Submitted by वल्ली on
ऋषिकेश

वेगळ्याच पुस्तकाचा छान परिचय करून दिला आहे. आता पुस्तक दुर्मिळ असल्यास / प्रताधिकार काळ संपला असल्यास हे स्क्यान करता येईल का?

Mon, 17/01/2011 - 11:17 Permalink

लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी प्रताधिकार संपुष्टात येतो असे इथेच पुर्वी झालेल्या चर्चेत समजले होते. इथे त्यासाठी निदान ४८ वर्षे तरी प्रताधिकार सुरक्षित राहीलच.
अर्थात प्रकाशक व लेखकाच्या कुटुंबियांची परवानगी घेउन पुस्तक कदाचित स्कॅन करता येउ शकते. पण ही वेळ कदाचित न यावी.
कारण गोनीदांची बहुतेक पुस्तके त्यांची कन्या सौ. वीणा देव परत प्रकाशित करत आहेतच. यात हे पुस्तकही नजीकच्या भविष्यात येउ शकते.

Mon, 17/01/2011 - 11:26 Permalink
सागर

लवकरच हेही पुस्तक प्रकाशित होईल असा मलाही विश्वास वाटतोय.
अलिकडेच गोनीदांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत तेव्हा हे देखील व्हावे.

पुस्तकाचा परिचय छोटासा पण अतिशय सुरेख आहे वल्ली.
पुस्तककोड्यातील वेचा पाहून पुस्तक वाचायचे ठरवले होतेच पण आता तुझा हा परिचय वाचून लवकरात लवकर हे पुस्तक वाचेन :)

ढाकचा बहिरी हा ट्रेक खूप प्रसिद्ध आहे त्याचे कारणही मित्रा तू दिलेले आहेसच. सरळ अडीच हजार फूट खोल तुटलेल्या कड्यातून वाट. गुहेत १ रात्र घालवल्यावर ट्रेकिंगची मजा करायला आलेल्यांना एक वेगळा अनुभव मिळतो आणि जुन्या काळात व आजच्या काळातही तिथले लोक कसे त्या परिसरात वावरतात या कल्पनेने अंगावर काटा येतो.

सुंदर परिचय :)

Mon, 17/01/2011 - 12:05 Permalink
आनंदयात्री

वाह. छान परिचय आहे.
ढाकचा बहिरी आजवर फक्त ट्रेकसाठीच माहिती होता.

Thu, 20/01/2011 - 07:35 Permalink

गडदेचा बहिरी ही ढाकच्या कड्यात असलेल्या बहिरीच्या गुहेत चालणार्‍या पशुहत्येविरुद्ध चाललेल्या संघर्षाची कहाणी.
राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या उढेवाडीतला खंडबा उंबरे कीर्तनाच्या ओढीने मळवलीतील एक जेष्ठ कीर्तनकार बुवांना कीर्तनासाठी उढेवाडीत आमंत्रण देतो. बुवा उढेवाडीत येउन कीर्तन करतात. राजमाचीचा राहाळ बघून बुवा हरिखतात. खंडबा बुवांना राजमाचीपासून पुढे असणार्‍या ढाक गडावर घेउन जातो. तिथे ढाकच्या हवालदाराकडे असलेले शिवाजी महारांजांचे अस्सल पत्र बुवा बघतात. त्यात ढाकच्या कड्यातील गुहेचा (गडदेचा) व त्यातील बहिरी देवाचा उल्लेख पाहून बुवांची गुहा बघण्याची इच्छा जागृत होते. कड्याच्या मध्यभागी एका अत्यंत अवघड जागच्या त्या गुहेत बुवा खंडबाच्या मदतीने पोहोचतात. बहिरीचे दर्शन घेतात तोच शेजारी त्यांना रक्ताळलेला धोंडा दिसतो. गुहेतील पाण्याच्या टाक्यांमध्ये असलेल्या साक्षात शिवाजी महराजांनी दिलेल्या भांड्याचा वापर आजूबाजूचे गांवकरी बहिरीला बळी देउन बरबटं शिजवण्यासाठी करतात हे पाहून बुवांचे मन विषण्ण होते व सुरुवात होते एका संघर्षाला.
राहाळाच्या परिसरात कीर्तन करून बुवा जनजागृती करतात. देवरुशाच्या पोटावरच पाय येतो. देवरुशाचा विरोध व बुवांच्या संघर्ष एका सामाजिक जाणिवेचा वेध घेतो. आजूबाजूचे गांवकरीही बुवांकडून सामील होतात. गडदेचा बहिरीला बारा मावळांतील पाण्याने अभिषेक करायचे ठरते. मुंबईहून मुकुंद गोंधळेकरांची मदत होते. अगदी काशीवरूनही जलकुंभ आणले जातात. देवरुशा हे उधळायचे ठरवतो. फणसराईतील नरशाला अनिष्टाची भिती दाखवून कोकरू बळी द्यायला प्रवृत्त करतो. इकडे बुवा गडदेतील धोंडा पवित्र जलकुंभांच्या अभिषेकाने धुवून काढतात. अशातच नरशा कोकरू घेउन मुलाणी व देवरुशासह गडदेत पोहोचतात. पुढे काय होते? प्रत्यक्ष पुस्तकच वाचा.
गोनीदांचे अत्यंत रसाळ शैलीतील हे पुस्तक आहे मात्र दुर्मिळ. आवृत्ती संपल्याने ते कुठेही मिळत नाही. अत्यंत साधी सरळ भाषा. राहाळाचे सुरेख वर्णन. गडदेचा बहिरी ही किती अवघड चीज आहे ते प्रत्यक्ष ढाकच्या गुहेत गेलेल्यांनाच कळेल. उभ्या कड्यातील गुहा. खाली २५०० फुटाचा सरळ तुटलेला कडा. गुहेत जायचे तेच मुळी पावलांएव्हढ्या खोबण्या चढून व पुढे वेलाचा आधार घेउन. अजूनही एव्हढी दुर्गम वाट चढून गांवकरी तिथे पाठीवर कोकरू, कोंबडं घेउन जातातच. एकापरीने बुवांचा संघर्ष अजूनही सुरुच आहे.