‘अशी काळवेळ’ ह्या नावाने सरोज देशपांडेंनी अनुवादित केलेली A Matter of Time ही शशी देशपांडेंची कादंबरी. सानियांच्या ‘त्यानंतर’ ह्या संग्रहातील त्याच शीर्षकाची दीर्घकथा. हे दोन्ही वाचताना आठवलेली मिलिंद बोकीलांची ’अधिष्ठान’ ही कथा. यातील प्रमुख व्यक्तीरेखा घर सोडून जाणारा नवरा. हे तीनही नवरे स्वतंत्र विचारांचे, आपापल्या जगण्याच्या विचारांशी प्रामाणिक राहू इच्छिणारे व त्यानुसार घर सोडून जाणारे आहेत.
’प्रत्येक माणसाला, खास करून पुरुषाला, आपल्या मनाप्रमाणे जगण्या-वागण्याचा हक्क असतो आणि तो केव्हाही तो बजावू शकतो. ज्यावेळी जसं मनात येईल त्याप्रमाणे तो जगू-वागू शकतो. संसार, मुलं-बाळं, पत्नी, प्रेम आणि मानलाच तर समाज ह्या कश्शाचाही विचार न करता त्याला हे शक्य होतं.’ निदान ह्या तीनही कलाकृतींतून हे एकच सत्य अधोरेखित झालं.
शशी देशपांडेंच्या ’अशी काळवेळ’ मधील गोपाळ. ’जीवन जगावं भविष्याकडे नजर ठेवून. परंतु ते समजतं भूतकाळातून.’ कर्कगार्दच्या या शब्दांचा तो नेहमी विचार करतो कारण त्याच्या आई-वडिलांच्या भूतकाळाने त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे. आपल्या मोठ्या प्रेमळ बहिणीचे व आपले वडील एक नव्हते हे सत्य त्याला समजतं. आई-वडिलांनी त्यांना हे सांगितलेलंही नसतं किंवा त्यांच्या वागणुकीतूनही त्याला ते कधीच दिसलेलं नसतं. त्यामुळे त्याला जबरदस्त धक्का बसतो.
’आपला उगम माणसाला माहीत असावा लागतो. नाहीतर त्याला अनिकेत (घर नसलेला), हद्दपार वाटत रहातं.’ गोपाळचंही तसंच झालेलं असतं. तो म्हणतो, ’आजवर जे जीवन मी जगत होतो त्यावरचा विश्वास उडाला, ते मिथ्या वाटायला लागलं. तसं जगत रहाणं शक्य नव्हतं मला.’ अंतरंगातल्या ह्या रितेपणाची त्याला भिती वाटते. ह्या सा~याचा परिणाम बायको-मुलींवर होईल ह्या कल्पनेने तो धास्तावतो. आणि घरातून निघून जातो.
सानियांच्या ’त्यानंतर’ मधील ललित. प्रामाणिक, सिन्सिअर. शाळाकॉलेजमध्ये कष्ट करून, रात्रंदिवस जागून अभ्यास केलेला, स्वत: यश मिळवलेला. पैशाची हाव धरलेली नाही. चिंताही केली नाही. आई-वडील-बहिणीपासून मात्र सतत दूर राहिलेला. ऑफिसमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलेला. परंतु ऑफिसमध्ये त्याचं कुणाशी पटत नसे. त्याच्या मते हाताखालचे बहुतेक लोक कामचुकार, अप्रामाणिक होते. बरोबरचे लोक मूर्ख आणि वरचे लोक निर्बुध्द होते. त्याच्यासारखे कष्टाळू, स्वाभिमानी, प्रामाणिक नव्हते. शिवाय तो सोडून बाकी सगळे काम चुकवत होते, लाच खात होते, दुस~याबद्दल अप्रामाणिक राहून स्वत:ची पोळी पिकवत होते. रोजच्या पेपरा-मासिकातल्या बातम्या, राजकारणाचे खेळ, गरिबांचे हाल, दलितांवरचा अत्याचार हे सगळं वाचून भडकून उठणारा तो. स्वत:ची तत्त्वं, नियम ह्यांना प्रमाण मानून अतिशय निर्भीडपणे उभा असलेला. कंपनीत तो लोकप्रिय अजिबात नव्हता पण त्याच्यासारख्या बुध्दिमान, कष्टाळू हि~याला सगळेजण सांभाळून घेत असत. तो घर का सोडतो? आपली सगळी तत्त्वं शाबूत ठेवून जगता येतं का ते बघायला! घर सोडून जाताना बायको आपल्याला समजून घेईल हे ते दोघंही गृहितच धरतात. आणि समजा नाही समजून घेतलं तरी काय फरक पडणार असतो? आपल्या नसण्याने बायकोचं काय होईल? मुलांचं काय होईल? आपली बायको नोकरी न करणारी आहे. मग तिची-मुलांची आर्थिक सोय काय आहे?
गोपाळला ह्या परिणामांचा विचार करावासा वाटत नाही. छोट्या गावातच बायकोच्या आई-वडिलांचं घर असतं, त्यांनाही मुलगा नसतो. त्यामुळे बायको आणि मुली भाड्याचं घर सोडून तिकडे रहायला जातात. तिथल्या घराची अजून एक वेगळीच कहाणी असते. परंतु मोठ्या कुटुंबात त्या सामावल्या जातात. कुटुंबसंस्थेवरचा आपला विश्वास वाढायला मदत होते. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही संकल्पना खोलवर रुजलेल्या आपल्या ह्या संस्कृतीतील स्त्रिया सारा भार समर्थपणे पेलतात.
ललित घर सोडून जाताना सांगूनच बाहेर पडतो की हे घर, फर्निचर, बॅंकेतील पैसा सर्व बायको-मुलासाठी आहे. तिचे आई-वडील नाशिकला रहाणारे. धाकट्या बहिणीचा नवरा अचानक गेल्याने लहान मुलीला घेऊन ती त्यांच्याजवळ रहात असते. त्यात आता आपण कुठे जाणार म्हणून राधिका, ललितची बायको, मुंबईतच रहाण्याचं ठरवते. शाळेच्या शेवटच्या वर्षात शिकणारा मुलगाही जास्तच अबोल बनतो, आईवर नाराज होतो. व शाळा संपल्यावर शिक्षणासाठी आत्याच्या निघून गावी जातो. राधिका हळूहळू एकटेपणाला सरावते. एका साध्याशा ओळखीवर तिच्याप्रमाणेच एकटा असणा~याला जवळ करते. दीड वर्षांनी नवरा अचानक परत येतो तेव्हा स्वत:ला ओळखून घेत ती त्याला खंबीरपणे सामोरी जाते. आणि वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण करून कथा संपते, की आता नवरा घरी राहणार किंवा नाही कारण त्या मित्रालाही रात्री घरी ये म्हणून तिने बजावलेलं असतं.
’अशी काळवेळ’ ही कादंबरी निवेदकाने सांगितलेली आहे. त्यामुळे गोष्ट ऐकत असल्याचं फीलिंग येतं. त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आपसातील नाती जपत जगणा~यांची गोष्ट आहे जे आता पुरेशा वेळाअभावी हळूहळू कमी होत आहे.
’त्यानंतर’ ही राधिकाने स्वत:च सांगितलेली गोष्ट आहे आणि ती मुंबईसारख्या शहरात, आपल्या ओळखीच्या वातावरणात घडल्याने आपण तिच्याशी जास्त पटकन एकरूप होतो.
थोडक्यात, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कितीही मोठा आघात झाला तरीही स्त्री तो सारासार विवेकाने झेलते, आपला आपण जगण्याचा मार्ग शोधते. समाजाच्या दृष्टीने ते चूक किंवा बरोबर ह्याचा निवाडा न करता आपल्या विचार-भावनांशी प्रामाणिक रहाण्याचं धैर्य बाळगून ताठ मानेने जगते.
एखादी स्त्री पुरुषाइतक्या सहजतेने असा निर्णय घेऊ शकते का? तिने खरोखरच असं ठरवलं तर काय होईल,? अशा विचारांना चालना मिळते. वेगवेगळी पुस्तकं वाचताना एकाच प्रकारचे जीवनानुभव लागोपाठ अनुभवायला मिळतात आणि आपल्या नजरेवरचे चांगलं-वाईट, चूक-बरोबर असे चष्मे अलगदपणे गळून पडतात.
येस्स, मला फार आवडलं हे
येस्स, मला फार आवडलं हे पुस्तक.
छान परिक्षण
पुस्तक विश्ववर स्वागत! अश्याच अनोख्या पुस्तकांचे परिचय देत रहा