नमस्कार मित्रहो,

पुस्तक वाचन ह्या प्रांतात जसजसा रुळू लागलो, तसतसा पुस्तकांच्या प्रकाशन संस्थेच्या नावाकडे लक्ष जाऊ लागलं. माझं वाचन मुख्यतः आमच्या वाचनालयातील पुस्तकांपर्यंतच मर्यादीत असायचं. सुरूवातीला सगळी ऐकून माहीत असलेली पुस्तके वाचून संपली. आणि मग भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहू लागलं, आता काय? आता कोणतं पुस्तक वाचू?
मग अंदाजाने लेखकाच्या नावावरून कधी कधी मुखपृष्ठावरून मग हळूहळू पुस्तकाच्या मलपृष्ठावरील पुस्तकाच्या परीचय-परीएच्छेदावरून नवीन पुस्तकांना हात घालू लागलो. हे करताना नकळत त्या त्या पुस्तकांच्या प्रकाशनाची नोंद माझी नजर घेऊ लागली. मग हळूहळू स्वतःचं ढोबळ मत ही बनू लागलं. मग एखादं नवीन पुस्तक दिसलं आणि ते राजहंस किंवा मौज यासारख्या प्रकाशनाचं असेल तर डोळे झाकून घेऊ लागलो.
काही काही लेखकांचं आणि प्रकाशनाचं एकमेकांशी तर अगदी घट्ट नातं जुळल्यासारखं दिसतं. आत्ता अगदी ठळकपणे आठवलेलं नाव म्हणजे सु.शि. आणि शशीदीप प्रकाशन.

तर.... अशा या प्रकाशन संस्थांचं काम नक्की कसं चालतं याबद्दल कुतुहल आहे.म्हणजे,
१. प्रकाशक आणि लेखक यांचा संपर्क कधी सुरू होतो?
२. प्रकाशनाच्या कामामध्ये कशाकशाचा समावेश होतो?
३. लेखकाचं मानधन कशा स्वरूपाचं असतं? म्हणजे ठराविक रक्कम की प्रत्येक विकलेल्या प्रतीच्या काही प्रमाणात वगैरे.
४. नवीन आवृत्ती काढताना लेखकाला पुन्हा मानधन दिले जाते का?

याशिवाय एकंदरीत पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान विविध टप्प्यांची माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.
( या विषयावर आधीही चर्चा झाली असल्यास, कृपया त्याचा दुवा द्यावा. मला इथे शोध घेतला असता काही हाती लागले नाही म्हणुन हा चर्चा प्रस्ताव. )

धन्यवाद.

---शमिश