वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश

साहना's picture
साहना in काथ्याकूट
5 Mar 2026 - 1:01 am
गाभा: 

राजा विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ पुन्हा आला आणि त्याने प्रेत काढून खांद्यावर घेतले आणि मौन व्रत धारण करून तो पुन्हा चालू लागला. तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला.

"विक्रमा.. तू इथे पुन्हा पुन्हा येतोस. याला तुझी चिकाटी समजावी की 'जेन झी' प्रमाणे तुला OCD आहे असे समजावे हेच मला समजत नाही. की काही वेळा एखादी गोष्ट केल्याने यश मिळते आणि त्या यशाच्या नशेत माणूस तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करू लागतो. तसे तर तुझे नाही ना झाले? 'विश्वगुरू प्रदेश'चा राजा कोबी सिंह याच्याप्रमाणे आपल्याच स्तुतीत मुग्ध होऊन पुन्हा पुन्हा तीच नाटके करवून त्यातून लोकांचा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न तर तू नाही करत ना? मी तुला त्याची कथा सांगतो."

विश्वगुरू प्रदेश हे एक अत्यंत गरीब राज्य होते. या राज्यात अनेक वर्षे 'गोपू' वंशाने राज्य केले. अत्यंत भ्रष्ट, विलासात गुंग, प्रजेविषयी कमालीची किळस, अनागोंदी कारभार, कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव, प्रचंड जातीयता हे सर्व माजवून या वंशाने प्रदेशाचा विनाश केला होता. प्रदेशातील चोर, दरोडेखोर आणि सरकारी नोकर यांनी संगनमत करून व्यापाऱ्यांना लुटले, विद्वानांना हाकलून त्याजागी आपली मंडळी बसवली आणि सर्व गुरुकुलांवर सरकारी अंमल आणून आपलाच उदो उदो केला. लोकांत प्रचंड असंतोष माजला. अशात गोपू वंशाच्या महाराणी वृद्धापकाळाने वारल्या आणि त्यांच्या जागी 'पप्पू' हा युवराज राजा होणारच होता, की एका जानपदातील मोठ्या सरदाराने बंड पुकारले.

सरदार कोबी सिंह हे गजोधर प्रदेशाचे मोठे सरदार होते. गरीब परिस्थितीतून ते वर आले होते. जबरदस्त स्मरणशक्ती, प्रचंड मेहनत घेण्याची क्षमता आणि कुणाचाही केसाने गळा कापण्याची कला त्यांना अवगत होती. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम गजोधर प्रदेशावर सत्ता हस्तगत केली. आपले विशेष अमात्य 'कल्लू कलंदर', जे पूर्वी खंडणी वसुली करण्याचे काम करायचे, त्यांना हाताशी धरून त्यांनी आपल्या सर्व विरोधकांचे गळे घोटले. त्याच वेळी सार्वजनिक रित्या कोबीजींच्या जिव्हेवर सरस्वती नृत्य करत असे. स्वतःच्या धर्मपत्नीला त्यांनी केव्हाच त्यागले होते, पण त्याच वेळी आपले कौटुंबिक आयुष्य किती धार्मिक आहे हे दाखवण्यासाठी कोबी सिंह आपल्या १०० वर्षांच्या मातेच्या पाया पडण्याचा एक वार्षिक कार्यक्रम घडवून आणत.

भुकेल्याला अन्न, गुरांना चारा, व्यापाऱ्यांना संरक्षण, चोरांना शासन इत्यादी गोष्टी ते आपल्या भाषणात इतक्या चातुर्यपूर्ण पद्धतीने मांडत की प्रत्येकाला वाटत असे की हाच तो नरशार्दूल जो विश्वगुरू प्रदेशाला दारिद्र्यातून बाहेर काढेल. याच्या तुलनेत पप्पू गोपू हा एकदम मतिमंद वाटत असे. कोबी सिंह पुढे त्याचे काही चालणार नाही हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आले होते, त्यामुळे त्यांनी आपले सैन्य कोबीजींच्या मागे उभे केले. पप्पूला आपली औकात कळली आणि तो शेपूट घालून पळाला.

कोबीजींच्या राज्याभिषेकाला दशके उलटली. अचानक ज्या लोकांनी कोबीजींसाठी जीव धोक्यात घातला होता, त्यांच्या लक्षात आले की मागील २० वर्षे आम्ही फक्त सतरंज्या उचलण्याचे काम करत आहोत. याउलट ज्यांनी शेवटच्या क्षणी 'चान्सवर डान्स' म्हणून कोबीजींना मदत केली, ती मंडळी आज सर्वत्र उच्च पदांवर विराजमान आहेत. अचानक कल्लू कलंदराचा मुलगा सर्व व्यापाराची केंद्रे इतर प्रदेशांतून गजोधर प्रदेशात घेऊन गेला. राज्यात जे चोर दरोडेखोर होते, त्यांनी अचानक कोबीजींचे झेंडे दाखवत 'विश्वगुरू प्रदेशाचा' उदो उदो करत स्वतःला राष्ट्रभक्त दस्युसम्राट घोषित केले. ज्या विद्वानांना आशा होती की कोबी सिंह त्यांना किमान आपली गुरुकुले चालवायची संधी देतील, त्यांना देशातून हाकलून लावण्यात आले आणि त्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकऱ्यांपासून वंचित करण्याचे धोरण आणण्यात आले.

कोबी सिंह स्वतःला नरशार्दूल योद्धे घोषित करत आणि भाषणातून आपण कसे शूर आहोत आणि आपल्या तलवारीच्या धाकावर दुनिया कशी घाबरून आहे हे सांगत, पण 'आम्रखंडाच्या' राजांनी जेव्हा कोबी सिंहला द्वंद्वासाठी प्रवृत्त केले, तेव्हा मात्र कोबी सिंहांनी 'ब्र' सुद्धा काढला नाही.

तरी सुद्धा दर महिन्याला कोबी सिंह राष्ट्राला संबोधित करण्यासाठी भाषण ठोकत. हे भाषण जबरदस्तीने सर्व समाजाला ऐकावे लागत असे. त्यानंतर दर महिन्याला एका मंदिरात जाऊन कोबी सिंह लोळण घेत आपण कसे देवभक्त आहोत हे जनतेला दाखवत. कोबी सिंहांचे अमात्य कल्लू कलंदर कोबी सिंहवर टीका करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वतः समाचार घेत. विश्वगुरू प्रदेशातील सर्व शहरे ढिगाऱ्याखाली गाडली जात होती, पूल पडत होते, विमाने चिल्लर शत्रुदेश उडवत होते, आम्रखंडीय सम्राट विश्वगुरू प्रदेशाची खिल्ली उडवत होता, कोबी सिंहचे कोषाध्यक्ष सामान्य पापभिरू जनतेवर अव्वाच्या सव्वा कर लावून तो पैसा विलासी चमच्यांवर उधळीत होते.

आणि हे सर्व काही चालू असताना कोबी सिंह मात्र जणू काही आपण एक लोकप्रिय आणि शूर वीर राजे आहोत या थाटात वावरत होते आणि अनेक सतरंजी उचलणारे लोक अजूनही त्यांच्या मागे उभे होते.

वेताळाने इतकी गोष्ट सांगून विक्रमाला विचारले,

"तर विक्रमा मला सांग बरे की कोबी सिंहची ही वागणूक अशी का आहे? देशाची स्थिती कशी आहे याची त्यांना माहिती नाही की ते स्वतः इतके आत्ममुग्ध आहेत की त्यांना फरक पडत नाही? इतके असून सुद्धा लोक त्यांच्या मागे अजून सुद्धा का उभे आहेत? कोबी सिंह वारंवार तीच नाटके आणि तीच भाषणे का देतात? तुझ्याप्रमाणे त्यांना सुद्धा OCD आहे की आणखीन काही? तुला ठाऊक असून सुद्धा उत्तर दिले नाहीस तर तुझ्या मस्तकाची सहस्त्र शकले होऊन पडतील."

विक्रमादित्य म्हणाला,

"वेताळा, यात आश्चर्याचे काहीच नाही. विश्वगुरू प्रदेशावर गोपू सारख्या विलासी आणि मूर्ख लोकांनी अनेक दशके राज्य केले, यातूनच संपूर्ण राज्य हे मतिमंद आणि षंढ झाले आहे हे दिसून येते. अत्यंत दळिद्री राज्य जिथे एकही गुरुकुल सुद्धा नीट चालत नाही, अशा प्रदेशाचे नाव 'विश्वगुरू' असावे आणि त्यातील विरोधाभास कुणालाच दिसू नये, यावरून दांभिकता आणि खोटी आत्मकेंद्रितता हा संपूर्ण समाजाचा धर्मच झाला आहे असे दिसते. अशा समाजात सर्वात मोठा दांभिक, वाचाळ आणि अतिमानी दर्प असलेला माणूसच राजा होऊ शकतो. काम कमी आणि घोषणा जास्त; जात, धर्म, भाषा यावर खोटा अयथार्थ अभिमान आणि दांभिकतेवर बोट ठेवणाऱ्या लोकांचे निर्दालन हे अशा राज्यकर्त्यांचे प्रमुख लक्षण असते. मासिक भाषणे, माता आणि देवळांत लोळण घेणे, देशप्रेमावर मोठी भाषणे ठोकणे हे सर्व काही ती दांभिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष समस्यांपासून लोकांचे लक्ष भटकवण्यासाठी आवश्यक असते.

माझ्या मते विश्वगुरू प्रदेशाला त्याच्या लायकीप्रमाणे योग्य राजा मिळाला आहे. जो समाज कडू सत्य सहन करू शकत नाही, आपल्यातील कमतरता मान्य करण्याची क्षमता ठेवत नाही, तो समाज काळाच्या ओघात 'कोप (cope)' रुपी मोहामृत रस प्राशन करून स्वतःला आत्ममुग्ध करतो. ज्याप्रमाणे कमी मार्क मिळाल्यानंतर कुठलाही विद्यार्थी 'मी अभ्यास केला नाही' असे कारण देत नाही, उलट 'मी सिली मिस्टेक केल्या' असे मोहामृत रसपान करतो, त्याचप्रमाणे विश्वगुरू समाज सुद्धा स्वतःची लायकी नसताना स्वतःला विश्वगुरू समजतो. आपल्या शहरात कचऱ्याचे ढीग माजलेले असताना स्वतःला थोर निसर्गप्रेमी संस्कृती समजतो, चिल्लर राष्ट्राकडून मार खाऊन सुद्धा स्वतःला वैश्विक सत्ता समजतो आणि गाढवाला पंचक्रोशीत फिरवून त्याला अश्वमेध यज्ञ समजतो, अशा समाजाला कोबी सिंह हा एक योग्य राजा आहे. कोबी सिंह हे आत्ममुग्ध असले तरी अत्यंत चतुर राजे आहेत आणि त्यांनी त्याच चातुर्याने सत्ता हस्तगत केली आहे आणि ती सत्ता ते सांभाळून सुद्धा ठेवणार आहेत. कोबी सिंहांचे सिंहासन तेव्हाच डळमळीत होईल ज्या दिवशी एक तर विश्वगुरू समाजाची मूळ मानसिकता बदलेल किंवा कोबी सिंहपेक्षा मोठा दांभिक, वाचाळ व्यक्ती लोकांच्या नजरेस येईल आणि कल्लू कलंदर त्या व्यक्तीला ठार मारू शकणार नाही."

असे म्हणून विक्रम चालू लागला आणि वेताळ त्याला म्हणाला,

"विक्रमा, तू खरोखरच प्रचंड ज्ञानी राजा आहेस. कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश याबद्दलचे तुझे मत १००% बरोबर आहे. पण तू उत्तर देऊन मौन व्रत तोडलेस, त्यामुळे मी पुन्हा झाडावर जातो."

असे म्हणून वेताळ खो-खो विकृत हास्य करत पुन्हा आपल्या झाडावर गेला.

प्रतिक्रिया

रामचंद्र's picture

5 Mar 2026 - 1:44 am | रामचंद्र

रूपक कथा मस्तच! आता महा(न)राष्ट्र तसेच आम्रविका राज्याची आणि तिथल्या चक्रवर्ती सम्राटाची पण गोष्ट लिहावी, ही विनंती.