'हे दु:ख, या वेदना उगाळून मी जगू इच्छित नाही. पण हे आपल्याच वाट्याला का? याचा जाब विचारावासा वाटतो ' या शब्दांत दलित व विमुक्त जातीतील अनेक संवेदनशील शिक्षित युवक आपली चीड व्यक्त करत असतात. शेवटी असहाय्य होऊन, प्रस्थपित समाजावरील राग गिळत मूकपणे जीवन जगतात. अज्ञान, दारिद्र्य, दौर्बल्य व सामाजिक हीनत्व यातून बाहेर पडणे व आपल्या मुला-बाळांना त्यातून बाहेर काढणे एवढाच मार्ग त्यांच्यासमोर असतो. त्यातील काही युवक संधी मिळताच शब्दावाटे आपले मनोगत व्यक्त करतात. पुस्तकातून वा लेखातून कुठेतरी मनोगत प्रसिद्ध होते. तेव्हाच या बंदिस्त, प्रस्थापित समाजाला आपल्यातील वैगुण्य, अत्याचार व बेफिकिरीची जाण येते. कुठेतरी चक्र फिरू लागतात. थोडे फार प्रयत्न करत असल्याचा देखावा निर्माण केला जातो. गाजावाजा होतो. परत येरे माझ्या मागल्या. ही वरवरची मलमपट्टी खोल जखम बरी करू शकत नाही. समाज आपल्या गुर्मीतच पुढे जातो व परिघाबाहेरचा समाज आहे तिथेच कुजत राहतो. उपरा, बलुतं, आभरान, उचल्या, तराळ-अंतराळ अशा वेदनाकथनांची पुस्तकं बाजारात आली. (व आवृत्तीच्या आवृत्त्या संपल्या!) त्या पुस्तकांवरील चर्चाशिबिरे गाजली. लेखकांचा हार-तुर्‍यानी सत्कार केला. परंतु आजही, काही मूठभर वगळता, इतरांच्या परिस्थितीत तिळाइतकाही फरक पडला नाही, याची जाणीव अजित मिणेकरांनी लिहिलेल्या फिरस्तू हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवते.

श्रीमंतीप्रमाणे गरीबीचेसुद्धा अनेक स्तर असतात. प्रत्येक कुटुंबाच्या गरीबीची व्याख्या स्वतंत्र असते. ब्राह्मण वा मराठा यासारख्या उच्च वर्णांतील कुटुंबाच्या दारिद्र्याची तुलना दलित जातींतील कुटुंबाच्या दारिद्र्याशी होऊ शकत नाही. भटक्या जातींतील गरीबीची तर्‍हा अगदीच वेगळी असते. कारण या तळागाळातील कुटुंबाचे दारिद्र्य पिढ्यान-पिढ्या चालत आलेली असते. या गरीबीतून बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो याची अंधुकशी कल्पनासुद्धा यातील व्यक्तींना नसते. जाणून बुजून त्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न इतरांकडून केला जात असतो. त्यामुळे फिरस्तूला प्रस्तावना लिहिलेल्या जगन फडणीस यांना प्रत्येक समाजगटातील गरीबीचा स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे आणि असा विचार करूनच गरीबी नष्ट करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असे म्हणावे लागले.

फिरस्तू ही अजित मिणेकर या कंजारभाट युवकाच्या जीवनाची कहाणी आहे. काही कारणामुळे मिणेकर यांचा संबंध भटक्या विमुक्त चळवळीशी व समाज प्रबोधिनीशी आल्यामुळे त्यांना आपल्या स्वत:बद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल व एकूण आपल्या अवतीभोवती असलेल्या कंजारभाट समाजाबद्दल विचार करावासा वाटला. आपल्या या जमातीचे रीतीरिवाज काय आहेत? आपण कुठून आलो? आताच्या या परिस्थितीची कारणे कोणती? याचा विचार ते करू लागले. काळ्याकुट्ट अनुभवांची आठवणसुद्धा नको असे अनेकांना अनेक वेळा वाटत असते. तरीसुद्धा मिणेकर यांनी आपल्या जीवनातील कष्टकाळातील घटनांबद्दल प्रांजळपणे लिहिण्याचे धाडसच एका प्रकारे केले आहे.

पुस्तक वाचताना सत्य किती दाहक असू शकते याची सतत जाणीव होते. एखादी संपूर्ण जमात दोनवेळच्या पोटा-पाण्यासाठी दारूभट्टी, चोरी, दरोडे यासारख्या अवैध धंद्यात कायमची गुरफटली जाते याची कल्पनाच आपण करू शकत नाही. लहान मुलांपासून अगदी म्हातार्‍या-कोतार्‍यापर्यंत दिवसरात्र, मान मोडेपर्यंत दारूच्या भट्टीवर, दारूच्या दुकानात वर्षानुवर्षे काम करणार्‍या या जमातीची दु:खे मिणेकर यांनी वेशीवर टांगली आहेत. आपण मात्र त्या गावचेच नाही अशाप्रकारे वागत असतो. मिणेकरांच्या निवेदनात कुठेही अतिशयोक्ती नाही, नाट्यपूर्ण प्रसंग नाहीत व कुठेही चीड नाही. जे भोगले, जसे भोगले त्याचीच ही कथा आहे.

ताडपत्री, चिपाड, पुठ्ठे, प्लास्टिक शीट्स किंवा मिळेल त्या साधनांनी लाज झाकण्याइतपत बनवलेल्या आडोशाखाली घाणीत, चिखलात अनेक कुटुंबे गावाबाहेरच राहत असतात. तेथे त्यांची उघडीनागडी पोरं खेळत असतात. बायका न कळणार्‍या भाषेत हातवारे करत अचकट विचकट शिव्या देत भांडत असतात. आपल्या परिचयाचे हे नेहमीचेच दृश्य असते. परंतु अशा वस्तीत काय घडत असते याची कल्पना आपल्यासारख्यांना, बघ्यांची भूमिका वठवणार्‍यांना कधीच येणार नाही. गावातील धनदांडगे, प्रतिष्ठित गुंड, पोलीस यंत्रणा, तथाकथित संस्कृतीरक्षक, त्यांना किती लाचार बनवत असतात, याची थोडीशी कल्पना अशा प्रकारची पुस्तकं वाचल्यानंतर येते. बाप चोरी करतो. आई दारूची भट्टी लावते. भाऊ, भावाची बायको, बहीण जमेल तसे चोवीस तास कुठे ना कुठे तरी सतत राबत असतात. भडक हिंदी चित्रपटांतील उत्तान दृश्यांची नक्कल करण्याची सवय येथील सर्व लहान-मोठ्यांना, युवक-युवतींना लागलेली असते. ह्या जमातीचे असे एक वेगळेच जग असते. आधुनिकतेचा स्पर्श नाही. विकासाचा संबंध नाही. हे सर्व कायमचेच विस्थापित. त्यांचा कुणी वाली नाही.

प्रशासन यंत्रणा व पोलीस यंत्रणा या जमातीकडे कायम गुन्हेगार जमात म्हणूनच पाहत असतात. गावाच्या हद्दीत घडणार्‍या प्रत्येक अपराधासाठी गावकुसाबाहेर राहणार्‍या या जमातीतील लोकांना जवाबदार धरले जाते. आपल्या गावात ही पीडा नको म्हणत रातोरात संगनमताने या जमातीस हाकलून दिले जाते. पुढच्या गावातसुद्धा हीच तर्‍हा. साधं, सरळ, सचोटीचे जीवन जगण्याची इच्छा असलेल्यांनासुद्धा प्रस्थापित समाजातील गरीबातील गरीबसुद्धा जवळ उभे राहू देत नाहीत. धर्म, राष्ट्र, संस्कृती, नीतीच्या गर्जना करणार्‍यांना आपल्याच समाजातील एक घटक उपाशीपोटी, अर्धपोटी राहून आपल्यातील काहींच्या व्यसनांची पूर्तता करण्यासाठी राबत आहे, याचे काहीच वाटत नाही. जमीन नाही, शिक्षण नाही, धंदा नाही ही या जमातीतील बहुसंख्याकांची नित्याचीच ओरड आहे. विकासाच्या गप्पा मारताना काठावर जीवन जगणार्‍या पारधी, वडारी, भिल्ल, कैकाडी, कंजारभाट, मांग अशा जमातीपर्यंत विकासाची फळे पोचवण्याचे प्राथमिक प्रयत्नही केले जात नाहीत.

या पुस्तकातील काळ्याकुट्ट अनुभवांबद्दल वाचताना एक आशेचा किरण आपल्याला दिसतो. तो म्हणजे या जमातीतील काहींना शिक्षणाबद्दल वाटत असलेली आस्था. शिक्षणच आपल्याला तारू शकते, या अदम्य आशेवर जगताना कुठल्याही थरापर्यंत जाण्याची जिद्द या लेखकांचे कुटुंबीय बाळगून होते. त्यामुळेच त्यांचे एक पाऊल पुढे पडू शकले व काही अंशी या नरकयातनेतून त्यांना सुटका मिळाली. आपल्या मायबाप सरकारने प्रामाणिकपणे शिक्षण देण्याचे प्रयत्न केल्यास 126 जमातींत विखुरलेले दोन कोटी लोक कधी ना कधीतरी सुसंस्कृत समाजाचा भाग म्हणून जगू शकतील.

फिरस्तू
अजित निमकर,
सलोनी प्रकाशन, इचलकरंजी,(1997)
किं 70 रु