Submitted by ऋषिकेश on
चिंतातुर जंतू

मला गेल्या दशकातलं कोणतंच पुस्तक सर्वार्थानं आवडलं नाही हे आधीच कबूल करतो. तरीही मला जी महत्त्वाची वाटली ती पुस्तकं या यादीत आहेत. त्यात एखाददुसरा अपवाद वगळता प्रामुख्यानं मराठीत काही नवीन जाणिवा ज्यांनी आणल्या अशी पुस्तकं आहेत. त्यामुळे 'शाळा', 'मौनराग' वगैरे पुस्तकं यात नाहीत. बोकील, एलकुंचवार, मेघना पेठे, कविता महाजन, सतीश तांबे, श्याम मनोहर वगैरेंनी गेल्या दशकात नवीन काही केलं असं मला वाटलं नाही. समीक्षा, कविता वगैरे यादीत नाहीत; मुख्यतः कथनात्मक लिखाण आहे.

बारोमास - सदानंद देशमुख (कादंबरी) - गावाकडचं बदलतं वास्तव
निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे उत्रादकर (कादंबरी) - द. मा. मिरासदार किंवा शंकर पाटलांची आठवण यावी असं, आताच्या गावाकडच्या जाणिवा मराठी साहित्यात आणणारं पुस्तक
हिंदू - भालचंद्र नेमाडे (कादंबरी) - भारतीय संस्कृतीकडे अगदी अनोख्या नजरेनं पाहायचा प्रयत्न.
सिगारेट्स - मन:स्विनी लता रवीन्द्र (नाटक) - नागर तरुणाईचं बदलतं वास्तव. यात किंचित शिडकाव्यापुरता तरुणाईचा विनोदही आहे आणि तो रोचकही आहे.
कोबाल्ट ब्लू - सचिन कुंडलकर (कादंबरी) - नागर तरुणाईचं बदलतं वास्तव. समलिंगी संबंध हा याचा विषय नाही. त्यातलं एक पात्र समलिंगी आकर्षण वाटणारं आहे.
नांगरल्याविण भुई - नंदा खरे (कादंबरी) - खर्‍या आणि कल्पित पात्रांची सरमिसळ करून भारतातल्या न झालेल्या पण होऊ शकली असती अशा एका वैज्ञानिक आणि सामाजिक क्रांतीच्या शक्यतेनं मनाला चुटपुट लावणारी विलक्षण कादंबरी.
अच्युत आठवले आणि आठवण - मकरंद साठे (कादंबरी) - मराठी कादंबरीक्षेत्रात नव्या वाटा चोखाळणारी आणि अस्वस्थ करून सोडणारी विलक्षण कादंबरी.
तमाशा - संदेश भंडारे (छायाचित्र) - तमाशाबद्दलची ही छायाचित्रं गोष्ट सांगतात म्हणून आणि मराठी माणसाला दृश्यकलांचं वावडं असतं म्हणून या पुस्तकाचा मुद्दाम समावेश केला. त्याच्या लोकप्रियतेनं मराठी पुस्तकविश्वात काही शक्यता आणि आशा निर्माण केल्या.

आणखी नावं आत्ता तरी सुचत नाहीत त्यामुळे एवढीच यादी देतो आहे.

Thu, 03/02/2011 - 18:28 Permalink

लोकसत्तामधे आलेला दशकातील दहा हा लेख काल वाचनात आला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे समाजातील वाचनसंस्कृती पार लयास जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात मात्र हे दशक संपताना परिस्थिती वेगळी दिसते आहे. या काळात विविध कारणांनी वाचकांची ‘चव’ बदललेली जाणवत असली तरी त्यामागे निश्चित असा ‘दृष्टिकोन’ आहे. या दशकात गाजलेली वा न गाजलेली, परंतु प्रभावशाली अशा निवडक दहा मराठी पुस्तकांचा, तसेच (अन्य पानावर) वेचक जागतिक पुस्तकांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.. अर्थात् वैयक्तिक स्वरूपातला!

ह्या लोकसत्तामधील सुरेश सोनटक्के यांच्या धांदोळ्यामधे हिंदूसारखी गाजलेली/गाजवलेली/खपलेली पुस्तके आहेत, भिन्न सारखी रसिकमान्य पुस्तकेही आहेत. अर्थात प्रत्येकाची यादी ही वेगळी असेल. इथे अशीच तुमच्या मनातली यादी द्यायची आहे.

तुम्ही वाचलेल्या नव्या १० उत्तम पुस्तकांची यादी.

अटी:

  • ही पुस्तके गेल्या १०-१५ वर्षांत प्रसिद्ध झाली असावीत.
  • यातील किमान तीन पुस्तकांची ओळख/तुम्हाला ते का आवडले वगैरे माहिती वाचकांना करून देणे गरजेचे आहे.

यानिमित्ताने एक चांगल्या व नव्या पुस्तकांचा संग्रह होईल अशी अपेक्षा आहे.

मी माझी यादी प्रतिसादात यथावकाश देईनच.. तर करा सुरवात.. तुमची आवडती गेल्या दशकातील दहा पुस्तके कोणती?