Submitted by प्रभाकर नानावटी on
चित्रा राजेन्द…

प्रना,
दोन वर्षांपूर्वी श्यामलाताईंच्या एका शिबिरात सहभागी झाले होते. ह्या वयातदेखील त्यांची सतत दोनेक तास, न थांबता, बोलण्याची ऊर्जा वाखाणण्यासारखी आणि त्यापेक्षाही जास्त अनुकरणीय आहे.
तेव्हाच त्यांच्या ह्या पुस्तकाशी ओळख झाली. आता तुम्ही एवढी मस्त शिफारस केल्यानंतर ते पुन्हा एकदा वाचायला घेतले आहे.
तेव्हा हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात झालेला मोठ्ठा बदल म्हणजे मी इतरांवर, त्यांच्या वागण्या-बोलण्यावर शिक्के मारणे थांबवले. त्याचा मला खूप फायदा झाला. नजरेवरील सर्व चष्मे उतरवून ठेवूता आल्याने ती स्वच्छ झाली. मनही मोकळे झाले. अनुभवांना पूर्वग्रहदूषित नव्हे तर प्रत्येक वेळी नव्या नजरेने भिडता येऊ लागले. अर्थात हे एका रात्रीत घडले नाही.
तुम्ही आठवण करून दिल्याप्रमाणे पुस्तक कसे वापराल हे परिशिष्ट पुन्हा एकदा वाचावेसे वाटले.
मनःपूर्वक धन्यवाद!

Wed, 02/03/2011 - 17:06 Permalink

मानवी स्वभावाच्या अनेकविध कंगो‌र्‍यांचा अभ्यास केल्यानंतर स्वभावाला औषध नाही या निष्कर्षाप्रत आपण नेहमी पोचत असतो. स्वभाव हा माणसाचा स्थायीभाव असून तो बदलणे कदापि शक्य नाही, असेच सर्व सामान्यपणे मानले जाते. माणसाचा स्वभाव, परिस्थितीच्या टक्क्या-टोणप्यातून घडत असतो. ज्या वातावरणात माणूस वाढत आहे ते वातावरण त्याच्या स्वभावाला आकार देत असते. त्यामुळे परिस्थिती बदलल्यास (किंवा बदलत्या परिस्थितीची जाणीव झाल्यास!) माणसाचा स्वभाव आपोआप बदलू शकतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात तसे घडताना दिसत नाही. म्हणूनच मानवी स्वभाव हा आनुवंशिक आहे की काय असे वाटू लागते. परंतु मानसशास्त्रज्ञांच्या मते स्वभावामध्ये बदल घडवता येतो. प्रयत्न केल्यास आपल्या तथाकथित नैसर्गिक क्रियांना आवर घालणे शक्य आहे. याच मानवी मनोव्यापारांचा वेध घेऊन, सैद्धांतिक व व्यावहारिक मांडणी वनारसे दांपत्यानी स्वभावाला औषध असते! या पुस्तकात केली आहे.

सुधीर व श्यामला वनारसे यांचे पुणे येथे सेंटर फॉर सायकॉलॉजिकल सर्व्हिसेस हे उपचार केंद्र असून सल्ला व प्रशिक्षणाद्वारे मानसिकरित्या कमकुवत असणार्‍यांवर ते उपचार करतात. मानसोपचाराचे प्रशिक्षण देत असताना सुमारे 12-13 हजार मनोरुग्णांशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्य त्यांनी समजून घेतले. स्वभावाबद्दल अनेक गैरसमज आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच या पुस्तकाची कल्पना त्यांना सुचली.

मानवी स्वभाव व त्याचे वर्तन हे नेहमीच चर्चेचे व प्रगत संशोधनाचे विषय झालेले आहेत. युरोप व अमेरिका येथील विद्यापीठात व संशोधन संस्थेत या विषयावर संशोधन होत असून वैज्ञानिक कसोटीला हे विषय अलिकडेच उतरले आहेत. विज्ञानाच्या सीमारेषेवर असलेल्या या विषयाच्या अनेक पैलूवर संशोधन चालू आहे. त्यामुळे या विषयावर इंग्रजीत भरपूर पुस्तकं आहेत. परंतु सिद्धांत व व्यवहार या पातळीवर हा विषय नेमका काय आहे व आपण त्यासाठी काय करायला हवे याची विस्तृत माहिती करून देणारे हे पुस्तक आहे.

स्वभाव म्हणजे काय, स्वभावाचा वर्तणुकीवर कसा परिणाम होतो, स्वभाव कसा आकार घेतो, त्यात बदल कसे कसे होत जातात, स्वभावाची माहिती झाल्यानंतर नेमके काय करावयास हवे, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण यात शोधू शकतो. परिस्थितीत बदल, आर्थिक समंजसपणा, समस्यांचे स्वरूप, याच्यासाठी केलेली कृती, स्वभावाचे अंतर्बाह्य रूप इत्यादी गोष्टीबद्दल लेखकद्वयानी अभ्यासपूर्वक विवेचन केले असून हे पुस्तक एकदा वाचून झाले या सदरात मोडत नाही. विषयाचा आवाका मोठा असून प्रत्येक वाचकाला विचारपूर्वक कृती करण्यास हे पुस्तक प्रेरित करू शकते. त्यामुळे विषय समजून घेणे, लेखकांना नेमके काय सूचित करायचे आहे त्याचा नीटसा अंदाज घेणे, पुस्तक वाचत असताना स्वत:विषयी, स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घटनांविषयी त्यावरील प्रतिक्रिया वा भाष्य याविषयी पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज आहे असे लेखकांना वाटते. व्यक्ती-व्यक्तीगणिक स्वभाव बदलतो, तसेच पुस्तकातील आशयावरच्या प्रतिक्रिया बदलत जाणार याची कल्पना लेखकांना आहे. त्यामुळे ढोबळपणे हे पुस्तक न वाचता, वाचत असतानाच जागोजागी थांबून आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या अशी लेखकांची अपेक्षा आहे.

मी रागीट आहे, तापट आहे, शांत स्वभावाचा आहे, स्थितप्रज्ञ आहे, असे स्वत:ला म्हणवून घेण्यात अनेकांना धन्यता वाटत असते. या प्रकारचे भाष्य वा केलेल्या कृतीचे समर्थन आपल्या मूळ स्वभावाला अनुसरून आहे अशी समजूत करून घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. काही वेळा तर आपला स्वभाव व वर्तणूक कुठल्या सदरात मोडतात याचीसुद्धा कल्पना नसते. केवळ वेळ मारून नेण्यासाठी काही तरी थातुर मातुर सांगितले जाते. मुळात स्वभावामध्ये आनुवंशिकता, परिस्थिती आणि व्यक्तीची वैचारिक प्रगल्भता या घटकांच्या परिणामांचा समावेश असतो. आपले अनुभवसुद्धा अवती भोवतीचा परिसर, एकमेकांच्यातील संवाद, परिस्थितीचे आकलन इत्यादीवर अवलंबून असतात. अनुभव व विचारांची सांगड घालताना स्वभावातील बदल हे आवश्यक ठरते. परंतु बदल ही सहजासहजी घडणारी क्रिया नव्हे. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आपल्यातील गुणदोषांची यादी करून भोवतालची परिस्थिती, शिकवणूक, क्रिया-प्रतिक्रिया इत्यादीवरून स्वत:चा एक नकाशा तयार करावा लागेल. तेव्हाच आपल्याला 'विवेकी ' मार्गावर चालता येईल. हा मार्ग चोखाळताना स्वत:चा स्वीकार करणे, स्वत:कडे त्रयस्थ दृष्टीने बघणे, उत्स्फूर्ततेला वाव देणे, परिस्थितीशी टक्कर देताना अविरत प्रयत्न करणे, आयुष्यातील सर्व प्रसंगी विनोदबुद्धीची जपणूक करणे, साध्य - साधन शुचितांचे आग्रह धरणे, इत्यादी गोष्टींना महत्व द्यावे लागेल. माणूस हा ठोकळेबाज, छापाचा गणपती कधीच नसतो. आत्मभान व मूल्यभान यांची जाणीव असलेला पैसा, सत्ता, सामाजिक संवाद, मैत्री, निकोप लैंगिक जीवन, ज्ञानलालसा, अशाबद्दल विचार करणारा तो असतो. "अधिक चांगला माणूस" होण्यासाठी त्याची धडपड चालू असते.

विचारास प्रवृत्त करणार्‍या साधनांमध्ये परिस्थितीला वरचा क्रमांक द्यावा लागेल. अनानुकूल परिस्थिती, पैशाच्या अभावामुळे होत असलेली अडवणूक, समस्यांच्या चक्रव्यूहातून सुटका नाही अशी समजूत, इत्यादींच्या कोंडीत सापडलेला माणूस स्वत:च्या कतृत्वशक्तीवरचा विश्वास गमावून बसतो. पुढची वाट दिसेनाशी होते. परंतु विचारातून नक्कीच मार्ग सापडू शकेल, असे लेखकांना वाटते. वैयक्तिक जीवनव्यवहारात पैशाला जितके महत्व आहे तितके कदाचित आणखी दुसर्‍या कुटल्याही गोष्टीला नसेल. पैसा मिळण्याची शाश्वती असली की गरज भागण्याची सुरक्षितता असते व या सुरक्षिततेला तोड नाही. म्हणून एनकेन मार्गाने पैसा न जोडता आत्मसन्मान, चित्तशांती, नैतिकता संभाळूनच पैसा मिळवणे योग्य ठरेल. आयुष्याच्या वाटेवर अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. काम करताना अडचणी येणारच. काही वेळा अत्यंत क्षुल्लक गोष्टसुद्धा डोकेदुखी होऊन बसते. परंतु डोक्यात राख घालून, वैतागून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, याची जाणीव असायला हवी. समस्यातून सुटका करून घेण्यासाठी प्रश्नाचे उगम स्थान ओळखणे, त्याची कारणमीमांसा, यथायोग्य मांडणी, पर्यायांची तपासणी, निर्णय प्रक्रिया, कार्यवाहीची रूपरेषा, प्रत्यक्ष कार्यवाही, पाठपुरावा, इत्यादी टप्प्यांचा विचार करावा लागेल. नियोजन पूर्वक कृती केल्यास ’प्रश्न’ हा कधीच प्रश्न म्हणून राहणार नाही. मळलेली वाट सोडून जाण्याचे धाडस अंगी बाळगल्यास समस्यांच्या जंजाळातून बाहेर पडणे शक्य होईल, असा आशावाद लेखक प्रकट करतात.

मानवी स्वभावांचे विश्लेषण करताना लेखकांनी मनातला आणि जनातला अशी विभागणी केली आहे. अनेक वेळा शांत डोक्याने विचार करू लागल्यास कळते पण वळत नाही अशी परिस्थिती उद्भवते. या पश्चातबुद्धीच्या संदर्भात काही उदाहरणांच्या मदतीने लेखक तोडगा सुचवतात. कायम यशाच्या मागे धावणारा अपयशाच्या धास्तीमुळे कमकुवत होतो. मुळातच यशापयशाची समजूत वस्तुस्थितीला धरून नसते. मग प्रयत्न केले जात नाहीत. नशीबावर भरवसा ठेवला जातो. न्यूनगंड निर्माण होतो. कंटाळा येऊ लागतो. म्हणूनच कौतुकाच्या ओझ्याखाली दबून न जाता विचारपूर्वक प्रयत्न करत राहणे योग्य ठरेल. याचवेळी कमीत कमी कष्ट घेऊन जास्तीत जास्त फळे मिळवण्याची वृत्ती हितावह नाही याची जाणीव ठेवायला हवी. प्रयत्न फुगवून दाखविणे, दुसर्‍याची अडचण हीच आपली संधी मानणे, संभावितपणाचा आव आणून लुबाडणे, उपटणे, फुकटेपणा, आळशीपणा इत्यादी सवयीपासून जितके दूर राहता येईल तितके हितावह ठरेल, असे लेखकांना वाटते. म्हणूनच आग्रही समजुतींचा पुनर्विचार करण्यावर लेखक भर देत आहेत.

पुस्तकाच्या शेवटी पुस्तक कसे वापराल हे परिशिष्ट असून त्यात उल्लेख केलेल्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर दिल्यास आपल्या स्वभावाचे पूर्ण चित्र उभे करता येईल. शेवटच्या पानातील प्रतिसाद भरून पाठवल्यास वाचकांच्या मनोव्यापाराबद्दल लेखकांना कल्पना येईल.

स्वभावाला औषध असते!
सुधीर वनारसे व श्यामला वनारसे,
सेंटर फॉर सायकालॉजिकल सर्व्हिसेस, एरंडवणा, पुणे
किंमत रु 100