Submitted by प्रभाकर नानावटी on
सागर

प्रभाकरजी,

पुन्हा एकदा सोमवारी एका पुस्तकाची सुंदर ओळख करुन दिलीत.
हे पुस्तक मी देखील नक्की बघणार आहे. वाचणार हे तर नक्की, पण आवडल्यास घेईनच.

एका पुस्तकाची सुंदर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. :)

Mon, 14/02/2011 - 13:46 Permalink
चित्रा राजेन्द…

पुस्तक परिचय छान आहे.
वाचनाच्या अग्रक्रमाविषयीचे निरीक्षण पटणारे आहे. वाचनावाचून अडणारे जे वाचक असतात ते मात्र रोजच्या दिवसातला थोडातरी वेळ वाचनासाठी कोरून काढतातच. बस-रेल्वेमधील कोलाहल-गर्दी त्यांच्या आड येत नाही. आणि आन्हिकं उरकतानाची वेळसुध्दा ते साधण्यात ते पटाईत असतात.

Tue, 22/02/2011 - 22:19 Permalink

एका नव्या दमाचा लेखक म्हणून संजय पवार यांचे नाव साहित्य क्षेत्रात परिचित आहे. पानीकम भाग दोन हे पुस्तक संजय पवार यांनी जानेवारी 1996 ते डिसेंबर 1998 या तीन वर्षाच्या कालावधीत लिहिलेल्या स्फुट लेखनांचा संग्रह आहे. एके काळी 3-4 पानांचे लेख लिहिणारे अनेक लेखणीबहाद्दूर वृत्तपत्र व नियतकालिकांसाठी लिहित असत. परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात 'एवढे मोठ-मोठे लेख' वाचण्यासाठी जो निवांतपणा लागतो, तोच मुळात नसतो. आरामात सुट्टीच्या दिवशी वाचण्यासाठी काही वेळ राखून ठेवलेले असल्यास नेमके त्याच दिवशी, त्याच वेळी काही तातडीची कामं निघतात व आपल्या वाचनाला 'खो' बसतो. वाचन ही एकच अशी गोष्ट आहे की त्याला शेवटचा अग्रक्रम देता येतो. ते न केल्यामुळे कुणाचेही काहीही नुकसान होत नाही, असे वाटत असते. त्यामुळे वाचनाचा प्रथम बळी घेतला जातो. त्यामुळे 'जे काही सांगायचे ते थोडक्यात सांगा' अशी विनंती कराविशी वाटते. म्हणूनच कदाचित संजय पवार यांनी लेखनाचा हा बाज अंत्यंत आटोपशीर घेत लिहिल्यामुळे प्रत्येक स्फुट वाचताना मजा येते.

या तीन वर्षाच्या कालखंडात भाजप व शिवसेना युतीचे राज्य महाराष्ट्रात होते. ज्यांना या कालावधीतील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा कल्पना आहे त्यांना या पुस्तकातील लेख त्यांच्या स्मृतींना उजाळा देतील. तीन भागात विभागणी केलेले, सुमारे 150 स्फुट लेख असलेले, व त्याकाळच्या अत्यंत लहान सहान घडामोडीवरसुद्धा मल्लीनाथी करणारे हे लेख वाचताना आपण हरवून जातो.

सास्कृतिक विभागात प्रामुख्याने साहित्य, कला, नाटकं, चित्रपट, सभा, संमेलने, क्रीडा, समारंभ इत्यादी विषयावर त्या काळात घडलेल्या काही निवडक प्रासंगिक घटनांवर, कुणाच्या तरी वक्तव्यावर किंवा बातमींच्या आधारे लिहिलेले लेख आहेत. अनेक मान्यवरांच्या दुतोंडी वर्तनावर लेखक तोंडसुख घेतात. एनकेन प्रसिद्धीस हपापलेल्या राजकारण्यांच्या साहित्यविश्वातील लुडबुडीवर लेखक टीका करतात. बुजुर्ग कलाकारांच्या साहित्यबाह्य वर्तनसुद्धा लेखकाचे लक्ष्य झालेले आहे. क्रिकेटच्या अतिरेकावर टीका करताना खेळांचे विकेंद्रीकरण का होत नाही असा प्रश्न त्यांना पडतो. ग्लोबलायझेशनमुळे कलांचा कशा प्रकारे बाजारीकरण होत चालले आहे याची चिंता त्यांना वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रांतात कशा प्रकारे भेदभाव केला जातो याचे वर्णन ते करतात. युतीची शिवशाही कलेच्या प्रांतात कशा प्रकारे धुडगुस घालत होती याचे उदाहरणासकट स्पष्टीकरण देतात. दया पवारसारख्या संवेदनशील लेखकाला दलितांपुरताच मर्यादित ठेवण्याच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्त करतात. कॉंग्रेसी राजवटीवर टीका करत युतीची भाटगिरी करणार्‍या कलावंतांना युतीच्या काळ्याकुट्ट कामगिरीची आठवण करून देतात. ज्याची सत्ता येईल त्याचे जोडे चाटायचे ही परंपरा मराठी साहित्य सांस्कृतीक जगाला नवीन नाही याची त्यांना अशा वेळी आठवण येते. नाना पाटेकर यांनी नाट्यसंमेलनाच्यावेळी केलेल्या भाषणामुळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे मच्छर को शेर बनने का भ्रम हुआ है असे उद्गार काढले होते, याची आठवण लेखक करून देतात. अशा प्रकारे लेखकाची फटकेबाजी वाचत असताना एकीकडे हसूही येते व दुसरीकडे समाजाची कीवही कराविशी वाटते.

सामाजिक विभागातील लेखनातसुद्धा अशाच प्रकारे आपल्या समाजातील विसंगतींवर बोट ठेवतात. स्त्री - पुरुष भेद, पुरुषी अरेरावी, (केवळ बहुजन समाजातील!) मुलींचीसुद्धा मुंज करण्याचा सनातन्यांचा अट्टाहास, आकाशातील तार्‍यांना स्वत:चे नाव देण्यासाठी चाललेली चढाओढ, शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांचे इंडिया विरुद्घ भारतनंतर महिला विरुद्ध बाईचे राजकारण, मागास वर्गातील मुला-मुलींसाठी मळखाऊ शालेय गणवेश देण्याची शिवशाहीतील सुपीक कल्पना, महाराष्ट्रातील प्रत्येक थिएटरमधून वर्षातील 15 दिवस मराठी चित्रपट दाखवण्याची सक्ती, तरुणींनी आक्रमक होण्याची गरज, प्रत्येक गोष्टीचे समारंभ - सोहळा करण्याची हौस, गर्भाशय भाड्याने देण्याचा नवा धंदा, वर्गणीचे खंडणीत होत असलेले रूपांतर, अशा अनेक विषयावरील टीका टिप्पणी वाचताना नेहमीच्या प्रतिसादाव्यतिरिक्त चाकोरीबाहेर जात विचार करता येते, हे कळू लागते. एक- दोन लेखात गणपतीबाप्पाचा उंदिराबरोबरचा संवाद वाचताना येस मिनिस्टर या मालिकेची आठवण येते. खरे पाहता संजय पवार या दोन पात्राभोवती भरपूर काही नक्कीच लिहू शकतील. शिवशाहीच्या घराणेशाही विषयी ते तोंडसुख घेतात. दलितांवरील हल्ल्यासंबंधी लिहिताना दलित भडवे फार माजलेत हे नेहमीचे पालुपद ऐकू येत असते. खरोखरच माजण्यासारखं दलितांकडे आहे तरी काय असा प्रश्न लेखक विचारतात. दलितांसकट सर्वांचा अस्तित्वाचा लढा किती तीव्र होत आहे याचा इशारा लेखक देऊ इच्छितात. तथाकथित हिंदूंच्या भोंदूपणावरचे लेखही अत्यंत वाचनीय आहेत.

पुस्तकातील अर्धा अधिक भाग राजकीय क्षेत्रातील स्फुट लेखनांसाठी खर्ची घातला आहे. लाच, वशिलेबाजी, गुंडगिरी, किकबॅक, प्रलोभन, यांचे एक स्वतंत्र शास्त्र बनलेले ते दिवस होते (व आजही आहे!)असे या विभागातील लेख वाचतांना वाटू लागते. युतीच्या दृष्टीने सर्व गोष्टींचे भगवीकरण होण्याचा तो काळ होता. भगवे करंडक, भगवी प्रशस्तीपत्र, टॅक्सी, रिक्षा भगव्या रंगाच्या, शाळा कार्यालयांच्या इमारतींचा रंग भगवा, असे युतीचे स्वप्न होते. शिवसेना प्रमुख, अविनाश धर्माधिकारी, प्रि. मनोहरपंत जोशी, गोपीनाथ मुंडे, भाजपचे चिंतन शिबिर, राष्ट्रवाद व नीतीमत्तेचे सक्तीचे शिक्षण, मंगेशकर घराणेशाही, राष्ट्रीय पक्षांची संपलेली विश्वासार्‍हता, राजकारण्यांच 'स्वत:चा व्यक्तीविकास हाच राष्ट्रविकास' याचे पालन, अडवाणींची रथयात्रा, स्वयंरोजगारासाठी 48 तासात पाच लाखाची (हवेत विरलेली!) घोषणा, झुणका भाकर योजनेचा बोजवारा, शिवशाहीतील लॉटरीबंदी गुटखाबंदीचा फुसका बार, अशा अनेक विषयावरची मल्लीनाथी वाचताना असाही एक काळ होता याचे आश्चर्य वाटू लागते. या लोकांच्या हातात पुन्हा एकदा राज्य आलं तर काय होईल याची धास्ती वाटू लागते.

जुन्या घट्ट चौकटी मोडून टाकण्याच्या संजय पवार यांचा हा प्रयत्न एका नवीन आविष्काराला जन्म घातला आहे. पुस्तकातील लेख वाचताना आपण नकळत अंतर्मुख होतो, यातच या पुस्तकाचे यश आहे.

पानीकम: भाग दोन
संजय पवार
'नवता' प्रकाशन, मुंबई (2010)
मूल्य: 300 रु, पा: 328