बेगम अख्तर, मजाज, पारुल घोष, तलत महमूद.....
![]() |
गीत व संगीत आपल्या जगण्याचे अविभाज्य अंग आहेत. कुठलं गाणं का आवडतं हे सांगता येत नसले तरी कुठली ना कुठली गाणी किंवा एखादी धुन कुठेतरी मनात पक्की गाठ बांधून बसलेली असते. गाणं आठवलं वा त्याचे स्वर कानी पडले की आठवणी उसळून येतात. आपण पुन्हा एकदा त्या काळात हरवून जातो. अशाच प्रकारे स्वातंत्र्य पूर्व काळातील पंधरा-वीस वर्षे व स्वातंत्र्योत्तर पंधरा-वीस वर्षे असे 30-40 वर्षाच्या कालखंडातील हिंदी चित्रपटातील अवीट गोडीच्या गाण्यांच्या दुनियेत, गाण्यांना संगीत देणार्या संगीतकारांच्या आठवणीत व ही अजरामर गाणी शब्दबद्ध करणार्या गीतकारांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यासाठी गीतयात्री या पुस्तकाचे लेखक माधव मोहोळकर वाचकांना हिंडून फिरवून आणतात.
आताच्या चित्रपटातील गाण्याचे शब्द ऐकल्यानंतर या हिंदी चित्रपटगीतांना सवंग, छचोर, अर्थहीन, उथळ, असभ्य म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही असेच वाटते. परंतु माधव मोहोळकरांनी त्याकाळातील चित्रपटगीतांना वांङ्मयीन मूल्य होते व त्यांच्यावर ललित लेखन करता येऊ शकते हे या पुस्तकाद्वारे सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे. विषय तद्दन फिल्मी असला तरी लेखन वांङ्मयीन दर्जाचे हवे यावर भर दिल्यामुळे लेखकानी या पुस्तकातील लेखासाठी घेतलेल्या परिश्रमाला दाद द्याविशी वाटते. लेखकानीच म्हटल्याप्रमाणे अशा लेखनासाठी मोठ्या प्रमाणात संदर्भ ग्रंथ वा इतर साहित्य हवेत. परंतु चित्रपटातील गीत - संगीतांची दखल काव्य समीक्षकांनी अथवा संगीत समीक्षकांनी कधीच गंभीरपणे घेतली नाही. त्यामुळे संदर्भ ग्रंथ उपलब्ध असण्याचा प्रश्नच नव्हता. हे लेख लिहिताना मुख्यत्वेकरून लहानपणी ऐकलेल्या गाण्यांच्या आठवणी, मित्राकडचे ग्रामोफोन रेकॉर्ड्स व रेडियोवरील गाणे यावर लेखकाला विसंबून राहावे लागले. त्याकाळी टेपरेकॉर्डर्स नव्हत्या. रेडियोसुद्धा फक्त श्रीमंतांकडे. तरीसुद्धा लेखकानी खटाटोप करून दर्दी मित्रांच्या संग्रहातून आठवणीना उजाळा देत आपल्यासमोर चित्रपट गीतांच्या आठवणींचा एक चित्रपटसंगीत विश्व उभे केले आहे.
मुळात हिंदी चित्रपट गाण्यांचे ढोबळपणे लतापूर्व कारकीर्द व लताची कारकीर्द असे दोन भाग करायला हवीत, अशी स्थिती आहे. कारण लताची गाणी येऊ लागल्यानंतर काही तुरळक अपवाद वगळता चित्रपटाच्या संगीतक्षेत्रात इतर कुठलीही स्त्रीगायिका पाय रोऊन उभी राहू शकली नाही, हे मान्य करायला हवे. बेभरवश्याच्या हे चित्रपटक्षेत्र कुणाला हात देईल व कुणाला आपटेल हे कधीच सांगता येत नाही. 'आराधना' पूर्वी किशोरकुमार गात होता. परंतु 'आराधना'नंतरची काही वर्षे त्याच्या गाण्याशिवाय दुसर्या कुणाचेही गाणे चित्रपट रसिकांना आवडेनासे झाले. असे का होते याचे कुठलेही ठोकताळे नाहीत. माधव मोहोळकर मात्र आपल्यासमोर लतापूर्वीचा संगीत काळ उभे करतात व त्यांच्या दृष्टीने तो हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ होता.
लेखकानी उभे केलेल्या या जमान्यात जगमोहन, खान मस्ताना, जी.एम. दुराणी, मास्टर निसार, सुरेंद्र, सैगल, तलत महमूद, रफी, किशोर कुमार, राजकुमारी, नूरजहान, उमादेवी (टुणटुण), गीता दत्त, ज्युथिका रॉय, मुबारक बेगम, बेगम अख्तर (अख्तरी फैजाबादी), लता, आशा, अशा गाण्याच्या जगातील मातब्बर मोहरे आहेत; शैलेंद्र, साहिर लुधियानवी, शकील बदायुनी, राजा मेहदी अली खान, मजाज, फैज अहमद फैज, सर्दार जाफ्री, इ.इ. एकापेक्षा एक असे सरस गीतकार आहेत; व गीत -संगीतांच्या खाणीतील रत्नांना पैलू पाडणारे नौशाद, खैय्याम, शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल विश्वास, के दत्ता, रवी, सी रामचंद्र, कमल दासगुप्ता, सज्जाद हुसेन, हुस्नलाल भगतराम, इत्यादी संगीत रचनाकारही आहेत. एवढा मोठा भव्य पट असूनसुद्धा लेखक मात्र यातील निवडक अशा आठ रत्नाभोवती फार सुंदर शब्दचित्र उभे करतात. पारुल घोष, नूरजहान, गीता दत्त व बेगम अख्तर या गायिका, तलत महमूद हा गायक, मजाज, साहिर व शैलेंद्र हे गीतकार यांच्या भोवतीच्या विश्वातूनच आपल्याला इतरांचा परिचय होतो. त्यांच्या सर्जनशीलतेतील बारकावे उलगडतात.
संगीतकारांची संगीत योजना, गाणार्यांनी जीव ओतून गायलेली गाणी, व या गाण्यांना, चालीना व चित्रीकरण होत असलेल्या दृश्यांना न्याय देणार्या गीतकारांची शब्दरचना याबद्दलचे वर्णन आपण पुस्तक वाचताना वा पुस्तकात ठिकठिकाणी उल्लेख केलेली गाणी ऐकताना हे सर्व किती थोर होते हे लक्षात राहते. अफसाना लिख रही हूँ, दिले बेकरार का... अशी गाणारी उमादेवी, ये रात फिर न आयेगी, जवानी बीत जायेगी... म्हणणारी राजकुमारी, रोऊँ मै सागर किनारे... वा प्रीतम आन मिलो.. अशी आर्त साद घालणारा सी एच आत्मा, सैगलचा हुबेहूब आवाज काढणारा चंद्रू आत्मा इत्यादी गायक-गायिकाबद्दल लेखक भारावून लिहितात. ऐ मोहब्बत, तेरे अंजाम पे रोना आया... ही गझल गाणारी अख्तरी फैजाबादी (बेगम अख्तर) बद्दलचा लेख वाचताना आपण भान विसरतो. लेख म्हणजे केवळ गाण्यांची जंत्री नसून तिने जगलेला तो काळ, तिच्या आयुष्यातील चढ उतार, तिची गझल गायकी, तिची ठुमरी, दादरा, चैती, कजरी वगैरे गायन प्रकार सादर करताना दिसणारी प्रतिभा आपल्या सदैव लक्षात राहते.
तलत महमूदने गायिलेल्या मजाज यांच्या ए ग़मे दिल क्या करूँ... ऐ दहशते दिल क्या करूँ... या गाण्यामुळे लेखक मजाजच्या कवितांच्या प्रेमात पडले. प्रेमामध्ये ज्यांच्या वाट्याला फक्त दु:खच आलं अशा अगणित कवींपैकी मजाजही एक होता. तो मुळातच भावनाप्रधान कवी होता. एक काळ असा होता की अलीगढ़च्या गर्ल्स कॉलेजच्या मुली चिठ्या टाकून मजाज कुणाच्या वाटेला येतो ते पाहायच्या, त्याच्या कविता उशाखाली ठेवून आसवांनी उशा भिजवायच्या. मजाजच्या कवितेत पुरोगामी विचार होते. परंतु त्यात प्रचारकी थाट नव्हता. ती एक वैयक्तिक अनुभूती होती. मजाजचा प्रेमभंग झाला. त्याचा मानसिक तोल ढळल्यामुळे दारूच्या नशेत बुडाला. दोनदा वेडाचा झटका आला व त्यातच त्याचा अंत झाला.
हमको हैं प्यारी हमारी गलियाँ...हमारी गलियाँ.... असे स्वप्नाळू आवाजात गाणारी पारुल घोष बासरीवादक पन्नालाल घोष यांची पत्नी आणि संगीतकार अनिल विश्वासची धाकटी बहिण. हिच्या गाण्यावर फिदा झालेल्या लताला पार्श्वगायन काय असतं ते समजलं. आणि मग पारुल तिची आवडती गायिका बनली. लता स्वत: पारुलच्या ऋणाचा उल्लेख करायला कधी विसरली नाही. त्या काळात गाणी मुद्दाम लोकप्रिय करण्याची प्रथा नव्हती. कानावर सतत आदळली म्हणून लोकप्रिय झाली असे म्हणण्याची सोय नव्हती. जी गाणी मनात रेंगाळत होती ती त्यांच्यातील अंगभूत गुणामुळं. म्हणूनच आजही पारुलची गाणी मनाला चटका लावू शकतात. नंतरच्या काळात लताचा स्वर उमटत राहिला नि बाकीचे आवाज हळू हळू विरून गेले. त्याचप्रमाणे पारुलचा आवाजही!
सुरुवातीच्या काळात तलत महमूद पार्श्वगायक म्हणून नव्हे तर गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होता. त्याला त्या काळी प्रती सैगल म्हणूनच ओळखत होते. तलत अगदी लहानपणापासूनच सैगलचा वेडा होता. लखनौतील सनातनी वृत्तीच्या त्याच्या वडिलाना तलतचे हे गाण्याचे वेड बिलकुल पसंत नव्हते. तलत मात्र सैगलची गाणी, गझल पाठ करायचा व हुबेहूब सैगलप्रमाणे गायचा. मुकेश, रफीच्या सुरुवातीच्या जमान्यातील हा तलत स्वत:च्या चाहत्यांचा एक वर्ग निर्माण करू शकला. मुळातच तलत हा गझल गायक होता. गझल व गीत दोन्ही भावगीतच व तलत हा भावपूर्ण आवाजात गाणारा गायक. गझल गाताना कवीच्या मूळ शब्दांची संगत तो कधीच सोडत नव्हता. तेथे तडजोड नव्हती. आपल्या येथील जगजितसिंग, राजेंद्र मेहता हे गझल गायक पाकिस्तानी गझल गायक मेहदी हसनची शैली उचलले आहेत. याच मेहदी हसनला 'पाकिस्तानचा तलत महमूद' म्हणून ओळखायचे. तलतचा आवाज हा मुळातच निर्मळ प्रीतीचा आवाज होता. वासनेचा लवलेशही त्यात दिसून येत नव्हते. तलतच्या गाण्यामध्ये मधुरतेबरोबरच शोकात्मतेचाही सूर होता. काही संगीतकारांनी त्याच्यातील मधुरतेला झुकते माप दिले तर काहींनी शोकात्मतेला. शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल विश्वास, या संगीतकारांनी तलतला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले व सामान्य लोकांना त्याची गाणी गुणगुणायला लावली. लेखकाची तलतची ही यादगार आपल्या मनाला भुरळ पाडते.
.
अपूर्ण...

सुरेल..
सुरेल..