Submitted by प्रभाकर नानावटी on

एके काळचे 'लोकसत्ता' या दैनिकाचे संपादक असलेले अरुण टिकेकर यांनी वेळोवेळी लिहिलेले सात दीर्घ लेख सारांश या त्यांच्या पुस्तकात समावेश केल्या आहेत. अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी आपल्याला लेखकाच्या वैचारिक समृद्धीची कल्पना येईल. नेतृत्वाचे प्रशिक्षण, इतिहासाचे ओझे, साहित्याचे समाजशास्त्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे राजकारण, संस्कृतीचा अपकर्ष, जीवनशैलीचा अभाव व समाजमनाचे अस्वास्थ्य हे लेख या पुस्तकात असून आपला समाज कुठल्या दिशेकडे भरकटत आहे याची पूर्ण कल्पना लेख वाचताना येऊ लागते. प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक समस्यावर लेखकाचा तोडगा आहे असा अभिनिवेश नाही. सर्व समस्या माहित आहेत, असाही त्यांचा दावा नाही. परंतु काही समस्यावर सुचेल तो तोडगा नाहीतर उपस्थित केलेले प्रश्न अशा स्वरूपात हे लेख असून वाचकांना विचारप्रवृत्त करण्यास लेख पुरेशा आहेत.

राजकीय नेतृत्वाच्या प्रशिक्षणाची गरज अत्यंत निकडीची आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. भारतीय समाजातील आजच्या नेत्यांची दुरवस्था सर्वश्रुत असून त्यावर तातडीने उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे, असा लेखकाचा आग्रह आहे. या नेत्यांच्याकडे विचार नाही, प्रबोधन नाही, नीती नाही, कुठलेही जीवन मूल्ये नाहीत, त्यांच्या सामाजिक जाणीवा बोथट झाल्या आहेत, निर्ढावलेपणा अंगवळणी पडत आहे, जबाबदारी नाही व सतत लोकानुनयाच्या मागे.... इत्यादीमुळे अशा नेत्यांचा समाज कुठे जाणार आहे याची चिंता लेखकाला स्वस्थ बसू देत नाही. राजकारण याच क्षेत्राभोवती इतर सर्व क्षेत्रांची मदार असताना तेच क्षेत्र निर्नायकी असल्यास त्याचे दुष्ट परिणाम सर्वांना भोगावे लागतील, याची जाणीव लेखक करून देत आहेत. मनोरुग्ण समाज मनोरुग्ण नेत्यांचीच निवड करत आहे, हे आपण सर्व अनुभवत आहोत. राजकारणाला अधिकृत व्यवसायाचा दर्जा दिल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे, असे लेखकाला वाटते. कारण नसताना कुठलाही सोम्या गोम्या राजकारणात प्रवेश करतो, बघता बघता नेत्याची माळ त्याच्या गळ्यात पडते. व तो स्वत:ला नेता समजू लागतो. हा नेत्यांचा गोतावळा आम्ही अशिक्षित आहोत, असे ढोंग करत लोकानुनय करण्याच्या प्रयत्नात असतात. आम्ही आमच्या घरा-दारावर तुळशी पत्र ठेऊन कुठलेही मानधन न घेता समाजकार्य करत आहोत, ही घोषणा ऐकून ऐकून कंटाळलेले लेखक इतरांप्रमाणे यांनी पगार घेण्यातसुद्धा अजिबात हरकत नाही, असे म्हणतात. नेतृत्वाविषयी चर्चा करताना लेखकाला फील्ड मार्शल माँटगोमोरी यांच्या The Path of Leadership या पुस्तकातील काही परिच्छेद आठवतात. विचारांशी राजकीय नेतृत्व फारकत घेत असेल तर ते धोकादायक आहे. राष्ट्रीय स्वभावात शहाणपण (prudence), न्यायभावना (justice), समघातता (temperance) आणि धैर्य (fortitude) या गुणांना जास्त महत्व आहे. संकुचित प्रादेशिकवाद, आत्यंतिक भाषावाद, तत्वचिंतन-विचार यांची हेटाळणी या गोष्टी समाजहिताच्या नाहीत. यावर उपाय म्हणून प्राध्यापक, डॉक्टर्स, वकील इत्यादी मध्यमवर्गातील काहींनी तरी राजकारणात प्रवेश घेण्याचा सल्ला लेखक देत आहेत.

इतिहासाचे ओझे वाटू नये इतपतच इतिहासाचे भान असावे हा लेखकाचा सल्ला आहे. ऊठसूट प्रत्येक वेळी भूतकाळाची साक्ष काढून गतवैभवाच्या गौरवावर जगण्याची प्रवृत्ती योग्य नव्हे. इतिहासाचा अभ्यास का करावा यासाठी इ. एच. कार या इतिहासतज्ञांच्या विधानाचा दाखला लेखक देतात. " To enable man to understand the society of the past and to increase the mastery over the society of the present."

धर्मकारण आणि राजकारण यांची मुळातच सांगड घालू नये. जर सांगड घालण्याचा प्रयत्न होत असल्यास धर्मवृद्धी महत्वाची की राष्ट्रोन्नती, या प्रश्नाला उत्तर द्यावे लागेल. धर्मकारणाचा राजकारणातील आग्रह हा राष्ट्राला बलवान बनविण्याऐवजी दुबळा बनवत आहे. इतिहास पुनर्लेखनाच्या उर्मीतून काही नेत्यांचे व त्यांच्या अनुयायांचे वैयक्तिक समाधान होईल. मात्र राष्ट्रविकास साधणार नाही. इतिहासाचे परिशीलन आवश्यक आहे. इतिहासाच्या परिशीलनाने व्यक्तीचे अनुभवविश्व मोठे होते. व्यक्तीला नवा समज येतो. दृष्टिकोन व्यापक होतात. कार्ल मार्क्सने म्हटले होते की इतिहास आपल्यासाठी उत्तरं शोधत नाही किंवा आपल्या वतीने लढाया लढत नाही. स्वत:हून इतिहास काहीही करत नाही. वर्तमानात वावरणार्‍या व्यक्तींना ते सारे करावे लागते.

साहित्याचे समाजशास्त्र याविषयी लिहिताना लेखक काही मूलभूत प्रश्न विचारू इच्छितात: वाङ्मयीन कृतींना सामाजिक संदर्भ असतो की नाही? सामाजिक संदर्भाशिवाय वाङ्मयीन कृतींना जन्म तरी मिळू शकेल का? वाङ्मयाचा गुणात्मक दर्जा सामाजिक जीवनाच्या गुणात्मक दर्ज्यावर आणि सांस्कृतिक पातळीवर अवलंबून असतो का? असल्यास का? आणि नसला तर का नाही? अमुक साहित्यकृती एका काळात आधिक लोकप्रियता का मिळवून बसतो? लेखकाच्या मते कलेसाठी कला हे कधीच नसते. साहित्यनिर्मितीसाठी सर्जशीलतेबरोबरच इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, मानसशास्त्र इत्यादी क्षेत्राविषयी प्रगल्भ जाण असावी लागते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे राजकारण व संस्कृतीचा अपकर्ष हे निबंध प्रत्येकाने मुळातूनच वाचायला हवेत. समाजमनाचे अस्वास्थ्य यावर भाष्य करताना लेखकांचे खालील उल्लेख विचार करण्यास प्रवृत्त करतात: " पिढ्यान पिढ्या जे मापदंड व्यक्तीगत कर्तृत्व मोजण्यासाठी वापरले गेले, ते मापदंड एक दोन पिढ्यांत बदलले जाणे, हे समाजाच्या प्रकृतीत काहीतरी मोठा बदल झाल्याचे दाखवणारे नाही का वैचारिक प्रगती आणि कृतीशील कर्तबगारी या समाजाच्या सांस्कृतिक मापदंडाऐवजी दुसराच एखादा मापदंड सर्वश्रेष्ठ असल्याचे समाज मानू लागला तर त्या समाजाच्या घटकांत मूलभूत मानसिक बदल झाला आहे, हे समजून येते. आर्थिक यश कोणालाही नको होते, असे नव्हते. पण आर्थिक यश हा सांस्कृतिक मापदंड गणला जात नव्हता. आर्थिक यशाकडे पाहून नाक मुरडण्याचे कारण नव्हते. तरीही आर्थिक यशाला वैचारिक वा अन्य प्रगतीच्या तुलनेत कमी लेखले जाण्याचा तो काळ होता. आर्थिक यश सांस्कृतिक प्रगतीला बरोबर घेऊन आले नसेल, तर ते आर्थिक यश कलंकित आहे, असे मानण्याकडे समाजाचा कल होता. सांस्कृतिक प्रगती हीच समाजाने आपले साध्य मानले होते. (आजच्या) समाजमनात जो मूलभूत बदल झाला तो हाच."

सारांश
अरुण टिकेकर
श्रीविद्या प्रकाशन, पुणे
किंमत: 200 रु, पृ.सं.: 186