
इथे एका धाग्याच्या निमित्ताने प्रसिद्ध कथाकार "श्री.दा.पानवलकर" यांच्याविषयी चर्चा छेडली गेली असता असाही विचार निघाला की या निमित्ताने त्यांची/त्यांच्या कथा साम्राज्याचीही सविस्तर ओळख करून द्यावी. तोच हा एक अल्पसा प्रयत्न.
श्री.दां.च्या लेखणीच्या सामर्थ्याची प्रचिती मला आली ती साधारणतः सन २००० (किंवा २००१ देखील असेल) साली, ज्यावेळी कोल्हापुरात झालेल्या "१९६० नंतरचे मराठी कथालेखन" या विषयावरील तीन दिवसाच्या चर्चासत्रात. सांगलीचेच प्रिं.म.द.हातकणंगलेकर यानी आपल्या शांत, संयत पण तितक्याच प्रभावी अभ्यासाने श्री.दा.पानवलकर, ए.वि.जोशी आणि चारूता सागर या तीन कथाकारांचे विश्व त्या सत्रात उलगडून दाखविले होते. चारूता सागर यांच्या 'नागीण' ने हॉलमधले श्रोते खूपच प्रभावित झाल्याचे स्पष्ट दिसत होते (ती कथा आहेच तशी...) पण मी आणि माझा एक मित्र रोमहर्षीत झालो होतो ते पानवलकरांच्या "जांभूळ" मुळे. अशा काही कोमल आणि भावपूर्व शब्दात हातकणंगलेकरसरांनी या कथेची मोहिनी आमच्या मनावर घातली की केव्हा एकदा ती कथा वाचतो असे होऊन गेले. पुढे ती मिळविलीही आणि हा लेखक जी.ए.यांच्यानंतर आपल्याला 'म्याड' करून टाकणार यात शंका राहिली नाही.....झालेही तसेच. मराठी कथेलाही स्वातंत्र्योत्तर काळात....विशेषतः १९६० नंतर....बदलत्या समाजजीवनाशी त्यातील आशयाशी समरस होणे गरजेचे वाटू लागल्याचे हळूहळू (गाडगीळ, मोकाशी, रेगे, भावे, मर्ढेकर करीत असलेल्या प्रयोगातून...) प्रतीत होत होतेच...भले त्यांच्यावर संतपरंपरेत वाढलेल्या त्याकाळातील ज्येष्ठ साहित्यिक आणि टीकाकारांकडून अश्लीलता, दुर्बोधता, वैफल्यग्रस्तता, जंतुवाद, कुरूपता, बीभत्सता असे अनेक आरोप नवकथेवर होत राहिले. कथाप्रकाराला एका सूत्रात जखडणे जाचक ठरू लागले होते. त्यातून अनेक वाद-प्रतिवाद झडले, काव्य-शास्त्र चर्चा रंगल्या. त्यामधून जे विचारमंथन झाले त्यातून नव्या जाणिवा घडल्या, रुजल्या आणि यथावकाश त्या विस्तारल्या! त्यातूनच गाडगीळ, भावे, अरविंद गोखले, धाकटे माडगूळकर यांच्यानंतर वा बरोबरीने या प्रांतात पुढे उत्साहाने सरसाविलेल्या जी.ए.कुलकर्णी, कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, विद्याधर पुंडलिक, शरच्चंद्र चिरमुले, शंकर पाटील, ए. वि. जोशी, तारा वनारसे, सरिता पदकी, ज्ञानेश्र्वर नाडकर्णी यांची नावे या प्रांतात शिलेदारासारखे चमकू लागले. "सत्यकथा", "अभिरूची", "हंस" ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. वाचकाला किती वाचू आणि कुणाचे वाचू अशी हेवा वाटण्यासारखी परिस्थिती त्या काळात निर्माण झाली.
या आघाडीत आपल्या अशा खास वैशिष्ट्याने सर्वांच्या लक्षात राहिलेले एक नाव म्हणजे ~ "श्री. दा. पानवलकर". सांगलीत १९२८ साली (नेमकी तारीख माहित नाही)... जन्मलेल्या श्री.दा. पानवलकरांचे वडील संस्थानात मुलकी अधिकारी होते. श्री.दा. मॅट्रिकच्या वर्गात शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. मामांनी त्यांना अबकारी खात्यांत नोकरीस लावले. पुढे या खात्यातील विविध विभागात काम करीत असताना तिथले विश्व असे काही त्यांनी मनी बिंबवले आणि त्याचा वापर पुढे मराठी कथेत केला की, वाचकाला प्रथमच कस्टम, चाचेगिरी आणि पोलीस जगताचे एक वेगळेच दर्शन झाले...शिवाय त्या खात्याशी हरघडी येत असलेला विविध प्रांतातील लोकांच्या बोली भाषेचाही श्री.दां.नी चपखलपणे आपल्या लिखाणात वापर केला. कस्टम असो वा पोलिस खाते असो, या ठिकाणी वावरताना ते बेदरकार, धाडसी आयुष्याचीच जपणूक करीत आणि त्यामुळे व्यायामाचीही मनस्वी आवड होती. उंच, आडदांड, देखणे शरीर होते. व्यायामशाळा, नदीचे घाट आणि महापुराशी दोस्ती. तशातच सांगलीत भरणारी कुस्त्यांची मैदाने व फुटबॉलचे सामने यात त्यांनी शरीर कमावले. शरीराच्या या भक्कमपणामुळे की काय, त्यांच्या लेखणातही एक प्रकारचा रांगडेपणा आणि कथेच्या प्रवाहात वाचकाला झोकून देण्याची विलक्षण ताकद आढळते. सांगली काय किंवा कोल्हापूर काय या दोन्ही ठिकाणी आपल्या लेखणीला आकार देणार्या लेखकांनी 'संस्थानी' कारभाराला/वातावरणाला आपल्या कथेत मोलाचे स्थान दिले आहे. पानवलकर तर पक्के सांगलीकर त्यामुळे त्यांच्या `श्रीमंताच्या वस्तरा' त संस्थांनी वातावरणाचा अनुभव सजग होतो. "सूर्य" ही एका पोलिस आणी त्याच्या पुढी पोलिस दलाताच अधिकारी बनणार्या मुलावरील अतिशय गाजलेली कथा. या कथेकरील 'अर्ध्यसत्य' ने तर हिंदी चित्रपटात मानाचे स्थान मिळविले आणि केवळ श्री.दा.च नव्हे तर ओम पुरी आणि सदाशिव अमरापूरकर ही नावे घरोघरी झाली. पानवलकरांना त्या कथे बद्दल १९८४ चा फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. पानवलकर मुंबईतच जवळपास २५ वर्षे कस्टम खात्यात अधिकारी म्हणून वावरले असल्याने तिथल्या रगेल, बहुरंगी जीवनाचे समर्थ चित्रण त्यांच्या लेखनातून होऊन राहिलेले आहे. जवळपास दोन संग्रह व्हावेत इतक्या त्यांच्या कथा कस्टमच्या वातावरणाशी निगडित आहेत. विमानतळ, बोटी, डॉकयार्ड, मदिरी+मदिराक्षी, तिथली रांगडी, प्रसंगी अश्लिल वाटणारी भाषा, अशा त्यांच्या कार्यक्षेत्रातला त्यांचा अनुभव इथे शब्दांकित होतो. सोन्याच्या शोधासाठी चाललेले छापे, भ्रष्टाचारातून निर्माण होणारी लफडी, तिथे गुंतलेल्या माणसांचे राग, लोभ, हितसंबंध, हेवेदावे, विविध मानवी भाव यांचे अनोखे दर्शन 'कस्टम आणि समुद्र छापे या वातावरणात वाचकाला घडते.
"सूर्य" सारखी उग्र प्रवृत्तीची जबरदस्त कथा एकीकडे तर कोमल मनांवरील पापुद्रे हळुवारपणे उलगडून दाखविणारी दुसरी कथा म्हणजे "जांभूळ". मासिकाच्या अनुक्रमणिकेच्या यादीत जरी हे लिखाण 'कथा' सदरात येत असले तरी ही खर्या अर्थाने एक 'भावकविता'च आहे. कथेमध्ये जांभळाला किती आणि का महत्व आहे ते प्रत्यक्ष त्या दोन पात्रांच्या आविष्कारात जांभूळ येऊन चिरडले जाते त्याचवेळी वाचकाला कळते आणि त्या काव्यमय (पण अयशस्वी) नात्याचे मोलही समजून चुकते. डॉ.जब्बार पटेल याना 'जांभूळ' कथेवर चित्रपट काढायचा होता. एका व्याख्यानात (बहुधा सांगलीतच...) त्यानी कबुली दिली होती की, जी. ए. कुलकर्णी , चि.त्र्यं.खानोलकर यांच्या बरोबरीने श्री.दां.च्या कथा चित्रपट साकारायला खूप अवघड आहेत. जी. एं. च्या कथांना हात लावायचे धाडस निर्माता-दिग्दर्शकांनी कधी केले नाही. त्याचप्रमाणे पानवलकरांच्या कथेतील व्यक्तिरेखा साकारणे हे काम देखील कठीण आहे. [ही एक प्रकारे पानवलकरांच्या अनोख्या प्रतिभेला तितक्याच प्रतिभावान दिग्दर्शकाची सलामीच म्हटली पाहिजे]. 'एका नृत्याचा जन्म', 'कमाई' या दोन कथाही चित्रपटाच्या नजरेतून अफलातून आहेत. पण त्यासाठी विजय तेंडुलकरांसारखा पट्टीचा पटकथाकार असणे फार जरूरीचे आहे. खुद्द तेंडुलकरांनी 'औदुंबर' नावाचा एक लेख लिहिला होता पानवलकरांवर. तो लेख त्यांच्या 'हे सर्व कोठून येते' या पुस्तकात आहे.
साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्याकडून 'श्री.दा.पानवलकर यांची कथा' हे प्रिं.म.द.हातकणंगलेकर यानी संपादित केलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते बहुतेक ठिकाणी उपलब्ध आहे. मौज परंपरेनुसार बाकीच्या कथासंग्रहांच्या आवृत्त्या अधूनमधून प्रकाशित होतात.
वयाच्या ५८ व्या वर्षी सांगलीतच श्री.दा.पानवलकरांचे देहावसान झाले. ते अविवाहीत होते.
धन्यवाद !
इन्द्रा
वा...
वा... पण थोडं संक्षेपानं घेतलं का?
संक्षेपाचे कारण....!
"....थोडं संक्षेपानं घेतलं का?..."
~ हा विचार मनात होताच, पण त्यालाही किनार अशी की इथले (आय मीन, पु.वि.) सदस्य हे मुळातच साहित्यप्रेमी आहेत आणि भाग घेताना साहित्यबाह्य गोष्टींचा इथल्या व्यासपीठावर विचार होत नाही. त्यामुळे प्रतिसाद देणार्यांनी साहजिकच 'श्री.दा.पानवलकर' यांच्याविषयी व त्यांच्या कथाविश्वाविषयीच प्रामुख्याने लिहिले तर खुद्द माझ्या ज्ञानातही भर पडेल. ज्याप्रमाणात प्रतिसादाद्वारे हा (आणि यासम अन्य येऊ घातलेले) विषय खुलत जाईल तसतशी त्याची व्याप्तीही वाढविता येईल.
इन्द्रा
चांगला
परिचय. 'सूर्य' ह्याच नावाचा त्यांचा कथासंग्रह आहे, त्यातल्या कथांची रेंज विलक्षण आहे. त्यातल्याच 'सूर्य' ह्या कथेवर आधारित 'अर्धसत्य'ची पटकथा विजय तेंडुलकरांनी लिहिली. प्रत्यक्ष चित्रपटात त्याचा शेवट सर्वस्वी कसा बदलला गेला, त्या चित्रपटाच्या यशाने प्रभावित होऊन राज कपूरने तेंडुलकरांना त्याच्या आगामी चित्रपटासाठी लिहिण्याची कशी गळ घातली यासंबंधीचा लेख तेंडुलकरांनी लिहिला आहे. तसंच पानवलकरांच्या कलंदर जगण्याचं, काहीशा बेफिकीर वृत्तीचं वर्णनही त्यांनी एका व्यक्तिचित्रात केलं आहे.
'सूर्य' ह्या कथासंग्रहातली वास्तविक मला स्वतःला सर्वात प्रभावी वाटलेली कथा म्हणजे पद्म. जेमतेम पाच पानांची. मोजके शब्द. कुठेही फाफटपसारा नाही, पण अतिशय परिणामकारक. पहिल्यांदा वाचली तेव्हा जी.एं.च्या विलक्षण उपमांची आठवण करुन देणाऱ्या लेखनात आणि चित्रदर्शी वर्णनातच एवढं गुंतायला झालं, की शेवटच्या कलाटणीचे संदर्भ लक्षात यायला जरा वेळ लागला. पुन्हा एकदा कथा वाचली आणि मग त्यातली नुकतीच व्यालेल्या केळेची उपमा; मित्राच्या सायकलीने केलेला कानाडोळा; गावाची आठवण बुडवून टाकण्याचा प्रयत्न करणारे डोंगर; (वयस्क) शेवाळाला पैलतीरी पोचवून कमळांच्या नाळी धुंडाळायला येणारा तो 'उलटा' झोका; परमेश्वराला साद घालत त्याच्यासारखाच 'तट'-स्थ बसलेला बूढ्ढा आणि तसाच निवांत निरीक्षण करणारा डोंगरावरचा नंदीबैल; पाठीवर शंख घेऊन लाळ खुरडत फिरणारी गोगलगाय; 'खोल पाणी दिसलं की खडा टाकावासा वाटतो' हे अगदी सहज येणारे वाक्य; धोक्याच्या जागी असलेली पण दाम मोजून सहज खुडता येणारी कमळं; फसवं 'फैला हुआ' झील, त्यातली चुकार कळी आणि निरुपायाने मधाचा कण सोडून परतावं लागणारा निळा किडा यांचं रुपक; सुरुवातीच्या प्रसन्न (चिंचेचा मोहर खावा तशी उन्हे खात) उपमांनंतर कथेच्या अखेरीस, कलाटणीच्या अगदी आधी येणाऱ्या अभद्रसूचक उपमा (सापासारख्या लोंबणाऱ्या नाळी, वासनेच्या ठिणगीसारखा किडा) -- या साऱ्या गोष्टींचा मग संदर्भ लागला. वाचून अंगावर काटा यावा पण कौशल्याला दाद द्यावी असे सारे एकत्र गुंफलेले.
उत्तम कथा लिहायला प्रतिभा सर्वात महत्त्वाची असली, तरी लेखनाच्या तंत्राकडेही लक्ष पुरवावे लागते. या दोन्ही गोष्टींचा इतका उत्तम मेळ, इतका सुरेख परिणाम आणि तोही कमी शब्दांत क्वचितच इतर कुठल्या कथेत साधला गेला असेल. संधी मिळाली तर 'सूर्य' हा कथासंग्रह नक्की वाचा.
धन्यवाद
धन्यवाद इंद्रराज,
आतापर्यंत श्री. दा. पानवलांबद्दल मी अनभिज्ञच होतो. एखाद दुसर्या पुस्तक प्रदर्शनातच त्यांच्या नावाचे पुस्तक पाहीले गेलेलेही असेल पण एकंदरीत त्यांच्याविषयीच्या अनभिज्ञतेने पुस्तक कधीही चाळले गेलेले नाही. पण तुमच्या आताच्या पानवलकरांच्या परिचयाने त्यांच्या कथांविषयीची उत्सुकता तर प्रचंड वाढलीय. त्यांची कथावाचल्याशिवाय ती आता थांबायचीच नाही. 'अर्धसत्य' पाहीलाच होता. आतापर्यंत तो विजय तेंडुलकरांचा वाटायचा. पण त्यामागची मूळ कथा पानवलकरांची होती हे समजल्यावर तर त्यांच्याबद्दलचा आदर तर अधिक दुणावला. खरेच पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अश्या ह्या मस्त कलंदराचा परिचय करून दिल्याबद्दल.
नंदन यांचेही आभार न मानणे चुकीचेच ठरेल. त्यांनाही खूप धन्यवाद. त्यांनी तर 'सूर्य' विकत घ्यायला प्रेरित केले.:)
खंत वाटते आहे
पानवलकरांचे एकही पुस्तक न वाचल्याची खंत वाटते आहे :(
सुंदर ओळख करुन दिलीत इंद्रराज तुम्ही. नंदनने देखील महत्त्वाची माहिती देऊन मोलाची भर टाकली आहे या धाग्यावर. पुण्याच्या वारीत पानवलकरांना लक्षात ठेवूनच पुस्तकांची खरेदी होईन माझी.
धन्यवाद
In reply to खंत वाटते आहे by सागर
मला पण असेच वाटते.पानवलकर आता
मला पण असेच वाटते.पानवलकर आता वाचलेच पाहिजेत.इंद्रराज यांचे आभार.
आभार इंद्रा. पानवलकर वाचलेले
आभार इंद्रा.
पानवलकर वाचलेले नाहीत.. आता जमवले पाहिजे
पानवलकर साहित्य
१. श्री.नंदन
~ वर श्री.मोडक यांच्या "संक्षेप" या प्रयोजनाला उत्तर देताना माझ्या मनी जी कारणे होती तीच नेमकी तुमच्या प्रतिसादात प्रतिबिंबीत झाली आहेत. 'श्री.दा.पानवलकर' [वा त्या निमित्ताने अन्य लेखक] सारख्या कलंदराला शब्दबद्ध करणे एकट्यादुकट्याचे काम नक्कीच नाही. त्यामुळे लेख लिहितानाही तो जाणीवपूर्वक आटोक्यात येईल इतक्या शब्दात पकडण्याचा मी प्रयत्न केला होता...जो तुम्ही तुमच्या 'पद्म' प्रतिसादाने पुढे नेला आहे.
यापूर्वीच मी तुमच्या ब्लॉगवर 'पद्म' विषयी सविस्तर वाचले होते...कथाही अर्थात स्वतंत्रपणे तसेच 'सूर्य' मधून वाचली होतीच. तरीही तुमचे तेथील भाष्य तसेच त्यावर आलेल्या तेथील वाचकांच्या प्रतिक्रियाही पाहिल्याने खुद्द तुम्ही पानवलकर यांच्यावर किती अधिकारवाणीने लिहू शकाल ही शक्यताही मनी डोकावली होती. एखाद्या लेखकाची प्रवृत्ती ही बहुपेडी असते, बहुमुखी होऊ शकते. पानवलकर एकाच लेखणीद्वारे अनेकविध विषयांना हुकमी स्पर्श करीत ते 'पद्म', 'जांभूळ', 'सूर्य', 'कमाई', 'एका नृत्याचा जन्म' अशा ढळढळीत रंगातून प्रकट होते. भाषेशी कुठेही लडिवाळपणा नाही, कृत्रिमपणा तर नाहीच नाही...आहे ती रोखठोक व्यवहारी भाषा, जी तुमच्याआमच्या रक्तात जगण्याच्या या शर्यतीत भिनलेली असल्याने ती फार भावते.
"सूर्य" कथासंग्रह वाचावा अशी तुमची जी शिफारस आहे ती यथार्थच आहे असेच मी म्हणेन आणि वरील काही प्रतिसाद पाहिल्यानंतर खात्री आहे की येथील प्रत्येक सदस्य तुमची सूचना अंमलात आणतील.
२. श्री.वल्ली
थॅन्क्स वल्ली. मला विशेष आनंद होतो तो तुम्हाला हा लेख आवडला म्हणून नव्हे तर या निमित्ताने तुम्ही समग्र श्री.दा.पानवलकर वाचून काढ्ण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल. त्यांच्या सुदैवाने श्री.विजय तेंडुलकर यांच्यासारखा समर्थ पटकथाकार "सूर्य" साठी लाभला आणि जब्बार पटेल म्हणतात तसे त्यांच्या कित्येक कथांवर प्रभावी चित्रपट निघू शकतात....पण परत तितक्याच तोलामोलाच्या 'तेंडुलकर' धाटणीच्या पटकथाकारासाठी घोडे अडलय....आता तर ती शक्यताही दुरावली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची एकच बाब म्हणजे 'अर्धसत्य' मुळे का होईना, श्री.दा.पानवलकर नावाचे कुणी लेखक या महाराष्ट्र देशी आहेत हे तरी घरोघरी माहिती झाले.
३. श्री.सागर, निवांत पोपट, ऋषिकेश
~ हरकत नाही, जरी अद्याप तुम्ही श्री.दा.पानवलकर यांचे सर्वच कथासंग्रह वाचले नसले तरी. पण आनंद होत आहे की या निमित्ताने का होईना तुमच्या घरी त्यांच्या पुस्तकांचे आगमन होईल. त्यांच्या खूपशा कथा या प्रत्यक्षदर्शी घटना आणि नोकरीतील अनुभवावर आधारित असल्या [ज्याला साहित्यिक भाषेत प्रासंगिक लेखन म्हटले जाते] तरी त्यानी मूलभूत आणि तरल सौंदर्यशास्त्रीय विचारव्यूह मांडून लक्षणीय अशा भाषेचा जो बाज त्या अनुभवाला दिला आहेत, तो तुम्हाला फार भावेल.
धन्यवाद
इन्द्रा
पानवलकर
म्हटले की 'सूर्य' आठवते, त्यांच्या कस्टम्सच्या जगातील विलक्षण अनुभव दर्शवणार्या अनेक कथ आठवतात (ज्या खरे तर एकसुरी आहेत-- एखादी सोडून). पण का कोण जाणे, मी 'जांभूळ' साफ विसरून गेलो होतो. इंद्रांनी त्याच्या उल्लेख केल्यावर, ती जेव्हा प्रथम एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्याझाल्य वाचली होती, तेव्हाचा थरार आठवला (आणि ती कथ विसरल्याची शरम वाटली).
'पद्म' पुन्हा एकदा वाचली पाहिजे हे नंदनच्या प्रतिसादावरून जाणवले.
अवांतरः "जी. एं. च्या कथांना हात लावायचे धाडस निर्माता-दिग्दर्शकांनी कधी केले नाही". पालेकरांनी कैरी काढला की! आणि आमची निराशा केली की. मराठी नाट्यक्षेत्रातील मंडळींकडून (अगदी पालेकर काय, जब्बार काय) चित्रपट माध्यमात काहीही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे, हे 'कैरी'ने अधोरेखित केले. तेव्हा 'जांभूळ' वर जब्बारने काही केले नाही, हे काही फारसे वाईट झाले नाही असे मला वाटते.
जी.ए. आणि चित्रपट
"...."जी. एं. च्या कथांना हात लावायचे धाडस निर्माता-दिग्दर्शकांनी कधी केले नाही". पालेकरांनी कैरी काढला की!..."
~ हो. हा संदर्भही डॉ.पटेल यानी त्या भाषणात दिला होताच. माझ्याकडे तो वृत्तांत लेखी स्वरूपातील नव्हता व दोनचार मित्रांच्या चर्चेतून निघालेला तो दुवा होता. पण तुम्ही म्हणता तसे श्री.पालेकर यांच्या "कैरी' ने पहिल्याच पाऊलाला निराशा केली की त्यानी मूळ कथेतील 'मुला' ला वगळून तिथे अकारण 'मुली' ला आणले. चित्रपट २००१ मध्ये प्रकाशित झाला व तत्पूर्वीच जी.ए. आपल्यातून निघून गेल्यामुळे त्यांच्या मनाला होऊ शकणार्या वेदना पुढे आल्या नाहीत हे बरेच झाले.
खुद्द जी.ए. ना हिंदी चित्रपट माध्यमाचे [....मराठीचा तर प्रश्नच नव्हता] तसे काहीच आकर्षण नव्हते. उभ्या आयुष्यात त्यांनी 'अछुतकन्या', 'बाबूल' आणि मीनाकुमारीचा कुठलासा एक असे तीनच चित्रपट पाहिल्याचे त्यानी नोंदविले आहे. इंग्रजी चित्रपटांचे मात्र ते जबरदस्त प्रेमी होते. असे असल्याने केवळ श्री.पालेकर स्वतःहून [तसेच एकदा गिरिश कर्नाड व 'घटश्राध्द' चे शंकर कासारवल्ली यानीही त्यांच्याशी 'बळी' संदर्भात संपर्क साधला होता] 'कैरी' आणि 'तुती' बद्दल विचारत गेल्याने त्यानी होकार दिला इतपतच.
मला वाटते 'फेड' या त्यांच्या लघुकथेवर भक्ती बर्वेना घेऊन गजानन जागिरदार यानी दूरदर्शनवर एक एपिसोड दर्शविला होता.....खात्री नाही. [नंदनला माहित असेल, कदाचित]
इन्द्रा
In reply to जी.ए. आणि चित्रपट by इंद्रराज पवार
फेड...
'फेड'वर आधारित भागाची आठवण अंधुक झाली आहे (इथे फेड झाली आहे, अशी कोटी करण्याचा मोह झाला होता :)), पण बहुतेक त्याच मालिकेत 'चैत्र' ह्या कथेवरील (आणि पुढे दि.बा.मोकाशींच्या 'आता आमोद सुनासि आले' ह्या कथेवर आधारित) भाग पाहिल्याचं आठवतं. निवडक मराठी कथांवर आधारित एक एपिसोड, अशी त्या मालिकेची सुरेख कल्पना होती. प्रसारणवर्ष बहुतेक १९९० च्या आसपासचं. इतर कुणाला आठवतंय का नाव त्या मालिकेचं?
In reply to फेड... by नंदन
प्रदक्षिणा
ह्य जी. एं.च्या कथेचेही एका भागात रूपांतर झालेले होते ते आठवतंय.
जी. एं.बद्दल आदर असला तरी त्यांच्या सर्वच ईडियोसिंक्रसींना महत्व देण्यात हंशील नाही. (उदा. 'ढुंगणावरचे रूधिराभिसरण दाखवणारी जीन्स पँट घालणार्या स्त्रिया वगैरे....). पण हे आता लेखाच्या संदर्भात अति अवांतर झाले म्हणून येथे थांबतो.
उत्तम ओळख, इंद्रा. मी श्री.
उत्तम ओळख, इंद्रा.
मी श्री. दा. पानवलकर (आणि श्रीनिवास कुलकर्णी) अगदी आत्त्ताआत्ताच वाचले.
आता श्रीनिवास कुलकर्णींबद्दलपण लिही ना.
डोह आणि सोन्याचा पिंपळ...!
"....श्रीनिवास कुलकर्णींबद्दलपण..."
~ जरूर प्रयत्न करतो. "डोह" आणि "सोन्याचा पिंपळ" मुळे दुर्गा भागवतांचे अतिशय लाडके लेखक झाले होते हे श्रीनिवास विनायक कुलकर्णी. श्री.पानवलकरांसारखीच यांचीही जडणघडण सांगली-कराड-सातारा परिसरात झाली आहे. गद्यात लिहिणारे जणू 'बालकवि'च आहेत.
इन्द्रा
In reply to डोह आणि सोन्याचा पिंपळ...! by इंद्रराज पवार
तरल
अतिशय तरलपणे लिहिलेले हे पुस्तक. अतिशय सुंदर. बेहद्द खूब असे.
मला श्रिनिवास कुळकर्ण्यांची पुढची पुस्तके तितकी आवडली नाहीत.
पानवलकर
तेंडुलकरांनी पानवलकरांवर लिहिलेला लेख त्यांच्या 'हे सर्व कोठून येते' नामक ललितलेख संग्रहात आहे. अतिशय वाचनीय.
पानवलकरांचा शब्दांचा वापर जबरदस्त होता. मला फार कौतुक वाटते ते त्यांच्या मुंबईमध्ये वसलेल्या कथांमध्ये येणारा शब्दांचा वापर (कस्टम्सशी संबंधित बगळा सारख्या कथा) आणि सांगली भागात घडणार्या कथांमध्ये केलेला सांगलीकडील भाषेचा वापर. स्थळ-काळाची साथ हा लेखक सोडत नाही. कथांचे विषय, मांडणी - दोन्ही खास पानवलकरांचे. अस्सल. 'सूर्य' (कथेमध्ये) मध्ये मुंबई आणि सांगलीकडल्या ह्या दोन्ही भाषाशैली फार सुंदर गुंफुन येतात.
सूर्य, बगळा, श्रीमंतांचा वस्तरा वगैरे एक से एक कथा आहेतच. अजून एक गंमत म्हणजे जीएंची चंद्रावळ (सत्यकथा जाने.१९५६) ही कथा आणि सप्टें-१९५६ मध्ये सह्याद्रीमध्ये श्रीदा पानवलकरांची छापून आलेली एक कथा (ही कथा त्यांच्या औदुंबर ह्या कथासंग्रहात सामाविष्ट केलेली आहे) ह्या exactly एकाच कथानकावर आधारीत आहेत. चंद्रावळ आणि पानवलकरांच्या कथेमध्ये गाभ्यात कणभरचाही फरक नाही. कथाबीज तेच, मुख्य पात्रे जवळपास तीच, कबूतरबाजीची स्पर्धा आणि त्याचा निकाल तोच. एव्हडे प्रचंड साम्य मी आजवर कधीच कुठल्या दोन ताकदीच्या लेखकांच्या कलाकृतीत बघितलेले नाही. आणि हे दोन्ही लेखक plagiarism करणार नाही ह्याची खात्री. दोन लेखकांनी एकच विषय स्वतःच्या शैलीत कसा हाताळला आहे ह्याचे उत्तम उदाहरण आहे ते.
मला स्वतःला पटकन आठवते अशी पानवलकरांची 'उगीच' ही कथा. ही पण 'औदुंबर' मध्ये सामाविष्ट आहे. अतिशय तरलपणे लिहिली आहे ही कथा. आणि एका जन्मभर लग्न न केलेल्या माणसाने लिहिली आहे असा विश्वासदेखील बसणार नाही.
म.दं. नी संपादित केलेले साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले पुस्तक मला साहित्य संमेलनात दिसले होते. ते माझ्या एका मित्राला मी दिले. त्यानंतर ते मला मिळाले नाही. कुणाला हे पुस्तक कुठे प्रदर्शनातवगैरे दिसल्यास मला कळवाल का? मला नक्की हवे आहे.
In reply to पानवलकर by टण्या
शब्दसामर्थ्यावरुन कर्णिक आठवले
पानवलकरांचा शब्दांचा वापर जबरदस्त होता.
यावरुन मला आठवले म्हणून लिहितोय. मधु मंगेश कर्णिक यांचे नुकतेच 'संधिकाल' वाचायला घेतले आहे. फक्त ५० पाने वाचून झालेली आहेत पण एवढ्या प्रचंड प्रमाणात आणि वेगवेगळ्या शब्दांचा वापर करणारा लेखक अजून तरी मी पाहिला नाही. *** पानवलकर मी अजून वाचले नाहियेत हे आत्ताच स्पष्ट करतो *** :) पण मधु मंगेश कर्णिक माहिती असणारा वाचक यावर प्रकाश टाकू शकेन. कर्णिकांचे मी हे पहिलेच पुस्तक वाचतो आहे. तरी माझे हे मत झाले म्हणजे कुछ तो है ;) अजून ३०० पाने वाचायची आहेत
In reply to पानवलकर by टण्या
भाषाप्रभू ...!
श्री.टण्या..... तुम्ही अत्यंत तरलतेने पानवलकरांच्यावर लिहिले आहे, जे मला खूप म्हणजे खूपच भावले आहे. कबुतरबाजी हा बेळगांव, कोल्हापूर आणि सांगली [त्यातही मिरज, तासगांव प्रामुख्याने....] या भागातील जबरदस्त व्यसनाचा विषय. दारूबाजी, तमाशा आणि नायकिणीच्या नादापेक्षा जास्त पैशे या नादावर उधळलेले लोक [अजूनही आहेत] या तीन जिल्ह्यात तुम्हाला आढळतील....ज्यानी संसाराला अक्षरशः चूड लावली आहे या कबुतरांपायी. त्यामुळे जीए काय पानवलवर काय वा शंकर खंडू पाटील, बाबा कदम, देवदत्त पाटील, नलगे, गवस वा मोरे काय...यांच्या कुठल्या ना कुठल्या कथेत कबुतरांचे गुटर्रघू घुमतेच घुमते....त्यामुळे तुम्हाला आढळलेला तो दोन कथेतील समानधागा बिलकुल आश्चर्यदायी नाही. जी.ए. तर लिहूनच गेले आहेत की..."चंद्रावळ' त्यानी प्रत्यक्ष पाहिलीच होती....तेच मीटर पानवलकरांनाही लागू होतेच होते.
भाषाप्रभू तर ते होतेच.....हे त्यानी अनेक कथातून सिद्ध केले आहे. 'पद्म' विषयी मी लिहिण्याऐवजी श्री.नंदन यांचा ब्लॉग पाहा...अन् मग कॅलक्युलेट करा की कोणत्या पातळीवर पानवलकर यानी आपल्या मनावर शब्दाद्वारे मोहिनी घातली आहे. "डवरलेल्या पाकळ्यांमध्ये ओला कंद लसलसत होता...." हे वर्णन अंगावर शहारे आणते....तर "कोवळ्या द्राक्षासारखी पाच बोटं नजरेला चाटून गेली..." हे वाचताना प्रथम द्राक्षे की बोटे पाहू हा संभ्रम निर्माण होतो....ही जादू पानवलकरांची.
खूप लिहिण्यासारखे आहे....या भाषाप्रभूविषयी.
इन्दा
In reply to भाषाप्रभू ...! by इंद्रराज पवार
मिरज
इंद्रा,
मी जन्मापासून वयाच्या विशीपर्यंत मिरजेतच वाढलो.. त्यामुळेच कबूतर, तालीम, नदी वगैरे वगैरे जे पानवलकरांच्या शब्दातून येतं ते थेटच भिडतं.. पानवलकर माझ्या मनाचा एक हळवा कोपरा आहेत..
जीएंच्या कुठल्या पत्रात त्यांनी स्वतः कबुतरे पाळल्याचा संदर्भपण येतो का? मला नक्की लक्षात येत नाहिये..
In reply to मिरज by टण्या
चंद्रावळ
"चंद्रावळ" बद्दल ते ऐसपैस बोललेत (किंवा लिहिले होते असे म्हणू या...!) ते फक्त श्री.श्री.पु.भागवत यांच्याशीच. जानेवारी १९५६ च्या "सत्यकथे" त ती प्रकाशित झाली आणि वाचकांनी तात्काळ उचलूनही घेतली होती. (खुद्द जी.ए. नी तो अंक आमच्या कोल्हापुरात पाहिला होता. ~~ यामुळे मलाही मूठभर मांस चढले ~~...तेही ते ज्या दुकानात थांबले होते तिथेच एक वाचकाने सत्यकथेचा अंक अनुक्रमणिका पाहून आणि तीत जी.ए.कुलकर्णी हे नाव वाचून विकत घेतला...त्या अगोदर "गुंतवळ" मुळे जीएंचे नाव बर्यापैकी झाले होते. ~ जाताजाता थोडेसे अवांतर - जी.ए. कोल्हापुरच्या मिसळपाववर जाम खूश असायचे. बी.ए.ची परीक्षा त्यांनी इथली मिसळ खाऊनच दिली होती.....असो)
त्याच महिन्यात १२ तारखेला श्री.पुं.ना पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, "चंद्रावळ मला आवडते ती त्यातील साहित्यिक गुणांमुळे नसून तर काही वैयक्तिक कारणासाठी. तिच्यात एका जुन्या आयुष्याचा तुकडा मला आठवतो. मराठी शाळेत असताना चंद्रावळीला मीच त्या शर्यतीसाठी वर उडवले होते. आज सण्ण्या कुठे आहे कुणास ठाऊक. पुढे गंजुडा बाबू एका बैलगाडीखाली मेलेला आढळला...." इ. इ. ~ त्यांच्या पत्रात कबुतरांविषयीची आवड स्पष्टच आहे, पण ते जिथे तो अड्डा असायचा (कर्नाटकात "साटपा" म्हणतात) तिथे हजेरी लावायचे. पाळली मात्र नाहीत....त्या शौकासाठी येत असणार्या खर्चाचा विचार करता त्याना शक्यही नसणार.
लेखक म्हणूनही त्यांना अत्यंत क्षुद्र म्हणावे असेच मानधन मिळत असे, सत्यकथेकडून. एकदा केव्हातरी दहा (येस टेन रूपीज्) रुपयाचा चेक भागवतांनी त्याना पाठविला होता....कथेचे मानधन म्हणून. नंतर तर जीएंनी वैतागून भागवतांना लिहिलेदेखील...."मी जरा स्पष्टपणे बोलतो....लेखनाबद्दल मोबदला. माझ्या "सांगाडा", 'काकणे', "माणूस नावाचा बेटा..." या कथांबद्दल मोबदला अजून मिळालेला नाही. तुम्ही आपले धोरण बदलले आहे की काय? अमुकच मोबदला मिळावा असा आग्रह मी क्वचितच धरला आहे. पण तो जरूर मिळावा असे माझे मत आहे....तुम्ही त्या बाबतीत सविस्तर लिहावे."
आपण लेखकांना डोक्यावर घेतो, हृदयात ठेवतो....पण संपादक+प्रकाशकांनी त्यांना कसे "लुबाडायचे" ही थोर परंपरा या महाराष्ट्र देशी अखंडपणेच चालत आली असल्याने, मौज तरी कसे अपवाद असेल?
इन्द्रा
पानवलकर हे नाव अर्धसत्यच्या
पानवलकर हे नाव अर्धसत्यच्या वेळी प्रथम ऐकले. त्यावेळी (आणि अजूनही) या नावाची महती ठाऊक नव्हती. तेंडुलकरांच्या हे सर्व कोठून येते मधे त्यांनी पानवलकरांवर लिहिलेला लेख छानच आहे.
पानवलकर वाचलेच पाहिजे.