अलिकडेच मी काही जुनी पुस्तके नव्याने छापून बाजारात आली म्हणून उत्साहाच्या भरात विकत घेतली.
मी खरेदी करताना एकतर ऑनलाईन किंवा फोनवरुन ऑर्डर देऊन इकडे बंगळूरात मागवतो. अशा वेळी हा धोका लक्षात येत नाही. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेतल्यावर किमान कळते तरी की हातात काय कलाकृती आली आहे ते. असो पण मुद्दा तो नाहिये.
मुळात कोणत्याही कादंबरीचा अथवा पुस्तकाचा संक्षेप करणे हे योग्य आहे की अयोग्य?
माझ्यामते तरी कोणत्याही साहित्यकृतीचा दुसर्या लेखकाने संक्षेप करणे ही प्रचंड आक्षेपार्ह बाब आहे आणि संक्षिप्त आवृत्त्या या मराठी साहित्याला लागलेली ही कीड आहे.
मी स्वतःच तीन उदाहरणे पाहिली आहेत. अजून किती असतील आणि किती येणार आहेत ते प्रकाशकांनाच ठाऊक.
नाथमाधवांसारख्या प्रतिभावान लेखकाने छत्रपति शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या स्वराज्य मालिकेतील ७-८ पुस्तके असो. किंवा हरि नारायण आपटेंचे 'चंद्रगुप्त' हे पुस्तक असो किंवा मग भा.रा. भागवतांनी ज्यूल्स व्हर्नच्या कथा मराठीत अनुवादीत केल्या तो २० पुस्तकांचा संच असो.
प्रकाशकांनी नाव मूळ लेखकाचे वापरायचे व आत कोठेतरी संक्षेप केलेल्या लेखकाचे नाव द्यायचे याला बाजारू वृत्ती नाही तर काय म्हणावे? मराठी माणसाच्या हातात पैसा खेळू लागला आणि तो पुस्तके विकत घेऊन वाचू लागला म्हणजे त्याच्या हातात सुंदर कलाकृती विकृत करुन द्यायचा हक्क तुम्हाला कोणी दिला? ज्याने रसनिर्मिती केली त्या लेखकाच्या कलाकृतीचे मूल्यमापन त्या लेखकापेक्षा जास्त दुसरे कोण करु शकेन?
भा. रा. भागवतांनी ज्यूल्स व्हर्नच्या सुंदर वैज्ञानिक कथांचा सुरस अनुवाद मराठीत २० पुस्तकांच्या संचाच्या रुपाने आणला होता. मुळात ही पुस्तके लहान आकाराचीच होती, त्यांचाही संक्षेप करण्याचे प्रयोजन ना प्रकाशकांनी दिले ना संक्षेप करणार्या लेखकाने. भा.रा. भागवतांनी बाल-कुमार वयोगटाला समोर ठेवून जी साहित्य निर्मिती केली त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. भागवतांचे बाल-कुमार वयोगटाला मोहून टाकण्याचे कौशल्य त्या कधीही नाव न ऐकलेल्या लेखकाकडे आहे की नाही हे कोण ठरवणार? संक्षेप करणारे लेखक पात्रतेने आणि योग्यतेने महान असतीलही. पण म्हणून दुसर्या लेखकाची साहित्यकृती विद्रूप करुन वाचकांना देणे हा अक्षम्य अपराध आहे.
तीच गोष्ट ह.ना.आपटे यांच्या चंद्रगुप्त या कादंबरीची. हिंदी अनुवाद आजही विकत घेण्यासाठी उपलब्ध आहे. पण मराठीत मात्र हे सुंदर पुस्तक बाजारात मिळत नाही. सध्या मिळते आहे ते केवळ ३०-३५ पानांचे पुस्तक. जे बाल वयोगटातील वाचकांना समोर ठेवून संक्षेप केलेले आहे.
आपण वेळीच या संक्षिप्त आवृत्त्यांच्या किडीवर उपाय नाही केला तर उद्या नाथमाधवांची वीरधवल अवघ्या ८०-१०० पानांत बघावयास मिळेल. छावा १००-१५० पानांत दिसेन. जी एंची अनेक पुस्तके एकत्र संक्षिप्त मिळतील. यापुढे कल्पनाच करु इच्छीत नाही.
एखाद्या कादंबरीचा रस त्यातील वर्णनांतून वाचकाला लेखक आपल्या शैलीतून एका वेगळ्या स्वप्न-विश्वात नेतो. विबिध वर्णनांनी वाचकाचे भावविश्व निर्माण होते. साहित्याच्या सौंदर्याचा हा आत्माच या संक्षिप्त आवृत्त्या मलीन करतात.
जाणकारांचे, पुस्तकप्रेमींचे, साहित्यावर अभ्यास असणार्यांचे व लेखकांचेही या विषयावर विचार जाणून घ्यायला आवडेल.
*** सर्व लेखकांना, प्रकाशकांना विनंती की अशा प्रकारची संक्षिप्त आवृत्त्यांची कीड मराठी साहित्यात आणू नका ***
मतलबी धंदा....!!
श्री.सागर यांची व्यथा (आणि तितकाच संतापही...) मी जाणतो कारण पुस्तकप्रेमीची ही एक प्रकारे शुद्ध फसवणूक आणि 'आम्ही साहित्य जिवंत ठेवतो...' अशी शेखी मिरवणार्या लबाड प्रकाशकांचा हा कावा आहे. झाले आहे असे की, गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील शाळामहाविद्यालये आणि नोंदणीकृत लायब्ररीजना 'ग्रंथवृद्धी' साठी भरघोस अनुदाने देणे सुरू केले असून आजपर्यंत शहरातील कॉलेजीस आणि विद्यापीठे यांच्यातच वाटले जाणारे अनुदान आता राज्यभरातील (अगदी डोंगराळ भागातील शाळा-हायस्कुल्सनादेखील) संस्थाना, भरपूर प्रमाणात, जावू लागले आहे. आता या वाहत्या गंगेत हात धुवून न घेईल तर मग ती प्रकाशन संस्था कसली? मग 'आम्ही खास मुलांसाठी काढलेली ही मालिका.... अमुक एका आदरणीय लेखकाची ही पुस्तके.....तमुक पारितोषिके मिळालेल्या ह्या कादंबर्या...." आदी वर्ख लावलेल्या पुस्तिका घेऊन त्या त्या जिल्ह्यातील पुस्तकविक्रेते त्या त्या संस्थाचालकांकडे जावून 'खुबी'ने त्या पुस्तकाचे ढीग त्यांच्या गळ्यात मारतात....आणि हे होते ते ३१ मार्चच्या धबडग्यात...तुम्हाला माहीतच असेल की, सरकारी भाषेतील एक मंत्र : "वर्षअखेर जवळ आली आहे....बजेट अॅलोकेशन लवकरात लवकर संपविले पाहिजे....". शासन व्यवहारात एखाद्या संस्थेला मंजूर केलेले बजेट न संपविणे हाही एक मोठा प्रमाद मानला जातो. वर्षभर थंड बसायचे आणि मार्च आला की हे जागे होणार. मग घाईघाईने मिटिंगा घेतल्या जातात आणि "....काय, ग्रंथालयावरील बजेट अजूनी इतके शिल्लक आहे? तर बोलवा त्या अमुकतमुक ना आणि करून टाका काय आहे तो व्यवहार, मास्तर !"...मग हे हेडमास्तर कसे आणि कुणाला बोलाविणे धाडतात....मग सो-कॉल्ड कमिटी मेंबर्स त्याच्याशी टेबलखालून कसे व्यवहार करतात, यावर खरे तर एक शोधनिबंध लिहिता येईल. पण थोडक्यात अशी तर्हेची खरेदी होत असताना मग तुम्ही म्हणता तशा 'संक्षिप्त आवृत्यां'ची चलती होते. कुणाला हव्या आहेत संपूर्ण ह.ना.आपटे, शशी भागवत, नाथ माधव, वि.वा.हडप, र.वा.दिघ आदींच्या कलाकृती पूर्ण स्वरूपात? असेल कुणाकडे या कलाकृतींचे कॉपीराईट्स तर प्रकाशकाने त्याला वडापाव बांधून देऊन वेळीच थंड केलेले असते. शिवाय त्या पाचव्या सहाव्या पिढीतील वाघ्याकडे तरी कुठे वेळ आहे आपल्या पूर्वजाने कधीकाही 'चंद्रगुप्त' वा 'वीरधवल' नावाची कादंबरी लिहिली होती आणि आता त्याची संक्षिप्त आवृत्ती निघाली आहे, ती तशी का काढली हे विचारायला?
त्यामुळे ज्याचे फावते तो आणि ते असा कचरा मोठ्या प्रमाणात आणित आहेतच, पुस्तकविक्रेत्याना भरघोस कमिशन देवून. याची कीड या स्थानिक पुस्तकविक्रेत्यांच्यात या कमिशनची अशी काही नशा लागली आहे की हे लोक आता तुमच्याआमच्यासारख्या एखाद्यादुसर्या वाचकाची पुस्तकविक्रीसाठी वाट पाहातच नाहीत असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही, सागर. [तुम्ही या क्षणी महाराष्ट्रात नाही, पण मार्चमध्ये कधी पुण्यात याल तर त्यावेळी अप्पा बळवंत चौकातील पुस्तकविक्रेत्यांच्या गोडावूनकडे, दुकानाकडे नव्हे,....सहज एक चक्कर टाका...आणि तिथे ट्रक्सची वाट पाहात असलेल्या पुस्तकांच्या पार्सल थप्प्यांचा ढीग आणि त्यावरील गावांची नावे पाहा....महाराष्ट्रातील असूनही तुम्हाला पहिल्यांदाच आपण ती गावाची नावे वाचत आहोत असा भाग होईल....~ मी हा प्रकार पाहिला आहे, त्यामुळे असे अधिकारवाणीने लिहित आहे.]
थोडक्यात, संक्षिप्त आवृत्याचा हा 'धंदा' बंद होईल याची सुतराम शक्यता नाही. फक्त आपण तसले पुस्तक खरेदी करू नये, इतपतच आपल्या हाती आहे.
इन्द्रा
In reply to मतलबी धंदा....!! by इंद्रराज पवार
नेमक्या शब्दांत माझी व्यथा मांडलीत
इंद्रराज,
मनापासून धन्यवाद तुम्हाला.
तुम्ही नेमक्या शब्दांत माझी व्यथा मांडलीत.
खरे तर यावर लिहायला घेतले आणि संतापामुळे एकटाकी टंकले. त्यामुळे जे मुद्दे मला स्पष्ट करता आले नव्हते त्यावर तुम्ही नेमका प्रकाश टाकला आहे.
त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.
सर्व पुस्तकप्रेमींनी संक्षिप्त आवृत्यांवर बहिष्कार टाकणे हे एकमेव शस्त्र वाचकांच्या हातात आहे. तेव्हा सर्व वाचकांनी संक्षिप्त आवृत्ती दिसली की ती घेऊच नये अशी माझी सर्वांना विनंती आहे.
In reply to नेमक्या शब्दांत माझी व्यथा मांडलीत by सागर
सागर, लेख वाचला होता, पण काय
सागर, लेख वाचला होता, पण काय लिहावे ह्याबद्दल नक्की होत नव्हते. तुझी कळकळ, रास्त मुद्दे पोहोचले. काही अंशी पटलेही. तरीही एक असे वाटते की समजा एखादे पुस्तक आता मला बाजारामध्ये मिळतच नसेल - जुने असेल, पुनर्मुद्रित झाले नसेल वगैरे अनेक कारणे - तर संक्षिप्त आवृत्ती वाचल्याने निदान मला त्या पुस्तकाचे भान होईल ना? त्यामुळे संक्षिप्त आवृत्त्यांवर/ आवृत्यावाल्यांवरही अगदी चिडावेच का, असा एक विचार करत आहे. :)
In reply to सागर, लेख वाचला होता, पण काय by यशोधरा
संक्षेप येत असेन तर मूळ पुस्तकही येईलच
यशोधरा,
संक्षिप्त आवृत्ती बाजारात आणण्याऐवजी मूळ पुस्तक पण आणता येईलच ना प्रकाशकाला.
पण संक्षेप फसला तर पुस्तक भिकार आहे असा दोष सामान्य वाचक लेखकाच्याच माथी मारणार ना?
ही जबाबदारी प्रकाशक व संक्षेप करणार्या लेखकाची असली तरी, असा कोणताही मापदंड नाहीये की हे दोघे त्यासाठी जबाबदार ठरतील.
ह.ना.आपटेंचे चंद्रगुप्त मुळातूनच मी वाचले आहे. संक्षेप बघून माझे डोळेच पांढरे झाले. एवढी सुंदर कलाकृती एवढी काटछाट करुन तिचे बोन्साय केले आहे. सगळी सौंदर्यस्थळे दूषित झाली आहेत. शेवटी मराठी मिळत नाही म्हणून मी या पुस्तकाचा हिंदी अनुवाद विकत घेतला. तो हिंदी अनुवाद मात्र ह.ना.आपटेंची कलाकृती आहे याची ओळख देतो.
संक्षिप्त चंद्रगुप्त वाचणारा वाचक पुन्हा कधी ह.ना. आपटेंच्या पुस्तकांच्या वाटेला जाणार नाही असा हा संक्षेप आहे.
प्रकाशक व लेखक या दोघांनीही पुस्तकात केवळ खुलासा व कारणे देऊन त्यांची जबाबदारी संपत नाही.एका सुंदर साहित्याचे संक्षेप फसला तर विडंबनच होते.
मूळ लेखक दोषी नसतानाही दोष मात्र त्याच्याकडे जातो ही मोठी चिंतेची बाब आहे
In reply to संक्षेप येत असेन तर मूळ पुस्तकही येईलच by सागर
हो सहमत आहे. कदाचित बर्याच
हो सहमत आहे. कदाचित बर्याच जणांकडे आजकाल वेळाची कमतरता असते वा खूप मोठी पुस्तके वाचण्यामध्ये रुची नसू शकते ह्या समजा/ गृहीतकामुळेही हे होत असावं, असं वाटतं. शेवटी ज्याला मूळ कलाकृती हवी आहे, तो ती मिळवून वाचेलच.
सहमत आहे
विश्वास पाटील यांची 'महानायक' आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 'माझी जन्मठेप' या वाचकांची सतत मागणी असणार्या पुस्तकांचीही संक्षिप्त आवृत्ती निघालेली आहे पण त्याचबरोबर मूळ आवृत्याही उपलब्ध आहेतच. तेव्हा कदाचित वाचकांच्या खिशाचाही विचार करून हा प्रयोग केला गेला असेल.
In reply to सहमत आहे by वल्ली
उलाढालीचे गणित...!!
"....या वाचकांची सतत मागणी असणार्या पुस्तकांचीही संक्षिप्त आवृत्ती निघालेली आहे पण ...."
~ वल्ली, मला एक सांगा, जर वाचकांची 'सतत' मागणी असेल तर मग तोच वाचक मूळ "महानायक' घेईल की त्याची संक्षिप्त आवृत्ती? आणि मूळ हवीच असेल तर मग तो किंमतीची पर्वा करेल का? आज नाही म्हटले तरी आपला वाचक वर्ग केवळ सार्वजनिक वाचनालयावर अवलंबून न राहता मासिक खर्चाच्या बजेटमध्ये पुस्तकांची खरेदी हीदेखील एक बाब असणे आवश्यक मानू लागला आहे; जे एक साहित्य चळवळीसाठी सुचिन्ह मानले गेले आहे. असे असताना 'घेतोय ना तो, मग देवू या त्याला त्याच्या लेखकाच्या संक्षिप्त आवृत्या !".....ही चीड आणणारी वृत्ती एवढ्यासाठी वाढत चालली आहे प्रकाशकांच्यात की कुठल्याही स्थितीत काढलेली आवृत्ती ही संपतेच आणि मी वर म्हटल्याप्रमाणे एखादेदुसरे गिर्हाईक अशी संकल्पना आता बदलली आहे. वर्षाला ५० कोटीच्या वर उलाढाल होत गेलेला प्रकाशनधंद्याच्या गणितात किरकोळ काऊंटर विक्रीचा हिस्सा ८ (होय, आठ) कोटीचा आहे, निदान या वरून प्रकाशन संस्था कुणाच्या बळावर ही मग्रुरी दाखवित आहेत याचा अंदाज तुम्हाला येईल.
~ नेमाड्यांची १९७५ मध्ये प्रकाशित झालेली 'बिढार' केवळ ४० रुपयांना मिळत होती. पण १९९० नंतर मराठी माणूस चार पैसे खर्च करायला लागला हे दिसल्यावर भटकळांनी बाजाराची अटकळ बांधून खुद्द नेमाड्यांना नाराज करून 'बिढार' चे दोन भाग करून, चांगदेव नगरच्या कॉलेजमध्ये लेक्चरर पदावर रूजू झालेला भाग 'हूल' नावाने 'स्वतंत्र' कादंबरी म्हणून बाजारात आणला...आणि दोन्हीच्या किंमतीही २५० च्या पुढे ! नेमाडे तरी काय करणार? आता साठी ओलांडल्यामुळे त्यांच्याच भाषेत "म्हातार्या बैलाची अगतिकता" आली होती...झुंजण्याची रग संपुष्टात. 'बिढार' मध्ये प्रकाशकांच्या आणि प्रस्थापित लेखकांच्या नावाने ठणाणा करणारी चित्रे-शहाणे-कोलटकर-ओक-पाध्ये आणि खुद्द नेमाडे ही मंडळी तो जोर ओसरल्यावर आणि स्वतःच त्यांच्या पंक्तीच पाट मांडून बसल्यावर मात्र 'आम्ही तरी ही रचना कशी बदलणार?" याचे नक्राश्रू ढाळू लागली आहेत.
त्यामुळे मनात असो वा नसो विश्वास पाटील तरी आपल्या भरदार कादंबर्यांची मोडतोड झालेली सहन करणारच. (संक्षिप्त रूप तर मूळ लेखक करीत नाही) कुणीतरी शिकावू पदरी असतोच प्रकाशन कचेरीत....त्याच्याकडून मारून घेतले जाते...टिळा लावण्यापुरते लेखकाकडे पाठविण्यात येते [ते देखील विश्वासराव अॅक्टीव्ह आहेत म्हणून...सावरकर, नाथ माधव, दिघे इ. मंडळींचे साहित्य कुणाकडे देणार नजर फिरविण्यासाठी?]....तो त्यात बदल करणार नाही हे गृहीत धरूनच मॅटर डीटीपीला गेलेले असतेच...काहीसा बदल केलाच तर, 'पाहू या पुढे..." असा सोयीचा विचार करून त्याच्या नोट्स प्रकाशक कपाटात ठेवून टाकतो... कारण? ३१ मार्च जवळ आली आहे....)
फार विचित्र (तरीही अंतीमतः फायदेशीरच असणारी...) गणिते आहेत या धंद्याची, वल्ली....("व्यवसाय" म्हणवत नाही.)
इन्द्रा
In reply to उलाढालीचे गणित...!! by इंद्रराज पवार
खरेच
खरेच आहे तुमचे इंद्रराज. प्रकाशकांनी तर या व्यवसायाचा अगदी धंदा करून टाकला आहे. पॉपुलरकडून तर अपेक्षाच नाही पण राजहंस सारख्या सन्माननीय प्रकाशकांनी 'महानायक' च्या बाबतीत असे करावे हे निश्चितच खंतावणारे आहे.
थोडेसे अवांतर होईल या धाग्यावर पण आता बराचश्या खासगी वाचनालयांनीही काहीसा असाच प्रकार सुरु केलाय आता. व हे दुर्भाग्य काही मोठ्या पुस्तकांच्या वाटेला आलेले दिसते. एखादे वाचकप्रिय जाड्जूड पुस्तके घ्यायचे. उदा. पानिपत, हिंदू, महानायक, श्रीमान योगी, कादंबरीमय शिवकाल, शांताराम असे. त्यांचे फाडून दोन तीन भाग करायचे. बाईंडींग करून वाचनालयात ठेवायचे व वाचकांच्या वाढत्या मागणीमुळे सर्वांना पुस्तक वाचायला मिळावे म्हणून असे करण्याचे गोंडस कारण द्यावयाचे. अशी चिरफाळलेली पुस्तके आपल्याकडे अगदी केविलवाण्या नजरेने बघत असतात व ते आपल्याला अगदी बघवत नाही.
In reply to खरेच by वल्ली
अजून थोडे विचार
इंद्रराज आणि वल्ली
छान चर्चा केलीत तुम्ही इथे.
सुहास शिरवळकरांनी अरेरावी प्रकाशकांच्या मनोवृत्तीवर 'थोडक्यात असं' या पुस्तकातून खूप सुंदर प्रकाश टाकला आहे. केवळ प्रकाशकाला वाटले म्हणून प्रकाशकाने काय बदल केले ते लेखकाला बाजारात त्याचे पुस्तक छापून आल्यावरच कळते. अर्थात हा देखील वेगळा विषय आहे पण संक्षिप्त आवृत्त्यांच्या विषयाशी जवळचाच किंबहुना निगडीतच आहे.
यात सर्वात मोठा कळीचा मुद्दा हा येतो की लेखकाने निर्माण केलेल्या कलाकृतीचे कोणत्याही प्रकारचे विच्छेदन करण्याची पात्रता त्या लेखकाव्यतिरिक्त दुसर्या कोणाची असू शकते का? त्याच लेखकाने जर संक्षेप केला तर ते समजण्यासारखे आणि पटण्यासारखे आहे.
साहित्यकृतीचा संक्षेप हा लेखकाच्या लेखन स्वातंत्र्यावर घाला नाही का?
तुम्ही हेच वाचा असा सूर संक्षेपातून येत नाही का?
आम्ही लेखकाच्या या महान साहित्यकृतीचे मर्म लोकांना कळावे म्हणून संक्षेप केला हा पोकळ युक्तिवाद जर कोणा प्रकाशकाने केला तर त्या प्रकाशकाला साहित्य, लेखनस्वातंत्र्य, रसस्वाद या गोष्टींचा परिचयच नाही असे म्हणावे लागेल. पानिपताचे युद्ध अमक्या तमक्या दिवशी झाले... अब्दाली जिंकला.. मराठे हरले... एवढी हानी झाली... अमके झाले... तमके झाले... अशा प्रकारची माहिती वाचकांना द्यायला १० ओळीपण पुरतात.
सध्याच्या संक्षिप्त आवृत्त्या ही केवळ सुरुवात आहे असे माझे मत आहे. कालानुसार त्या अजून संक्षिप्त होत जातील. जबाबदारी येते ती सर्व वाचकांची. वाचकांनी संक्षिप्त आवृत्त्यांकडे पाठ फिरविली तरच प्रकाशक संक्षेपाच्या वाटेला जाणार नाहीत. शेवटी बाजारात जे विकले जाते तेच त्यांना द्यावे लागते.
संक्षिप्त आवृत्त्यांचा हा मुद्दा लवकर पटणे अवघड दिसते आहे एकंदरीत. पण आज अशा संक्षिप्त आवृत्त्यांना पायबंद नाही बसला तर उद्या पानिपत, कोसला, वीरधवल, पण लक्षात कोण घेतो, मृत्युंजय, अधःपात, मर्मभेद, अशा सुंदर साहित्यकृती पॉकेट बुक म्हणून शंभर सव्वाशे पानात दिसली तर आश्चर्य नको वाटायला.
In reply to अजून थोडे विचार by सागर
खरे आहे
शिवाय या अश्या संक्षिप्त आवृत्त्या लोकआवृत्ती, जनआवृत्ती अश्या गोंडस नावांनी बाजारात येतात.
'महानायक' संक्षिप्त करतानाच राजहंसवाल्यांनी एक चांगला प्रयत्न देखील केला असे येथे नमूद करावेसे वाटते. अरूण साधूंची 'मुखवटा' ही मूळची मोठी कादंबरी त्यांनी लोकआवृत्ती करून स्वस्तात उपलब्ध करून दिली. यात कादंबरीचा काहिही संक्षेप केला गेला नाही मात्र यात थोड्या हलक्या प्रतीचा कागद वापरला गेला व कादंबरीत मार्जिन्समध्ये (समासात) कमी जागा सोडली गेली. म्हणजेच कमी पानात व कमी जाडीत पूर्ण पुस्तक बसवले. तरी छपाई उत्कृष्टच आहे. असे करून जर किंमत कमी करता आली तर स्वागतार्हच.
अशाच प्रकारे नुकतीच काही पेपरबॅक पुस्तकेही आली आहेत. उदा. खंडाळ्याच्या घाटासाठी, प्राक्तन, गियानाहून सुटका वगैरे. पण त्यांचा कागद खूपच कमी प्रतीचा आहे.
In reply to खरे आहे by वल्ली
+१ हे मान्य आहे
पुस्तकाच्या किंमतीशी गणित जुळवताना एक वेळ कागदाचा दर्जा, कमी पानांत जास्त मजकूर बसवणे या गोष्टी मूळ कलाकृतीशी छेडछाड न करता केलेल्या आहेत त्या मान्य असायला कोणाचीच हरकत नसावी. साहित्यकृतीचा आत्मा जपणे हे जास्त महत्त्वाचे
खंडाळ्याच्या घाटासाठी स्वस्तात आणि जसेच्या तसे मला मिळाले म्हणून खूप आनंदलो होतो त्यावेळेस. :)
भावनेशी सहमत
'स्मृतीचित्रे'ची संक्षिप्त आवृत्ती यातलाच प्रकार असावा नाही का? :(
लेखातील भावनेशी सहमत आहे तरीही माझे मत असे की असा संक्षेप करताना लेखकाची परवानगी (घेतली) असेल तर हा आक्षेप घेता येऊ नये. एकतर वल्ली म्हणतात त्याप्रमाणे खिशाचा विचार, दुसरी गोष्ट अनेकदा अनेक मंडळी केवळ आकार (व किंमत) बघून पटकन (वाचकासाठी) नव्या लेखकाची पुस्तके घेत नाहीत, त्यापेक्षा त्यांना ह्या संक्षिप्त आवृत्त्यांमुळे त्या त्या लेखकाच्या पुस्तकांच्या वाचनाची सुरूवात करता येते. मग तो लेखक/शैली आवडली की मुळ पुस्तक घेतले जाते.
मात्र हा संक्षेप मुळ लेखकानेच केला तर अधिक आवडेल, नपेक्षा, मुळ लेखकाची परवानगी मात्र घेतलीच पाहीजे असे वाटते.
In reply to भावनेशी सहमत by ऋषिकेश
तांत्रिक अडचणी...!
ऋषिकेश....चला तुमच्याच मुद्यांच्या आधारे पुढे जावू या ~~
१. संक्षेप करताना लेखकाची परवानगी (घेतली) असेल तर हा आक्षेप घेता येऊ नये. = कोणत्या लेखकाची परवानगी? विश्वास पाटलांची घेता येईल....पण ते फक्त 'परवानगी' देतील कारण त्यांच्या शासकीय सेवेच्या धबडग्यातून (जिल्हाधिकारी आहेत ते आता) महानायक, संभाजी चे संक्षिप्त रूप करायला तर राहू देत, पण दुसर्याने केलेले वाचायलादेखील त्याना फुरसत नाही. मागे ललितमध्ये त्यानी हे स्पष्टही केले आहे की, 'आता संभाजी नंतर ऐतिहासिक पद्धतीच्या कथानकाकडे जाणे अशक्य आहे, इतका अभ्यास आणि फिरावे लागते...".
२. किंमत बघून पटकन (वाचकासाठी) नव्या लेखकाची पुस्तके घेत नाहीत = इथे नव्या वाचकाची तुम्ही काय व्याख्या करता, ऋषि ? दहावी-बारावीमध्ये शिकणारा विद्यार्थी की पदवीला भाषा विषय घेतलेला एक युवक वा युवती? की नोकरी-व्यवसायामुळे चार पैसे पुस्तकांवर खर्च करू इच्छिणारी एखादी व्यक्ती? पहिल्या प्रकारातील वाचकाकडे खरेदीसाठी त्याचे स्वतःचे पैसे असण्याची शक्यता धूसर. वाढदिवसानिमित्त जर कुणी मामा-काकाने दोनतीनशे दिले असतील आणि हा गब्रू पुस्तकच खरेदी करणार असेल तर तो सर्वप्रथम हॅरी पॉटर रॅककडे जाईल [हे मी पाहिले, अनुभविले आहे]. इथे संक्षिप्तचा संबंध येणार नाही...त्यामुळे किंमतीचा विचारही नाहे. दुसर्या गटातील पदवीचा युवक तुम्ही म्हणता तसा कदाचित विचार करेल. पण त्याला शशी भागवत, नाथमाधव, हडप माहित असतील तर तो संक्षिप्तकडे पाहाणार नाही. शिवाय गाजलेल्या (गाजत असलेल्या) पु.ल.; जी.ए., खांडेकर, पेंडसे, दळवी, मतकरी, शिरवळकर, कदम, पाटील, माडगूळकर यांच्या कलाकृतीचा मूळचाच खप इतका प्रभावी आहे की संबंधित प्रकाशक त्यांची संक्षिप्त आवृत्ती काढतच नाही (निदान माझ्या पाहणीत तरी आजअखेर 'संक्षिप्त पु.ल.' पाहण्यात आलेले नाहीत. म्हणजेच याचा अर्थ असा घ्यायचा का की, फक्त "गलेलठ्ठ' पुस्तकांच्याच संक्षिप्त आवृत्त्या काढल्या तर ते स्वागतार्ह मानायचे. असे असेल तर ते Abridged Version करणार्या Ghost लेखकाची ती पात्रता आहे की नाही हे ठरविणारी कोणती यंत्रणा वाचकाकडे आहे? तिसर्या गटातील वाचक (जर तो नवखा असेल तर...) सोबत श्री.सागर, श्री.वल्ली आणि श्री.ऋषिकेश यांच्यासारख्या पुस्तक खरेदी क्षेत्रातील 'दादा' ला घेऊनच 'अक्षरधारा' च्या दालनात जाईल. मग या तिघातील एक त्याच्या सोबत असेल तर तो 'संक्षिप्त' ला प्रेफरन्स कदापिही देणार नाही.
३. मात्र हा संक्षेप मुळ लेखकानेच केला तर अधिक आवडेल, नपेक्षा, मुळ लेखकाची परवानगी मात्र घेतलीच पाहीजे असे वाटते. = ठीक आहे. पण यातील पहिला विकल्प कधीच अंमलात येणार नाही....दुसरा 'मुळ लेखकाची परवानगी...' कुठे आहेत हे मूळ लेखक? लक्ष्मीबाई टिळक, मोरोपंत, माधव जूलियन, अत्रे, शशी भागवत, नाथमाधव, सावरकर, मर्ढेकर, कोलटकर... ही मंडळी बसल्येत चित्रगुप्तासमवेत त्याच्या ग्रंथालयात.... त्यामुळे या भद्र लोकांची परवानगी कशी घेणार?
असा सगळा बाजारभोगाव असल्याने जे बाजारत येते तेच सकस आणि 'ओरिजिनल' असा जो ट्रेन्ड पडत चालला आहे त्यात नुकसान वाचकाचेच होत आहे.
इन्द्रा
In reply to भावनेशी सहमत by ऋषिकेश
संक्षेप फसला तर दोष लेखकाकडेच जातो
ऋ,
त्यापेक्षा त्यांना ह्या संक्षिप्त आवृत्त्यांमुळे त्या त्या लेखकाच्या पुस्तकांच्या वाचनाची सुरूवात करता येते. मग तो लेखक/शैली आवडली की मुळ पुस्तक घेतले जाते
ही सुविधा खूपच मोजक्या पुस्तकांना लाभली आहे.यातही मेख अशी आहे की संक्षिप्त आवृत्ती मिळाली आणि संक्षेप चुकीचा झाला तर वाचक लेखकाला हद्दपारच करणार नाही का?. मग हा दोष मूळ लेखकाचा म्हणायचा का? करावे कोणी भरावे कोणी असेच होईल की मग. दुसरे असे की संक्षेप छपून बाजारात आणल्यावर मूळ कलाकृतीचे नखही दॄष्टीस बघावयास मिळत नाही. मग मूळ पुस्तक घेण्याची गोष्ट कधी अस्तित्त्वातच येणार नाही. संक्षिप्त आणि मूळ दोन्ही आवृत्त्या उपलब्ध आहेत अशी खूप कमी आणि मोजकीच पुस्तके बाजारात आहेत.
लेखकाच्या मूळ कलाकृतीतच दम असेन तर वाचक कसाही वाचेनच की.
पानिपत, मृत्युंजय, स्वामी, छावा, राजा शिवछत्रपति या जाडजूड कादंबर्या आजही विक्रीच्या बाबतीत नवे उच्चांक करत आहेत. आणि ही पुस्तके न वाचलेला हाडाचा वाचक क्वचितच सापडेन. तेव्हा वाचनाचा दर्जा कलाकृतीत असेन तर आकार हा गौण मुद्दा ठरतो असे मला वाटते. छोटे पुस्तक वाचक ४ दिवसांत वाचत असेन तर मोठे पुस्तक १५ दिवसांत वाचेन अशी विभागणी होईन. पण वाचक अशी कलाकृती वाचणार हे नक्की.
पण .........
सागरच्या भावना मी समजू शकतो व वाचक म्हणून मी तरी संक्षिप्त पुस्तके फेकून मूळ पुस्तकच वाचण्यासाठी निवडेन.
तरीही, इंग्रजीकडे नजर टाकली तर असे दिसते की अशा संक्षिप्त केलेल्या पुस्तकांची देखील समाजाला गरज आहे.
१. आपापल्या बालपणाची आठवण केली तर आढळेल की आपणही अशी अनेकानेक संक्षिप्त पुस्तके एके काळी वाचलेली आहेत. इंग्रजीत बहुतेक "क्लासिक" समजली जाणारी पुस्तके अशा स्वरूपात मुलांसाठी उपलब्ध असतात व त्याना चांगला खपही असावा. आणि तो संक्षेप लेखकाने नव्हे तर अन्यच कोणीतरी (पण सक्षम) व्यक्तीने केलेला असतो.
२. "रीडर्स डायजेस्ट" च्या वाचकाना त्यातील कंडेस्ड पुस्तके निश्चितच आवडतात असे वाटते - इतकी की नंतर तशी संक्षिप्त पुस्तके टिकाऊ बांधणीमध्ये विकली जातात व वाचलीही जातात. मीही वाचली आहेत.
३. आपल्याकडचेच उदाहरण घ्यायचे तर दुसर्या भाषेतून (मुख्यतः इंग्रजी व संस्कृत) मराठीत आणली जाणारी भाषांतरित पुस्तके बहुधा याच स्वरूपाची असतात व ते कित्येकदा वाचकाना कळतही नाही. अर्थात बहुधा ती मुलांसाठीच असतात हे नाकारता येणार नाही. याची सुविख्यात उदाहरणे म्हणजे अरेबियन नाइट्स व पंचतंत्र. आपण लहानपणी काय वाचले होते ते मोठेपणी या पुस्तकांच्या (मुळाशी नव्हे पण) असंक्षिप्त रूपाशी ताडून पाहिले तर धक्के बसतात हा माझा अनुभव आहे - जिवंत दाखला हवा असेल तर माकडाने पाचर काढून टाकल्यावर नक्की काय झाले ते मुळातून वाचा.
सर्व अनुभवांनंतर मी मूळ किंवा असंक्षिप्त पुस्तकच पसंत करतो/करेन हे पुन्हा म्हणतो, कारण त्यातील झटका संक्षिप्त रूपात मिळणे कठीण. पण हाही विचार करावा की मूळ पुस्तक आपल्याला येत असलेल्या ३ भांषांपेक्षा ४थ्या भाषेतले असेल तर किंवा अत्यंत जुनाट इंग्रजीतले असेल तर आपण काय करू.
अजूनही शेक्सपिअरची मूळ नाटके व लॅम्ब्ने केलेले त्यांचे कथानुवाद यापैकी सामान्य वाचक हातात चटकन काय घेईल?
तेव्हा संक्षिप्त रूपानाही त्यांची एक जागा आहे याची एका बाजूला नोंद असलेली बरी.
- दिगम्भा
In reply to पण ......... by दिगम्भा
+१
२. "रीडर्स डायजेस्ट" च्या वाचकाना त्यातील कंडेस्ड पुस्तके निश्चितच आवडतात असे वाटते - इतकी की नंतर तशी संक्षिप्त पुस्तके टिकाऊ बांधणीमध्ये विकली जातात व वाचलीही जातात. मीही वाचली आहेत.
हो, मीही :)
In reply to पण ......... by दिगम्भा
अनुवादाच्या बाबतीत नक्कीच सहमत आहे
सर्वप्रथम दिगम्भा तुमचे आभार मानतो की या धाग्यावर तुम्ही मोलाचे विचार मांडलेत.
आणि तुमच्यासारखी दिग्गज व्यक्ती नक्की मूळ पुस्तकाचे समर्थन करणार याची खात्री होतीच. :)
इंग्रजी साहित्याचा अनुवाद करतानाच संक्षेप झाला तर ते योग्यच आहे असे मलाही वाटते. पण मराठीतीलच सुंदर साहित्यकृतीचा संक्षेप मराठीतच दुसर्या लेखकाने करताना मूळ कलाकृतीचे सौंदर्य डागाळले जायला नको या वेदनेतूनच या धाग्याची निर्मिती झाली असे म्हटल्यास चूक नाही.
संक्षेप करताना नव्या लेखकाने नक्की काय काय गाळणी लावली आहे आणि काय नवीन भर टाकली आहे हे लक्षातच येत नाही.
मी देखील तुमच्यासारखेच म्हणतो. :)
सर्व अनुभवांनंतर मी मूळ किंवा असंक्षिप्त पुस्तकच पसंत करतो/करेन हे पुन्हा म्हणतो, कारण त्यातील झटका संक्षिप्त रूपात मिळणे कठीण.
अवांतरः खूप दिवसांनी तुम्हाला येथे पुन्हा पाहून खरेच आनंद झाला
In reply to अनुवादाच्या बाबतीत नक्कीच सहमत आहे by सागर
>>इंग्रजी साहित्याचा अनुवाद
>>इंग्रजी साहित्याचा अनुवाद करतानाच संक्षेप झाला तर ते योग्यच आहे असे मलाही वाटते.
का बरं? हा मुद्दा काही कळला नाही? योग्य का आणि कसे?
In reply to >>इंग्रजी साहित्याचा अनुवाद by यशोधरा
दिगम्भांनी थोडक्यात सांगितलंच
दिगम्भांनी थोडक्यात सांगितलंच आहे यशोधरा. पण अजून थोडं स्पष्ट करतो.
अनुवाद करताना ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे त्या भाषेत दुसर्या भाषेतील सौंदर्य जसेच्या तसे उतरवणे हे खरे अनुवादकाचे मोठे कौशल्य असते. अनुवाद वाचणारा वाचकवर्ग हा बहुधा इंग्रजी साहित्य वाचणारा नसतो.( दोन्ही वाचन करणारेही आहेत, ) अशा वेळी मूळ साहित्य जसेच्या तसे अनुवादित केले तर त्या भाषेतील सौंदर्यस्थळे जशीच्या तशी दुसर्या भाषेत उतरतीलच असे नाही.
उदाहरण द्यायचे झाले तर इंग्रजीतील म्हणींशी ज्याचा परिचय आहे त्याला त्या म्हणींचे मर्म कळू शकते. पण त्याच म्हणीचा कोणताही आगापिछा माहिती नसलेला मराठी वाचक हे काय लिहिले बुवा असा स्तिमित होणारच. मग त्याच अर्थाची एखादी मराठी म्हण अनुवादकाने वापरली तर मराठी वाचकाला ते लगेच कळते. इथे मूळ कलाकृतीचे सौंदर्य जपले जाते.
अजून एक गोष्ट अशी की इंग्रजी साहित्याचा मराठीत अनुवाद करताना अनुवादकाने मूळ साहित्यकृतीचे सौंदर्य जपले जाईल याचे भान ठेवणे फार गरजेचे असते. अशा वेळी अनुवादकाने काही गोष्टी संक्षेपित केल्या असल्या तरी त्या अनुवादकाने मराठीत निर्माण केलेली साहित्यकृती ही नवीनच निर्मिती असते. अनुवादक जर जास्तीचा संक्षेप करुन मूळ कलाकृतीतील सौंदर्य मराठीत आणण्यास अयशस्वी ठरला तर वाचकांचा किंवा खरेदीदारांचा प्रतिसाद (खरे तर प्रसाद ;) )त्याच्या पुस्तकाला मिळतोच मिळतो.
In reply to दिगम्भांनी थोडक्यात सांगितलंच by सागर
ओके सागर.
ओके सागर.
In reply to ओके सागर. by यशोधरा
क्षमस्व,पण असा अनुवाद करताना केलेला संक्षेप मला मान्य नाही
एक तत्व म्हणून असहमती दर्शवतो.
अनुवाद करताना त्या प्रक्रियेचा भाग म्हणून संक्षेप करणे मला मान्य होत नाही.
रूपांतर होते, अनुवादभाषेतील म्हणी त्या त्या जागी वापरल्या जातात हे सर्व ठीक. परंतु मूळ लेखकाने जे लिखाण कलाकृतीची आवश्यकता म्हणून समाविष्ट केले आहे ते वगळण्याचा अधिकार अनुवादकाला नाही असे मला वाटते.
संक्षेप करायचाच झाला तर तो काही विशिष्ट हेतूने केलेला असावा - जसे वेगळ्या वाचक वर्गासाठी (मुले, रीडर्स डायजेस्ट वगैरेचे वाचक), काळानुरूप तेच लिखाण अधिक स्वीकारार्ह बनवणे (बायबल, गीता, इ.), ज्याना वेळ नसतो त्यांच्यासाठी सूत्ररूपाने तीच गोष्ट उपलब्ध करून देणे ("एक्झिक्युटिव्ह समरी" प्रमाणे, एकश्लोकी रामायण वगैरे). आणि अर्थात असे केले आहे याची त्याच पुस्तकात नोंद असावी.
मला वाटते मराठीत असा प्रकाशन-अनाचार चालतो कारण अडाणी जनता/वाचक (ज्याना असे होते आहे/झाले त्याची जाण व जाणीव नसते) व विधिनिषेधशून्य प्रकाशक. म्हणजे आदिवासी किंवा निरक्षर जनतेचे जसे शोषण होते त्यातलाच प्रकार. आणि अनुवादांच्या बाबतीत तर आणखी एक कारण म्हणजे अनअकांउंटेबिलिटी - कोण तपासेल व जाब विचारेल अनुवादकाला की हे हे असे का केले - सगळाच अज्ञात अपरिचित प्रदेशातला प्रवास.
एका अनुवादकाने अरेबियन नाइट्स च्या अनुवादात लिहिले की "राजा राणीवर/राण्यांवर रागावला कारण त्याने त्या राण्यांना अत्यंत खालच्या जातीच्या गुलामांबरोबर हसताना खिदळताना पाहिले" - याला काय म्हणावे? अल्पवयीन मुलांचे लैंगिक तपशीलांपासून रक्षण करणे समजू शकतो पण हे काय भलतेच. "खालची" जात वाईट की गुलाम वाईट की हसणे खिदळणे वाईट?
गावगुंड कायदेकानूंची तमा न बाळगता मनमानी करतात तसेच झाले हे.
तेव्हा कोणत्या हेतूने असा संक्षेप केला जातो याचा विचार केला पाहिजे हा इंद्रराजांनीं मांडलेला मुद्दा खरेच महत्वाचा आहे. आणि संक्षेपाबद्दल इतर व्यक्त झालेल्या वेदना, कडवटपणा व चीड यांच्याशी देखील मी सहमत आहे.
- दिगम्भा
In reply to क्षमस्व,पण असा अनुवाद करताना केलेला संक्षेप मला मान्य नाही by दिगम्भा
+१ असेच म्हणतो
संक्षेप करायचाच झाला तर तो काही विशिष्ट हेतूने केलेला असावा
हेच मला म्हणायचे होते दिगम्भा. पण माझ्या प्रतिसादातून तसा अर्थ निघत नाही हे ही तितकेच खरे.
मुळात कोणत्याही साहित्यकृतीचा संक्षेप हाच आक्षेपार्ह आहे.
इंग्रजीतून मराठीत अनुवाद करताना ती मराठी साहित्यासाठी ती एक नव-निर्मितीच ठरते, तिचे यशापयश अनुवादकाच्या प्रामाणिकपणावरच अवलंबून असते. तेव्हा अनुवादक संक्षेप करतो तेव्हा तुम्ही म्हणता तसे त्यासाठी योग्य हेतू असणे हे फार गरजेचे आहे, नाहीतर त्या साहित्यकृतीतील सौंदर्यस्थळे दूषित होण्याचाच धोका जास्त असतो.
In reply to क्षमस्व,पण असा अनुवाद करताना केलेला संक्षेप मला मान्य नाही by दिगम्भा
+१
एक तत्व म्हणून असहमती दर्शवतो.अनुवाद करताना त्या प्रक्रियेचा भाग म्हणून संक्षेप करणे मला मान्य होत नाही.
रूपांतर होते, अनुवादभाषेतील म्हणी त्या त्या जागी वापरल्या जातात हे सर्व ठीक. परंतु मूळ लेखकाने जे लिखाण कलाकृतीची आवश्यकता म्हणून समाविष्ट केले आहे ते वगळण्याचा अधिकार अनुवादकाला नाही असे मला वाटते.
हेच म्हणायचे आहे. म्हणूनच प्रश्न विचारला होता. :)
नेमकं काय झालंय?
सागर,
आपण एखादं पुस्तक खरेदी करताना,ऑर्डर देताना आपल्याला त्या पुस्तकाचं प्रकाशन गृह माहीत असतं. मग तुझ्याबाबतीत नेमकं काय झालंय? तू पुस्तक खरेदी करताना तुला मूळ पुस्तका विषयी माहीती नव्हती का? होती तर हे पुस्तक उचललंच कसं?
स्वराज्याची स्थापना 'वरदा बुक्स'चं आहे ना? मग त्याशिवायच कोणत्याही प्रकाशन गृहाचं हेच पुस्तक घेताना शंका नाही का आली? का हा संक्षेप प्रकार 'वरदा'वाल्यांनी केलाय? तुझ्या वरच्या लिखाणातून नेमकं काय झालंय कळत नाहीये. तसं नसेल तर तू हा प्रकार 'वरदा'वाल्यांना कळवू शकतोस. ते काहीतरी कारवाई नक्कीच करतील.
In reply to नेमकं काय झालंय? by मणिकर्णिका
वरदा बुक्सचेच आहे
मणि,
मी बरीचशी पुस्तके ऑनलाइन खरेदी करतो गं. त्यामुळे पुस्तक न बघताच घ्यावे लागते.
आता ठरवले आहे की पुण्याला अधून मधून येतो त्याच वेळी प्रत्यक्ष पुस्तक पाहूनच घ्यायचे. खास करुन जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या. :)
वरदा बुक्सनेच नाथमाधवांची 'स्वराज्य' मालिका पुन्हा छापून संक्षिप्त स्वरुपात आणली आहे. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार आहे हा. कोणाकडे तक्रार करणार? :)
आणि हा मुद्दा फक्त या एका पुस्तकापुरता नाहिये. तर मूळ मराठी साहित्यकृतीचा संक्षेप करण्यावर माझा जास्त आक्षेप आहे. वरील चर्चेवरुन लक्षात आलेच असेन तुझ्या आता.
हा धागा काढल्याचा उलट मला फायदाच झाला. संक्षेप झालेल्या अजून काही पुस्तकांची नावे कळाली जी मी नक्की घेणार होतो.
*** अशी संक्षेप झालेली पुस्तके मी विकत घेणार नाही... *** पैसे वाचले. :)
समाजाची गरज....!!
"...इंग्रजीकडे नजर टाकली तर असे दिसते की अशा संक्षिप्त केलेल्या पुस्तकांची देखील समाजाला गरज आहे...."
श्री.दिगन्भा यांच्या या मताशी सहमती व्यक्त करीत असताना हेही मी म्हणतो की, इंग्रजी साहित्यातील दिग्गजांच्या जगभर गाजत असलेल्या (शेकडो वर्षापासूनच्या...) कलाकृती समाजातील सर्वत थरातील वाचकांना समजाव्यात हा हेतू Abridged Version काढण्यामागे होताच पण त्याहीपेक्षा भारतातील विविध विद्यापीठातून 'क्रमिक' पुस्तकांतर्गत या कादंबर्या अभ्यासक्रमासाठी नेमस्त करताना त्यांच्या पूर्ण अवतारापेक्षा संक्षिप्त रूप देणेच आवश्यक आहे असे त्या काळातील शिक्षणतज्ज्ञांनी ठरविले होते. (अर्थात हे फक्त आपल्याच देशात झाले असे नसून इंग्रजी वाङ्मयाचे माहेरघर इंग्लंडमध्येच ही प्रथा त्याही अगोदर सुरू झालीच होती). त्या काळातील 'मॅट्रिक' च्या विद्यार्थ्याला वा एफ.वाय.च्या वर्गात शिकत असलेल्या कॉलेजकुमाराला चार्ल्स डिकन्सची जगभर गाजलेली 'अ टेल ऑफ टू सिटीज्' ही कादंबरी अभ्यासण्यासाठी ती पूर्ण रूपात देण्याचे काहीच कारण नव्हते, कारण ती पूर्णरूपात 'पचने' फारच कठीण काम होते (आजही हेच मत कायम आहे). पण अतिशय सुंदररित्या केलेले या कादंबरीचे Abridged version १०० मार्कासाठी म्हणून का होईना विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यासले आणि त्या दरम्यान सिडने कार्टन आणि चार्ल्स डार्नी या व्यक्तिरेखांच्या प्रेमातच ते पडल्याने तिथेच त्यानी मनी निश्चय केला की पुढील आयुष्यात वाचनाची आवड वाढवायची आणि डिकन्स पूर्ण रूपात वाचायचा. वाङ्मय वृद्धीसाठी इथे संक्षिप्त आवृत्तीचा चांगला उपयोग झाला असे म्हटले पाहिजे. हे का झाले? तर मूळ प्रकाशकांनी ज्यांच्याकडून ते संक्षिप्त रूप करवून घेतले ते देखील या क्षेत्रातील नावाजलेली मंडळीच होती.
अभ्यासक्रमासाठीबाबतचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी इंग्लंड आणि कित्येक युरोपिअन देशात अगदी सातवी आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना त्याच वयात 'ग्रेट क्लासिक्स' ची ओळख व्हावी यासाठी अशा अब्रिज्ड व्हर्शनचे महत्व वाढलेले होते असे प्रकाशनाचा इतिहास सांगतो. शाळा नव्हे तर आईवडीलच आपल्या पाल्यांना अशा कादंबर्यांची संक्षिप्त रूपे आणून देत आणि त्यांच्यासमवेत कथानकावर चर्चाही करत. मूळ कादंबर्यांतील काही प्रसंगी वाटणारी बोजड भाषा, द्विरूक्ती, पात्रांची गर्दी, क्रूरता, हिंसाचार तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री-पुरुष संदर्भातील वर्णने गाळून सुटसुटीत भाषा रचनेत आणली गेलेली ही संक्षिप्त रूपे मूळ कलाकृतीसारखीच तिथल्या समाजजीवनाचा हिस्सा बनली होती. 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, रॉबिन्स्न क्रुसो, ला मिझरेबल, ग्रेट एक्स्पेक्टेशन, सेन्स अॅन्ड सेन्सिबिलिटी, ऑलिव्हर ट्विस्ट्, टॉम सॉयर...' आदी आणि तत्सम कादंबर्या जितक्या थोरांच्यात लोकप्रिय झाल्या तितक्याच त्या बालचमूतही झाल्या आणि त्यातून निर्माण झाली त्यांच्यातील अधिक वाचनाची भूक...जी त्यानी पुढे युवा अवस्थेत पूर्ण केली...केली असणारच.
पण तसा प्रयोग इथे 'मराठी' भाषेत त्या दृष्टीने केलेला आहे का? हा खरा तर प्रश्न आहे. 'रीडर्स डायजेस्ट' सारखे मॅगेझिन इथे रूजू शकले नाही त्याला कारणही 'अभिजात साहित्य हे संक्षिप्त स्वरूपात द्यावे...' अशी वृत्ती ना लेखकात होती ना प्रकाशन संस्थेत.....त्यामुळे आता जो ट्रेन्ड इथे वसत आहे त्यामागील (सत्य....) कारणमीमांसा पाहिली पाहिजे असे वाटते. तरीही अशा संक्षिप्त आवृत्त्यामुळे जर आता शाळेत शिक्षण घेत असलेल्या नामा-गणा-तुक्याच्या मनात मूळ कादंबरी पूर्ण स्वरूपात आपण कधीतरी वाचली पाहिजे असा विचार डोकावला तरी संक्षिप्त आवृत्तीचे स्वागत करू.....पण असे होईल?
इन्द्रा