श्री गणेश लेखमाला २०२३ - ॥ श्रीगणेश स्तवन ॥

By मी-दिपाली, 19 September, 2023

.

॥ श्रीगणेश स्तवन ॥

जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु॥

तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे
मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे
सुमुख तुझे स्मरता अवघे खल, पापविचार, दशा हरती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥१॥

मुनिजनपूजित वेदपुरस्कृत लौकिक सर्व दिशांत वसे
चरण शुभंकर पंकज कोमल लीन जिथे मम शीश असे
गजवदना तव आशिष मंगल दुःख निवारण ते करती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥२॥

भवभयहारक दुष्टनिवारक अंकुशधारक रुद्रसुता
शुभगुणकानन तू करुणाघन तूच महोदर विश्वपिता
कलियुग हे घनघोर धरेवर घे अवतार गुणाधिपती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥३॥

स्वरसुमने नित अर्पियली तुज नादप्रतिष्ठित छंदपती
अवतरती स्तवनात निरागस भक्तिसुधारसयुक्त श्रुती
निसदिन जे भजती प्रथमेश्वर, ते भवसागर हा तरती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥४॥

( वृत्त - हंसगती )

©® दीपाली ठाकूर