सार्वजनिक जीवनाचे अध:पतन होत असलेल्या या काळात मागच्या पिढीतील नि:स्वार्थीपणे कार्य केलेल्यांची सतत आठवण येत असते. कारण ज्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी अशा व्यक्तिमत्वांची उणीव भासत आहे. म्हणूनच आपण इतिहासातल्या पानांत अशा निस्पृह व्यक्तींच्या शोधात असतो. अशा काही स्फूर्तीदायक व्यक्तींच्यापैकी सरदार पटेल यांचे नाव समोर येते. गांधी - नेहरूबरोबर काम केलेले पटेल यांनी आधुनिक व अखंड भारताचा पाया घातला. परंतु धर्मवाद व जातीयवादाची टोकाची भूमिका घेणार्या काही हितसंबंधींना थोर व्यक्तींच्या चारित्र्यहननात आसुरी आनंद मिळत असतो. म्हणून जे आहे ते तसे समोर न ठेवता आपल्याला हवी तशी प्रतिमा निर्माण करण्याचा अट्टाहास ते करत असतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे 'सरदार पटेल हे मुस्लिमांचे कट्टर द्वेष्टे होते' असे विधान करून जनसामान्यांची व अभ्यासकांची दिशाभूल करणे.मात्र रफिक झकारियासारखे अभ्यासू हे आव्हान स्वीकारून नेमकी सत्य परिस्थिती काय होती हे वाचकांसमोर मांडतात. Sardar Patel & Muslims हे या संदर्भातील रफिक झकारिया यांचे इंग्रजीत पुस्तक असून याचा सुरेख अनुवाद एकनाथ बागुल यांनी केला आहे. त्याचे मराठीतील शीर्षक, सरदार पटेल आणि भारतीय मुसलमान.
रफिक झकारिया यांनी सरदार पटेल यांचा पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ व इतर साहित्य अभ्यासून पटेलांचे एक परिपूर्ण व्यक्तिचित्र वाचकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. झकेरिया यांचा मुख्य भर सरदार पटेल यांची मुस्लिमाबद्दलची भूमिका काय होती, त्यात बदल कसा होत गेला, त्यांची कृतीची दिशा कोणती यावर आहे. एका टोकाला बॅ. जीनासारखे कडवट मुस्लिम नेते, दुसर्या टोकाला य़ेनकेन प्रकारे ब्रिटिश साम्राज्याचे हित पाहणारे ब्रिटिश मुत्सद्दी व तिसर्या टोकाला गांधी - नेहरू - पटेल यांसारखे तळमळीने काम करणारे नेते, अशी अवस्था असल्यामुळे स्वातंत्र्यासंबंधीच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर सहजासहजी सापडत नाही. सुदीर्घ चर्चा, वाद - विवाद, निर्णय व कृती यातूनच संबंधित व्यक्तींबद्दल माहिती मिळवणे शक्य आहे. परंतु त्यातून संपूर्ण व्यक्ती आपल्यासमोर येत नाही. म्हणूनच या सर्व व्यक्तींबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. खरे पाहता सरदार पटेल हे शेतकरी कुटुंबातून आलेले कृतीशील, साधे व सरळमार्गी होते. गांधीजींच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या राहणीमानात आमूलाग्र बदल झाला. बौद्धिक कसरती त्यांना आवडत नव्हत्या. शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळे प्रत्येक गोष्टींकडे वास्तव दृष्टिकोनातून पाहण्याची एक नजर तयार झाली होती. राजकारणात हिंदू - मुस्लिम असे भेद ते कधीच करत नव्हते. परंतु बॅ. जीनांसारख्या कडवट व हेकेखोर मुस्लिम नेत्याची वागणूक त्यांच्या सहनशक्तीला आव्हान देत होती. म्हणूनच त्यांच्या वक्तव्यातून मुस्लिम विरोध डोकावत असे. जयप्रकाश नारायण व मौलाना आझाद या नेत्यांना पटेल कदाचित मुस्लिमविरोधी असू शकतील असे वाटत होते. परंतु पटेलांची वागणूक हिंदूधार्जिणी नव्हती हे पटल्यानंतर या नेत्यांनी आपली चूक स्पष्ट शब्दात कबूल केली. या सर्व घटनांचा लेखकाने छानपणे आढावा घेतला आहे.
फाळणीच्या वेळी घडलेला नरसंहार हा मनुष्यजातीला काळिमा लावणारा प्रसंग होता. असे का घडले, कुणी घडविले, त्याला जबाबदार कोण, हे टाळता येणे शक्य होते का, असे अनेक प्रश्न हे पुस्तक वाचताना डोकावतात.या भयंकर शोकनाट्यातील प्रत्येक पात्राची मानसिक अवस्था, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या हातून घडलेल्या कृती, त्यांचे परिणाम व कारणमीमांसा हे सर्व वाचताना आपण एका काळ्याकुट्ट कालखंडातून गेलो याची जाणीव होते. पाकिस्तानने स्वत:ला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केल्यामुळे भारतानेसुद्धा हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा करावी असे पटेलांसारख्या नेत्यावर दडपण येत असे. परंतु या दडपणाला बळी न पडता अल्पसंख्यांकांचे रक्षण हे बहुसंख्यांकाचे कर्तव्य आहे याची जाणीव पटेल यांनी करून दिली. प्रशासनाच्या बाबतीत त्यानी घेतलेले निर्णय व त्यांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे अधिक जीवितहानी झाली नाही असे त्यावेळच्या अनेक अधिकार्यांनी नमूद केले आहे.
पाचशेच्यावर छोट्यामोठ्या संस्थानिकांमध्ये विभागलेला प्रदेश भारतात समाविष्ट करून घेण्यासाठी पटेल यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी, त्यांच्यातील त्यावेळी व्यक्त झालेला प्रखर राष्ट्रवाद, व अशा प्रसंगातसुद्धा हिंदू - मुस्लिमात बंधुभाव निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट यांचे वर्णन लेखकाने समर्पकपणे केले आहे. सरंजामी स्वरूपात असलेल्या संस्थानिकांच्या प्रश्नाला जातीय रंग देण्याचा कुटील डाव रचण्यात आला होता. हैदराबाद संस्थानाचा मीर कासीम रझवीच्या गुंडगिरीमुळे प्रश्न जास्त चिघळला होता. परंतु पटेल यांनी मनाचा समतोल ढळू न देता योग्य पाऊल उचलून तो प्रश्न निकालात काढला.
उर्दू भाषेला राज्यभाषा म्हणून मान्यता देताना पटेल यांनी त्याकडे धर्मभाषा म्हणून न बघता साहित्य, संस्कृती व संपर्क माध्यम म्हणून बघितले. घटनासमितीच्या बैठकीत कुठल्याही गटाकडे झुकते माप देण्याचे ते टाळत असत व राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत असत. त्यावेळचे त्यांचे वक्तव्य ऐकून नेहरूसुद्धा भारावून जात. सरदार पटेल यांच्या प्रयत्नामुळेच धर्मप्रचार, भाषा, लिपी व संस्कृती यांचे जतन करणे, शिक्षण संस्था चालवणे असे अधिकार अल्पसंख्यांकाना मिळाले. यासाठी पटेल यांना प्रखर विरोध सहन करावा लागला.
रफिक झकारिया यांनी इतर अनेक लेखकांप्रमाणे आपल्या चरित्रनायकाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला नाही. पटेल यांचे मुस्लिम विषयक ज्ञान मर्यादित होते, धर्मनिरपेक्षतेपेक्षा सर्वधर्म समभावावर त्यांचा विश्वास होता, सामाजिक जीवनात हिंदूंशी जास्त मोकळेपणाने वागत होते, असे नमूद करण्यास लेखकाला संकोच वाटत नाही. सरदार पटेल हिंदुत्ववादी होते असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल, याची प्रचीती पुस्तक वाचताना जाणवते, यातच लेखकाचे यश दडले आहे.
सरदार पटेल आणि भारतीय मुसलमान
मूळ इंग्रजी: रफिक झकारिया,
मराठी अनुवाद: एकनाथ बागूल
श्री विद्या प्रकाशन, पुणे,
किंमत 150 रु