✪ "प्लॅनेट परेडची" सत्य स्थिती
✪ आत्ताचे ग्रह कसे व कुठे बघता येतील?
✪ सूर्य मावळल्यानंतर तेजस्वी शुक्र दिसेल
✪ शुक्र, शनि व तेजस्वी गुरू हे तीन ग्रह सहजपणे बघता येतील
✪ पुढचे दोन- तीन दिवस नितांत स्वच्छ आकाश
✪ नितळ निळा रंग- आकाशाचा रंग निळा का असतो?
✪ ३ मार्चला चंद्रग्रहण- पण चंद्र उगवताना ग्रहण संपत असेल
✪ पायथागोरसचे प्रमेय आणि तमिळ गणितज्ञाचं निरीक्षण
नमस्कार. गेले काही दिवस एका रेषेत सगळे ग्रह येणार अर्थात् "प्लॅनेट परेड" होणार अशा पोस्टस आल्या आहेत. ग्रहांची सद्यस्थिती कशी आहे व कुठले ग्रह कसे बघता येतील त्याबद्दल बोलण्याआधी थोडा विचार करूया. जर पृथ्वीसह सहा ग्रह एका रेषेत आले तर नक्की काय होईल? थोडा वैज्ञानिक प्रकारे विचार करूया! हे थोडं सिम्युलेट केलं तर लक्षात येईल की, असं जर कधी झालं तर पृथ्वीवरून अशा वेळेस बूध व शुक्र दिसणार नाहीत, कारण ते सूर्याच्या दिशेला येतील व सूर्याच्या तेजामध्ये दिसणार नाहीत. आणि मंगळ, गुरू, शनि व इतर ग्रह अशा वेळी सूर्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला असतील आणि ते सूर्य मावळताना उगवत असतील. पण अशी आत्ताची स्थिती अजिबात नाही. त्यामुळे सगळे ग्रह एका रेषेत अर्थातच नाही आहेत. पण त्या पोस्टमध्ये थोडा अर्थ नक्की आहे. आणि ते म्हणजे मंगळ वगळता इतर सहा ग्रह सूर्य मावळल्यानंतरच्या आकाशामध्ये तांत्रिक दृष्टीने विजिबल आहेत. म्हणजे ते एका रेषेत नाहीतच पण संध्याकाळी दिसू शकतील असे आहेत.
.
.
(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल आणि कालच्या नितळ आकाशातले फोटो इथे बघता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)
सूर्यापासूनचा पहिला ग्रह बूध. तो नेहमीच सूर्याच्या मागे- पुढे असतो. २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सूर्य मावळल्यावर तो थोड्याच वेळाने मावळेल. त्यामुळे बघायला खूप कठिण आहे. पण कुठे बघायचं माहिती असेल व सराव असेल तर तेजस्वी शुक्राच्या उजव्या बाजूला ५ अंशांवर बघता येऊ शकतो. दुसरा ग्रह शुक्र. तो अति तेजस्वी आहे. किंबहुना आपल्या आकाशात सूर्य आणि चंद्रानंतर तिसरी तेजस्वी गोष्ट शुक्रच आहे. सूर्य मावळल्यावर संधीप्रकाशातच तो दिसायला लागेल आणि अंधार पडल्यावर थोड्या वेळात मावळेल. संधीप्रकाशात तेजस्वी शुक्र आणि त्याच्या पाच अंश उत्तरेला (उजवीकडे) अंधुक बूध बघता येऊ शकतो. तिसरा ग्रह पृथ्वी. चौथा ग्रह मंगळ. तो सध्या सूर्याला ओलांडून पूर्वेकडे जातो आहे. अजून १५ दिवसांनी पहाटेच्या आकाशात सूर्योदयापूर्वी पूर्वेला दिसायला लागेल.
पाचवा ग्रह गुरू. अंधार पडल्यावर पूर्वेला डोक्यावर येताना तेजस्वी गुरू लगेचच दिसेल. त्याच्या बाजूला पुनर्वसू- प्रश्वा हे तारेही दिसतील. शिवाय मृग नक्षत्र, ठळक व्याधसुद्धा दिसतील. विशेष म्हणजे गेले दोन दिवस आणि पुढचेही दोन दिवस जिथे ढग नसतील तिथे अतिशय स्वच्छ आकाश असणार आहे. आकाशाचा निळा रंगसुद्धा नुसता बघावा असा आहे. आकाशाचा रंग निळा का असतो आणि चंद्र- सूर्यासह प्रत्येक ग्रह- तारे उगवताना व मावळताना लाल का दिसतात ह्यावर विचार करूया! निळा रंग प्रकाशात सर्वांत जास्त विखुरतो (स्कॅटरिंग). म्हणून तो जास्त पसरलेला दिसतो. आणि लाल रंगाची तरंगलांबी सर्वांत जास्त असते व तो कमी विखुरतो, म्हणून तो तसाच राहतो. त्यामुळे उगवताना व मावळताना वातावरणाच्या जास्त थरातून किरण येतात, त्यातले इतर रंग विखुरतात, पण लाल तसाच राहतो व म्हणून चंद्र- सूर्य क्षितिजालगत लाल दिसतात. अगदी ह्याच कारणामुळे सिग्नलचा रंगही लाल असतो. असो. इतक्या स्वच्छ आकाशात शहरातूनही अनेक अंधुक तारे दिसू शकतात. काल पुण्यातूनसुद्धा खूप अंधुक तारे आणि तारकागुच्छ दिसले. अगदी कृत्रिम उपग्रहसुद्धा दिसले. पहाटे आकाशगंगेच्या पट्ट्यातील अनेक तारकागुच्छ दुर्बिणीतून दिसले आणि आकाशगंगेचा पट्टाही अंधुकसा फोटोमध्ये उमटला. पुढचे दोन- तीन दिवस ह्या स्वच्छ आकाशात हे ग्रह आणि इतरही तारे- तारकासमूह बघता येतील.
सहावा ग्रह शनि. संध्याकाळच्या तेजस्वी शुक्रापासून थोडा वर अंधुक शनि दिसेल. ९ मार्चला तो शुक्राच्या जवळ दिसेल आणि नंतर हळुहळु संधीप्रकाशामुळे दिसेनासा होईल. सातवा ग्रह युरेनस. तो बायनॅक्युलर किंवा टेलिस्कोपद्वारे कृत्तिका तारकागुच्छाच्या परिसरात शोधता येईल. आठवा ग्रह नेपच्युन. तो शनिच्या जवळ बायनॅक्युलर किंवा टेलिस्कोपद्वारे बघता येईल पण बघायला कठिण आहे. तर असे हे ग्रह बघता येऊ शकतात. अति तेजस्वी शुक्र आणि तेजस्वी गुरू अगदी सहज कुठूनही बघता येतील. आणि हो, 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. पण भारतात चंद्रोदय ग्रहण संपतानाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून बाहेर जातना उगवेल. त्यामुळे ग्रहण असं जाणवणार नाही. पण ३० मार्चच्या पहाटे साधारण अडीच वाजता महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून चंद्रामुळे तेजस्वी मघा (Regulus) तारा झाकला जाताना नक्की बघता येईल.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने ह्या गोष्टींकडे डोळसपणे बघूया. छोट्या छोट्या गोष्टींमधलं विज्ञान किंवा वैज्ञानिक गमती जाणूया आणि छोट्यांना सांगूया. अशीच एक गणितातली गंमत. पायथागोरसचं प्रमेय अनेकांना आठवत असेल. काटकोन त्रिकोणात मोठ्या बाजूचा वर्ग हा अन्य दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. म्हणजे काटकोन त्रिकोणात जर कर्ण C असेल आणि A आणि B दोन बाजू असतील तर, C2 = A2 + B2. म्हणजे. पण ह्या प्रमेयात एक अडचण अशी आहे की, बाजू शोधताना वर्गमूळ (square root) काढावं लागतं आणि वर्गमूळ काढणं सोपं नाही. त्याबद्दल पोथायानार (Pothayanar) ह्या 800 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या तमिळ गणिती व कवीने एक वेगळं सूत्र दिलं आहे. त्याच्या सूत्राचा इंग्रजी अर्थ असा आहे: Divide the horizontal into eight, Delete one portion, and add the remaining, to half of vertical to result you’ve got. The answer would be hypotenuse of the triangle.
वर आपण घेतलेल्या बाजू A, B आणि C आहेत. आणि काटकोन त्रिकोणात C2 = A2 + B2 (कर्णाचा वर्ग = पायाचा वर्ग + उंचीचा वर्ग). पोथायानार सूत्रानुसार बाजू शोधण्यासाठी वर्गमूळ काढण्याची गरजच नाही. त्याचं सूत्र (वरच्या ओळींचा अर्थ) सांगतो की, C= 7/8A + 1/2B (जिथे A पाया आणि B उंची आहे). ह्याची पडताळणी करण्यासाठी काटकोन त्रिकोणाच्या बाजू घेऊन सहज तपासता येईल. A= 8, B= 6; A=28; B=21; A= 12; B= 5 अशा काही किमती घेऊन हे सहज तपासून बघता येईल! अशा विज्ञान- गणितासोबतच्या मैत्रीतून आणि निरीक्षणातून ज्ञान आणि समज वाढत जाते! अशा सोप्या गोष्टींचा तरी आनंद घेऊया आणि छोट्यांनाही तो देऊया!
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 28 फेब्रुवारी 2026.
प्रतिक्रिया
28 Feb 2026 - 12:03 pm | कंजूस
माझा आवडता छंद होता तो आता सोडावा लागला. आकाश पाहायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला आहे. जवळच्या आणि चांगल्या जागांवरही लखलखाट झाला आहे. तुम्ही कुठून पाहता?