अंबिका सरकार ह्यांच्या ‘अंत ना आरंभही’ कादंबरीची नायिका, मराठी विषयाची प्राध्यापिका उषा. विसाव्या शतकाच्या, साठच्या दशकातील विवाहिता. पुरुषप्रधान समाजात जगताना तिला स्वत:ची खरी ओळख पटेपर्यंत उशीर होतो. वस्तुस्थिती काय आहे हे समजायला वेळ लागतो. आत्मभान जागं होईपर्यंतच्या काळात जास्तकरून वाईटच घडून गेलेलं असतं. त्या वाईटाने एक कमाल मर्यादा गाठल्यानंतर तिचं मन बंड करून उठतं. परिस्थितीशरण न होता परिस्थितीकडे डोळसपणे बघण्याचं भान तिला येतं.
बेटर लेट दॅन नेव्हर! एकदा जाग आल्यानंतर मात्र तिच्यातील बंडखोर स्त्री तिला स्वत:च्या विचारांप्रमाणे, इच्छेप्रमाणे कृती करण्यास भाग पाडते.
जन्मदात्या वडिलांच्या तापट स्वभावामुळे तिला आणि तिच्या तिन्ही भावंडांना लहानपणी खावा लागलेला मार, आईची असहाय्यता ह्यामुळे आई-वडिलांकडून प्रेम मिळत नाही. लग्नानंतर नवर्याकडून शारीरिक व मानसिक छळ होत रहातो. हे सारं तिला जितकं एकटं पाडतं तितकंच एकीकडे कणखरदेखील बनवतं, स्वयंसिध्दा होण्यास भाग पाडतं. अविचारी, कृतीशून्य आणि केवळ सत्ता गाजवणार्या नवर्यापासून ती वेगळी नाईलाजाने होते.
नि:स्वार्थ प्रीतीचा शोध घेत असताना तिला एका मुलाचा बाप असलेला विधुर अभिराम भेटतो. त्याची हुशारी आणि तिच्याशी अदबशील वागणं ह्यामुळे तिचं मन त्याच्याकडे ओढ घेऊ लागतं. अभिरामलाही त्याच्या वकिली पेशातील अनुभव व कर्तबगारी लक्षपूर्वक ऐकून घेणारी उषा आवडते. तिच्या अपंग मुलीसह तो तिला स्वीकारतो. दोघंजणं लग्न करतात.
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा पट मांडला की असंख्य माणसं नजरेसमोर येतात. चांगली-वाईट, विचारी-अविचारी अन न-विचारी देखील! उषालादेखील माणसांचे असे अनेक नमुने भेटतात. विद्यासारखी स्वतंत्र विचारांची स्पष्टवक्ती मैत्रीण, चैतन्यसारखा समजूतदार मित्र, आणि तिच्यातील ‘बाई’पण वापरू बघणारा मोहन. ह्या सार्यांच्या अनुभवांतूनच आपण नेमकं कसं वागायचं ह्याचं अवधान बाळगायला शिकणारं समजुतीचं शहाणपण येतं. तिच्या जगण्याविषयीच्या जाणीवा स्पष्ट होतात.
तरीही तिचं मन अस्वस्थपणे स्वत:ला विचारत रहातं, ‘ अभिरामचं प्रेम मिळत असूनही ते आपल्या मनास का येत नाही? आपण नेमका कशाचा शोध घेत आहोत? प्रेम? प्रीती? शोष पडेपर्यंत धावण्यासारखं काय असतं ह्या फसव्या चीजेत?’ ह्या प्रश्नांच्या गुंत्यात ती बर्याचदा अडकत रहाते.
अन्न-वस्त्र-निवारा ह्या मूलभूत गरजा भागत असतील तर जगणं किती सहज-सोप्पं असायला हवं ना! मात्र वास्तवात खरंच तसं घडतं का? रूढी-परंपरांच्या भिंतींमध्ये कोंडलेल्या अवकाशात मोकळेपणाने जगता येतं? स्वत:तील माणूसपण जपत, दुसर्यातील माणूसपण समजून घेत सहजीवन जगणं अवघड का बनतं?
आरती प्रभूंनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे
‘दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली, कालही अन आजही...’
असं म्हणत म्हणत नायिकेची जीवननौका चालत रहाते.
ह्या कादंबरीचं रवीमुकुल ह्यांचं मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाला साजेसं आहे. काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर उजळलेल्या कमानींचे दोन दरवाजे, एक पूर्णपणे उघडून प्रकाश आतमध्ये घेणारा आणि दुसरा प्रकाशमान होण्याकरता किंचित किलकिला झालेला....