विसाव्या शतकाच्या आरंभीच्या 30-40 वर्षांचा आढावा घेतल्यास समाजाचा गाडा कसा असावा व तो कसा चालवावा यासंबंधी विचार करणार्‍या व त्या विचारांप्रमाणे कृतिशील असलेल्यांची संख्या, निदान महाराष्ट्रात तरी, अजिबात कमी नव्हती. यातील प्रत्येकाला आपले विचार कसे योग्य आहेत व या विचाराप्रमाणे समाजात बदल होत गेल्यास आपली पुढची पिढी (व त्यानंतरच्या पिढ्या!) नक्कीच सुखी व समाधानी राहतील याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती. या सर्व अतिरथी-महारथी विचारवंतांमध्ये रघुनाथ धोंडो कर्वे (1882 - 1953) यांचे नाव व त्यांची कर्तव्यनिष्ठा यांचा आपल्याला कधीच विसर पडणार नाही. या लोकोत्तर पुरुषाच्या वादळी व्यक्तिमत्वाचे वादग्रस्त परंतु ध्येयनिष्ठतेने भारावलेल्याचे, बुद्धीनिष्ठपणे आयुष्य झोकून दिलेल्याचे, जवळ जवळ संशोधन ग्रंथ म्हणवून घेण्याची पात्रता असलेले 'समाजस्वास्थ्य'कार हे पुस्तक डॉ अनंत देशमुख यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन असून त्यानी 'रधों' हा एक प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केला आहे. त्या प्रकल्पानुसार 'रधों'च्या जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारे आठ ग्रंथ प्रकाशित झाले असून हे पुस्तक त्यापैकी एक आहे. या प्रकल्पाद्वारे विसाव्या शतकातील एका द्रष्ट्या विचारवंताचे चरित्र, त्याचे जीवन कार्य, त्याच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडी, त्यांचे इतरांशी असलेले नाते संबंघ, इत्यादींचे चिकित्सक विश्लेषण अभ्यासकाना उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशाप्रकारचे प्रकल्प इंग्रजी साहित्यात विपुल प्रमाणात सापडतात; परंतु मायमराठीत हा कदाचित पहिला धाडसी प्रयत्न असावा. यासाठी प्रकाशक, लेखक, व इतर संबंधित यांना धन्यवाद द्यायला हवेत.

विसाव्या शतकाचा आरंभीचा काळ व एकविसाव्या शतकाचा आत्ताचा काळ यांची तुलना करू लागल्यास या दोन्हीत फार मोठा फरक आहे असे जाणकारांचे मत आहे. त्याकाळातील बुरसटलेली रूढीपोषक मते, संस्कृतीरक्षणाचे निमित्त करून विचारवंतांची होत असलेली बदनामी, ऊठसूट खटले - कब्जे, लैंगिक विषयासारख्या जीवनाच्या महत्वाच्या पैलूवर भाष्य न करण्याची उघड उघड सक्ती व दमदाटी, ब्रह्मचर्यपालनाची खोटी आश्वासने, कामसुखातील चोरटेपणा, हेकेखोरपणा, आत्मवंचना इत्यादींबद्दल आज वाचताना 'असाही एक काळ होता' याचे आश्चर्य वाटू लागते. समाजपरिवर्तनासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टींची उघड चर्चा व्हायला हवी, विचारमंथन व्हायला हवे यांचा आग्रह धरणार्‍यांना नामोहरम करणे, त्यांची निंदानालस्ती, त्यांच्याबद्दलची संवेदनविहीनता याबद्दल वाचताना आपला आजचा समाज किती बदलला आहे याचा अभिमान वाटतो.(तरीसुद्धा फार मोठा टप्पा गाठायचा आहे, अशी तक्रार अजूनही कुठेतरी ऐकू येत असते!) परंतु आताच्या पिढीला अशा प्रकारचे मोकळे वातावरण मिळवून देण्यास 'रधों' सारख्यांनी खस्ता खाल्या होत्या हे आपण कधीच विसरू शकत नाही.

आख्खा महाराष्ट्र 'रधों' यांना 'समाजस्वास्थ्य'कार म्हणूनच ओळखतो. पुनर्विवाहाची चळवळ व स्त्रीशिक्षणाचे कार्य करणार्‍या महर्षी धोंडो कर्वे यांचे थोरले पुत्र, रघुनाथरावानी मात्र वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवला तरी त्यांच्या कार्याची दिशा अत्यंत वेगळी होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अपत्यांनी कार्य करून ' घराणेशाही' प्रस्थापित करावीत ही समाजाची अपेक्षा असते. परंतु 'रधों' मात्र स्वतंत्र विचाराचे होते. व त्यानी हाती घेतलेल्या संततीनियमन व लैंगिक शिक्षण या कार्याला महर्षी कर्वेंची संमती होती. 'रधों' यानी या कार्याचा वसा गंमत वा काही तरी करायचे म्हणून घेतलेला नव्हता. त्यामागे अभ्यास होता, तळमळ होती व त्यांची कार्यनिष्ठा होती. फर्गसन कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांना याविषयाचे गांभीर्य कळले होते. गुप्तरोगामुळे तरुणांचे आयुष्य बाद झाल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. योग्य वेळीच प्रतिबंधक उपाय न केल्यास अनाचार पराकाष्ठेला जाईल याची कल्पना होती. लोकसंख्येचे नियंत्रण ही काळाची गरज आहे हे त्यांनी त्याकाळी ओळखून संततीनिरोधांची साधनं वापरायला हवीत अशी आग्रहाची मांडणी केली. समाजाचा विरोध पत्करून त्यासाठी सल्ला, साधनं पुरवण्याची व्यवस्था, वापरण्याचे शिक्षण, इत्यादी गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. यातूनच त्यांचे द्रष्टेपण अधोरेखित होते. खरे पाहता त्यांच्या वैयक्तिक जीवनात असे काहीच घडले नव्हते की ज्यामुळे या विषयाचा सखोल अभ्यास करावा किंवा या प्रकारचे कार्य हाती घेण्याची प्रबळ इच्छा व्हावी. मुळातच त्यांचा स्वभाव अत्यंत भित्रा होता.

पदवी शिक्षणानंतर 'रधों'नी शिक्षक होण्यासाठी म्हणून डिप्लोमाच्या अभ्यासासाठी मुंबईला गेले. तेथे प्रो. जे. फ्रेझर व फ्रेंच भाषा शिकविणार्‍या प्रो. पेल्तिए यांच्या संपर्कात आले. त्यांनी फ्रेंच भाषा शिकून घेतली. फ्रेंच समाजातील लैंगिक विषयातील उदारपणामुळे ते प्रभावित झाले होते. स्त्री-पुरुष संबंध, गुप्तरोग, संततिनियमन यावरील फ्रेचभाषेतील पुस्तकांचा अभ्यास त्यांनी केला. त्याचकाळी त्यांना आपल्या जीवनकार्याचे उद्दिष्ट स्पष्ट झाले.

यानंतरच्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी नोकर्‍या केल्या. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते गणित शिकवत होते. नंतर धारवाडच्या कर्नाटक कॉलेजमध्ये काही काळ नोकरी केली. तिथूनच उच्च अभ्यासासाठी पॅरिसला गेले. परत आल्यानंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये नोकरी पत्करली. या नोकर्‍या करत करतच ते संततीनियमनाचे प्रचारकार्य करू लागले. त्याविषयी लेख लिहून जनजागृती करण्याचे प्रयत्न करत होते. परंतु त्यांची लैंगिक शिक्षणविषयीची आस्था रूढीप्रिय समाजातील इतरांच्या डोळ्यात खुपत होती. क्षुल्लक कारणामुळे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर खटके उडत होते. त्यामुळे रघुनाथ कर्वे वैतागून राजिनामा देऊन मोकळे होत होते. खरे पाहता कुटुंब चालविण्यासाठी व त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी पैशाची कमतरता भासत होती. या कामासाठी कुणीही आपणहून वा मागितल्यानंतरसुद्धा एक पैसा द्यायला तयार नसत. तरीसुद्धा आर्थिक कुचंबणा सोसत त्यांनी आपल्या कार्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या पत्नी, मालती कर्वे शिक्षिका होत्या व त्या संसाराचा आर्थिक भार उचलत होत्या.

समाजस्वास्थ्यचा पहिला अंक 15 जुलै 1927 रोजी व शेवटचा अंक रघुनाथ कर्वे यांच्या मृत्युच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1953 रोजी प्रसिद्द झाला. मृत्युपूर्वी त्यांनी अंकाची जुळणी करून ठेवली होती. डॉ. विलियम रॉबिन्सन हे न्यूयार्क येथीव नामवंत डॉक्टर कामशास्त्राला वाहिलेले मासिक काढत होते. 'रधों'च्या वाचनात हे मासिक आल्यानंतर त्यातून स्फूर्ती घेवून समाजस्वास्थ्यसंबंधीचे कार्य 'रधों'नी सुरु केले. समाजस्वास्थ्य निघण्याच्या अगोदरही 'रधों' अनेक ठिकाणी आपल्या आवडत्या विषयावर लेख लिहून पाठवित असत. काही ठिकाणी त्या छापूनही आल्या. काही सुबुद्ध वाचकांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. परंतु समाजप्रबोधनासाठी एवढे फुटकळ कार्य पुरेसे ठरणार नाही याची जाणीव होऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा अत्यंत नेटाने हे कार्य सतत 26 वर्षे चालू ठेवले. 1931 साली त्यांनी लिहिलेल्या 'व्यभिचाराचा प्रश्न' या लेखामुळे समाजस्वास्थ्यावर खटला भरला गेला. 1943 साली त्यातील पत्रव्यवहाराला अश्लील ठरवून खटला भरला. या खटल्याच्या वेळी डॉ. आंबेडकर त्यांचे वकील होते. 1938 साली अंकातील जाहिरातीमुळे त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तरीसुद्धा न डगमगडा, नमते न घेता त्यांनी आपले कार्य तसेच चालू ठेवले. 'रधों' इतर लेखाबरोबर 'शारदेचे पत्र' या नावाचे सदर चालवत. उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याच्या हतोटीमुळे ते सदर लोकप्रिय झाले होते. लेखकांना मानधन दिले पाहिजे या विचाराचे ते होते. परंतु समाजस्वास्थ्यसाठी लिहिणार्‍यांना मानधन देण्याइतकी कुवत त्यांच्यात नव्हती. म्हणूनच मासिकात लिहिण्यापासून घडी घालून पोस्टात टाकेपर्यंतची कामे त्यांना (व मालतीबाईना) करावी लागत. मानधनाची अपेक्षा न करता कुणी चांगला लेख पाठविल्यास ते प्रसिद्ध करत होते. शकुंतला परांजपे पुस्तक समीक्षा लिहित होते व संततीनियमनाच्या प्रचार कार्यात व साधनं कशी वापरावीत याची प्रात्यक्षिके करण्यात त्यांना मदत करत होत्या.

1943मध्ये त्यांनी 'दोन बायका विशेषांक' ही काढला होता. त्याकाळात व्ही. शांताराम, राजकवी यशवंत, शंकरराव किर्लोस्कर, रा. ग. हर्षे, मामा वरेरकर, ना. सी. फडके यांनी पहिली बायको हयात असताना दुसरे लग्न केले होते. विशेषांक काढण्याइतपत हा विषय त्याकाळी ज्वलंत होता, हे लक्षात येईल. डॉ. अनंत देशमुख यांनी अंकात लिहिणारे लेखक, प्रतिक्रिया देणारे वाचक व मदत करणारे मित्र व या अंकातील मांडणीला विरोध करणारे विरोधक यांच्याबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ते सर्व मुळातूनच वाचायला हवे.

'रधों' जरी 'समाजस्वास्थ्य'कार म्हणून परिचित असले तरी त्यांचा बौद्धिक आवाका फार मोठा होता. इंग्रजीतील Reason या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकाचे बहुतांश काळ ते संपादक होते. त्यांची विवेकवादावरील सडेतोड मांडणी आश्चर्यचकित करणारी होती. त्यांचा पी ई एन या जागतिक संस्थेशी संबंध होता. अनेक साहित्यसंस्था आणि नाट्यपरिषदा यांच्यात उठबस होती. ते स्वत: शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. कामशास्त्र व संततीनियमनावरील पुस्तकांव्यतिरिक्त भूमितीवर त्यांनी एक पुस्तकही लिहिले होते. आहारशास्त्रावर ते लेख लिहित असत. डॉ. अनंत देशमुख यांनी 'रधों'च्या या अपरिचित पैलूवरही छानपैकी विवेचन केले आहे.

या वादळी व्यक्तीमत्वाचा परिचय यापूर्वीही अनेक लेखकांनी करून दिला आहे. उपेक्षित द्रष्टा, ले. दिवाकर बापट, 1970; र.धों. कर्वे, लेखक यदि फडके, (1981) यांच्या पुस्तकांना व म. वा. धोंड आणि डॉ. मंगला आठलेकर यांच्या 'रधों'वरील दीर्घ लेखांना रसिक मान्यता मिळालेली आहे. जाणकारांची प्रशंसाही मिळाली आहे. अमोल पालेकर यांचा 'रधों' च्या जीवनावरील ध्यासपर्व हा चित्रपट चांगलाच गाजला होता. परंतु डॉ. अनंत देशमुख यांचे 'रधों' वरील हे पुस्तक वाचताना लेखकाची चिकित्सक वृत्ती लक्षात येते. आजपर्यंत अज्ञात असलेल्या रघुनाथरावांच्या जीवनाचे कंगोरे यात स्पष्ट होतात. 'रधों'च्या साहित्याकडे सामाजिक अंगाने बघण्याचा हा दृष्टिकोन नक्कीच वाचकांना आवडेल!

'समाजस्वास्थ्य'कार
डॉ. अनंत देशमुख,
पद्मगंधा प्रकाशन, पुणे (2010)
मूल्य: 210 रु; पृ.सं :247+