवार
अचूक मूल्यमापन
सु.शि., बाबा कदम, गुरूनाथ नाईक, एस. एम. काशिकर, रामचंद्र सडेकर, नारायण धारप, रत्नाकर मतकरी हे लेखक कदाचित अभिजात चाळणीत येणार नाहीत पण लोकप्रियतेचा जर निकष लावला तर त्यात ते कुठेही कमी नाहीत ते दिसून येते. आपण जर वाचनालयात गेलो तर एकवेळ पेंडसे, दांडेकर, जी.ए. दिसणार नाहीत पण तिथे मात्र सु. शि., कदम, सडेकर, नाईक, अर्नाळकर यांची झाडून सर्व पुस्तके त्यांच्या त्यांच्या नावाच्या कप्प्यात आपल्याला दिसतात. पण जर पुस्तके विकत घेउन वाचायचे म्हटले तर त्यातील किती वाचक त्यांची पुस्तके विकत घेउन वाचतात हा मोठा गहन प्रश्नच आहे. श्री. इंद्रराज यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मी व सागर सुशिप्रेमी आहोतच. पण व्यक्तिशः माझ्याकडेही सुशिंची दोनच पुस्तके आहेत बाकी नाईक, कदम, धारप आणि इतरांचे एकही नाही. अपवाद फक्त मतकरीचा. त्यांची जवळजवळ सर्वच पुस्तके माझ्याकडे आहेत. सागरकडे मात्र बरिचशी आहेत. तरीही सर्वच आहेत असा दावा तोही करू शकणार नाही. पण तोच निकष लावून पाहिले तर मात्र पेंडसे, दांडेकर यांची सर्वच पुस्तके व्यक्तिगत घेतलेली सर्वत्र दिसतील. जी.ए. संपूर्ण तर अनेकांकडे आहेच.
लोकप्रिय साहित्य हे रंजनासाठीच वाचले जाते. तर अभिजात साहित्य मात्र आपल्याला बरेच समृद्ध करून जाते हेच खरे.
In reply to अचूक मूल्यमापन by वल्ली
खरं आहे वल्लीचं
मी थोडा नशीबवान आहे खरा
सागरकडे मात्र बरिचशी आहेत. तरीही सर्वच आहेत असा दावा तोही करू शकणार नाही.
सुशिंची माझ्याकडे किमान २५-३० पुस्तके तरी असतील.
सुशिंच्या लेखनाचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांचे कोणतेही पुस्तक पुन्हा वाचताना तेवढाच आनंद मिळतो, कंटाळा येत नाही. मला सुशिंची पुस्तके आवडतात. अजूनही माझा पुस्तके वाचायचा मूड गेला की मी सुशिंची १-२ पुस्तके वाचतो मग मला माझा हरवलेला सूर पुन्हा सापडतो आणि मग मी बाकीच्या पुस्तकांकडे वळतो. :)
सुशिंची पुस्तके माझ्यासाठी टॉनिक चे काम करतात.
लोकप्रिय साहित्य हे रंजनासाठीच वाचले जाते. तर अभिजात साहित्य मात्र आपल्याला बरेच समृद्ध करून जाते हेच खरे.
सौ सुनार की एक लोहार की असे हे कोरुन ठेवण्याजोगे पण सत्य वाक्य :)
In reply to खरं आहे वल्लीचं by सागर
सागर, वल्ली
सागर, वल्ली,
'अभिजात साहित्या'ची व्याख्या काय?
'अभिजातते'च्या कसोटीवर उतरण्याकरता काय काय निकष लावावेत?
अभिजात साहित्य वाचल्याने कशा आणि कुठल्याप्रकारे समृद्ध व्हायला होते? किंवा तुम्ही कसे समृद्ध झालात जरा खुलासेवार सांगता येईल का? ऐकायला आवडेल.
तळटिपः माझ्याकडे सुशिंची २० पुस्तकं आहेत. अमर विश्वास, फिरोज सिरीज सर्वात जास्त.
In reply to सागर, वल्ली by मणिकर्णिका
नावे दे ना २० पुस्तकांची
मणि,
अभिजात साहित्यावर इंद्रराज, वल्ली, नंदन, श्रामो, चिंतातुर जंतु, आणि बाकीचे अनेक तज्ञ बोलू शकतील.
पण मला असे वाटते आहे की या विषयावर एक वेगळा धागा सुरु करावा
या धाग्यावर ही चर्चा अप्रस्तुत होईल कारण ती लांबेल :)
मी योग्य वेळी त्या चर्चेत भाग घेईनच. एक नवीन धागा करतेस का यावर? तू पण थोडे सविस्तर लिही म्हणजे तुझा दृष्टीकोन पण सर्वांना कळेन.. या धाग्याच्या निमित्ताने एक सुंदर चर्चा पुवि वर अनेक दिवसांनी होईन
तुझी सुशिंच्या पुस्तकाची यादी इथे दे किंवा मला खरड.
आवडेल मला माहिती करुन घ्यायला. कारण तुझ्या ग्रंथसंग्रहात ती यादी काही दिसत नाही.
माझ्या येथील ग्रंथसंग्रहात सुशिंची माझ्याकडे असलेली सगळी पुस्तके अॅडवली आहेत :)
अभिजात+लोकप्रिय...!
जगभरातीलच साहित्य नवे तर हरएक ललित कलेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच एक बाब समोर येते की, सर्वत्रच 'अभिजात' [Classic] आणि 'लोकप्रिय' [Popular] हे दोन प्रमुख वर्ग अस्तित्वात आहेच. हे कुणी जाणूनबुजून करते अशातला भाग नसून वर्गीकरण हे काळाच्या कसोटीवर कायम होत असते. ग्रीक,इजिप्त, रोमन, द.भारतातीलमधील भव्य मंदिरे उभी करणारे शिल्पकार असोत, वा रेम्ब्रा, व्हर्मीअर, एंजेलो, रुबेन, व्हॅन गॉग यांच्या चित्रकृती असोत...या काळाच्या कसोटीवर उतरून शेकडो वर्षे झाली तरी त्यांची मोहिनी आणि त्यामागील त्या कलाकारांचे कष्ट, कल्पना विसरल्या गेलेल्या नाहीत...जाऊच शकत नाहीत. याना 'अभिजात' म्हणतो त्यावेळी 'पिकासो' हा जरी 'लोकप्रिय' गटातील चित्रकार असला तरी त्याच्या कलाकृतीत अभिजातपणा नाही काय? पिकासोही जगभर एक आयकॉन मानला गेला आहे. त्यामुळे 'अ' अभिजात म्हणून वरिष्ठ आणि 'ब' लोकप्रिय म्हणून कनिष्ठ या गोष्टी फक्त कॉफी टेबलपुरत्या उरतात. दोन्ही वर्गाने समाजाला नेमके जे हवे ते दिले आहे, आणि त्यातून त्याच समाजाने काय अंगिकारले याचा फक्त मागोवा घेतला म्हणजे दोन्ही संज्ञातील अर्थ आणि त्यांचे महत्व अधोरेखीत होते.
साहित्य ही देखील एक कलाकृती असल्याने इथेही हे दोन वर्ग सुखनैव नांदत आले आहेत हे स्पष्टच आहे. अभिजात गटात येणारे साहित्य हे लोकप्रिय का होऊ नये किंवा होत नसेल तर का झाले नाही, असा प्रश्न खरा तर दुय्यम आहे. होमरची महाकाव्ये 'इलियड' आणि 'ओडेसी' शेकडो वर्षापासून जगभर अभ्यासिली जातात म्हणजे ती अभिजात आहेत म्हणूनच. ती लोकप्रियही झाली त्याला कारण म्हणजे त्यातील कथांची मोहिनी जनमनातून कधीही ओसरली जाणार नाही. पण त्यावेळीच वा आगेमागे अन्यत्र प्रसिद्ध झालेली सोफोक्लिसचे 'फिलोक्टेट्स', हिप्पोक्रेटसचे 'एपिडेमिक्स', प्लॅटोचे 'रिपब्लिक', अॅरिस्टॉटलचे 'ड्रीम्स' (अशी अनेक उदाहरणे देता येतील...) या कलाकृतीही 'अभिजात'च होत्या आणि अभ्यासकांच्या दृष्टीने त्यांचे महत्व कालातीत आहे. असे असले तरी याना 'इलियड' ची लोकप्रियता कधी मिळाली नाही. असे असले तरी आजही जर यांची चर्चा जगाच्या कुठल्या तरी कोपर्यात क्षीणपणे का होईना होत असेल तर त्या दोन्ही गटात हमखास येऊ शकतात.
सर्वन्टेसचा 'डॉन क्विक्झोट' हा तर मूळचा स्पॅनिश, पण १६०५ मध्य लिहिलेली ही अचाट कादंबरी आणि तिचा सरदार नायक, त्याचा हरकाम्या नोकर पांझा, त्याची कल्पनाशक्ती....आदी, सार्या जगाला वेड लावून देण्यास समर्थ झाली आहेत. आज चारशे वर्षे होऊन गेली तरी जगभरातील प्रत्येक विद्यापिठात ही कादंबरी 'क्रमिक' पुस्तकाच्या यादीत अग्रस्थानी असतेच. कथानक तरी काय? एक असाध्य वेडाने पछाडलेली व्यक्ती, त्याला ताळ्यावर आणण्यास मदत करणारा एक नोकर, त्या दोघांचा शोधासाठी अथक तरीही थकत गेलेला प्रवास...."स्वप्न" पाहाणे ही ईश्वरदत्त देणगी प्राप्त झाली आहे मानवाला आणि स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठीच प्रयत्न...ही शिकवण...इनमिन दोनतीन पॅरेग्राफमध्ये आटोपली जाणारी अशी ही कादंबरी 'अभिजात' का गणली गेली आहे याचा विचार केला तर दिसून येते की, ती केवळ ला मांचा वा सरदाराची कहाणी नसून जगातील प्रत्येक देशात, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत सापडणार्या गण्यागंप्याच्या स्वप्नाची कहाणी आहे....स्पेनमधील डॉन आपला दिनू होतो तो याच भावनेने...आणि हीच त्या कलाकृतीला अभिजात बनवते.
रामायण-महाभारत ही दोन्ही महाकाव्ये अभिजात बनतात ती याच गुणांमुळे....तर लोकप्रिय झाली ती त्यांच्या अफाटपणामुळे. नाहीतरी जी.ए.म्हणतात त्याप्रमाणे या महाकाव्यांना गुंडाळायचे म्हटल्यास 'महाभारत म्हणजे जमीन वाटपासाठी झालेली भाऊबंदकी..." असेही सोयिस्कररित्या म्हणता येतेच. पण साहित्यात अभिजातपणा येतो तो त्यामागील तत्वज्ञानामुळे...ज्याच्या आधारावर मानवाने 'माणूस' म्हणून प्रगती करावी अशी सर्वसाधारण भूमिका ती ती कलाकृती निर्मितीमागे असते.
आधुनिक काळातील साहित्यालाही हेच निकष लागू होतात. शेक्सपीअर तर बाजूलाच राहु दे, पण मिल्टनच्या "पॅराडॉईज लॉस्ट", जोनाथन स्वीफ्टच्या 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स", फिल्डींगच्या "जोसेफ अॅन्ड्र्यूज", कांटच्या "मेटाफिजिक्स ऑफ मोराल्स", गिबनचे 'डीक्लाईन अॅन्ड फॉल", जॉर्ज ऑर्वेल, थॉमस मान, जेन ऑस्टेनच्या सर्वच कादंबर्या, इमर्सनचे निबंध, टॉलस्टॉय, डोस्टोव्हस्की यांच्या प्रदीर्घ समजल्या गेलेल्या कादंबर्या....शेकडो उदाहरणे आहेत जी काळाच्या कसोटीवर उतरून 'अभिजात' दर्जा मिळविलेली आहेत....असे असले तरी या तितक्याच किंबहुना काकणभर जादाच अशा 'लोकप्रिय' कलाकृती आहेत. चार्ल्स डिकन्स हा जितका अभिजात त्याहुनी लोकप्रिय, मार्क ट्वेन तर सर्वच गटात गळ्यातील ताईत, कार्ल मार्क्सचे 'कॅपिटाल' हे अभिजात की लोकप्रिय...की दोन्हीही हे प्रश्न उमटतच नाही, इतके ते आपल्यात भिनले आहेत. "अरेबियन नाईट्स" अभिजात की लोकप्रिय? असा प्रश्न मनी येणेच शक्य नाही इतकी त्या आपल्या हृदयी खोलवर मुक्कामी आहे.
मग निव्वळ 'लोकप्रिय' गट निवडायचा झाल्यास? तर तिथेही एक चाळणी आहेच अन् ती म्हणजे ज्या कलाकृती निव्वळ रंजनासाठी निर्मिल्या गेलेल्या आहेत आणि ज्यांचे आयुष्य विशिष्ट काळापुरतेच सीमित असते. असे साहित्य (बहुधा कादंबर्या...) ज्यावेळी लेखक लिहितो त्यावेळीच त्या कलाकृतीचे अस्तित्व 'पुढील' कादंबरी येईपर्यन्त असेच त्यावे स्वरूप असते. या गटात मग अगदी अगाथा ख्रिस्ती, बार्बरा कार्टलँड, जॅक्वेलिन सुसान या सारख्या 'लंच टाईम' स्त्री लेखिका असो वा 'पॉलिटिक्स, सेक्स, माईल्ड पोर्नोग्राफी, गॅन्गवॉर, करप्शन, सस्पेन्स, कार्पोरेट वर्ल्ड' यांच्याकडे प्रामुख्याने झुकणार्या एकामागोमाग एक कादंबर्या प्रसरविणारे हॅरॉल्ड रॉबिन्स, आयर्विंग वॅलेस, अॅलिस्टर मॅक्लिन, मारिओ पुझो, फ्रेडरिक फोर्सायथ किंवा आजचे डॅन ब्राऊन इत्यादी असोत....यांचा प्रधान हेतू इतपतच की वाचकाने 'एक विलक्षण थरार' अनुभवला पाहिजे. यामध्ये मानवी मूल्यांची जपणूक, परंपरेचा हट्टाहास, थोर तत्वज्ञान, नितीमत्तेचा उदोउदो असे प्रकार बिलकुल नसतात....किंबहुना तो त्यांचा उद्देशही नसतोच. खुद्द वाचकाचीही त्या साहित्यापासून 'मोअर दॅन एंटरटेनमेन्ट' अशी अपेक्षा नसतेच. त्यामुळे या गटातील कादंबरीकारांच्याही कलाकृती कोटीच्या घरात जरी खपत असल्या तरी त्यांचे आयुष्य ती पूर्ण वाचल्यानंतर संपुष्टात येते. असे असलेतरी या "लोकप्रिय' गटातील लेखकांची अभ्यासाची शैली जबरदस्त आहेच आहे. वॅलेसने 'प्राईझ' ही 'नोबेल पुरस्कारा'वर आधारित कादंबरी लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. पण त्या विषयावरील अधिकृत माहिती मिळविण्यासाठी वॅलेसने काय आणि किती प्रयत्न केले ते त्याच्या Writing of A Novel या शोधपुस्तकातून वाचली की समजते 'लोकप्रिय' असा जरी त्याच्यावर शिक्का बसलेला असला तरी तो चार भिंतीच्या आत बसून लिहिणारा लेखक नव्हता. ८४ वर्षाचे दीर्घ आयुष्य लाभलेल्या आर्थर हेलीच्या 'हॉटेल', 'व्हील्स', 'एअरपोर्ट', 'मनीचेन्जर्स' या कादंबर्यांची नुसती नावे जरी वाचली तरी ती कोणत्या क्षेत्रावर आधारित आहेत हे समजते, पण त्या वाचताना या लेखकाने त्या त्या क्षेत्राचा इतका अभ्यास कधी आणि कसा केला असेल याचे नवल वाटल्यावाचून राहात नाही. टीकाकर भले याला 'अभिजात' साहित्याच्या दालनात ठेवीत नसतील तरीही त्यांच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही कमतरता येत नाही....किंबहुना या गटातील लेखकवर्गानेही 'मला अभिजात लेखकांच्या पंक्तीला का वाढत नाहीत?' असाही त्रागा कधी केलेला नाही. [मोबदल्याच्या दृष्टीने पाहिले गेल्यास शंभर अभिजात लेखकाना मिळालेले मानधन एकट्या वॅलेसने एका कादंबरीपोटी मिळविलेले होते....पण हा सर्वस्वी वेगळा विषय होईल.]
त्यामुळे 'अभिजात' असो वा "लोकप्रिय" दोन्ही गटातील वाङ्मयाने जगभरातील वाचकाला अपरंपार आणि कधीही न संपणारा आनंदाचा खजिना दिला आहे.
आता आपल्याकडील साहित्याचा मागोवा .....[पुढच्या प्रतिक्रियेत देतो....कारण ही प्रतिक्रिया मूळ धाग्यापेक्षाही मोठी झाल्याचे दिसत आहे.]
इन्द्रा
In reply to अभिजात+लोकप्रिय...! by इंद्रराज पवार
खूपच छान
इंद्रराज, खूपच उत्तम प्रतिसाद दिलाय तुम्ही. तुमच्या नुसत्या प्रतिसादातच कित्येक जागतिक दर्जाच्या कादंबर्यांची नावे खच्चून भरली आहेत. सर्वच कादंबर्या वाचण्याचा मोह होतोय. रंजनासाठी असलेल्या हॅरॉल्ड रॉबिन्स, आयर्विंग वॅलेस, अॅलिस्टर मॅक्लिन, मारिओ पुझो, फ्रेडरिक फोर्सायथ, डॅन ब्राऊन, अगाथा ख्रिस्ती, आर्थय हेली यांच्या बहुतेक कादंबर्या वाचून झाल्याच आहेत(अर्थातच अनुवादित). आता तुमच्या वर उल्लेखलेल्या मिल्टन, काट, स्विफ्ट, ओर्वेल, मान, ऑस्टीन कडे जाण्याची जबरदस्त इच्छा निर्माण झालीय.
In reply to अभिजात+लोकप्रिय...! by इंद्रराज पवार
सुंदर प्रतिसाद इंद्रराज
छानच प्रतिसाद आहे.
अभिजात' असो वा "लोकप्रिय" दोन्ही गटातील वाङ्मयाने जगभरातील वाचकाला अपरंपार आणि कधीही न संपणारा आनंदाचा खजिना दिला आहे
या वाक्याला टाळ्या... :)
खरी गोष्ट आहे ही.
आयर्विंग वॅलेस च्या प्राइझ या पुस्तकाबद्दल सुंदर मुद्दा छेडला.
आयर्विंग वॅलेसची मला आवडलेली अनेक पुस्तके आहेत
- सेकंड लेडी
- द सेवन्थ सिक्रेट
ही जास्त गाजलेली देखील आहेत. पण नोबेल पारितोषिक कसे मॅनेज केले जाते यावर आधारित वॅलेस ची प्राईझ आली आणि या पुस्तकाने वॅलेसला एक वेगळे स्थान निर्माण करुन दिले.
गॉडफादर या मारियो पुझोच्या पुस्तकाबद्दल माझे थोडे वेगळे मत आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारीत असली तरी गॉडफादरमधून मिळण्यासारखे खूप काही आहे. तीच गोष्ट सिडने शेल्डनच्या ब्लडलाईन मधून देखील मिळते. वाचकाला आत्मसन्मानासाठी प्रेरित करणार्या या कादंबर्या आहेत असे माझे (वैयक्तिक) मत आहे.
एकंदरीत अभिजात साहित्यकृतींबद्दल बोलायचे झाले तर आपण सर्व नशीबवान आहोत की वेगवेगळे आणि थोर लेखक आपल्याला मिळाले.
अभिजात आणि लोकप्रिय या निकषांच्या कसोटीवर पारख करताना लेखकांचे एकूण ३ प्रकार मी मानतो
१. काही लेखकांना अभिजात कलाकृती निर्मितीचे गूढ गवसलेले असते. असे लेखक लोकप्रिय असतीलच असे नाही
२. काही लेखकांना अभिजात कलाकृती निर्माण होताना ती सर्व थरांतील लोकांना आकलन होऊ शकेन या लेखनशैलीत मांडण्याचे कौशल्य प्राप्त झालेले असते. अशा कलाकृती अभिजातही असतात आणि लोकप्रियही
३. तर काही लेखकांना सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मनोरंजक लेखन करण्याचे कौशल्य प्राप्त झालेले असते. असे लेखक लोकप्रियतेच्या शिखरावर कायमच असतात. एक मनोरंजक उदाहरण द्यायचे झाले तर अँडी मॅक्डरमॉट या लेखकाच्या पुस्तकांची नावेच त्या लेखकाच्या लेखनकौशल्यावर प्रकाश टाकतात. जिज्ञासूंनी या दुव्यावर या लेखकाच्या पुस्तकाची नावे व पुस्तकांची मुखपॄष्ठे देखील बघावीत. उदा: हन्ट फॉर अटलांटिस, व्हॉल्ट ऑफ शिवा, टोम्ब ऑफ हर्क्युलिस... असे लेखक लोकप्रिय होऊ शकतील पण अशा लेखकांना अभिजात साहित्यकृतीचे दार देखील पहावयास मिळत नाही.
या व्यतिरिक्त या दोन्ही प्रकारांत न मोडणारेही लेखक येतात पण तो या धाग्याचा विषय नाही.
चर्चा सुंदर चालू आहे. इंद्रराज तुम्हाला विनंती आहे की तुमच्या प्रतिसादाचा दुसरा भाग लवकरात लवकर द्यावा. तो कितीही मोठा झाला तरी चिंता करु नका. एक सकारात्मक चर्चा येथे होते आहे आणि ती चर्चा जेवढी विस्ताराने होईल तितकी अजून मजा येईन.
सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. अजून पुढे चर्चा करुयात. :)
दुसरा भाग....!!
प्रतिक्रिया भाग-२
ज्यावेळी आपण साहित्य संदर्भात 'जागतिक पातळी वरील..' या वाक्याचा आपल्या लिखाणात, चर्चेत उपयोग करतो त्यावेळी निश्चितच "इंग्रजी"तील साहित्य (मग भले ते अन्य भाषांतून अनुवादित होऊन आले असले तरीही...) हेच प्रामुख्याने अभिप्रेत असते. "डॉन..." चा वर उल्लेख आहेच, त्याच गटातील गॅब्रियल गार्सिया मार्क्वेझची One Hundred Years of Solitude ही स्पॅनिश भाषेतील जगप्रसिद्ध कादंबरी असो वा समस्त रशियन लेखकांचे वाङ्मय, काम्यूचे फ्रेन्च, काफ्का, थॉमस मान यांचे जर्मन असो....या सर्वत्र मानल्या गेलेल्या थोर साहित्यिकांची ओळख झाली ती 'इंग्रजी' भाषेमुळेच. इतकेच काय ज्यावेळी समितीसमोर रविन्द्रनाथ टागोर यांच्या नावाचा नोबेल प्राईझसाठी विचार आला त्यावेळीही मूळ बंगाली 'गीतांजली' काव्याचे इंग्लिशमध्ये भाषांतर करून घेऊन त्यावर डब्ल्यू.बी.यीट्स, एझरा पाऊंड, रोथेन्स्टेइन [जे टागोरांच्या काव्यप्रतिभेने भारून गेले होते] आदी मान्यवरांची पसंती घेण्यात आल्यावरच समितीपुढे ते काव्य विचारार्थ गेले. 'अभिजात' वाङ्मयाची कसोटी लावण्यासाठी या पायर्या कुठल्याही साहित्यप्रकाराला पार कराव्याच लागतात. 'गीतांजली' देशभर मग 'लोकप्रिय' का ठरली? तर साहजिकच जगन्मान्य असे 'नोबेल प्राईझ' मिळाले म्हणून. म्हणजेच अमुक एका कलाकृतीला चारचौघे मानतात ते पारितोषिक प्राप्त झाले म्हणजे त्या लेखकाचे साहित्य (अगदी सर्वच नसले तरी...) एका रात्रीत 'अभिजात' आणि 'लोकप्रिय' ठरते हे गृहितक काही अपवादात्मकबाबतीतच सिद्ध होते. उदा.विंदा करंदीकरांना 'ज्ञानपीठ' पुरस्काराने गौरविण्यात आले म्हणून दुसर्या दिवशी 'स्वेदगंगा', 'मृदगंध' हे कवितासंग्रह घेण्यास वाचकांची मॅजेस्टिक बुक स्टॉलवर गर्दी उसळली असे होते नाही. तर दुसर्या बाजुला वि.स.खांडेकरांना ज्यावेळी हेच पारितोषिक मिळाले त्यावेळी 'ययाति' ची मागणी वाढली असेही झाले...त्याला कारण म्हणजे ययाति प्रसिद्धीच्या दिवसापासूनच 'लोकप्रिय' ठरली होती आणि आता ज्ञानपीठामुळे तिला एकप्रकारे 'अभिजात' साहित्याच्या दर्जा प्राप्त झाला असे मानले गेल्यानी त्या मूळच्याच प्रसिद्धीत आता ज्यादाची भर पडली....म्हणजेच दोन्ही घटक एकमेकाला पूरक आहेत असे मानले तरी व्यवहारात 'वाचक नावाचा प्राणी' जे ठरवेल अंतीमतः तेच होते.
गेल्या दशकापासून तर सरकारीच काय पण अगदी पाडळी बुद्रुक, खांडगाव-खुर्द गावातून पसरलेल्या गल्लीबोळातील सार्वजनिक वाचनालयापासून ते व्यवसायातून श्रीमंती आलेल्यांनी आईबाप आजाआजोबांच्या नावे पारितोषिक देण्याची जी टूम सुरू केली तीत ग्रामदेवळापासून ते साहित्य आणि पैलवानाना खुराक ते झोपडपट्टी सुधारणा यांचा त्यांच्या 'देणगी' नियमावलीत समावेश असतो. मग साहित्यासाठी मीटिंग भत्त्याच्या बोलीवर एखादी समिती स्थापन करायची आणि त्याना सुचवायला सांगायचे दोनचार नावे प्रतिवर्षी....मग सुरू होते 'अमुक एका कादंबरीला तमुक एक भव्य बक्षिस !"....वर्तमानपत्रे तर 'पारितोषिक आणि बक्षिस' या मध्ये काही फरक आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. म्हशी पळविण्याच्या शर्यतीत मिळालेल्या ढालीला जे नाव तेच साहित्यविजेत्या लेखकाला दिल्या जाणार्या शिल्डला नाव. घेणार्यालाही त्यात जर वावगे वाटत नसेल तर देणार्याला काय वाटावे? पण आपण त्रयस्थ या नात्याने अशा 'भरघोस पारितोषिका'चा विचार लेखकाच्या 'लोकप्रियते'साठी करतो त्यावेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की त्या चेकवरील रकमेने त्या साहित्यिकाचे आर्थिक भले होत असले तरी साहित्याच्या क्षेत्रात मूल्यभ्रम निर्माण होत असतो. कारण प्रकाशक ही बिलंदर जमात दुसर्याच दिवशी 'ललित' आणि 'मेहता ग्रंथ जगत' मधून 'अभिनंदन...आमच्या अमुक एका पुस्तकाला तमुक यांचे पारितोषिक मिळाले. आता त्यामुळे खास सवलत मूल्य आवृत्ती...नावे नोंदवा...' वाचकाचाही असा समज होतो की खरच किती अभिजात साहित्य असू शकेल ती कादंबरी म्हणजे. त्यामुळे साहित्य आणि साहित्यिक यांचे मूल्यमापन करण्याचा अधिकार अंतिमतः विदग्ध समीक्षेलाच असला पाहिजे (जी आता दुर्मिळ होत चालली आहे.) दुर्दैवाने अतिवेगाच्या या जमान्यात खर्या अर्थाने अस्तित्वात असलेल्या वाङ्मयीन नियतकालिकांच्या अभावी आज तो अधिकार अनाधिकारी व्यक्ती आणि कुत्र्याच्या छ्त्रीप्रमाणे गल्लोगली उगवलेल्या संस्थाकडे गेला आहे. हल्ली तर धर्म जात उपजात गट पक्ष गाव लिंग आदी बाबीचे निकषही पारितोषिकासाठी लावण्यात येत असल्याचे पाहून तिथे 'साहित्या'चा विचार तरी होतो का असे वाटायला लागले आहे. [हे थोडे विषयांतर झाले, पण असू दे....इथे आपण साहित्य हाच विषय प्रामुख्याने चर्चेला घेतला आहे.]
सबब मराठी साहित्यातील 'अभिजात' आणि 'लोकप्रिय' या दोन तागड्यातील वाङ्मय तपासताना त्यांचे वाङ्मयीन मूल्यच सर्वार्थाने तपासले गेले पाहिजे. बेडेकरांची 'रणांगण' आजही कादंबरी परीक्षणाच्या अभ्यासक्रमात अढळस्थानावर का आहे? रेग्यांची 'सावित्री', पेंडसे यांची 'रथचक्र', नेमाडे यांची 'कोसला', माडगुळकरांची 'बनगरवाडी', शंकर पाटलांची 'टारफुला'. दळवींची 'चक्र', तल्हारांची 'माणूस', शेळक्यांची 'धग' ....ही काही वानगीदाखल उदाहरणे अशी आहेत की या कलाकृतीवर बाजूने आणि विरूद्ध अशा दोन्ही मतांचा धबधबा (विशेषतः कोसलावर) पडला असला तरी या कादंबर्यांवर प्रतिकूल टीका करणारेही त्यांची वर्गवारी कायमपणे अभिजात गटात करतात. या कादंबर्यांच्या विषयांत ज्या काही बाजू लेखकांनी अधोरेखीत केल्या आहे ('रणांगण आणि 'सावित्री' ह्या तर छोटेखानी आहेत...एका बैठकीत वाचून होण्यासारख्या) त्यात विरोध, विसंगती, संवादी, संतुलित, असंतुलित, विचलित विश्वाचे धागेदोरे असे काही गुंफले आहेत की यातील कुठलीही कलाकृती 'निखळ मनोरंजना'साठी निर्माण करण्यात आलेली नसून 'वाचक अस्वस्थ'च होतो. जीवनाच्या धाग्यांना हेलकावे देणारे साहित्य म्हणजे एक अप्रतिम शिल्प, एक अनवट मूर्तीच असते. त्या साहित्यातील जिवंतपणा वाचकाला असे काही मूक करतो की, जीवनाचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी या साहित्याची पारायणे त्याला करावी वाटतात यात या 'अभिजात' म्हणविल्या गेलेल्या लेखनाचे यश आहे.
मात्र म्हणून तो 'स्वामी', 'मृत्युंजय', 'श्रीमान योगी', 'महानायक', 'ताम्रपट', 'पानिपत] या कादंबर्या निव्वळ 'लोकप्रिय'तेचे लेबल लागले आहे म्हणून वाचतो असे नव्हे तर त्या कादंबर्यातून रेखाटल्या गेलेल्या व्यक्तिरेखांवर त्याचे मूळचेच प्रेम असते...अभ्यासही असतोच. काही रंजनाबरोबर आणखी सखोल माहिती मिळाली तर ती त्याला हवीच असते त्यामुळे इथेही या उदाहरणात वाचकाने 'लोकप्रिय' या निकषासोबत आणखीन काही जादाची ओढ त्याला लावली असल्याचे दिसते जे सर्वमान्यही आहे. परंतू ज्यावेळी दोन घटकांचे मनोरंजनच त्याला अभिप्रेत आहे त्यावेळी जे साहित्य तो जवळ करतो त्याला मात्र केवळ 'लोकप्रिय लेखक' इतकेच अभिप्रेत असते. या गटातील साहित्यिकांच्या लेखणीचा झपाटाही विलक्षण असतो, इतकी की हरेक महिन्याला ते एक कादंबरी बाजारात आणू शकतात आणि प्रकाशक ती वेगाने खपवूनही दाखवितात. पण याना 'अभिजात साहित्य' प्रकारात स्थान का मिळत नाही तर त्यांच्या लिखाणाचे 'वाचकांना चटकन प्राप्त होणारा सुबक, नटवा आणि हुरहूर लावणारा आनंद देणारे' असेच स्वरूप असते. अशा पुस्तकांना 'पुनर्वाचना"चे भाग्य (सहसा) लाभत नाही, जे 'रणांगण, कोसला' याना मिळते....हा एक लक्षणीय फरक आहे दोन गटात. अर्थात मानवीमूल्यांचा आणि जगण्यामागील प्रेरणेचा मागोवा साहित्यातून घ्यायचा असेल तर वाचकाने अभिजात वाङ्ममयाचीही कास सोडता कामा नये. कारण त्यातील जीवनचिंतन, रुपके आपले अनुभवविश्व संपन्न करीत असतात. एखाद्या पुस्तकाबद्दल 'लोकप्रिय नाही म्हणून मी ते पुस्तक वाचले नाही..." असा ज्यावेळी एखादा वाचक विचार करतो त्यावेळी त्याने वाचन या नावाखाली केवळ पाने पालटली असे होईल.
'अभिजात' आणि 'लोकप्रिय' हे दोन्ही दिवे वाचकाच्या वाचनाच्या अथक प्रवासातील साथीदार आहेत...असा प्रवास जो कधी संपणारही नाही आणि हे दोन्ही दिवेही कधी विझणार नाहीत.... एक आहे म्हणून दुसर्याची गरज नाही असे मानण्याचे कारण नाही, कारण जीवनात डावे आहे म्हणून तर उजव्याला महत्व आहे, हेही ध्यानात ठेवणे तितकेच महत्वाचे आहे.
इन्द्रा
In reply to दुसरा भाग....!! by इंद्रराज पवार
अतिशय उत्तम प्रतिसाद
पूर्णपणे सहमत.
एखाद्या वाचकाची सुरुवात लोकप्रिय साहित्यापासूनच होते. लोकप्रिय साहित्याचा आस्वाद घेतल्यानंतरच त्याला वाचनाच्या, पुस्तकांच्या अफाट ताकदीची जाणीव होते व त्यानंतर तो अभिजात साहित्याकडे वळतो. एकापरीने लोकप्रिय साहित्य हे अभिजात साहित्यासाठी एक प्रकारे उत्प्रेरकाचीच(Catalyst) भूमिका बजावत असते.
फरक इतकाच की लोकप्रिय साहित्याचा आस्वाद अगदी सर्वसामान्य माणूसही घेउ शकतो. पण अभिजात साहित्य अंगी भिनवण्यासाठी किंचित प्रगल्भतेची आवश्यकता असते.
In reply to अतिशय उत्तम प्रतिसाद by वल्ली
प्रश्न
माझ्या मते प्रश्न येथेच येतो. अभिजात साहित्य अंगी भिनवण्यासाठी प्रगल्भतेची आवश्यकता असते याचाच अर्थ अभिजात वाचतात ते प्रगल्भ आणि इतर अप्रगल्भ असा(ही) निघतो ना? मला मागची अवचट या संदर्भात झालेली चर्चा आठवली. मी दुसऱ्या एका प्रतिसादात लिहिलं आहे की, मीही लोकप्रिय साहित्य असे म्हणतो आणि त्याला दुय्यमच मानतो. पण ते वाचणाऱ्याला नाही किंवा त्याच्या प्रगल्भतेबद्दल तो ते साहित्य वाचत असल्याने शंका घेणार नाही. कारण हे असे काटेकोर नियम बसवता येत नाहीत.
In reply to प्रश्न by श्रावण मोडक
असे असत नाही...!!
"...अभिजात वाचतात ते प्रगल्भ आणि इतर अप्रगल्भ असा(ही) निघतो ना?..."
~ नाही श्रामो...असा सूर निघत नाही आणि काढण्याचा यत्नही करू नये. कारण तुम्ही एक लेखक या नात्याने जाणताच की हे सर्व मानणे (वा ना मानणे) व्यक्तिसापेक्ष आहे. आम्हाला (आम्हालाच काय पण इंग्रजी विषय शिकणार्या सर्वानाच) अभ्यासक्रमात शेक्सपीअर अटळ होता, कारण, तो 'अभिजात' गटातील अशी त्या नावावर शेकडो वर्षाची मोहोर, पण त्याचे साहित्य कितीही अगदी व्हॉईस-चॅन्सेलरनेसुद्धा कंठारवाने ओरडून सांगितले तरी आमच्याकडून "संपूर्ण शेक्सपीअर" कधीच वाचले गेले नाही. इथे प्रगल्भतेचा नसून आवडण्याचा प्रश्न येतो. जॉईसच्या 'युलिसिस' वर वा लॉरेन्सच्या 'लेडी चॅटर्लीज्" वर का कमी राळ उठविली गेली होती? युरोपात तर बंदीही होती. तरीही जगभर ही पुस्तके कोट्यावधी वाचकांनी वाचलीच ना? मग इथे ह्या कलाकृती अभिजात की लोकप्रिय? अशी खूप उदाहरणे देता येतील.
होते असे की जागतिक पातळीवर मोठे गणले गेलेल्या लेखकानी नेहमीच 'बेस्ट फिशिंग इन द ट्रबल्ड वॉटर...' हे सूत्र अंगिकारल्याने त्यांच्या कलाकृतीवर त्या त्या काळात या ना त्या कारणाचे चर्चेला विषय पुरविले गेले आहेत. आता चर्चेचा विषय झाला म्हणजे त्या कलाकृतीचा आस्वाद घेणे अनोळखी वाचकाला क्रमप्राप्त वाटणे साहजिकच आहे. 'सात सक्कं त्रेचाळीस' ही वाचावी म्हणून वाचली की कायम चर्चेत आली आहे तर वाचू या, यासाठी वाचली असाही विभाजक निघू शकतो. शिवाय जे वाचक अभिजात वाचतात ते लोकप्रिय गणले गेलेले साहित्य वाचत नाही हाही एक छुपा निष्कर्श तुमच्या वरील विधानातून निघण्याची दाट शक्यता आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे असे होत नाही. त्यामुळे प्रगल्भ कोण आणि अप्रगल्भ कोण याबद्दल कुस्ती करण्यातही काही हंशील नाही.
शेवटी मला कुमार गंधर्व जितके भावतात तितका तलतही....पण म्हणून यावरून मी प्रगल्भ की अप्रगल्भ ठरविणारे कुठले मीटर अस्तित्वात असत नाही....'जत्रेत तर मला भटकायचे आहे मनमुराद...पण गावड्या सांगतोय म्हणून नव्हे !"
इन्द्रा
In reply to असे असत नाही...!! by इंद्रराज पवार
अच्छा
हे सारं तुम्हासारख्या समजूतदार मंडळींबाबत लागू होतं. प्रगल्भ - अप्रगल्भ असा संदर्भ नको, असे सारेच म्हणत नसतात आणि मग हे प्रश्न येतात. उदाहरणार्थ अवचट यासंदर्भात येथेच झालेली चर्चेच्या मूळ स्रोत.
एक अतिरिक्त गोष्ट लिहितो. शास्त्रीय संगीत समजण्यासाठी त्या माणसाकडं थोडी वैचारिक बैठक असावी लागते, असं जितेंद्र अभिषेकी म्हणायचे, असं मला एका मुलाखतीवेळी शौनक यांनी सांगितलं होतं. मी ते इतरत्रही लिहिलं. त्यावेळी "म्हणजे मग, शास्त्रीय संगीत समजणाऱ्याकडे वैचारिक बैठक असते, असं मानायचं का" असा एक प्रश्न केला गेला होता. मला उत्तर देता येत नाहीये. अगदी आजही. वैयक्तिक स्तरावर मला शास्त्रीय संगीत समजत नाही, पण आवडतं. आता मी या न्यायानं कोणत्या प्रकारात मोडत असेन? तीच गोष्ट आऊटसायडर आणि दुनियादारीची.
In reply to अच्छा by श्रावण मोडक
बैठक...!
"...शास्त्रीय संगीत समजण्यासाठी त्या माणसाकडं थोडी वैचारिक बैठक असावी लागते, असं जितेंद्र अभिषेकी म्हणायचे, असं मला एका मुलाखतीवेळी शौनक यांनी सांगितलं होतं...."
~ ठीक आहे, थोडा वेळ मान्य करु या. पण इथे पंडितजी म्हणतात "समजण्यासाठी". मला पं.मल्लिकार्जुन मन्सूरजींचा राग जौनपुरी समजूनच घ्यायचा असेल तर माझ्याकडे वर म्हटल्याप्रमाणे थोडी वैचारिक बैठक असणे गरजेचे ठरते. पण मला फक्त त्या रागाचा 'आनंद' घ्यायचा असेल तर मी तो ऐकायचा नाही का? पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला गर्दी करणार्या सर्वानाच शास्त्रीय संगीताची वैचारिक बैठक असते असे मानायचे का? त्यातील निम्म्यापेक्षा जास्त संगीताचा आनंद लुटण्यासाठीच तिथे जमा होतात असे मी जर म्हटले तर तो त्यांचा अपमान समजण्याचे काही कारण नसते.
आता रागदारी समजणार्यांकडे 'वैचारिक बैठक' असते का? या प्रश्नाला उत्तरही असेच आहे की समजणार्याने अभ्यासाच्या दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा असा निर्णय घेतला तर तशी वैचारिक बैठकही तो तिथे चार पावसाळे काढून प्राप्त करू शकतो. ही एक गुरूकुल अभ्यासाची परंपरा आहे. मर्ढेकर वाचणे आणि मर्ढेकर समजून घेणे यासाठी वेगवेगळी सूत्रे आहेतच, बैठकही असणे मग क्रमप्राप्त झाले. पण म्हणून ज्याला अभ्यासाअंती मर्ढेकर 'समजले' म्हणजे त्याने स्वतःला मर्ढेकराचे मात्र वाचन करण्यार्याला हिणविण्याचे काही कारण असत नाही.
गुलाब फुलाच्या सौंदर्याचे वर्णन कविही करतो आणि एखादा बॉटनीचा प्राध्यापकही त्यातील इलेमेन्टस समजावून सांगतो. अशावेळी फरक पडतो तो दोघांच्या 'दृष्टी'त....एक प्रगल्भ आणि दुसरा अप्रगल्भ असा काही इथे प्रकार संभवत नाही. साहित्याचेही तसेच मूल्यमापन व्हावे. बालकविंची 'औदुंबर" हे एक याच पठडीतील दोन्ही घटकांना भावणारे छान आणि सुंदर उदाहरण आहे.
इन्द्रा
इन्द्रा
प्रगल्भता...!!
"....पण अभिजात साहित्य अंगी भिनवण्यासाठी किंचित प्रगल्भतेची आवश्यकता असते...."
~ खरंय, पण ही प्रगल्भता येण्यासाठी कुठल्यातरी विद्यापीठाची त्या विषयातील पदव्युत्तर स्नातकाचे आवरण तुमच्या अंगाभोवती असले पाहिजे असे मानण्याचे बिलकुल कारण नाही. प्रगल्भता मिळते वा विकसित होते ते सातत्याच्या वाचनामुळेच आणि त्यातील विविधतेमुळे.
मला जी.ए. आवडतात, म्हणजे याचा अर्थ असा नाही की माझ्याभोवती मी फक्त त्याच लेखकाचे कुंपण घालून घ्यावे. तिथून मी पुढे डोस्टोव्हस्की, किर्केगार्द, सार्त्र, काम्यू, काफ्का यांच्या गावी जाण्यासाठी एस.टी. पकडली तरच खर्या अर्थाने प्रगल्भतेच्या रस्त्याला लागलो असे समजेन.
"चांदोबा" चांगलेच मासिक आहे....पण म्हणून जगात तेच फक्त वाचनयोग्य असे मानले तर आपण फक्त वयाने मोठे झालो एवढाच त्यातून अर्थ निघेल.
इन्द्रा