Submitted by प्रभाकर नानावटी on
यशोधरा

हल्लीच वाचलं हे पुस्तक. एक ३-४ दिवसांपूर्वीच संपवलं. अफाट आहे. ज्या परिस्थितीतून मुक्तांगण उभं राहिलं, ज्या ज्या कटकटी म्हणा, अडचणी म्हणा - त्यातून गेलं, आणि दर वेळी अवचट कुटुंबियांनी आणि मुक्तांगण परिवारानं जी शिवधनुष्यं पेलली त्या संबंधी वाचताना खूप भरुन येतं. निदान मला तरी खूप अफाट वाटलं सारंच. साध्या, सोप्या शब्दांत अवचटांनी सारं सांगितलं आहे. सुनंदा अवचटांविषयी, त्यांच्या व्यक्तीमत्वाविषयी पुस्तक वाचताना जे वाटतं, ते शब्दांच्या पलिकडलं!

पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद.

Mon, 24/01/2011 - 11:50 Permalink
आनंदयात्री

उत्तम परिचय. मुक्तांगण आणि पुलंची गोष्ट एकुन माहिती होती, बाकी पण वाचायला आवडेल. धन्यवाद.

Mon, 24/01/2011 - 19:22 Permalink
ऋषिकेश

पुस्तकाबद्दल अजून एका परिचिताकडून बरेच औकून आहे. ग्रंथालयात बरेच दिवस रिझर्व केल्यानंतर पुस्तक मागे हातात आलं होतं आणि काहि कौटुंबिक कारणांमुळे न वाचताच परत करायची तारीख आली होती. :(
आता पुन्हा एकदा नेटाने पुस्तक मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे.
परिचय आवडला

Mon, 24/01/2011 - 21:15 Permalink

व्यसने किं दरिद्रता" या उक्तीप्रमाणे आपल्या येथे व्यसनांना अजिबात तोटा नाही. काही व्यसनं त्या त्या व्यक्तीपुरते मर्यादित असतात. फार फार तर ती व्यक्ती व्यसनाचे दुष्परिणाम भोगते व काही काळानंतर मृत्यु ओढवून घेते. परंतु दारू, अफू, गांजा, चरस, इ.इ. सारख्या मादकपदार्थांची व्यसनं व्यक्तीलाच नव्हे तर त्याचे कुटुंब, भोवतीचा समाज व देशालाही घातक ठरू शकतात. आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरून उठून गेल्यामुळे कुटुंब उध्वस्त होते. मुलं पोरकी होतात. गर्दुल्याचा पोरगा म्हणून हिणवल्यामुळे मुलं कोमेजतात व तेही व्यसनाच्या आधीन होतात. हे चक्र असेच चालू राहते. ऐन तारुण्यात काही क्षणिक मौजमजेखातिर अशा पदार्थांचे सेवन केले जाते. परंतु त्याचे केव्हा व्यसनात रूपांतर होते याचा पत्तासुद्धा लागत नाही. व जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. दारूच्या बाबतीत प्रथम सोशल ड्रिंकर, नंतर प्लॅनड ड्रिंकर, त्यानंतरची स्टेज हॅबिच्युअल ड्रिंकरची व शेवटी अ‍ॅडिक्टची अशा अवस्थेतून हे व्यसन जात असते. शासनाच्या अगतिकतेमुळे वा नाकर्तेपणामुळे अशा मादकपदार्थांची उपलब्धता वाढतच चालली आहे. मादक पदार्थांच्या उत्पादन, पुरवठा व विक्रीच्या व्यवहारात करोडो रुपयांची उलाढाल होते. या व्यवहारात अनेक जण आपली पोळी भाजून घेत असल्यामुळे लाखो तरुण-तरुणींचे बळी जातात. बळी पडलेल्या तरुण-तरुणींच्या कुटुंबियांचे हाल बघवत नाहीत. म्हणूनच समाजातील काही समंजस व संवेदनशील व्यक्ती पुढाकार घेऊन व्यसनाधीनतेबद्दल काही उपाय करता येतील का याच्या प्रयत्नात असतात. या व्यक्ती मग प्रयत्नांची शिकस्त करून जीवाचे रान करत व्यसनमुक्तीसाठी एखादी संस्था उभी करतात. अशाच एका संस्थेच्या वाटचालीचा आढावा म्हणजेच डॉ. अनिल अवचट यानी शब्दबद्ध केलेली ’मुक्तांगणची गोष्ट' हे पुस्तक.

मुळात अशा प्रकारची व्यसनाधीनता मानसिक आजाराच्या प्रकारात मोडते, असे तज्ञांचे मत आहे. बाहेरून अशा व्यक्ती नॉर्मल वाटत असले तरी आतून ते पोखरलेले असतात. त्यांच्यावर वेळीच उपचार व व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेत राहिल्यास ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात, असे अभ्यासांती सिद्ध झालेले आहे. कुठलेही अंगार, धूप, ताइत, बाबा-बुवा, नवस इत्यादीमुळे रुग्ण कधीच बरा होणार नाही. तसेच पाश्चिमात्य देशासारखी मानस तज्ञांच्या देखरेखीखाली केलेल्या महागड्या औषधोपचारांचा माराही आपल्यासारख्या देशांना परवडणार नाही. मुळातच आपल्या देशात प्रशिक्षित मानस तज्ञ व/वा मनोविकारतज्ञांची संख्या तुलनेने फारच कमी. म्हणूनच या क्षेत्रातील काही तज्ञ आपल्या इतर सहकार्‍यांच्या मदतीतून व स्वयंसेवकांच्या सहभागातून अशा संस्था आजकाल उभ्या करत आहेत. डॉ. अनिल व डॉ. सुनंदा अवचट या पती-पत्नींच्या अथक परिश्रमातून नावारूपास आलेले व महाराष्ट्रातील काही मोजक्या संस्थामध्ये अत्यंत नावाजलेले मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र गेली 25 वर्षे कार्य करत आहे. अनिल अवचट यांनी आपल्या खुमासदार लेखनशैलीतून या संस्थेची जन्मकथा फार सुरेखपणे सांगितलेली आहे.

या पती-पत्नींच्या ओळखीच्या एका मैत्रिणीचा मुलगा ड्रग्सच्या विळख्यात अडकला होता. त्याला त्यातून बाहेर काढण्याच्या निमित्ताने एखादे डी-अ‍ॅडिक्शन केंद्र असावे ही कल्पना सुचली. डॉ. अनिल अवचट यांनी याविषयीची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मुंबईच्या के.इ.एम हॉस्पिटलला भेट दिली. आनंद नाडकर्णीच्या सायकियाट्री डिपार्टमेंटमध्ये काही गोष्टी शिकले. त्यांच्या पेशंटच्या घरी गेले. अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमसच्या सभेत जाऊ लागले. सोबर, सोब्रायटी, ऑब्सेशन, स्लिप, रिलॅप्स, शेअर, फालोअप अशा शब्दांचा संग्रह वाढू लागला. या सर्व अनुभवावरून त्यानी एक लेखमाला लिहिली. त्याचेच पुढे गर्द या पुस्तकात रूपांतर झाले. गर्दमधील लेख वाचून पु.ल. देशपांडे पती-पत्नी अस्वस्थ झाले." अशा मुलांसाठी काही तरी करा तुम्ही. आता एक लाख द्यायचे ठरलेय. पण आम्ही पैशाला कमी पडू देणार नाही" मुळात म्हणावी तशी संस्था नाही. कामाचा पत्ता नाही. तरीसुद्धा काटेकोरपणासाठी ख्याती असलेले पुलं दांपत्य असा एखादा प्रस्ताव मांडू शकते, यावर अनिलचा विश्वास बसेना. परंतु सुनंदा मात्र व्यसनग्रस्त सायकोसिस रुग्णांच्याबाबतीत काही तरी करता येईल या विचाराची होती. मनोरुग्णांसाठी सरकारी दवाखाना आहे. परंतु बाहेरून चार चौघासारख्या दिसणार्‍या या सायकोसिस रोग्यांसाठी कुठलीही उपचारव्यवस्था नसल्यामुळे तिला त्यांचे हाल बघवत नव्हते. म्हणून या पती-पत्नींनी (जास्त करून सुनंदानेच!) पुढाकार घेतला व 'मुक्तांगण' चे नामकरण झाले. सुनंदा जेथे काम करत होती त्या मेंटल हॉस्पिटलच्या आवारातच व्यसनमुक्ती केंद्राने बाळसे धरले. पुढे काही वर्षापर्यंत पुलं फौंडेशननी इथला खर्चाचा आर्थिक भार सांभाळला.

हे पुस्तक वाचताना आपण एका वेगळ्या जगात जातो. असेही काही घडू शकते याचे सखेदाश्चर्य वाटू लागते. समाजात असल्या समस्या असू शकतात, हे आपल्याला कळू लागते. एखादी संस्था चालविणे म्हणजे काय दिव्य असू शकते, कशा प्रकारच्या अडचणी येतात, साधी गोष्टसुद्धा समस्या म्हणून कशी उभी राहते, हेही आपल्याला कळू लागते. कित्येक प्रकारचे पेशंट्स आपल्याला येथे भेटतात. महादेव घारे, मनोहर, अंबरनाथचा दत्ता, ड्रग रॅकेटमधला नायर, कद्री, अशोक वैद्य, सनई वाजविणारा वाजंत्री-न्हावी मित्र, बाबा शेख, द्विजेन स्मार्त, बंधू, मुधोळकर... असे शेकडो पेशंट्स, एकापेक्षा एक नग, प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य. लेखकाने लिहिलेल्या या पेशंट्ससंबंधीच्या प्रसंगाबद्दल वाचताना एकीकडे गंमतही वाटते व दुसरीकडे अशी परिस्थिती त्यांच्यावर का आली याबद्दल हळहळ वाटू लागते.

मुक्तांगण केंद्र हे नाव ऐकले की धो धो पैसा आला वा पुण्यातील श्रीमंत देणगी देण्यासाठी रांगेत उभे राहिले किंवा पुल वा डॉ. अवचट हे नाव ऐकून सरकारी ग्रँट मिळू लागले, असले कुठलेही चमत्कार या संस्थेच्याबाबतीत घडले नाहीत. एकीकडे कॅन्सरग्रस्त सुनंदा पेशंट्सकडून शिकत शिकतच त्यांना बरे होण्यासाठी मदत करत होती व दुसरीकडे अनिल अवचट शासन दरबारी उंबरठे घासत होते. एकच समाधानाची गोष्ट म्हणजे अवचट यांना सरकार दरबारीसुद्धा चांगली माणसं भेटली. डॉ. अवचट यांना नेहमीच चांगली माणसं कसे काय सापडतात हे एक गौडबंगालच आहे. अपवाद म्हणून शिंदे या माणसानी या संस्थेच्या कामात खो घालण्याचा प्रयत्न केला. ती हकीकतसुद्धा वाचण्यालायक आहे. त्याकाळच्या सरकारी यंत्रणेचे "झीरो बजेट" यांच्या ग्रँटच्या मंजूरीत आडवे आले. अशा कटू प्रसंगी ते "सामाजिक काम करतोस काय? मग तुला शिक्षा हवीच" अशी स्वत:च्या मनाची समजूत घालून घेत होते. ही शिक्षासुद्धा कामाचा भाग व्हायचा. मुळात अवचट पती-पत्नी सरकारी काम करून घेण्यासाठी पैसे चारत नव्हते हा त्यांचा उद्धटपणा होता. त्यामुळे यांचे काम 'नियमा'त बसत नव्हते. ही सरकारी यंत्रणा इतकी निर्लज्ज व निर्विकार की त्याला कशाचीही चाड नव्हती. सर्व संबंधितांची लेखी परवानगी घेऊनसुद्धा मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील या केंद्राचे थकलेले भाडे म्हणून तिथल्या पीडब्ल्यूडी ऑफिसरने 25 लाख रुपये भरण्याची नोटीस पाठवली होती. यांचे धाबे दणाणले. शेवटी शरद पवारांच्या सांगण्यावरून हे प्रकरण मिटले. कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी कागदी घोडे नाचवावे लागत होते. इतक्या कागदपत्रांची खरोखरच गरज असते का हा प्रश्न लेखकासमोर होता. काम न करणारे मात्र कागदपत्रं तत्परतेने पुरवणारे असतात. त्यांची कामे बिनबोभाट होतात. आणि ते सरकारी यंत्रणेला चालते.

इतर सरकारी यंत्रणेबरोबर या संस्थेचा पोलीसखात्याशीसुद्धा संबंध यायचा. कारण त्यांच्या मते ड्रग्सचे व्यसन असलेले सर्वजण नेहमीच गुन्हेगार व या गुन्हेगारांवर पाळत ठेवणारी ही दक्ष पोलीसयंत्रणा. एखादा जरी अ‍ॅडिक्ट बरा होऊन गुन्हेगारी जग सोडण्याचा प्रयत्न करत असल्यास ड्रग सप्लायर्स व पेडलर्सचा धंदा बुडतो व पोलीसांनाही हप्ता न मिळाल्यामुळे नुकसान सोसावे लागत होते. म्हणूनच नको ते आरोप ठेवत त्यांचे ते हाल करत असत. कोर्टकचेरी करायला भाग पाडत असत. याही गोष्टींचा अवचट यांना चांगलाच अनुभव आला. पोलीस शाखेतही (अपवादाने का होईना!) काही चांगले अधिकारी होते म्हणून लेखकाचे निभावले. गंमत म्हणजे या खात्यातसुद्धा अशा व्यसनांच्या आहारी गेलेले अनेक रुग्ण यांच्या केंद्रातून बरे होऊन सामान्य जीवन जगत आहेत.

मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील हे केंद्र सुनंदा असेपर्यंत चांगल्या प्रकारे चालले होते. परंतु नंतर मात्र या संस्थेला अनेक कटकटींना सामोरे जावे लागले. म्हणून स्वत:च्या मालकीच्या जागेत केंद्र उभे करण्यासाठी धडपडावे लागले. काही हितैषींच्या सहाय्यातून व सरकारच्या मदतीतून या केंद्राला आधीच्या केंद्राजवळच नवीन देखणी अशी एक इमारत मिळाली.

मुक्तांगण व डॉ. सुनंदा यांना आपण वेगवेगळे करू शकत नाही, याची प्रचीती पुस्तक वाचत असताना जाणवू लागते. ज्या तडफेने, उत्साहाने तिने हे केंद्र उभे केले, त्याला आकार दिला, शेकडो रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबियांचे अक्षरश: पुनर्वसन करू शकली, त्यांना जगण्यास उभारी दिली याला शब्द अपुरे पडतात. डॉ. सुनंदाच्या मृत्युनंतर क्लिनिकल सायकालॉजीत एम ए केलेल्या मुक्ता ही तिची मुलगी आवडीने, निष्ठेने व समर्थपणे या संस्थेची धुरा संभाळत आहे. सुनंदाने या संस्थेत दाखल झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबविले. तिच्या मृत्युपश्चातही ते उपक्रम अजूनही रुग्णांना व्यसनमुक्त करू शकतात. या केंद्रानी राबविलेले उपक्रम एका प्रकारे थेरपीच आहेत. अ‍ॅड्मिट झालेला रुग्ण 35 दिवस येथे असतो. परंतु या कालावधीत त्याला संस्थेचा, संस्थेतील सहकार्‍यांचा लळाच लागतो. रुग्ण कितीही मोठा, श्रीमंत वा उच्चशिक्षित असला तरी भांडी घासण्यापासून जमेल ती काम करू लागतो व या प्रक्रियेमधून जात असताना त्याचे व्यसनही हळू हळू सुटू लागते. त्याचबरोबर आपण एक माणूस म्हणून जगू शकतो याची जाणीवही होऊ लागते.

गेल्या 25 वर्षात या संस्थेनी अठरा हजार पेशंट मित्रांना बरे होण्यासाठी मदत केली आहे. पूर्ण बरे झालेले बारा हजार मित्र आहेत. सुरुवातीला 20-30 रुग्णावर उपचार करण्याची सुविधा असलेल्या या संस्थेकडे आज 150 रुग्णावर उपचार करण्याइतका आत्मविश्वास व सोई सुविधा आहेत. पुण्याबाहेरही फालोअपसाठी ठिकठिकाणी कौन्सिलिंग सेंटर्स आहेत. येथे बरे झालेले पेशंट्सच कौन्सिलिंग करतात. तेच कार्यकर्ते होतात. खरे पाहता अशा प्रकारची केंद्रं असण्याची आवश्यकताच समाजाला भासता कामा नये. परंतु जोपर्यंत व्यसनांना प्रतिष्ठा मिळते, दारू पिणे वा पाजणे शिष्टाचार होतात तोपर्यंत व्यसनाचे बळी वाढतच जाणार आहेत. व्यसनग्रस्तांचे पालक, उध्वस्त बायको, कोमेजलेली पोरं, यांच्यासाठी का होईना, अशी केंद्रं हवीतच असे नाइलाजाने म्हणावे लागते. डॉ. अनिल अवचट यानी मुक्तांगणची गोष्ट लिहून आपल्या समाजातील व्यथेला मोकळी वाट करून दिलेली आहे.

'मुक्तांगणची गोष्ट'
डॉ. अनिल अवचट,
समकालीन प्रकाशन (2010)
किं: रु 200, पृ.सं:173