'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
एक 'गोड' बाळ
मुखपृष्ठ
|
"लहानपणी वाचलेल्या अनेक पुस्तकांनी बालपण समृद्ध केलं आहे" वगैरे वाक्य अनेकांच्या लेखांत, मुलाखतील वाचायचो/ ऐकायचो तेव्हा किती छापील बोलतात असं पुर्वी वाटायचं. पण माझं वाचनं फारच बेताचं असलं आणि चरुरस्त्र नसलं तरी जे वाचलं त्याच्या जोरावरही 'लहानपणी वाचलेल्या अनेक पुस्तकांनी बालपण समृद्ध केलं आहे' हे वाक्य फेकण्यास हरकत घेता येऊ नये. अनेक पुस्तकांनी लहानपणी वेगळ्या विश्वात - त्या वयाला आवश्यक अशा कल्पनाविश्वात (फँटसी) - नेलं आहे. मग भा.रा.भागवतांची ज्यूल व्हर्नची भाषांतरे असोत किंवा देनिसच्या गोष्टी असोत. याच यादीतील एक पुस्तक आज शुचि यांच्या ह्या पुस्तक परिचयावरून आठवलं आणि मन पंधराएक वर्षे मागे धावलं
गोट्या, सानेगुरूजींपासून काळा पहाड आणि ठक्-ठक्, चंपक, किशोर, चांदोबा, अबब हत्ती, टॉनिक वगैरेत रममाण होणार्या वयात मुंजीच्या निमित्ताने भेट म्हणून माझ्या कपाटात "साखरेचं बाळ" आलं. आणि मग हे बाळ माझंच नाही तर घरातल्या सगळ्यांचं लाडकं बाळ बनलं. एका हलवायाच्या घरात एकदा हलवाई चक्क साखरेचं बाळ बनवतो. हलवायाच्या घरातल्या मुलांचंही ते फार लाडकं बाळ बनतं.. मात्र एका रात्री ते बाळ जिवंत होतं आणि हलवायाच्या घरातून (बहुदा कुत्र्याच्या भितीने.. आता नीट आठवत नाही) पळतं. बाहेर त्याला एक घार उंदीर समजून पकडून उडून जाते आणि उंदीर नसल्याने खट्टु होऊन एका झाडाच्या फांदीवर सोडते. तिथे त्याला मधमाशा पकडून पोळ्यात घेऊन जातात, तिथून सुटका होते तर एका घुबडाच्या सल्ल्याने तो मुंग्यांकडे जातो तर मुंग्या त्याला गोड म्हणून वारूळात घेऊन जातात. पुढे मुंगळ्यांबरोबरच्या युद्धात ते बाळ मुंग्यांच्या बाजूने लढतं आणि मग मुंग्या त्याला पुन्हा हलवायाकडे आणून सोडतात असं ते साध सोपं कथानक आहे.
"ह्यात काय विषेश" असं म्हणण्याआधी थांबा! साखरेच्या बाळाचा प्रवास मधमाश्या आणि मुंग्याच्या वारूळात होतो इतकाच हा उल्लेख नाही तर मधमाशा व मुंग्यांच्या साम्राज्याची सखोल माहीती देणारं हे पुस्तक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा, त्यांच्या षट्कोनी खोल्या, राणीमाशी, मेण बनविण्याची प्रक्रीया, नव्या राणी माशीचा जन्म, फुलातुन मध व परागकण जमण्याची प्रक्रिया, चांगला मध वेगळा काढणं, अधिक टिकणारा मध साठवण्याची मधमाश्यांची पद्धत वगैरे माहिती इतकी सुंदर दिली आहे मधमाश्यांचं जग हे वाचकाला अत्यंत विस्मयचकित करणारं बनतं. मधमाश्यांप्रमाणेच मुंग्यांच्या वारूळाची रचना, त्यांचे प्रकार, (चक्क) शेतकरी मुंग्या, कामगार मुंग्या, राणी मुंगी, त्यांची अन्न साठवण्याची पद्धत, त्यांच्यावर येणारी संकटं वगैरे माहीती तितकीच रोचक आहे.
हे पुस्तक वाचताना आम्ही घरातल्या मोठ्यांनाही रममाण झालेलं पाहिलं आहे तर आमचं काय होत असेल हे सांगायला नको. बरं हे पुस्तक केवळ माहिती देण्यासाठी लिहिल्यासारखं लिहिलं नसून त्यांला एक व्यवस्थित कथा आहे, अतिशय समजायला सुलभ असे संवाद आहेत, वापरलेलं मराठी शुद्ध आहे तरीही शब्दयोजना सोपी आहे. तसेच "लहान मुलं" हा वाचकवर्ग डोळ्यासमोर लिहिताना त्यांच्या मनोव्यापाराची उत्तम जाण ठेऊन त्यांच्या विश्वातील उपमा, सवयी त्या बाळाच्या अंगी आहेत.
मात्र इतकं सुंदर पुस्तक आज माझ्याकडे नाही. आता बहुदा ऑत ऑफ प्रिंट असावे (कारण कुठे मिळालं नाही). मनाला इतकं जवळचं पुस्तक त्या न-कळत्या वयात घरात आलं आणि काही कळू लागायच्या आत कोणीतरी नेलं ते आणूनच दिलं नाही. पण त्या वयात नकळत मनावर राज्य करणारं ते बाळ आणि मधमाशा-मुंग्यांचं साम्राज्य अजूनही आठवलं की मन आपोआप त्या निष्पाप विश्वात पोचतं
मनःस्पर्शी परिचय
वा फारच मनःस्पर्शी पुस्तक परिचय. मला स्वतःला लहान मुलांची पुस्तकं खूप आवडतात. कारण त्यांची सहज सुंदरता (सिंपलीसिटी). ही पुस्तके जड्व्यागळ नसतात. ऋषीकेष आपण म्हणालात त्याप्रमाणे एक कोवळी निष्पापता असते आणि या सगळ्यांतून भरारी घेणारी एक इनसाईट असते. लहान मुलांची पुस्तके लिहीण्यासाठी वेगळाच ई क्यू (इमोशनल कोशंट) लागतो हे खरं आहे.
मस्तच रे ऋष्या! कथानक आवडलं.
मस्तच रे ऋष्या! कथानक आवडलं.
पुस्तक परिचय आवडला आणि
पुस्तक परिचय आवडला आणि पुस्तकाची एकूण कल्पनाही आवडली.
छान
हे पुस्तक पुर्वी वाचल होत आठवणी जाग्या झाल्या...आभार.
ऋ
परिचय आवडला. वरचे प्रतिसादही आवडले. हा परिचय वाचून बरेचसे वाचक आपापल्या बालपणीच्या काळजात घर करून राहणार्या पुस्तकांच्या दुनियेत जाऊन पोचतात हे फार हृद्य वाटले.
इंद्रराजांनी सांगितलेल्या चांदोबा मधल्या कथा अर्धवट तुकड्यातुकड्यांमधून ग्राउंडवरच्या ग्रंथालयात जुन्या मासिकांचे खंड असायचे तिथे वाचल्या होत्या. चांदोबा हे प्रकरणच रोमहर्षक आणि वेडावून सोडणारं आहे.
साखरेचं बाळ खरोखरच फार गोड आहे असं दिसतंय 
--अदिती
--अदिती
गुणाः सर्वत्र पूज्यन्ते दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगंधमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदाः ॥
अप्रतिम!
अप्रतिम रे ऋ! फार आवडलं हे गोड बाळ. बालपणीच्या भावरम्य जगात जायला मला तर नुसतं निमित्तच हवं असतं..
तुझ्या या गोड बाळाने मला बदकाचा फ्रॉक नावाचे पुस्तक आठवले एकदम. लिहित रहा असाच मस्त. पुलेशु.






त्या आठवणी....!!
सुंदर परिचय आणि तितक्याच आंतरसालीसारख्या जपणार्या आठवणी सांगितल्या आहेत श्री.ऋषिकेश यानी. त्यानी भावूक होणे स्वाभाविकच आहे कारण त्या पुस्तकाचा गंध इतक्या आर्ततेने त्यानी जपून ठेवला आहे. 'साखरेचं बाळ' हे नावच इतकं गोड आहे की त्यावरून त्यातील लेखनाची जातकुळी झटकन लक्षात येते. पुस्तक नक्कीच आऊट ऑफ प्रिंट असणार कारण अशा धाटणीच्या पुस्तकांचे आयुष्य त्या लेखकाच्या नावाप्रमाणेच अल्पायुषी ठरते. पण मग अशा धाग्याच्या निमित्ताने त्यांची आठवण ज्यावेळी निघते आणि मग मनी जी हुरहूर घुमते त्यातच त्या पुस्तकाची गोडी चाखली असे मानले तर ते योग्यच म्हणावे लागेल.
आम्हा मराठा समाजात 'मुंज' हा प्रकार नसल्याने अशी पुस्तकांची भेट लहान मुलांना देणे ही कल्पना आमच्यात (निदान काही जिल्ह्याच्या ठिकाणी तरी) अद्यापिही रूजलेली नाही. मुलास 'भेट' म्हणजे हमखास ठराविक छापाची खेळणी किंवा खाऊचे डबे आणि वाढदिवसासारखा कार्यक्रम असेल तर कपडे...इतपतच उडी असते. तरीही मला व्यक्तीशः माझ्या लहानपणी, मूळचे रत्नागिरीचे, पण नोकरीनिमित्त कोल्हापुरात येऊन आमच्याच गल्लीत पलिकडील खोलीत राहणार्या एका शिक्षकांनी कोणत्यातरी निमित्ताने एक स्थानिक छापखान्यातून वरवर बाईंडींग केलेले एक पुस्तक भेट दिले केलेले. त्याला रितिरिवाजानुसार नाव नव्हतेच; पण त्या शिक्षकांनी स्वतःच रंगीत पेनने "तीन मांत्रिक व अन्य दीर्घकथा" असे पहिल्या पानावर लिहिलेले होते. हा संग्रह होता जुन्या १९५२ ते १९५८ सालातील 'चांदोबा' तील रंगीत दीर्घकथांचा एकत्र संग्रह. मी आणि माझे त्यावेळचे तीन मित्र वेडावून गेलो होतो त्यातील कथेच्या अनुषंगाने पानापानावर आलेली चित्रे पाहताना. 'चांदोबा' आमच्याकडे येत नव्हता...अर्थात आम्ही शाळेत असतानाच दूरदर्शनने घरी प्रवेश केला असल्याने थोरांच्या दृष्टीने 'दिले की आता घरी भरपूर...' झाले होते. पुस्तके वाचायची ती क्रमिक आणि जास्तीतजास्त रविवारी घरी येणारी साप्ताहिके असाच बहुतांशी पालकांचा समज होता...(निदान आमच्या घरी त्यावेळीही पुस्तकांची बर्यापैकी आवक असायची, पण 'चांदोबा' नव्हताच....'किशोर' होता.)
'तीन मांत्रिक' मधील 'पिंगल', 'पद्मपाद', "भल्लुककेतु" ही नावे आणि त्यांच्या कारवायांनी आम्ही मोहूनच गेलो. त्यानंतर त्या एकत्रित संग्रहात "धूमकेतु....कांशाचा किल्ला व त्यातील नायक चंद्रवर्मा....जुळ्या बहिणी..." ~ वाचून झाल्यावर आता आणखीन किती सुंदर आणि चमत्कारीक गोष्टीना आपण मुकलो आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली.
धन्यवाद...ऋषिकेश "साखरेच्या बाळा"ची आठवण काढल्याबद्दल.
इन्द्रा