विजय तेंडुलकरांचा परिचय करून देताना सामान्यपणे घाशीराम कोतवाल, मी जिंकलो मी हरलो, अशी पाखरे येती, सखाराम बाइंडर, कमला, इत्यादी गाजलेली नाटकं लिहिणारे एक थोर नाटककार म्हणूनच आवर्जून उल्लेख केला जात असतो. त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेखन (रातराणी, कोवळी उन्हे) हेही साहित्यप्रकार हाताळले व त्यातही त्यांची विलक्षण प्रतिभा दिसत असली तरी त्यांच्यावर नाटककार म्हणून लेबल चिकटविल्यामुळे त्यांच्या इतर लेखनाकडे आपले लक्ष जात नाही. (व नाटकं वाचण्यापेक्षा बघायला हवीत म्हणून नाटकही वाचली जात नाहीत!) मुळात तेंडुलकर आयुष्यभर अवती भोवतीच्या 'माणसां'च्या शोधात होते. माणसाचे आयुष्य, त्याचे भावबंध, नातेसंबंध, त्याच्या वासना, राग, लोभ, प्रेम, ईर्षा, स्पर्धा, उत्कटपणा, हलकटपणा, उदात्तता, अधमता, सामर्थ्य, हतबलता, अगतिकता इत्यादीतून 'माणसं' उभी करत होते. अशा 'माणसां'ची नाटकं बघणं हा मागच्या पिढीतल्या चोखंदळ प्रेक्षकांचा छंद होता. परंतु अशा प्रतिभावान लेखकाला आपल्या स्वत:बद्दल व विशेष करून आपल्या जडणघडणीच्या कालखंडाबद्दल काय दिसले याचाच खटाटोप करणारे 'तें' दिवस पुस्तक आहे. माणूस स्वत:कडे किती निरपेक्षपणे बघू शकतो याचा एक वस्तुपाठ म्हणायला हरकत नाही असे म्हणावेसे वाटणारे हे पुस्तक आहे.
रूढ अर्थाने त्यांचे हे लेखन आत्मचरित्राच्या अंगाने जात असले तरी पूर्ण पुस्तकभर तेंडुलकर त्यांना भेटलेल्या माणसाविषयीच जास्त करून भाष्य करतात. त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगत असताना आपल्या डोळ्यासमोर त्या कालखंडातील मुंबई व पुणे उभे करतात. 'रम्य ते बालपण' म्हणण्याइतके सुखद बालपण त्यांना लाभले नसले तरी त्या वयातील मुग्धपणातूनच त्यांनी अवती भोवतीचे जग न्याहाळलेले असल्यामुळे त्याकाळच्या आठवणी आपल्याला आश्चर्यचकित करतात. घरची परिस्थिती बेताची, आर्थिक ओढाताण, वडिलांचा विक्षिप्तपणा, (मूगभाट-कांदेवाडी) मुंबई ते कोल्हापूर ते (सदाशिव पेठ) पुणे असा संसाराचा प्रवास, इत्यादी गोष्टीबद्दल वाचताना लेखक कुठल्या प्रसंगातून जात होते याची कल्पना येऊ शकते. त्यांच्या नवव्या वयापर्यंतचा काळ त्यांनी मुंबईत काढला. त्याकाळची चाळ संस्कृती, गिरगाव ते ठाकुरद्वारापर्यंतच्या टापूतील दुकानं, हॉटेल्स, हॉटेल्समधील ग्रामोफोन्स व गाण्याच्या तबकड्यांची नवलाई, मुंबईतील ट्रामगाड्या, घराजवळची म्युनिसिपल शाळा, इत्यादीबद्दल वाचत असताना लेखकांच्या शब्दचित्राचे कौतुक करावेसे वाटते.
वडिलांनी मुंबईतील चांगली नोकरी सोडून दिल्यामुळे तेंडुलकर कुटुंबीय कोल्हापूरला घर करतात. कौलारू तळमजली वाडा, विजेअभावी कायमचा काळोख, तर्हे तर्हेचे जीव-जीवाणू-साप, वाड्याच्या मागचा मोकळा माळ, टोपलीचा संडास या गोष्टी बालपणातील लेखकामध्ये भीती उत्पन्न न केल्यास नवल म्हणावे लागेल. वैभवातून विपन्नावस्थेत पडल्याची अशी ती भावना होती. परंतु एकदा रहायचे म्हटल्यावर त्यांच्या तक्रारी क्रमेण थांबल्या. कोल्हापुराशी जमवून घेऊ लागले.
कोल्हापूर हे संस्थानिकांचे शहर. बायका सर्व आईसाहेब, ताईसाहेब वा आक्कासाहेब. वाड्याला लागूनच रेस कोर्स. रेसकोर्सवर सीझनमध्ये घोड्यांच्या शर्यती असायच्या. प्रत्येक रेसनंतर टाळ्या पिटणे यात आनंद मानणार्यात लेखक व त्यांचे बालमित्र होते. मुंबईचे क्रिकेट मागे पडले व वयाच्या अकराव्या वर्षी ते 'रेसबाज' झाले. दुसर्या महायुद्धाच्या काळातील संस्थानिकाचा कोल्हापूर व माधवराव बागलांचा दरारा इत्यादी गोष्टी तेंडुलकरांच्या लेखणीमधूनच समजून घेणे गमतीचे ठरेल.
या दोन - तीन वर्षानंतरच्या वास्तव्यानंतर तेंडुलकर कुटुंब पुण्याला शिफ्ट होते. सदाशिव पेठेतील टिळकरोडवरील जवळजवळ गावाबाहेरच्या (?) भागातल्या एका जुन्या वाड्यात या कुटुंबानी बस्तान बसवले. 'मातीच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन, सार्वजनिक संडास, वाड्यापुढचा भकास रस्ता' अशा प्रकारे तेंडुलकर आपल्या राहत्या घराचे वर्णन करतात. तेंडुलकरानी शाळा शिकावी म्हणून आई शिकस्त करत होती. परंतु तेंडुलकराना शाळेतील रूढ शिक्षणापेक्षा इतर उपद्व्यापातच जास्त रुची. बॉय स्काउट, आर एस एसच्या शाखा, राष्ट्र सेवा दल, कम्युनिस्टांचे अभ्यासवर्ग या सर्व प्रकारची शिदोरी त्यांनी त्या वयात जमवली. या विषयींच्या गमती जमती वाचताना आपण त्या कालखंडात हरवून जातो. याचप्रकारे त्याकाळातील त्यांना शिकवलेल्या वि. वि. बोकील सर, संत सर, चितळे सर, पु ग सहस्रबुद्धे सर, इत्यादी शिक्षकाविषयींचे शब्दचित्र आपले मन वेधून घेते. प्राचार्य ना. ग. नारळकरांचे शालेय उपक्रमांच्या आवाक्याने विद्यार्थीदशेतील तेंडुलकर भारावून जातात. अशा प्रकारे तेंडुलकर आपल्याला त्यांच्या शाळेतून फिरवून आणतात.
तेंडुलकरांचे माध्यमिक शिक्षणही असेच रडत खडतच चालते. मधल्या काही काळात त्यांना शाळेला जावेसे वाटत नाही. अधून मधून शाळा चुकवू लागतात. शाळेत भरायला दिलेल्या पैशातून सिनेमा बघू लागतात. वेळ घालवण्यासाठी एकाच थियेटरमध्ये पुन्हा पुन्हा तिकिट काढून तोच तोच सिनेमा बघतात. दुपारच्या वेळी नगर वाचन मंदिरात वेळ घालवण्यासाठी जात असलेल्या तेंडुलकरांना मराठी, इंग्रजी वृत्तपत्रे वाचण्याची सवय लागते. अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर यांच्या कलापथकाचा कार्यक्रम बघितल्यानंतर त्यांचा कम्युनिस्टामधला रस वाढतो. चौदाव्या वर्षी ते तात्पुरते 'कम्युनिस्ट' होतात. परंतु कम्युनिस्ट मंडळीच्या गुप्त भेटीगाठीमुळे तेंडुलकरांना एके दिवशी तुरुंगाची हवा खावी लागली. घरच्याना मनस्ताप झाला. अशा प्रकारे युद्धकाळातील पुणे व पु्ण्यातील त्या काळातील घडामोडी व लेखकाच्या शिक्षणाचा बट्याबोळबद्दलचे वर्णन वाचता वाचता आपण न कळत त्या काळात जातो.
खरे पाहता मध्यम वर्गाच्या दृष्टीने तेंडुलकरांचे अशा प्रकारचे बालपणीचे आयुष्य म्हणजे उडाणटप्पूचे, वाया गेलेल्याचे आयुष्य. परंतु त्यांच्यातील उपजत प्रतिभेमुळे तेंडुलकर त्याकाळात आवेगाने लिहू लागले. लिहून टाकल्यानंतर त्यांना हलके वाटू लागले. रोज काही ना काही तरी खरडण्याच्या या सवयीमुळे त्यांच्यातील लेखक घडत गेला. लिहिण्याची ती एक 'किक्' होती. तो एक लेखनज्वर होता. कथा, कविता, विनोदी लेख, नाटके, व पटकथासुद्धा त्यांनी त्या काळात लिहिली. कुणालाही ते लेखन दाखवण्याचा प्रश्न नव्हता. सर्व व्यवहार स्वांतसुखाय. त्यातून कुठलिही अर्थप्राप्ती नव्हती. उलट घरात कळल्यास बदनामी, नाचक्की. अशा प्रकारे त्यांच्या न कळत ते लेखक व स्वत:चेच लेख वाचणारे एकमेव वाचक बनले. काही वेळा चोरून एखादी गोष्ट वा कविता मासिकांना छापण्यासाठी पाठवत असत. परंतु साभार परत आलेले लेखन चार चौघासमोर दिसू नये याचीच खटपट ते करत असत. अशा प्रकारे शिक्षणामध्ये कुठलेही जास्त प्रगती न केलेले लेखक तेंडुलकर कुठल्यातरी सामान्य कुवतीच्या छापखान्यात नोकरी करू लागले व तेही वडिलांच्या मित्राच्या वशिल्याने!
याच कालखंडात दुसरे महायुद्ध संपले. भारताला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी काय घडले हे आठवत नसले तरी तेंडुलकर यांना नकलाकार भोंडे यानी स्वा. सावरकर यानी 14 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणाची नक्कल आठवते. देशाच्या फाळणीचे झळ पुण्याला लागली नसली तरी गांधीजींच्या खुनाचे (वधाचे!) चटके मात्र पुण्याला चांगलेच बसले. त्या कठिण प्रसंगाचे वर्णन व त्यावरील लेखकाच्या टिप्पणीचा उल्लेख या पुस्तकात आहे.
'तें' दिवस केवळ तेंडुलकरांच्या बालपणीच्या आठवणी या स्वरूपात नसून पुस्तकाच्या शेवटच्या काही पानांमधून त्यानी अनुभवलेल्या काही कटू व गोड प्रसंगांचे चित्र तेंडुलकर आपल्यासमोर उभे करतात. त्याकाळची स्वस्ताई, जातीय दंगे, व्यभिचार करताना नवऱ्यांनी पकडल्या गेलेल्या बायकांची नाकं कापण्याची अजब 'प्रथा', कष्टकरी वर्गातील कोकणातील रामागड्यांचे जीवन, समांतर काळाबाजार व्यवस्थेचा स्वीकार, स्त्रियांच्या नोकरीमुळे अहंगंड दुखवलेला पुरुषी समाज, मध्यमवर्गाच्या राहणीमानाला गेलेला तडा, इत्यादी अनेक प्रसंगांचे वर्णन लेखक फार खुबीने करतात.
या पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावनाऐवजी दिलीप माजगांवकरांचा तुम्हाला आठवताना हा लेख आहे. 20 -25 वर्षाच्या मित्रत्वाच्या नात्याला उजाळा देणार्या या लेखातून दिसणारे तेंडुलकर आपल्याला अत्यंत हृदयस्पर्शी वाटतात. माजगांवकरानी फार संयमितपणे तेंडुलकरांच्या आयुष्यातील अनेक सुख दु:खाच्या प्रसंगांची आठवण या प्रस्तावनेवजा लेखात चित्रित केली आहे.
'तें' दिवस हे पुस्तक म्हणजे तेंडुलकरांच्या पिढीचा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय काळाचा दस्तावेज असे वाचून झाल्यानंतर म्हणावेसे वाटते.
'तें' दिवस (आरंभकाळ)
ले: विजय तेंडुलकर,
राजहंस प्रकाशन (2009)
किं:200 रु, पृ.सं: 146
नेहमीप्रमाणे सुरेख पुस्तक
नेहमीप्रमाणे सुरेख पुस्तक ओळख. धन्यवाद.
सद्ध्या पुस्तक खरेदी थोडीशी थांबवली आहे, पण जी पुस्तके अजून खरेदी करावयाची आहेत, त्या यादीमध्ये ह्या पुस्तकाची नोंद केलेली आहे.
In reply to नेहमीप्रमाणे सुरेख पुस्तक by यशोधरा
+१ असेच म्हणतो
नेहमीप्रमाणेच नानावटींकडून सुरेख परिचय अजून एका सुरेख पुस्तकाचा
उत्तम पुस्तक परिचय पुस्तकही
उत्तम पुस्तक परिचय
पुस्तकही अगदी वाचनिय आहे.
माझ्या मते तेंडुलकरांचे हे अर्धवट राहिलेले पुस्तक ते गेल्या नंतर प्रकाशित झाले आहे.
हे पुस्तक नाही आवडले
या पुस्तकात काऽही ठोस गवसत नाही असे वाटले.जरा भ्रमनिरास झाला.नसते लिहीले तरी चालले असते असे वाटले. असो.