Submitted by चिंतातुर जंतू on
सागर

पानिपताच्या युद्धाचा विषय निघताच मला पहिले हे एकच वाक्य आठवते

कुतुबशहा (नजीबखानाचा गुरु) म्हणतो
"क्यों दत्ताजी और लडेंगे?"
त्यावर दत्ताजीने दिलेले उत्तर अंगावर अक्षरश: काटा आणते
"क्यों नही. बचेंगे तो और भी लडेंगे!!"

अर्थात हा प्रसंग पानिपत च्या युद्धाच्या अगोदरचा आहे. पण पानिपताच्या युद्धाशीच निगडीत आहे.
शाळेत याच प्रसंगावर धडा असल्यामुळे मनावर कोरला गेलेला असेल कदाचित. पण पानिपत म्हटले की मला पहिले आठवते ते दत्ताजी शिंदे याचे हे वाक्य.
दत्ताजीच्या उत्तरामुळे कुतुबशहाने (नजीबखानाचा गुरु) दत्ताजीचे मुंडके कापून भाल्यावर खोचून सैन्यात नाचवले होते.
हा प्रसंग रक्त पेटवणाराच आहे.
पानिपत झाले हा वाक्प्रचार एक शोकांतिका म्हणूनच कायमचा मराठी भाषेला आठवण करुन देईन

Wed, 05/01/2011 - 17:30 Permalink
वल्ली

इंद्रराज यांचा सविस्तर प्रतिसाद मिपावर वाचलाच आहे. खूपच उत्तम प्रतिसाद.
धाग्याच्या अनुषंगाने पानिपतावरच्या कादंबर्‍यांवरही चर्चा व्हावी असे वाटते.

Wed, 05/01/2011 - 12:26 Permalink
सागर

In reply to by वल्ली

पानिपतावर विश्वास पाटील यांची 'पानिपत' एवढी जबरदस्त आहे की बहुतेक दुसर्‍या कोणाला पानिपतावर कादंबरी लेखन करायचे धाडस झाले नसावे. किमान मला तरी माहिती नाहिये दुसरी कादंबरी.
अलिकडेच संजय सोनवणी यांची '....आणि पानिपत' प्रकाशित झालेली आहे. त्याकाळच्या सर्व सामान्यांच्या नजरेतून पानिपताचे अवलोकन करण्याचा प्रयत्न या कादंबरीतून झालेला दिसतो. अलिकडेच ही कादंबरी घेतली आहे मी.
वरवर चाळताच कादंबरी सुंदर असल्याचे जाणवलेच पण एक वेगळी विचारधाराही जाणवली. नीट मन लावून वाचण्यासारखी ही कादंबरी आहे हे नक्की.
बाकी बखरी व संशोधनपर ग्रंथ बरेच उपलब्ध आहेत
- भाऊसाहेबांची बखर
- भाऊसाहेबांची कैफियत
- पाणपताची बखर (रघुनाथ यादव विरचित)

संशोधनपर: अनेक आहेत पण उल्लेखनीय म्हणजे
- पानिपत १७६१ - त्र्यं.श.शेजवलकर
- मराठी रियासत मुळेही पानिपतावर प्रकाश पडतो

Wed, 05/01/2011 - 12:42 Permalink

विश्वास पाटलांची 'पानिपत' तर केवळ पानिपत या विषयावरच नव्हे तर एकूणच मराठी साहित्यविश्वातली एक सर्वोत्तम कादंबरी म्हणावी लागेल. कादंबरीचा आवाका अफाट असूनही कादंबरी फक्त मोहिमेवरच आधारलेली आहे. मूळ विषयाला सोडून संवाद असे काहीही नाही. निश्चीतच 'पानिपत' हे मराठी साहित्यातले एक मानाचे पानच.

Wed, 05/01/2011 - 12:50 Permalink
इंद्रराज पवार

थॅन्क्स....सागर, वल्ली, मेघना, ऋषिकेश.....मी जाणीवपूर्वक इथे हा धागा यावा असे म्हटले होते, त्याला कारण आपण सर्वजण याविषयाची (साहित्याच्या दृष्टीने....) व्याप्ती वाढवू शकतो, जेणेकरून माझ्याही ज्ञानात भर पडत जाईल. या धाग्याबाबत मी मिपावर जो प्रतिसाद दिला आहे तो इथे देतच आहे....पण अजूनही हा प्रतिसाद वाढणार आहे, तोही इथे देईन....धन्यवाद मित्रांनो.

चिंतातरजंतू यानी काढलेला हा असा धागा आहे की तो एकदोन ओळीच्या प्रतिसादांने पुरा होईल असे वाटत नाही. तरीही मूळ लेखापेक्षा प्रतिसादच मोठा होणार नाही याची (शक्य तितकी) काळजी घेऊन लिहित आहे.

पानिपतच्या तडाख्याने जे काही उध्वस्त वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले त्याचे रोखठोक वर्णन बखरीत आले आणि त्यामुळे अनेकविध वाक्ये आणि समज सांप्रतदेशी रूढ झाले हेही तितकेच खरे आहे. 'सभासद बखरी' सारख्या चरित्रपर बखरी असो वा 'होळकरांच्या कैफियती' वा पेशव्यांच्या कारकिर्द रंगविणार्‍या बखरी असो तसेच 'हनुमंतस्वामींच्या' सांप्रदायिक बखरी असोत या सर्व बखरीतील वर्णन हे प्रत्यक्षदर्शी असल्याने त्याचे महत्व बेजोड आहे असा समज त्या काळी होता. वि.का.राजवाडे बखरींना 'इतिहासाचे साधनग्रंथ' म्हणून मान्यता जरी देत नसले तरी बखरीतून 'इतिहास' वजा होऊच शकत नाही. या सर्व बखरीत मान आहे तो 'भाऊसाहेबांच्या बखरी'ला, जिच्यात पानिपत पराभवाचे रोखठोक वर्णन केले आहे, आणि म्हणूनच यातील शब्दसंपदा आजही प्रमाणभूत मानली जाते. 'स्वामी', 'श्रीमान योगी' अशा ऐतिहासिक समजल्या गेलेल्या कादंबर्‍यातही विविध बखरींचा कृतज्ञतापूर्वक लेखकाने उल्लेख केलेला असल्याचे आढळते.

हा विषय फार विस्तृत प्रमाणावर चर्चिला पाहिजे, कारण निव्वळ बखरीतून मराठी भाषेत रूढ झालेले शब्द म्हणून वा इतपतच बखरींचे महत्व मानले तर खुद्द बखरीवर वा त्या लिहिणार्‍यांवर एक प्रकारे अन्याय केल्यासारखे होईल. तरीही धाग्याची मर्यादा पाहता निदान आतापुरते तरी त्या एका हेतूवरच लक्ष केन्द्रीत करावे लागेल.

"बांगड्या फुटल्या, चिल्लरखुर्दा, मोहरा, विश्वास गेला..." आदीबाबत वर्षानुवर्षे चर्चा होतच आल्या आहेत आणि अनेक साहित्यिकांनी वेळोवेळी या संज्ञा आपल्या लिखाणात बखरीतूनच घेतल्या आहेत. याशिवाय काही नवी वाटणारी वाक्ये आणि शब्द....जे मी 'भाऊसाहेबांच्या बखरी' तून इथे उदधृत करीत आहे :

१. "प्याद्याचा फर्जी जाहला" ~ अचानकच एखाद्या क्षुद्र व्यक्तीला कुठल्यातरी कारणाने महत्व प्राप्त होते, पण ते कारण लयास जरी गेले तरी ती व्यक्ती आपल्या मिशीला पिळ देतच राहते. अबदालीचा एक विश्वासू नोकर नजीबखान याच्याबाबतीत ही म्हण पडली होती.
२. "भाऊगर्दी होणे" ~ फाजील आत्मविश्वासात राहणे आणि संकट कोसळताच कारणमीमांसा न करता "सदाशिवरावभाऊंच्यावर हल्ला - गर्दी - झाला" म्हणून छाती बडवून घेणे. [आजही कॉन्ग्रेस पक्षाच्या तिकिट वाटपाच्यावेळी सोनिया गांधीच्या निवासस्थानी इच्छुकांची 'भाऊ़गर्दी' झाली असा वर्तमानपत्रे -म.टा.आणि लोकसत्तासह- उल्लेख करतात. या संज्ञेचा खरा अर्थ घ्यायचा झाल्यास 'सोनिया गांधी' वर उमेदवारांनी हल्ला केला असा होईल, पण काळाच्या ओघात या वाक्याला अर्थ उरला आहे तो 'एखाद्या कामासाठी एकापेक्षा अनेकजणांनी इच्छा दर्शविणे....असो.
३. मुंगीस पक्ष फुटले ~ मरण जवळ आले की मुंग्यांना पंख फुटतात असा समज आहे. हा भावार्थ मल्हाररावांचा मुलगा खंडेराव होळकर याच्यासंदर्भात बखरकारांनी लावला आहे. गरज नसताना खंडेराव आपले शूरत्व दाखविण्यासाठी मोर्च्याच्या अग्रभागी आला व त्यास अबदाली सैन्याकडून तोफेच्या गोळ्यास सामोरे जावे लागले.
४. "वानरी तेलाचा प्रकार नको आता..." ~ एखाद्या खर्‍या माकडास जखम झाल्यास कळपातील दुसरे अतिशहाणे माकड त्यावर तेल लावून उपचाराचा बहाणा करते, पण त्यामुळे मूळची जखम अधिकच फुलते....म्हणजेच त्रास कमी न करता हकनाक वाढविणे. ~ हा फटका राघोबादादा याना उद्देश्यून बखरीत वापरला आहे. नानासाहेबांनी त्याना उत्तरेत पाठविले ते होळकर, पवार आणि शिंदे यांच्यातील बेबनाव कमी करून खंडणी गोळा करण्यासाठी. मात्र दादासाहेबांनी स्वभावानुसार जे काही केले तो एक वानरी तेलाचाच प्रकार होता असे सिद्ध झाले.
५. "झाडास घेऊन जातील..." ~ मराठ्यांच्या कथीत पराक्रमाच्या कथावर उत्तरेतील राजपुतांचे हे उत्तर. बाजारबुणगे किती आणि हाडाचे सैनिक किती हा सवाल युध्द तोंडावर आले तरी सुटेना. त्यातही गनिमी काव्याबद्दल प्रसिद्ध असलेले मराठ्यातील एक सैनिक गट आणि राजपूर यांच्यात तुलना करता "रजपूत खर्‍या अर्थाने महापराक्रमी, शिरच्छेद झाला तरी त्याचे कबंध नाचते, तर इकडे आम्हाकडील आधीच गनीम यांचे कच्चे दिल...निसवले तरी झाझाल बांधले असता झाड घेऊन जातील..." अशी बखरीने दखल घेतली होती त्यावेळच्या पानिपतात असलेल्या मराठा सैन्याच्या मनःस्थितीची.
६. "मुरगी मारी, बच्चे दानादान..." ~ अर्थ स्पष्टच आहे. दत्ताजी शिंद्याला मारा म्हणजे त्याच्या अवतीभवती असलेले चिल्लर गनीम आपसूकच मारले जातील.
७. "अजगरका दाता राम..." ~ मराठीमध्ये एक म्हण आहे, ज्याने चोच दिली तो दाणाही देईलच. त्याच संदर्भात अजगराला खायला खूप लगते, पण त्याचीही व्यवस्था 'रामाने - परमेश्वराने' केलेली आहेच. पानिपतात शिंद्याजवळ प्रचंड फौज होती व तिच्या खर्चासाठी मोठी रक्कम त्याना निर्माण करावी लागत होती. युद्ध तोंडावर आले असतानाच बुंदीच्या राणीने शिंद्यांजवळ मदतीची याचना केला व त्याप्रित्यर्थ पाऊण कोट देऊ केले...."अजगरका दाता राम..." नियम सिद्ध झाला.

काही प्रभावी शब्दही आहेत, ते थोडक्यात असे :
क्रोड = कोट रुपये, सुतरनाल = उंटावरील तोफ, सीरची = डोक्यावरील, नामोस्की = अपकिर्ती, नामुष्की; सिपारस = प्रशंसा, इस्तकबील = प्रारंभ, जूग = युती; नरद = सोंगटी ~ जयाप्पा शिंदे याच्याबाबतीत नजीबखानने ही उपमा वापरली होती, फाजील = अधिकची रक्कम ['फाजील' हा फार्सी शब्द खरे तर पैशाच्या संदर्भात वापरला जातो, पण तो मराठी भाषेत त्याचा प्रवास 'आगाऊ, अतिशहाणा' अशा अधिकच्या अर्थाने कायमचा विराजमान झाला आहे.], सानकरोटी = अन्नाची शपथ [सान = मुस्लिमधर्मीय पिरास देत असलेला नैवेद्य...करोटी = भांडे, कटोरा या अर्थाने. ते हातात घेऊन स्वामीनिष्ठा दाखवायची...तिच शपथ]; बक्षीगिरी = सैन्याचे अधिपत्य...बक्षी = सरदार असाही आहे.

~ मला वाटते इतपत ठीक आहे. जर चिं.जं.ना प्रतिसाद ठीक वाटला तर पुढेही चर्चा करता येईल.

इन्द्रा

Wed, 05/01/2011 - 14:40 Permalink
चिंतातुर जंतू

In reply to by इंद्रराज पवार

जर चिं.जं.ना प्रतिसाद ठीक वाटला तर पुढेही चर्चा करता येईल.

वाटला आहे. करा! :-)

(फक्त क्रोड, नामुष्की, शिफारस वगैरेंसारखे शब्द आधीही चांगलेच प्रचलित असावेत असं वाटतं. त्यामुळे पानपतानं मराठी भाषेला दिलेल्या देणगीत ते कदाचित अंतर्भूत करता येणार नाहीत.)

Wed, 05/01/2011 - 15:29 Permalink
सागर

In reply to by इंद्रराज पवार

झाडास बांधले तरी झाड घेऊन जातील हा आमचा मराठियाचा स्वभाव.

जेथें साहेबांचे डोके तेथें भल्याचा पायपोसही पडणार नाहीं

अशी वाक्ये बखरीत वारेमाप आढळतात. यामुळे मुळातली बखर (भाऊसाहेबांची बखर) वाचनीय झालेलीच आहे.
या विषयानिमित्ताने पानिपतावर थोडा प्रकाश टाकू इच्छितो.

अब्दाली अफगाणिस्थानातून जरी आला असला व बाहेरचा असला तरी त्याला नजीबखानाच्या स्वतःच्या इलाख्यामुळे रसद आणि दाणागोटा यांचा वेळेवर पुरवठा होत होता. युद्धात पोटापाण्याला योग्य वेळेला अन्न-पाणी व दारुगोळा मिळणे आवश्यक होते. ते त्यांना मिळेल याची व्यवस्था चोख ठेवली होती.
मराठ्यांचे पानिपताच्या युद्धात पानिपत झाले त्याची मला प्रामुख्याने ३ कारणे वाटतात
१. जाट व उत्तरेकडील राजांना बरोबर न घेता त्यांच्याकडून जुलुम जबरदस्तीने वर्षानुवर्षे खंडणी वसूल करताना प्रदेशातील लोकांनाही मराठ्यांच्या फौजांकडून त्रास दिला गेला. त्यामुळे भाऊंना युद्धसमयी रसद-दाणा-गोटा गोळा करताना नाकी नऊ आले होते, अर्धपोटी (खरे तर कित्येक दिवस उपाशीपोटी) केवळ निकराने सैन्य लढलं.

२. मराठी फौजांमधील नियोजनाचा अभाव. यामुळे युद्धसमयी तोफखान्याने मिळवलेली युद्धातील आघाडी ऐनवेळी कच खाण्याच्या काही मराठी सरदारांमुळे गमवावी लागली आणि परिणामी मराठ्यांचे पानिपत झाले

३. सुजा ने अब्दालीच्या पक्षास सामील होणे. या गोष्टीमुळे खूप फरक पडला होता. कारण सुजा चा प्रदेश संपन्न होता. या प्रदेशातून अब्दालीच्या नेतृत्त्वाखालील सैन्याला धन-धान्य, चारा, दारुगोळा अशी मुबलक प्रमाणात मदत झाली. भाऊंनी सुजाला वळवण्याचे खूप प्रयत्न केले होते. आणि भाऊंच्या शब्दाला सुजा ही मानत असल्यामुळे त्याचे शेवटच्या घटकेपर्यंत तळ्यात मळ्यात होत होते. शेवटी सुजाने नजीबखानाच्या राजनीतीला बळी पडून अब्दालीच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांविरुद्ध मदत करण्यास मान्यता दिली. अब्दालीला सुजाची ही मदत न मिळती तरी पानिपताच्या युद्धाचे चित्र वेगळे असते.

या ब्लॉग वर पानिपतावर सविस्तर लेखन पहावयास मिळाले. सर्वांनी नक्की पहावे. वाचनीय आहे. पानिपतावर या ब्लॉगवर भाऊसाहेबांच्या बखरीच्या अनुषंगाने सविस्तर लेखन केलेले आहे.

Wed, 05/01/2011 - 17:51 Permalink

१. पेशव्यांच्या सैन्याबरोबर 'बुणगाईत' प्रचंड संख्येने होती. स्त्रिया, लहान मुले, व्यापारी, यात्रेकरू, साधू, बैरागी ई. अनेक. हे बुणगे युद्धाच्या कामी कुचकामी-थोडक्यात खायला काळ भुईला भार अशी पेशव्यांची स्थिती झाली. परीणामी अन्नाचा मोठा तुटवडा निर्माण झाला व सैन्याची मोठी उपासमार झाली.
२. यमुनेनेही भाउसाहेबांचा अंतच पाहीला. त्याकाळी पाउस जास्त व उशिरापर्यंत झाल्याने दुथडी भरलेली यमुना पार करणे अशक्य झाले व मोहीम लांबतच गेली.
३. त्याउपरही नंतरही पानिपतात उत्तरेकडून पतियाळाच्या अलासिंग शिखाकडून मराठ्यांना रसद पुरवठा कमी प्रमाणात का होईना पण होतच होता. पण नंतर मात्र कुंजपुराचे ठाणे परत अब्दालीच्या ताब्यात गेले (बहुतेक अताईखानाकडून व कुंजपुराच्या किल्लेदाराच्या मुलाकडून) व तिकडून येणारा पुरवठाही बंद पडला.

पण पानिपताच्या विजयानंतरही अब्दालीची परत हिंदुस्थानात यायची हिंमत झाली नाही. मराठ्यांनी मात्र त्यानंतर दहाच वर्षात उचल खाल्ली व परत दिल्ली काबीज केली. महादजी शिंदे यांनी तर रोहीलखंडात जाउन नजिबाचे थडगेही उद्धवस्त केले असे ऐकिवात आहे. तरी त्याविषयी जास्त माहिती नाही.

सागर तुझे विशेष धन्यवाद. पानिपतावरचा खूपच उत्तम ब्लॉग तु दाखवलास.

Thu, 06/01/2011 - 08:52 Permalink
सागर

In reply to by वल्ली

होय रे मित्रा

हे मुद्दा माझ्या हातून सुटलेच
पण मुख्य मुद्दा बाजारबुणग्यांचा. बाजारबुणगे ही एक मोठीच अडचण झाली होती. मराठी सैन्याला सड्याने (सडाफटींग मधला - अर्थ एकट्याने - म्हणजे बाजारबुणगे न घेता) लढायची सवय होती. अचानक हल्ला करणे ही मराठ्यांची पद्धत होतीच. या नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन बाजारबुणग्यांनी सैन्याच्या उपासमारीत मोठा हातभार लावला.

महादजी शिंदे यांनी तर रोहीलखंडात जाउन नजिबाचे थडगेही उद्धवस्त केले असे ऐकिवात आहे. तरी त्याविषयी जास्त माहिती नाही

याबद्दल मला वाटते मराठी रियासत मध्ये सविस्तर माहिती मिळू शकेन

Thu, 06/01/2011 - 13:55 Permalink
विष्णु वडेर

` भाऊगर्दी हॊणॆ' हा वाक्प्रचार जसा भाऊसाबांच्यावरून आला तसाच विश्वासरावांच्यावरूनही ऎक शब्द आलॆला धिसथॊ. व्यवहारात एखाद्या माणसावरच्या विश्वासाचा प्रश्न निघाला किंवा निर्माण झाला, की गंमतीनॆ म्हटलॆ जातॆ- ` विश्वास? अरॆ, तॊ तर कॆव्हाच पनिपतावर गॆला...'- म्हणजॆ आता विश्वास राहिला आहॆ कुठॆ?
मला वाटतॆ हीही `पानिपता' चीच दॆन आहॆ.

Thu, 06/01/2011 - 08:00 Permalink
वल्ली

गंगेत घोडं न्हालं
भीमथडी तट्टे यमुनेचे पाणी प्याली.
पण हे शब्द पानिपतानंतर प्रचलित झाले याची शंका आहे. हे बहुतेक राघोबादादांनी हिंदुस्थान जिंकून अटकेपार झेंडा लावला त्या मोहीमेसंदर्भात आलेले असावेत.

Thu, 06/01/2011 - 08:51 Permalink
इंद्रराज पवार

धागाकर्ते श्री.चिंतातुर जंतू यांचे आणि प्रतिसाद मान्य+पसंद केल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. वास्तविक माझ्या प्रतिसादातील ९०% पेक्षा जास्त शब्दरचना थेट 'भाऊसाहेबांची बखर' मधीलच असल्याने श्रेय त्या (अज्ञात) बखर लेखकासच जाते हे मान्य केले पाहिजे. मी फक्त काही वाक्यप्रचार, म्हणी आणि अनोखे शब्द यांचा अन्यत्र धांडोळा घेतला, इतकेच.

"अनोखे शब्द" वरून आठवले की, श्री.चिंजं यानी मौखिक परंपरेतील शब्दांचा केलेला उल्लेख तसेच काहीनी बखरीपूर्वीदेखील त्यातील शब्द अस्तित्वात होते असे जरी म्हटले असले तरी मी जाणीवपूर्वक (मला वाटलेले) काही कठीण तसेच नवखे वाटणारे शब्द इथे देत आहेत ज्यामुळे ते प्रथमच वाचणार्‍याला एक प्रकारचा आनंदही मिळू शकतो.

भाग-२

१. पानिपतच्या पराभवानंतर मराठी फौजेची जी 'हालत' झाली त्या अवस्थेचे बखरकाराने केलेले वर्णन ~

"....जिकडे वाट सापडली तिकडे पळत चालिले. कितीएक गाड्या व छकडे व बायका वगैरे अवसानरहित होते ते खंदकात पडले. त्यास निघावयास अवसान जाहाले नाही. गिलचे डोचकी कापीत होते. ती कापावयाची त्यानी मग सोडून दिली. कोठवर कापतील?....इकडे गिलचे खदकातील मालमत्ता लुटू लागले. बायका धरून नेल्या. कितीएक जीवे मारल्या. तीच गत पुरुषांची केली..."

२. त्र्यंबक बापूजींच्या पथकाचा दुराणीने पराभव केला, त्याची अवस्था ~
"...पंज्याब प्रांती त्रिंबक बापूजीचे पथक गेले होते ते दुराणीने बुडवून तमाम मनुष्याचा बंद धरून भोवतील राखणदार ठेविले. सायंकाली आदा शेर आन्न द्याचे. अंगावर वस्त्र नाही. दोन आडीच हजार माणूस नागवे उघडे माळावर. केवल मोठेमोठे सरदार होते; ते तर ओलखूं येईनात..."

[ आपण हिटलरच्या नाझी कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पबाबत खूप काही वाचतो, चित्रपटातून, माहितीपटातून, मालिकांतून ती अंगावर शहारे आणणारी दृष्ये पाहतो....हे आधुनिक काळातील...पण २५० वर्षापूर्वी दुराणीने जी काही हालत केली ती नाझीसदृश्यच होती....मोकळ्या माळावर २५००+ सैनिक+सरदार नागव्या अवस्थेत हतबल अवस्थेत अन्नाच्या पाळीत उभे...]

आता त्या प्रसंगातील पुढील वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पाहू या :
१. आकाशाची दोरी तुटणे = ईश्वरानेदेखील मदतीस येण्याचे नाकारले अशी सैन्याची अवस्था झाली. "कठीण समयी वरचा दाता तो त्राता होईल..." असे म्हटले जाते. पण पराभवामुळे 'देवाने आकाशाची दोरीच तोडून टाकली."

२. पोटात हरणाची कालजे सिरणे = घाबरगुंडी उडणे. गिलच्यानी डोकी उडविण्याचा जो सपाटा लावला होता तो पाहून अर्धमेले झालेले सैन्य अधिकच हतबल झाले.

३.' कालचा शेणामेणाचा झाला लोखंडाचा' = हे नजीबखान रोहिल्याच्या दिवसागणिक वाढत चाललेल्या ताकदीबद्दल दत्ताजी शिंद्यानी काढलेले उदगार. मराठे सरदार इकडे आपापसतील लहानथोरपणाच्या गोष्टी करत बसले तर त्या चार महिन्यात रोहिला मातब्बर झाला..."दिवसेदिवस ते शेणामेणाचे लोखंडाचे होत चालले, त्यास यत्न कोणता काय करावा?"

४. जैसे शालवाचे पीक कापिले = केवळ प्रचंड प्रमाणावर जीवितहानी नव्हे तर मुंडकी उडविण्यासाठी गिलच्यानी दाखविलेल्या रितीचे हे वर्णन. शेतकरी जसा विळ्याने सटसट शाळूचे पीक कापित जातो, तसे गिलचे निव्वळ पेशव्यांच्या सैनिकाना मारत नव्हते तर ते शीर तोडून स्वतःजवळ ठेवत होते...का? तर दुराणी आणि रोहिल्याने आपल्या सैनिकासाठी "मराठ्यांच्या एक मुंडक्यास पाच रुपये" हा दर जाहीर केला होता. ~~ "येकाने पुढे डोचके कापावे, येकाने मागे सैती मारावी व डोचके कापून न्यावे, ते सरकारात रुजू करावे. त्याणे इनाम दर सिरास पांच रुपये घेणे...".

५. "रानभरी जहाले..." = गारुड्याच्या मंत्राने ज्याप्रमाणे रानातील प्राणी भारावले जातात त्याप्रमाणे आमचे सैन्य वरील पध्दत पाहून दिङ्मूढ झाले.

काही शब्द :
तिमखहरामी = स्वामिद्रोह; करांचली = छोटी तलवार; माकूल = योग्य, कर्तृत्ववान; बबदल होऊन = द्रोह करून; वर्कड = इतर [सध्याच्या मराठीत इतर साठी 'वरकड' असा शब्द वापरला जातो, पण बखरीत 'वर्कड' असा उल्लेख आहे]; दिकत = आक्षेप; आडसांगड = कशाही प्रकारे ~ इथे उदा. जेवण करण्यासाठी आयुधे नाहीत, तर 'कारणे सांगू नका, आडसांगडीने करा..' असा अर्थ अभिप्रेत.... थोडक्यात एखाद्या ऑफिसमधील क्लार्कने बॉसला कामाच्या पूर्ततेबाबत कसलीही अडचण सांगायची नाही...बॉस म्हणणार, "आडसांगडीने करा...खरं करा !"; अनीन = लगाम [हा एक नवेच नाम सापडले, अगदी जीएंच्या विदूषक मधील वाटते.]; झोटधरणी = मरणाची झुंज; नरमीना = तलम वस्त्रासारखे ['नरम' शब्दामुळे असेल कदाचित... छान आहे शब्द]; उभाडा = उमाळा; मोडशी उतरली = खोड मोडली; पोळजत्रा = वाताहात; किलाफ = वैर; सरसाल = दरसाल; पायगुंता = लोढणे (हे आपल्या सैन्यासोबत असलेल्या आणि युद्धासाठी नव्हे तर उत्तरेत देवदेव करण्यासाठी आलेल्या बाजारबुणग्यांना उद्देश्यून.)

इन्द्रा

Thu, 06/01/2011 - 11:28 Permalink
इंद्रराज पवार

In reply to by वल्ली

थॅन्क्स वल्ली....सर्वश्री सागर, मेघना, टण्या, रोचीन आणि तुमच्यासारख्या सातत्याने वाचनविहीरीत डुंबत राहाणार्‍या पट्टीच्या वाचकाना वरील प्रतिसाद आवडले यातच मला समाधान आहे. पण श्री.चिंतातूर जंतू यांचेही आभार एवढ्यासाठी मानले पाहिजेत की, त्यांच्यामुळे माझेही बर्‍याच दिवसापासून राहिलेले वाचन आयतेच झाले.

इन्द्रा

Thu, 06/01/2011 - 11:57 Permalink
सागर

In reply to by इंद्रराज पवार

पानिपत युद्धावर अनेक बखरी आहेत पण त्यातही भाऊसाहेबांची बखर जास्त प्रसिद्ध आहे त्याला २ कारणे आहेत
१. बखरीतील भाषेची भावुकता
२. बखरकार प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी रणांगणावर व सर्व प्रसंगात बरोबर असल्याच्या खुणा

याव्यतिरिक्त मराठी (तत्कालीन मर्‍हाठी की मर्‍हाटी ) भाषेचे सौंदर्य देखील भाऊसाहेबांच्या बखरीतून वाचकाला अचंभित करते.

पायगुंता , उभाडा , दिकत असे शब्द महाराष्ट्रात काही भागांत आजही प्रचलित आहेत.

या युद्धात त्र्यंबक बापूजींच्या पथकाचा दुराणीने केलेला अपमान व छळ हे तत्कालीन इतिहासालाच नव्हे तर मानवजमातीच्या इतिहासालाही नवे नाहीच. जिंकणार्‍या सैन्याने पराभूत सैन्याचा शारिरिक छळ करायचा व त्यांच्या बायका उचलून न्यायच्या हा परिपाठ गेल्या कित्येक शकतकांपूर्वीचाच नव्हे तर कित्येक हजार वर्षांपासूनचा आहे. सबळाने दुर्बळाकडून हिसकावून घ्यायचे या न्यायाने बहुतेक सर्वच सैन्य अशी लुटालुट व छळ करतच होते. अलिकडे नजर टाकली तर दुसर्‍या महायुद्धाच्या निमित्ताने हिटलर या राक्षसाचे ज्यूंना छळण्याचे प्रयोग अतिभयानकच होते. थोडक्यात क्रूरपणात वाढच झाली असे म्हणता येईल.

पानिपताच्या या चर्चेवरुन पानिपताच्या इतिहासाला उजाळा मिळाला.
या धाग्याबद्दल, त्यातील माहितीबद्दल चिंतातुर जंतु यांचे, पानिपतकालीन शब्द व वाक्यप्रयोगांवर सविस्तर लिहून प्रकाश टाकणार्‍या इंद्रराज यांचे आणि पानिपताच्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने मोलाची भर टाकणार्‍या वल्ली या सर्वांचे मनापासून आभार.

सुंदर धागा आहे हा. पानिपत या कादंबरीच्या अनुषंगाने पुढे केव्हातरी अशीच चर्चा व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. मी अलिकडेच पानिपत पुण्यातील घरातून आणले आहे. तेव्हा त्या अनुषंगाने पानिपत व तत्सम बखरींचे व संशोधनग्रंथांचे वाचन झाले की मलाही या चर्चेत थोडा अधिकाराने भाग घेता येईल :)

Thu, 06/01/2011 - 14:48 Permalink
इंद्रराज पवार

श्री.वल्ली आणि श्री.सागर....
तुम्हा दोघांच्याही प्रतिसादातील काही बाबीबद्दल आता इथे लिहित आहे :

सर्वात प्रमुख बाब आहे ती मराठ्यांच्या ससेहोलपटीची. "सैन्य सैन्य" जे म्हणतात ते नजरेसमोर आणले तर असे दिसते की, एक जवान योग्य त्या हत्यारानिशी ठाम खडा आहे....युध्द असो वा नसो, तो हमेशा अटेन्शनमध्येच आपल्याला दिसतो. पण पानिपताच्यावेळी (दुर्दैवाने) मराठ्यांची...पर्यायाने सैन्याची... ती स्थिती नव्हतीच.

"पेशव्यां" कडे देवदेव किती मोठ्या प्रमाणात होत असेल याचा तुम्हाला अंदाज असेलच. जातपात, सोवळेओवळेही कडक...त्यामुळे जरी युद्धमोहिमेला बाहेर पडले तर कबिलाखजिनातर सोबत असायचाच पण बायकांच्या पालख्या, भोया, त्यांची सरबराई, भोजनभाऊ, पाणके, किडुकमिडुक कामासाठी हरकारे यांचाही काफिला प्रचंड प्रमाणावर असायचाच. यातील एकालाही साधी माशी वारता येत नसे....निव्वळ दोन वेळचे खायाला मिळते, मुलूखगिरी, बायकांच्यासमवेत राहायला मिळते म्हणूनदेखील उत्तरेत जाणारे मुबलक असत.

त्यात यापूर्वीची उत्तर हिंदुस्थान मोहिमेतील पानिपताची दोन युद्धे जिंकली असल्याने तसेच अगदी आताच्या पाकिस्तानातील 'अटके' पार मराठ्यांनी झेंडे रोवल्याने इकडील भागात स्वतःच्या पराक्रमाविषयी एक 'उन्माद' चढला होता...म्हणजे "आता तिसरे काय चौथे जरी पानिपत आले तरी शेवटी पेशव्यांचाच जय..." हे गृहितक इथल्या राज्यकर्त्यांनी सोयिस्कररित्या मांडले व पानिपतच्या मोहिमेवर निघालो आहोत तर चला गंगास्नानही आयते घडेल म्हणून, सैन्य वगळता, पुण्याच्या जहागिरीतून तब्बल दीड लाख लोक (होय, चक्क दीड लाख, म्हातारेकोतारे, बायकामुले) उत्तरेतील 'मथुरा, प्रयाग, गया आदी देवदर्शाना' साठी मोहिमेत सामील झाले होते. आता तुम्ही नजरेसमोर आणा की, त्यावेळी प्रत्यक्ष शस्त्रे घेवून लढणारे जे होते ते शत्रुशी केव्हा लढतील आणि या बाजारबुणग्यांसाठी किती? शेवटी हार झाल्यावर जी पळापळ झाली त्यात नृशंसरित्या कापले गेले ती ही अकारण गेलेली जनता...शिवाय यातील बायकामुलांचे रक्षण करण्याकामीच युद्धासाठी नेलेले सैनिक मारले गेले.

आमचे निम्म्याहून जास्तीचे सैनिक "पाठीकडून मारले गेले" या वाक्यातच एक खोल विषण्णता ठासून भरलेली आहे.

बाकी निसर्ग...पूर...अंधारयुध्दनितीची माहिती नसणे....सरसेनापतीमधील वर्षानुवर्षे चालत आलेली 'तू मोठा की मी मोठा.."; त्यातही भाऊसाहेबांना आपल्याकडे असलेल्या 'प्रचंड' फौजेबद्दल नको इतका फाजिल आत्मविश्वास...त्यांच्या स्वभावातील काहीसा एककल्लीपणाही पराभवास कारणीभूत ठरलाच....त्यातही खंडेरावाच्या मरणानंतर मल्हारराव होळकर म्हणतात "आमच्या अस्तनीतच आग आहे आणि मग जाट हस्तगत होईल कसा?", हे शिंद्यांनी सूरजमल जाटला दिलेल्या आश्रयावरून काढलेले उदगार आपल्यातीलच बेदिली दर्शविते....जी दुराणी, अबदालीच्या पथ्यावरच पडली.

खूप लिहिता येईल या विषयावर.

इन्द्रा

Thu, 06/01/2011 - 16:20 Permalink
सुधीर कांदळकर

वल्ली यांच्या ०६-०१-२०११ च्या अभिप्रायातील
पण पानिपताच्या विजयानंतरही अब्दालीची परत हिंदुस्थानात यायची हिंमत झाली नाही. मराठ्यांनी मात्र त्यानंतर दहाच वर्षात उचल खाल्ली व परत दिल्ली काबीज केली.

हे वाक्य पटले नाही. अब्दाली इथे आला तो लूट करायला. भारतावरील बहुतेक आक्रमक लूट करायलाच आले होते. लुटीत लढाईचा खर्च वसूल होईल असे आश्वासन नजीबाने दिल्यामुळे अब्दाली आला. प्रत्यक्षात तो न झाल्यामुळे तोटाच झाला. त्यामुळे तो पुन्हा आला नाही. बहुतेक आक्रमकांचे सैन्य भाडोत्रीच होते. ते जगले मेले त्या आक्रमक शासकंना काहीही देणेघेणे नव्हते. लढाया त्यांच्या दृष्टीने परकीय भूमीवर. जमेल तेवढा हात मारायचा आणि पराभूत झाले तर जीव वाचवून पळून जायचे. इथे हिमतीचा प्रश्नच येत नाही.

मराठे मात्र दिल्ली बादशहाचे बूड स्थिर करून त्याच्याकडून मान मिळवायला उत्तरेत गेले असावेत असे दिसते.

सुधीर कांदळकर

Fri, 14/01/2011 - 20:00 Permalink

औरंगजेबाच्या मृत्युनंतर मोंगल साम्राज्य कमजोर झाले. व उत्तरेकडून परकीय आक्रमकांच्या टोळ्या हिंदुस्थानात आक्रमण करू लागल्या. नादिरशाहाने दिल्ली लुटली. व नंतर नादिरशाहाच्या मृत्यनंतर अब्दालीनेही ४ स्वार्‍या केल्या व मोंगल साम्राज्य पूर्णपणे खिळखिळे केले. अशातच तेव्हा दुर्बळ मोंगल बादशाहाने पेशव्यांकडे (शाहूमहाराजांकडे??) संरक्षणाची मागणी केली व चौथाई व सुभ्याच्या बदल्यात परकियांपासून रक्षण करणारा अहमदीया करार केला. राघोबादादांनी उत्तरेकडे स्वारी करून अब्दालीच्या मुलाचा पराभव केला व अटकेपार झेंडे लावले व अंताजी माणकेश्वराची दिल्लीवर सुभेदार म्हणून नेमणूक केली. बादशाह अर्थातच नामधारी.
राघोबादादा परत दक्षिणेत गेल्याचे पाहून नजिबाने अब्दालीला धर्मवेडाच्या भरास पाडून हिंदुस्थानात परत बोलावले. बुराडी घाटाच्या लढाईत दत्ताजी शिंदे हा पराक्रमी सेनापती ठार झाला व पानिपताची ठिणगी पडली.
यात लूट करणे हा त्याचा हेतू नव्हताच तो आधीच्याच लूटींमध्ये साध्य झाला होता इतका की समृद्ध, संपन्न दिल्ली त्यावेळी अक्षरश्: कंगाल झाली होती. जिहाद हाच मुख्य हेतू आणि तोही नजीबाने शहावली उल्लाह ह्या प्रमुख धर्मगुरुच्या माध्यमातून अब्दालीच्या मनात भरवला.
युद्धात दोन्ही पक्षांची जबर हानी झाली. जरी अब्दालीला विजय मिळाला तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर ठार झालेल्या अफगाणांची संख्या लढून ठार झालेल्या मराठ्यांच्या दिडपट होती. एव्हढी जबर हानी पाहून अब्दालीनेही मराठ्यांची दहशत घेतली, त्याच्या सैन्यात तसेच अफगाणिस्तानच्या त्याच्या साम्राज्यातही बंडाळीची चिन्हे दिसू लागली. तो अफगाणात परत गेला व त्यानंतर कोणीही आक्रमक परत उत्तरेकडून हिंदुस्थानात आक्रमण करू शकला नाही.
उत्तर सीमा कायमची सुरक्षित झाली व नंतर फक्त इंग्रजच ताबा घेउ शकले.
हे एक मराठ्यांचे दिल्लीवर असलेले ऋणच.

Sat, 15/01/2011 - 11:53 Permalink
सागर

In reply to by वल्ली

पानिपताच्या युद्धात जरी अब्दालीला विजय मिळाला तरी अब्दाली पळून जाण्याचे कारण नुसते त्याची प्रचंड हानी हे नव्हते तर भाऊंच्या मदतीसाठी स्वतः पेशवे सैन्यासह निघाल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली होती. भाऊंनी अब्दालीच्या तोंडाला एवढा फेस आणला तर पेशव्यांच्या कडवे सैन्यापुढे थकलेले अब्दालीचे सैन्य टिकण्याचा सुतरामही संभव नव्हता. हे एक अब्दाली (खरे तर जीव वाचवून) पळून जाण्याच्या कारणांपैकी एक कारण होते.

Sat, 15/01/2011 - 12:19 Permalink

पानिपतच्या लढ्याला आता २५० वर्षं पूर्ण होतील. पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला. पानिपताविषयीची बखरींतली किंवा मौखिक परंपरेतली वर्णनं, पोवाडे वगैरेंमधून असे इतर काही शब्द मराठीला लाभले का? असतील तर ते कोणते याविषयी माहिती हवी आहे. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती पानिपत-वाङ्मयाबाहेरचीही असू शकते, पण तो शब्द/वाक्प्रचार/म्हण मराठीत प्रचलित होण्यामागचं कारण पानिपत-वाङ्मय (लेखी/मौखिक) असलं तरीही चालेल.

यासंबंधात एक प्रश्नः मोहोरा गळणे, बांगडी पिचणे, चिल्लर-खुर्दा असे पानिपतावरच्या युध्दाच्या नतीजाचे वर्णन करणारे (बहुधा) भाऊसाहेबांच्या बखरीतले शब्द हे आधीपासून अस्तित्वात होते का? की त्या बखरीमुळे ते अनेकांच्या तोंडी गेले आणि मग मराठीत रुळले? म्हणजे हे शब्दही पानिपताची मराठी भाषेला देणगी मानता येतील का?

विकीपिडीआत 'पानिपतची तिसरी लढाई':'साहित्यात व दैनंदिन जीवनात' याखाली 'संक्रांत कोसळणे' हा वाक्प्रचारही पानिपताने मराठीला दिला असा उल्लेख आहे; पण तो त्रोटक आहे आणि संदर्भ म्हणून 'स्वामी' या रणजित देसाईंच्या अर्वाचीन कादंबरीचा उल्लेख केला आहे. हे फारसं विश्वासार्ह वाटलं नाही. याविषयीही अधिक संदर्भ मिळाले तर हवे आहेत.

विनंती: शक्य तिथे संदर्भ द्यावेत (कोणती बखर/पोवाडा, वगैरे). नाहीतर विकिपीडिआप्रमाणेच विश्वासार्हतेला मर्यादा पडतात.

टीपः अधिकाधिक ज्ञानवृध्दीसाठी असाच धागा उपक्रमावर आणि मिसळपावावरही काढलेला आहे. त्यावरही काही रोचक आणि माहितीपूर्ण प्रतिसाद वाचता येतील.

दुवे: उपक्रमावर आणि मिसळपावावर