![]() |
आमची संस्कृती या डॉ. इरावती कर्वे यांच्या पुस्तकात 1948 ते 1960 च्या दरम्यान त्यांनी लिहिलेले संस्कृती, समाजसुधारणा, स्त्रीमुक्ती, शिक्षण इत्यादीविषयीचे लेख समाविष्ट केलेले आहेत. आपल्या भारतीयांच्या दृष्टीने हा काळ संक्रमणाचा काळ होता. स्वातंत्र्य मिळाल्याची उर्मी व जोश, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी होत असलेली चर्चा व मुख्यत: सर्वसामान्या-पासून तज्ञापर्यंत या सर्वांना याविषयीची आस्था, इत्यादी गोष्ठी नकारात्मकतेकडे झुकलेल्या आजच्या पिढीला कुतूहलाचे वाटतील. परंतु इरावती कर्वेसारख्या विदुषीला स्वत:च्या संशोधक अभ्यासाव्यतिरिक्त समाजसुधारणेसारख्या कळीच्या विषयाबद्दल मत व्यक्त करावेसे वाटले व वेळात वेळ काढून लेख लिहावेसे वाटले, हा एक सुखद धक्का ठरेल. त्यांच्यातील न्यायबुद्धी, सामंजस्य, आणि मूल्यांची जाणीव त्यांना कदाचित स्वस्थ बसू दिले नसेल. आमची संस्कृती हे पुस्तक वाचत असताना लेखिकेचा निर्भीडपणा, स्पष्टवक्तेपणा, विद्वत्ता व सामान्याविषयी असलेली कणव या ठळकपणे दिसू लागतात.
संस्कृती- संस्कृती म्हणत ऊर बडविणार्याकडून होत असलेली अवहेलना व गैरवापर यांचा अनुभव घेतल्यावर हा शब्द उच्चारणार्यांपासून चार हात दूर रहावे असेच सूज्ञांना वाटेल. परंतु इरावती कर्वे यांनी लिहिलेला संस्कृती म्हणजे काय हा लेख वाचकांना वस्तुपाठ ठरेल. भारतीय संस्कृतीच्या नावाने प्रचार जेव्हा जेव्हा होतो, तेव्हा तेव्हा विचारवंताने मनाशी विचार करावयास पाहिजे की, भारतीय संस्कृती काय बरे आहे ? प्रचारकाला कोणत्या अंगाबद्दल बोलायचे आहे ? कोणत्या संस्कृतीला उद्धेशून प्रचार चालला आहे ? की संस्कृती ह्या गोड शब्दाच्या बुरख्याखाली राजकीय सत्तेसाठी प्रचार चालला आहे? केवळ अमकी गोष्ट जुनी म्हणून उत्तमही ठरत नाही वा टाकाऊही ठरत नाही हे लेखिकेचे विधान उठता बसता संस्कृतीचे जप करणार्यांना चांगलाच डोस ठरू सकेल.
संस्कृती ही गरजेप्रमाणे बदलत असते व त्यात बदल झाल्यामुळे ती नष्ट झाली असे म्हणण्यात काही अर्थ नाही, हेच लेखिकेला सांगायचे आहे. आपण बहुतांश वेळा संस्कृती व व्यावहारिक देवघेव यांच्यात गल्लत करतो. मुळात काहींचा संस्कृतीच्या बुरख्याआडून सत्तेसाठी राजकीय प्रचार करायचा असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या तडजोडीला तयार होत नाहीत. त्यामुळेच पेच उद्भवतो. संस्कृती ही काही मोजक्यांची मालमत्ता नसून समाजातील सर्व व्यक्तींनी ती बनवलेली आहे. म्हणून समाजातील फक्त एखाद्याच अंगाची सुधारणा करण्याचा हव्यास चुकीचा ठरेल. भारतीय संस्कृती केवळ उच्चवर्णीयांचीच नसून गरीब, दलितासकट सर्वांचा हा ठेवा आहे, याची जाण हवी असे लेखिकेला वाटते. संस्कृतीत वाईट प्रवृत्ती शिरलेल्या असल्यास त्यांचे समूळ उच्चाटन करायलाच हवे. वाईटाचे पोषण करणार्या वर्गाची, तसे करण्याची शक्ती नाहिशी करायला हवी. परंतु हे करताना आपण सर्व एकाच संस्कृतीचे बळी आहोत याचेही भान हवे.
पुढील दोन लेखातसुद्धा डॉ. इरावती कर्वे हिदूंच्या सांस्कृतिक इतिहासातील बारकावे व इंग्रजांच्या दृष्टिकोनातून आपली संस्कृती याविषयी विस्तृतपणे लिहिले आहे. परदेशी प्रवासी इतिहासकार व राज्यकर्ते, भारतीय समाजव्यवस्थेतील असंख्य जाती, पंथ, देव, वंश यामुळे गोंधळलेले असतात व त्यांच्या दृष्टीने ही संस्था एखाद्या खोलीत वाटेल तसे अस्ताव्यस्त टाकलेल्या अडगळीतील सामानासारख्या वाटतात. परंतु लेखिकेला मात्र या सांस्कृतिक इतिहासातील अखंड परंपरा, राजकीय वा धार्मिक सत्तेच्या केंद्रीकरणाचा अभाव व संघर्ष टाळण्याकडे वाटचाल ही वैशिष्ट्ये नमूद कराविशी वाटतात.
मुसलमान व इंग्रजांच्या आक्रमणातून त्यांना मिळालेल्या राज्यसत्तेमुळे आपल्या समाजव्यवस्थेत, संस्कृतीचा ढाचा ढासळला नसला तरी, काही मूलगामी बदल होत गेले. इंग्रजामुळे शिक्षणव्यवस्था बदलली. यंत्रयुगात आपण पाऊल ठेऊ शकलो. उच्चवर्णीयांची पकड सैल झाली. सार्वजनिक जीवनातील व्यवहारांना जातपातीच्या बाहेर ठेवणे शक्य झाले. तरीसुद्धा आपण नेहमीच जित्यांची भ्रष्ट नक्कल करण्यात धन्यता मानत आलो याचा लेखिकेला तीव्र खेद वाटतो. आपली कामगिरी नेहमीच अनुकरणात्मक राहिली. आपल्यातील बहुतेक निर्मिती इतरांच्या कल्पनेतून निघालेल्या आहेत. इंग्रजानी इतिहास लिहिला, आपणही त्याचप्रमाणे लिहिले. त्यांनी लघुकथा लिहिल्या, आपण त्यांचे अनुकरण केले. त्यांनी कामगारांना सहानुभूती दाखवली, आपणही दाखवतो. अशा प्रकारच्या अनुकरणात्मक शैलीतून तयार होत असलेले वांग्मय, शास्त्र वा कला निर्जीव वाटतात. पराजित मनोवृत्तीचे दर्शन आपल्या पोशाखात, खाण्यापिण्यात निदर्शनास येते. अजूनपर्यंतही आपली सांस्कृतिक मूल्येही ठरवू शकलो नाही याची लेखिकेला खंत वाटते.
लेखिकेचा अभ्यासाचा आवाका फार मोठा आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या स्थितीगतीविषयी फार कळकळीने लिहिले आहे. आदिवासींच्या भाषेतील दुर्बोधता, प्रदेशानुगणिक बदलणारी बोलीभाषा व हेल, त्यांच्या आचारविचारातील वेगळेपण, शासनाची अनास्था व आदिवासी आणि इतरांमध्ये भिंती उभारण्याचे प्रयत्न यासंबंधी त्यानी टिप्पणी केली आहे.
1958च्या सुमारास गोवधबंदीची चळवळ जोमात होती. या चळवळीच्या एकंदर प्रकाराविषयी लेखिकेने फार मार्मिकपणे घणाघाती हल्ला चढविला आहे व पुराव्यानिशी गोमांसभक्षणाच्या इतिहासाचा उलगडा केला आहे. दूधपुरवठा व गोवध यांचा एकमेकाशी कुठलाही संबंध नाही, म्हशीच्या दुधापेक्षा गायीचे दूध चांगले यास कुठला शास्त्रीय पुरावा नाही, गोवधबंदीतून धर्मसंरक्षंण ही खुळचट कल्पना आहे व हा हट्टाग्रह योग्य नाही, असे त्यांना वाटते. गोवधाने हिंदूंच्या भावना दुखावतात; डुकरे मारणे किंवा खाणे मुसलमानांना निषिद्ध आहे; तर आल्पतम प्राणी म्हणजे ढेकूण, उवा, पिसवा वगैरेसुद्धा मारणे जैन धर्माच्या विरुद्ध आहे. सर्वानी एका राज्यात राहावयाचे म्हटलेतर प्रत्येकाला शक्य तर आपले आचारधर्म पाळण्याची मुभा देता येईल, पण इतरांवर बंधन कसे घालता येईल? हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या हिंदूना गाई पूज्य वाटतात त्यांनी रोज नमस्कार करावा व आपली पापे नष्ट करावीत; त्याचे दूधतूप खावे; पण इतरांनी त्यांच्याच समजुतीप्रमाणे वागावे, असा आग्रह योग्य नाही.
संबंध समाजाच्या कल्याणाची तळमळ असणारे व ते कल्याण कसे साध्य करावयाचे यावर मार्गदर्शक विवेचन करणारे सुधारककार आगरकर यांच्या बद्दलचे विश्लेषण लेखिकेने एका लेखात केला आहे. आगरकरांच्या लेखनातील विविधता, बालबोध भाषा, त्यातील ओज, तळमळ, त्यांची सत्यप्रियता, निर्भिडपणा व लेखनातील सातत्य इरावती कर्वेंना आश्चर्यचकित करतात. व त्याचवेळी (1956 साली) महाराष्ट्राची दुर्दशा मनात येऊन त्या खिन्न होतात. (आजची स्थिती पाहिली असती तर त्यांनी आत्महत्याच केली असती!) समाजसुधारणा हा राजकीय अजेंड्यावर गेल्यामुळे तो पक्षीय प्रश्न झाला आहे व महाराष्ट्राभिमान व भारताभिमान हे एकमेकाचे विघातक नसून पूरक आहेत, याची जाण आगरकरांना होती. समाजाच्या विचारांच्यात परिवर्तन होणे महत्वाचे असून बाह्य सुधारणेचा तो पाया आहे, या आगरकरांच्या मताशी लेखिका ससहमती दर्शवतात. त्याचवेळी आगरकरांचा नको तितक्या अट्टाहासामुळे जनतेचा रोष व उपहास त्यांना सहन करावा लागला हेही सांगण्यास त्या विसरत नाहीत.
मराठी कोषकार, डॉ. केतकराविषयी लिहिताना त्यांनी लिहिलेल्या कादंबर्यांमधून त्यांच्या विचारांची दिशा कळते, असा उल्लेख इरावती कर्वे करतात. केतकरांचे नंतर नंतरचे लेखन हिदुत्ववादी होत गेले अशी टीकाही त्या करतात.
कर्हाड अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात व आम्ही बायका या लेखात महाराष्ट्रातील स्त्रियांच्या प्रश्नावर विस्तृत मांडणी करतात. दोन पिढ्यातील संघर्षावर नेमके भाष्य करतात. भारतीय भाषेवरील इंग्रजी भाषेच्या आक्रमणाविषयी मत व्यक्त करतात. त्यांच्या मते भारतीय भाषेसाठी एका लिपित लिहिण्याची व्यवस्था असल्यास आंतरप्रांतीय सांस्कृतिक दळणवळण वाढून भारतीय संस्कृतीत भर पडेल. शिक्षण व्यवस्थेवरील त्यांचे दोन लेख मुळातूनच वाचायला हवीत. कारण शिक्षणाची दुरवस्था अजूनही तशीच आहे.
प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे दिवंगत व्यक्तीची उणीव भासते आहे असे सांगण्याची एक पद्धतच आपल्याकडे रूढ होत आहे. परंतु या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचताना ही उणीव खरोखरच जाणवू लागते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आमची संस्कृती
डॉ. इरावती कर्वे
देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. (2006)
किं 200 रु पृ. सं 182 +

चांगला परिचय
वाचायला हवे.
अभ्यासपूर्ण परिचय.....
अभ्यासपूर्ण पुस्तकाचा तितकाच अभ्यासपूर्ण परिचय.....
इरावतीबाईंचे फक्त `परिपूर्ती' वाचले आहे. `गंगाजल'देखील, पण आता ते नीटसे आठवत नाही. आता ह्या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही तिन्ही पुस्तके वाचायला हवीत.
In reply to अभ्यासपूर्ण परिचय..... by चित्रा राजेन्द…
+१ असेच म्हणतो
अभ्यासपूर्ण परिचय
मी पण इरावतीबाईंचे फक्त युगान्त आणि भोवरा हीच पुस्तके वाचली आहेत