![]() |
आठवणीचे जग हे विचित्र जग आहे. काही गोड आठवणी मनाला गुदगुल्या करतात, आपल्याला हसवतात तर कडू आठवणी रडवतात, मन विषण्ण करतात. या आठवणी आपल्या का दुसर्यांच्या, यामुळे काही फरक पडत नाही. फक्त आठवणींचे वर्णन व्यवस्थित हवे. म्हणूनच प्रसिद्ध लैंगिक तज्ञ डॉ. विठ्ठल प्रभू यानी स्नेहबंध या पुस्तकामधून ज्या काही मोजक्या व्यक्तींच्या गोड आठवणी सांगितल्या आहेत त्या वाचताना आपले मन हरवून जाते. कालकुपीतून आपण काही काळ मागे गेल्यासारखे वाटू लागते. लेखकानी वर्णन केलेल्या गोष्टी आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत की काय असे वाटू लागते.
डॉ. प्रभू यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे आयुष्याच्या वाटचालीत अनेक माणसे भेटतात. त्यातली काही अविस्मरणीय असतात. त्यांचे नाते परिसासारखे ठरते. ती मनात घर करून बसतात. अशी माणसे शाळा कॉलेजात भेटली. व्यवसायानिमित्त भेटली. अचानक भेटली. किंवा त्यांना भेटावयास गेलो. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे भारावलो गेलो. त्यांचे वागणे, बोलणे इतके आपुलकीचे, त्यांची सर्जकता, त्यांचे आदर्श इतके मानात ठसणारे की ते निकटचे बनले. त्यांच्याविषयी इतरांना सांगावे असे वाटले.
डॉ.प्रभू स्वत एक सिद्धहस्त लेखक असल्यामुळे त्यानी रंगविलेले व्यक्तिचित्रं मनाला हुरहुर लावतात. यातील अनेक व्यक्तींची दूरान्वयानेही आपली ओळख नाही, नावही कधी ऐकण्यात वा वाचनात आलेले नाही. यातील अनेक जण हयातीतही नसावीत. तरीसुद्धा त्यांच्यावरील व्यक्तिचित्रण वाचताना आपणही यांना कुठेतरी पाहिल्याचा अनुभव आपल्याला येतो.
लेखकानी उल्लेख केल्या प्रमाणे यातील माणसं केवळ लेखकांचे समव्यवसायिक वा लेखकाचा गोतावळा अशा स्वरूपाचे नाहीत. त्यात 'पुल'सारखे हरहुन्नरी लेखक, कुसुमाग्रजासारखे थोर कवी, जयवंत दळवीसारखे नाटककार - कवी, सोपानदेव चौधरीसारखे महा कवी असे अनेक जण भेटतात. यांच्याबद्दल आपण कुठे ना कुठे तरी वाचलेले असतो. त्यांच्या कलांचा आस्वादही घेतलेले असतो. परंतु लेखकाच्या डोळ्यामधून पाहताना या व्यक्ती अगदीच वेगळे वाटू लागतात. त्यांची संवेदनशीलता, माणुसकीवरील प्रेम, कलेशी असलेला प्रामाणिकपणा, दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठीची धडपड, या गोष्टी उठून दिसतात. नटवर्य मामा पेंडसे वा तबलावादक निखिल घोष या मागच्या पिढीतील कलाकारांबद्दल वाचताना आपला आदर द्विगुणित होतो.
दादरच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये शिकत असताना पुल देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीता ठाकूर तेथे हे दोघेही शिक्षक म्हणून काम करत होते. त्या दोघांचा कोर्टिंगचा हा काळ होता व लेखक त्याचे साक्षिदार होते. डॉ. विठ्ठल प्रभूनी आपली लैंगिक शिक्षणावरील निरामय कामजीवन हे पुस्तक पुलंना पाठविल्यानंतर पुलंनी दिलेल्या उत्तरात याविषयीची त्यांची कळकळ प्रकर्षाने जाणवते. पुल म्हणजे एक अद्भुत रसायन होते याचा प्रत्यय पुलवरचा लेख वाचत असताना येतो.
काही निमित्ताने कुसुमाग्रजला लेखक भेटले व लेखकाच्या अत्यंत आवडते झाले. तात्यासाहेबांच्या आवडी निवडी, कवी म्हणून त्यांच्यातील प्रतिभा, त्यांचा भला मोठा मित्रपरिवार, इत्यादीबद्दलची लेखकाची टिप्पणी मनाला सुखावते. जयवंत दळवी हे मागच्या पिढीतील एक प्रतिभावान नाटककार होते. प्रेक्षकांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे नाटककार अशी त्यांची ख्याती होती. ते मुळातच माणसांचे लोभी होते. गप्पा मारण्यात त्याना रस होता. दळवीनी अनेक कथा लिहिल्या, कादंबर्या लिहिल्या, विनोदी लेखन केले, नाटकं लिहिली. दळवींची जिद्द आणि आतून असणारी प्रखर उर्मीमुळे झपाटल्यासारखे ते लेखन करत. आपल्या लेखनात त्यांनी कधी तडजोड केली नाही की मतं बदलली नाहीत. चक्र या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीत सेक्सविषयक प्रसंगाचे वर्णन आहेत. सेक्सविषयी इतके स्पष्टपणे लिहिणारे लेखक मुळात स्त्रीलंपट असावेत असा वाचकांचा समज होत असतो. पण वास्तवात दळवी अत्यंत साळसूद होते. कुठल्याही प्रकारची टवाळखोरी त्यानी केली नसावी. पुस्तकाच्या जगात मात्र त्यांनी रंगविलेली पात्र अत्यंत खोटकर व अफलातून असायच्या. हा सर्व विरोधाभास लेखकानी छानपैकी टिपले आहे.
निसर्गकन्या बहिणाबाई यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांच्या मुलाखतीवरील लेख आपल्याला कवींच्या जगात घेऊन जातो. ज्या सहजतेने बहिणाबाई कविता करत याचे आश्चर्य वाटू लागते. मामा पेंडसे हे जुन्या काळातील रंगभूमी गाजविलेले नटवर्य. परंतु आधुनिक काळाची जाण असणारे एक व्यक्तिमत्व. त्यांचीसुद्धा लेखकाने मुलाखत घेतली व या मुलाखतीतून त्यांचे एक आगळे वेगळे चित्र त्यांनी उभे केले आहे.
लेखकाने व्यक्तिचित्रं निवडताना केवळ नावाजलेल्या व्यक्तिंचीच निवड केली असे नाही. त्यांच्या परिचयातील प्रा. रमेश तेंडूलकर व त्यांच्या कुटुंबियाबद्दलही अत्यंत आपुलकीने तेंडूलकर्स या लेखात लिहिले आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांचे वडील रमेश तेंडूलकर जुन्या पिढीतील मध्यमवर्गीय मानसिकतेतील असूनसुद्धा आपल्या मुलाला क्रिकेटसारख्या अत्यंत बेभरवशाच्या खेळाचे करीअर करण्यास कसे काय प्रोत्साहन दिले याचे आश्चर्य वाटते. या कुटुंबियाच्या सालस स्वभावाचे अनेक प्रसंगांचे वर्णन लेखकाने या लेखात केले आहे.
लेखकाच्या स्नेहबंधातील मित्रांमध्ये कोठावळे कुटुंबियांना आदराचे स्थान आहे. डॉ. प्रभू यांना लेखक म्हणून घडविण्यात या कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे, असे लेखक मान्य करतात. केशवराव यांनी अत्यंत जिद्दीने उभे केलेले ग्रंथ व्यवहार पाहताना खरोखरच आश्चर्य वाटू लागते. याचबरोबर केशवरावांच्या मृत्युनंतर नाउमेद न होता त्यांचे बंधू तुकारामशेट व मुलगा अशोक यांनी उभे केलेले ग्रंथसाम्राज्य दृष्ट लावण्यासारखे आहे.
काही निमित्तामुळे डॉ. प्रभू यांची भेट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आद्य हृदय रोपणकार डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड आणि मानसतज्ञ डॉ. जॉन मनी यांच्याशी झाली. यांच्याबद्दलही लेखकाने थोडक्यात लिहून वाचकांना वैद्यकीय क्षेत्रातील महान कार्याची ओळख करून दिली आहे. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर्स डॉ. ए व्ही बाळिगा व डॉ. भा नि. पुरंदरे हे लेखकाचे व्यवसायातील गुरुतुल्य सहकारी. या जगावेगळ्या डॉक्टरांच्या जीवनशैलीबद्दल वाचताना असेही डॉक्टर्स असू शकतात याचे आश्चर्य वाचते.
शिक्षकी पेशात आयुष्य वेचलेल्या हाडाच्या शिक्षकांना त्यांच्या जीवनाबद्दलच्या अपेक्षा काय आहेत असे विचारल्यास आम्ही आयुष्यभरात हजारो विद्यार्थ्यांना निरपेक्षपणे शिकवतो, त्यांना घडवतो. त्यातील एखाद्याने जरी आमची आठवण काढली तरी आमचे जीवन सार्थक झाले असे म्हणू. डॉ. विठ्ठल प्रभू यानी अशाच शिक्षकांपैकी वि ह कुलकर्णी, टी के जोशी व प्रफुल्लदत्त या शिक्षकांच्या आठवणीना व्यक्तिचित्रांच्या लेखनामधून उजाळा देतात. राजकारणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर नेहमीच्या पठडीतील व्यक्ती उभी राहते. परंतु संगीततज्ञ आरोग्यमंत्री, डॉ. ललिता राव या राजकीय क्षेत्रात वावरणार्यात अपवाद ठरावेत. डॉ. प्रभू यांनी तोंडभरून त्यांचे कौतुक केले आहे.
डॉ. प्रभू यांनी ’नवी तीर्थक्षेत्रे ’ या सुदीर्घ लेखात डॉ. रजनीकांत आरोळे दंपती, अभय बंग दंपती आणि आमटे कुटुंबीय यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिवैशिष्ट्याबद्दल छानपणे लिहिले आहे. हा लेख म्हणजे वैद्यकशास्त्र शिकणार्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
डॉ. प्रभू यांनी जपून ठेवलेल्या अशा लोकोत्तर व्यक्तींच्या आठवणींना उजाळा दिल्यामुळे आपल्यासारख्या सामान्य वाचकांना त्यांच्याबद्दल थोडे फार तरी कळू शकले. नसल्यास काळाच्या पडद्याआड असे किती तरी व्यक्ती गेले असतील की त्यांच्या आठवणी सांगणारे पण कुणीही नाहीत!
स्नेहगंध
डॉ. विठ्ठल प्रभू
मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई (2010)
मूल्य: 200 रु; पृ.सं: 182

ह्या पुस्तकाबद्दल मी रसिकच्या
ह्या पुस्तकाबद्दल मी रसिकच्या मासिकात वाचले होते असे वाटते. नक्की आठवत नाही.
दळवी साळसूद होते? की सालस? साळसूदचा अर्थ काहीसा नकारात्मक होतो ना?
एकांगी
अशी व्यक्तिलेखांची पुस्तकं मला जरा 'गौरवग्रंथ' पद्धतीची आणि एकांगी वाटतात. 'चांगले अनुभव' तेवढेच लिहिले जातात आणि त्यातून व्यक्तिपूजा वाढीस लागते. या माणसांविषयी इतरत्र काही नकारात्मक वाचले वा ऐकले की ते समजून घेण्याची वाचकांची मानसिकता राहत नाही. किंवा मग एकदम अनादर तयार होऊन 'यांचेही पाय मातीचेच तर' असे वाटायला लागते. अनिल अवचट यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रेही ( उदा. कार्यकर्ता ) अशीच एकांगी असण्याचा दोष घेऊन आली आहेत.
या लेखनप्रकारात मी मराठीत 'उत्तम' वाचले ते केवळ डॉ. सरोजिनी वैद्य यांचे. व्यक्तीच्या अनेक सकारात्मक व नकारात्मक बाजू त्यांनी खुबीने रंगवल्या आहेत. त्यातील वासंती मुझुमदार यांच्यावरील ( वासंतीबाईंच्या मृत्यूनंतर 'ललित'मध्ये लिहिलेला ) लेख तर अनेकवेळा वाचावा असा आहे. कुणाला दोष न देता, किंवा वागण्याचं - कृतीचं समर्थन न करता देखील त्याच्या व्यक्तिमत्वातील काळ्या-करड्या बाजू कशा रंगवता येतात, याचे ते अनोखे उदाहरण आहे. त्यांचा श्री.दा.पानवलकरांवरील लेख वाचून तर मी त्या लेखाइतकेच मोठे पत्र त्यांना लिहिले होते.
अर्थात त्यामुळे डॉ. प्रभु यांचे लेख कमी महत्त्वाचे आहेत, असं मी म्हणत नाही. कारण त्यांना आलेले त्या माणसांचे अनुभव हे खास त्यांचेच असतात आणि त्या माणसांकडे पाहण्याची दृष्टीही त्यांचीच असते. पुन्हा प्रभु ज्या साधेपणाने लिहितात, ती शैलीही सामान्य वाचकाला आपलीशी वाटते. आपल्या विषयाच्या वर्तुळाबाहेर जाऊन त्यांनी हे वेगळे लेखन केले... हे चांगलेच आहे.
In reply to एकांगी by कविता महाजन
तात्विक दृष्ट्या तुमचं म्हणणं
तात्विक दृष्ट्या तुमचं म्हणणं पूर्ण मान्य आहे. तरीही कोणीतरी चांगल्या - वाईट आठवणी वा अनुभव लिहिले, ते वाचून कोणाहीबद्दल, स्वानुभव नसताना मत बनवायचे तरी कशाला? लिहीणारी व्यक्ती स्वतःला सोयीस्कर असेच लिहिणार नाही कशावरुन? पुन्हा ज्या व्यक्तींशी सामान्य वाचकांचा व्यक्तीगत असा संबंध यायची अतिशय कमी शक्यता, त्यांच्याविषयी, त्यांच्या स्वभावाबद्दल अगदी खोलात जाऊन जाणून घेणे अत्यावश्यक आहे का? त्याने काय साध्य होईल?
त्यापेक्षा चार चांगल्या गोष्टी वाचून सकारात्मक विचार वा कोणी स्फूर्ती घेतली तर ते अधिक योग्य नाही का? एखादी व्यक्ती उदा. - साहित्यिक, सामजिक कार्यकर्ते वा तत्सम, ज्या कारणासाठी चार लोकांना माहिती आहे, त्याविषयी सोडून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, त्या आयुष्यात ते कसे आहेत वा नाहीत ह्याबद्दलची कधी कधी अतिउत्साही भोचक जिज्ञासा इतरांनीही दाखवू नये. त्यांनाही त्यांची प्रायव्हसी जपायचा हक्क नाही का?
>>या माणसांविषयी इतरत्र काही नकारात्मक वाचले वा ऐकले की ते समजून घेण्याची वाचकांची मानसिकता राहत नाही. किंवा मग एकदम अनादर तयार होऊन 'यांचेही पाय मातीचेच तर' असे वाटायला लागते. >> आजकाल माहिती मिळवण्याचे इतके स्रोत उपलब्ध आहेत, की बहुतांश वाचक इतके भोळे राहिले असतील हे मानणे जरासे जड जाते आहे.
बाकी डॉ. प्रभू ह्यांच्या लेखांचे महत्त्व तुम्हीही मान्य केले आहेच. :)
>>या लेखनप्रकारात मी मराठीत 'उत्तम' वाचले ते केवळ डॉ. सरोजिनी वैद्य यांचे >> रवींद्र पिंगे ह्यांनीही काही उत्तम व्यक्तीचित्रे रंगवली आहेत. रेळ्यांनी कुमार गंधर्वांचे लिहिलेले व्यक्तीचित्रही कुमारांच्या गुण दोषांसकट ( तुम्ही म्हणता तसे) उत्तम उतरले आहे. हल्लीच आलेले मंगला गोडबोले ह्यांचे सुनीताबाईंवरचे पुस्तकही असेच उत्तम आहे.
In reply to एकांगी by कविता महाजन
सरोजिनी वैद्य
सरोजिनी वैद्यांच्या लेखांचे संकलन उपलब्ध आहे का?
पानवलकरांवरचा विजय तेंडुलकरांचा लेखही अत्यंत वाचनीय. बहुतेक 'तें'दिवस मध्ये आहे.
In reply to सरोजिनी वैद्य by टण्या
हस्तलिखित गहाळ
टण्ण्या,
या पुस्तकाचे सारे काम खरेतर पूर्ण झाले होते. पण बाई आकस्मिक गेल्या आणि ते राहून गेले. आत्ता तुमची ही कॉमेंट वाचताच मी वैद्यसरांना फोन करून चौकशी केली. तर समजले की ते पुस्तक 'मौज' काढणार होते. ( म्हणजे आनंदच! ते माझ्या नातीच्या हाती पडले तरी खूप झाले!! :-(... असो.) आणि बहुतेक ते हस्तलिखित गहाळ झाले आहे. याचा अर्थ आता मी त्या प्रकरणाचा पाठपुरावा करणे आले! इतके निष्काळजी आणि बेजबाबदार लोक असतात आपल्याकडे... जाऊ दे... आता डोके फिरलेय. काही लिहीत बसण्यापेक्षा अजून चार जागी चौकशा सुरू कराव्यात हेच उचित.