सुरेश द्वादशीवार या लेखकाने साप्ताहिक 'साधना' आणि दैनिक 'लोकमत' मधून वेळोवेळी लिहिलेल्या
![]() |
लेखमालेची पुस्तकी आवृत्ती म्हणजेच मन्वंतर हे पुस्तक. पुस्तकाची सुरुवातच आमचे मन थांबले की बुद्धी? या प्रश्नाने होते व वाचकांना आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करते. लेखकाच्या मते आपल्या देशाच्या पुरतेच विचार करण्याचे ठरविल्यास 1930 नंतर नवा विचार नाही आणि आद्य शंकराचार्यांच्या मृत्युनंतरच्या आठव्या शतकानंतर नवे तत्व चिंतन नाही. याचाच अर्थ आपण बुद्धीच्या संदर्भात कुठेतरी कमी पडत आहोत, याची जाणीव लेखक करून देत आहे. कदाचित हे विधान या क्षेत्रातील अभ्यासकांना धाडसाचे वाटेल. परंतु पुस्तक वाचता वाचता लेखकाच्या या विधानाशी - अंशत: का होईना - आपल्याला सहमती दर्शवावी लागते. विचारवंतांची (व सामान्याची) अशी स्थिती का झाली, जागतिक परिप्रेक्ष्यातून बघू लागल्यास आपण कुठे कमी पडत गेलो, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे लेखकाला वाटते. विसाव्या शतकाच्या कालखंडात भारतीय समाज मार्क्सवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद आणि आंबेडकरवाद या विचार प्रवाहाने ढवळून निघत होता. परंतु हे वैचारिक प्रवाह लोकचळवळीत रूपांतरित होऊ शकल्या नाहीत. गेल्या 80 वर्षात समाजमनाला भावणारा असा एकही नवा विचारप्रवाह का जन्माला आला नाही, हा प्रश्न लेखकाला भेडसावतो. त्याचेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न पुस्तकातील इतर लेखामधून लेखक करत आहे.
ज्ञानाची थोर व प्राचीन परंपरा असलेल्या आपल्या देशात तत्वज्ञांचे दुर्भिक्ष का जाणवते? याचे उत्तर शोधताना आपले तथाकथित विचारवंत धर्म व तत्वज्ञान यांचे सरमिसळ करत आहेत असे लेखकाला वाटते. मुळात धर्म व तत्वज्ञान या दोन परस्पर भिन्न बाबी आहेत. धर्म ही व्यवस्था तर तत्व हा ज्ञानप्रकार आहे. धर्माचा संबंध श्रद्धेशी व तत्वज्ञानाचा चिकित्सेशी असतो. शरणागत मन धर्माला शरण जाण्याच्या पावित्र्यात आणि प्रश्न विचारणारी बुद्धी नवीन विचारांना जन्म देण्यात धन्यता मानत असते. परंतु धर्माने स्वतंत्र विचार करण्याला अपराध मानला. धर्माबाहेर काही चांगले असू शकते असे मांडणार्यांना मज्जाव केला. त्यामुळे धर्मविरोधी विचार मांडण्याचे धाडस करणार्या तत्वचिंतकांची संख्या मुळातच कमी आहे. आपल्या देशात प्रबोधनयुगाची पहाट व्हावयाची आहे, असे लेखक नमूद करू इच्छितो.
वैचारिक क्षेत्रात गेली शंभर दोनशे वर्षात फक्त अनुकरणापलिकडे आपले असे काहीही नाही. मुळात आपल्या मनाभोवतीची जुनी तटबंदी अजून आहे तशीच आहे. आपले आदर्श अजून पूर्वीचे आहेत. तू ब्रह्म आहेस, स्वत:ला ओळख यापलिकडे आपण (अजूनही) जायला तयार नाही. कदाचित यात मुक्त स्वातंत्र्य उपभोगण्याचे भय किंवा अशाश्वत उद्याची अव्यक्त भीती असेल. समाजमनाच्या या मनस्थितीचा मागोवा घेत असताना लेखकाला आजची सामाजिक स्थिती समूहापासून सरकत सरकत व्यक्तिगततेकडे जात आहे असे वाटते. म्हणूनच पुस्तकाचे उपशीर्षक समूहाकडून स्वत:कडे असे आहे. ही वाटचाल कशी होत गेली याचीच मांडणी लेखक काही उदाहरणांच्या आधारे स्पष्ट करतो.
आज आपल्याला ईश्वर, धर्मसंस्थापक, सम्राट वा महात्मा यांची गरज वाटेनासे झाले आहे. माणूस एकटा असूनही तो स्वयंभू होत आहे. आणि समूहात नसूनही सामर्थ्यवान ठरत आहे. गेल्या 30 -40 वर्षाच्या आपल्या इतिहासाकडे ओझरती नजर टाकली तरी हे आपल्याला स्पष्ट दिसते. एके काळी पं. नेहरू, शास्त्रीजी, इंदिरा गांधी यांची नावे उच्चारली तरी माणसं गंभीर होत. नम्र होत. नंतरच्या प्रधानमंत्र्यांची नावे हळू हळू पुसटशी होत गेली. धर्म, जात वा राज्य यात समूहमानसिकता वाढीला जात होती. व हे करताना स्वहिताकडे दुर्लक्ष कर वा समाजासाठी त्याग कर ही शिकवण दिली जात असे. ईश्वर, धर्म वा जात यातून व्यक्तिला दिलासा मिळत असे. या भित्र्या मानसिकतेतून बुवाबाजी बोकाळली. देवळातली गर्दी वाढली. प्रवचनातून, सत्संगातून दिलासा मिळाला. असुरक्षिततेच्या भावनेमुळे आपले निर्णय धर्मावर, जातीच्या पुढार्यावर किंवा एखाद्या ग्रंथावर ढकलले जात होते. परंतु समाजातील उपेक्षितांच्या अपेक्षा उंचावल्या. ज्यांना आजवर गृहित धरले जात होते तसे धरण्याचा काळ संपला. जातीच्या पुढार्यांचा दबदबा ओसरू लागला. फतव्यांचे बळ कमी होऊ लागले. निवडणुकीच्या राजकारणापुरते जातीची ओळख राहिली. जाती व धर्म बहुमुखी व बहुकेंद्री झाले. एकाहून अधिक प्रवाह येऊ लागले. प्रत्येक प्रवाहागणिक पुढारी झाले. प्रस्थापित व्यवस्थेला धक्के बसू लागले. कनिष्ठ मानले गेलेले वर्ग वरिष्ठांना आव्हान देऊ लागले. त्यातूनच समूह मानसिकता हळू हळू लयाला जाऊ लागली व त्याची जागा व्यक्ती घेऊ लागल्या.
हे स्थित्यंतर केवळ समाजापुरते मर्यादित न राहता कुटुंब व्यवस्थेपर्यंत पोचले. कुटुंबप्रमुख हा प्रकार अस्तंगत होत आहे. विभक्त कुटुंब, छोटे कुटुंब, सुटसुटीत कुटुंब अशी व्यवस्था रुळू लागली. जातीप्रथा धूसर होऊ लागल्या. आंतरजातीय विवाह रूढ होऊ लागले. आंतरराष्ट्रीय लग्नाचे कुतूहल संपले. विवाहावाचून मातृत्वाच्या आधिकाराला मान्यता मिळू लागली. आता तर समलैंगिक विवाहाला कायद्याची मान्यता मिळाली. धर्म धोक्यात आहे, भाषा बुडायला लागली आहे, संस्कृतीला ओहोटी लागली आहे असे ओरडून सांगणार्यांचा ढोंगीपणा लोकांच्या लक्षात येत आहे. सत्तास्थानावर सामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणारे - हळू हळू का होईना - येत आहेत. जातीचे राजकारण, धर्मवर्चस्व, भाषा वा राष्ट्रप्रेम यांची जाहीरवाच्यता करून सत्ताकेंद्रे काबीज करण्याचे दिवस संपत आले आहेत. लेखकाच्या मते अजूनही जात, धर्म, भाषा व पैसा यांचे वर्चस्व कुठे ना कुठेतरी असले तरी हा काळ फार दिवस टिकणार नाही. समूहकेंद्री समाजास व्यक्तीकेंद्री होण्यास वेळ लागणार नाही.
परंतु हे जरी खरे असले तरी मुळात आपला समाज इतका का मागे राहिला याचेही विश्लेषण लेखकाने एका लेखात केला आहे. आपल्या ज्ञान परंपरांनी या जगाला मिथ्या वा दुखमय ठरवून त्यापासून सुटका करून घेण्यावरच जास्त भर दिला. सर्वम् दुखम् , सर्वम् क्षणिकम् असे म्हणत मानवी अस्तित्वाला कुरुपपणा बहाल केला. परिणामी आमच्या विज्ञान संशोधन परंपरा थांबल्या. ऐहिक व्यवहारात रस घेण्याजोगे काही नाही हे एकदा ठरविल्यानंतर अनास्था, निवृत्ती वा निर्वाणाविषयीचे आकर्षण वाढते व भौतिक प्रगतीच्या शक्यताच नाहिशा होतात.
आज पाश्चात्य देशात धर्म हा विरंगुळाचा व ईश्वर हा मानसिक दिलासा देणारा भाग बनत आहे. राजकारणाचे कुतूहल असले तरी त्यात आकर्षण राहिले नाही. समाजाला जसा डॉक्टर वा वकील वा कुशल कार्मिक लागतो त्याचप्रमाणे शासकही हवेत, एवढीच समज आता शिल्लक राहिली आहे. समूहापासूनचे हे तुटलेपण व्यक्तिगततेकडे नेत असले तरी ती नव्या व्यवस्थेतील समस्या दूर करू शकणार नाही. नव्या व्यवस्थेत नीतिव्यवहाराला धर्म वा धर्मशास्त्र यांचा आधार असणार नाही. ईश्वरीप्रसाद वा कोप यांचे भय असणार नाही. नव्या नीतिधर्माला समाजाच्या मान्यतेची गरजही भासणार नाही. लिव्ह इन रिलेशन्स, विवाहावाचून मातृत्व हा स्त्रीचा अधिकार आहेत व या अधिकारांना धक्का देणार्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत.
आज आपण एका संक्रमणावस्थेतून जात आहोत असे लेखकाला वाटते. आपल्या समोर एकीकडे मूलभूत अधिकार व दुसरीकडे रूढी, परंपरा, चालीरीती, सामाजिक नियम अशी द्वंद्वात्मक स्थिती उभी आहे. याचा अर्थ समुदायाचे संरक्षण नाही म्हणून व्यक्ती हवालदिल होत आहे असे नाही. एकाकी माणसांच्या या समाजातही व्यक्ती भिन्न वा समविचारी माणसं जोडत आहे. जातबांधव, रक्तातली नाती, ज्ञात बांधव यांच्यापेक्षा मैत्रीच्या संबंधावर हा समूह टिकत आहे. नातेसंबंधातील जाचकता बोलून दाखवण्याइतपत मनमोकळेपणा आला आहे. पटत नसल्यास ताणून धरण्यात अर्थ नाही, एवढा समज आलेला आहे. म्हणूनच पुढील काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढतीलही. याचा अर्थ सर्व प्रश्न संपले असेही कधीच होणार नाही. मात्र हे प्रश्न व्यक्तीचे असतील. त्यांचे स्वरूप समजुतीच्या अनुभवांवर आधारलेले असतील व त्यात व्यवहारिक मानसिकता असेल. परंतु व्यक्तिगततेकडे वाटचाल करत असलेल्या समूहावर धर्माची पकड सैल होवू लागल्यामुळे धर्म डोळे झाकून बसणार नाही. धर्म हा कदाचित राजकीय पक्ष म्हणून नव्या स्वरूपात येण्याची शक्यता आहे असे लेखकाला वाटते. लेखकाने धर्माच्या या नव्या स्वरूपाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आहे.
लेखकाच्या मते यानंतर नीतीला साथ विज्ञानाची असणार आहे. उद्याचे जग लोकशाहीचे असेल आणि ते सुजाण व सुबुद्ध नागरिकांनी केलेल्या कायद्याचे आणि त्या कायद्याने प्रस्थापित केलेल्या न्यायाचे असेल. या जगाचे अगदीच वेगळे नीतीतत्वे असतील. परंतु यात अराजकता वा राज्यविहीन निसर्गावस्था नसेल. या सर्व गोष्टी माणसांना जगाचा नागरिक बनवतील. येथे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हा अपसमज दूर होईल. देश, धर्म, जाती, वंश यांच्या मर्यादा ओलांडून राजकीय लोकशाहीबरोबरच आर्थिक लोकशाही रुजू लागेल.
लेखक ज्याप्रकारे भविष्यकाळाचे चित्र रंगवतो त्या प्रकारचे जग किती वर्षानंतर येईल हे काळच ठरवू शकेल. परंतु लेखकाचा हा आशावाद चुकीचा वा कल्पनारम्य किंवा अतार्किक आहे असे पुस्तक वाचून झाल्यानंतर वाचक कधीच म्हणणार नाही. यातच लेखकाची प्रतिभा आहे!
मन्वंतर: समूहाकडून स्वत:कडे
सुरेश द्वादशीवार
साधना प्रकाशन, पुणे (2010)
किं: 100 रु, पृ.सं. 126
