Submitted by प्रभाकर नानावटी on

प्रत्येक पिढीतील वयस्कर व्यक्तींची पुढच्या तरुण पिढीच्या नीतीमूल्यांबद्दल काही ना काही तरी तक्रार असते. तसेच प्रत्येक वयस्कर व्यक्तीला आपण आपल्या पाल्यावर योग्य संस्कार करू शकलो नाही, याची पण खंत वाटत असते. या सर्व प्रकारात संस्कार म्हणजे काय, नीतिमूल्ये म्हणजे काय, कोणती मूल्ये जीवनमूल्ये म्हणून स्वीकारावीत, मूल्ये स्थळ-काल-व्यक्ती निरपेक्ष असू शकतात का, मुळात ती शिकवता किंवा शिकता येतात का, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. या व इतर अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध सुमन ओक यांनी मूल्यशिक्षण या पुस्तिकेतून घेतला असून प्रत्येक शिक्षक, शिक्षिका व पालकांनी वाचला पाहिजे असा हा दीर्घ निबंध आहे.

सुमन ओक एखाद्या कसलेल्या संशोधिकेप्रमाणे मूल्यशिक्षणाची सर्व बाजूनी तपासणी करत शिक्षक व पालक म्हणून याविषयी आपली काय जबाबदारी आहे याची जाणीव करून देतात. सामान्यपणे धर्माचे परिपालन म्हणजेच संस्कार व रूढी परंपरांचे तंतोतंत पालन म्हणजेच नीतिमूल्ये असे अनेकांना वाटत असते. खरे पाहता धर्मशास्त्राव्यतिरिक्त अनेक शास्त्रांचा नीतिमूल्यांशी घनिष्ठ संबंध आहे. तत्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र, संस्कृती अशा नानाविध ज्ञानशाखांतून नीतिमूल्यांचा ऊहापोह केलेला असतो. परंतु प्राथमिक अवस्थेतील मनुष्यप्राण्यासारखेच अजूनही आपण नैसर्गिक घटनांच्या कार्यकारणांचा विचार न करता सोपी कर्मकांडे, पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये इत्यादिंनाच धर्म म्हणून कवटाळत आहोत व त्यानाच जीवनमूल्ये असे समजत आहोत.यामुळे आपली मानसिकवृत्ती पलायनवादी होत आहे. वर्तमानकाळातील ऐहिक जीवनापेक्षा मरणोत्तर मोक्षाच्या मृगजळाच्या पाठीमागे जाण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे जीवनमूल्यांच्याबाबतीत गोंधळल्यासारखे, नेमके काय करावे हे कळेनासे झाले आहे.

इंदुमती पारिख यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे या पुस्तिकेचा रोख याच जगात, याच जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारी नीतिमत्ता कशी असेल व त्यासाठी काय करायला हवे, याचा विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा आहे. विज्ञान - तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपली समाजरचना व वैयक्तिक जीवन जास्त गुंतागुंतीचे होत चालले आहे. जीवनपद्धतीस सुसंगत ठरेल अशी प्रगती वा कालानुरूप बदल मात्र नैतिकतेमध्ये होत नाही. त्यामुळे निर्माण झालेली सांस्कृतिक दरी भरून काढायची म्हणजेच प्रत्येकाने जाणतेपणाने आपापली मूल्यप्रणाली निर्माण करायची व ती आचरणात आणायची. तसेच इतरांनाही या वस्तुस्थितीची जाणीव होण्यास मदत करायची.

मूल्यांचा र्‍हास का होत आहे याचा शोध घेताना कुटुंब, धर्मसंस्था व शिक्षणसंस्था नैतिक शिक्षण देण्याबाबत अपयशी ठरल्या आहेत असे लेखिकेला वाटते. " सामाजिक उत्क्रांतीमुळे मानवी समाजरचना गुंतागुंतीची, स्तरांमध्ये विभाजित व विषमतापूर्ण होऊ लागली व प्रत्येक बदलाबरोबर जुन्या मूल्यांची जागा नवीन मूल्ये घेऊ लागली."

मूल्यप्रणाली परिवर्तनशील असावी यावर भर देताना लेखिकेने मूल्यप्रणालीत कसे बदल होत गेले याचा काही तक्त्यांच्या आधारे सुरेख आढावा घेतला आहे. रोजच्या व्यवहारातील आचारांच्या नियंत्रणासाठी एखादी आचारसंहिता वा निर्णयप्रक्रिया यांना काही महत्व दिलेले जाणवत नाही. हिंदू धर्म व इतर धर्म यात कुठल्या नैतिकमूल्यांना अग्रक्रम दिला जातो याची नोंदही लेखिकेने घेतलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक शिक्षणतज्ञांनी स्वार्थत्याग, धैर्य, अस्मिता, मानसिक स्वातंत्र्य, विचारप्रवणता, चिकित्सक वृत्ती, राष्ट्रप्रेम, सांस्कृतिक एकात्मता इत्यादी मूल्यांवर भर देत असतानाच संस्कृती, राष्ट्रीयता व परंपरा यांची केवळ कदर करण्यावर न थांबता त्याचे विश्लेषण करावे व त्यातील दुर्बळ व प्रतिगामी गोष्टींचा त्यागही करावा असे प्रतिपादन करत होते. अध्यात्मिकतेतून बुद्धीप्रामाण्यवादाकडे ही वाटचाल असावी यावर सर्व शिक्षणतज्ञांचे एकमत होते. मानवतावाद, मानवी मूल्ये व वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्ये रुजविल्यास धार्मिकता, अध्यात्मिकता, व त्याचे अपत्य असलेली भिक्षावृत्ती यातून पुढची पिढी मुक्त होण्याची शक्यता आहे असे लेखिकेला वाटते.

सध्याच्या धार्मिक व मूलतत्ववादाच्या उन्मादाच्या मगरमिठीतून सुटका होण्यासाठी मानवी परिस्थितीतच मूल्यांचे श्रोत शोधणे गरजेचे आहे. यासाठी वर्तनवादीशास्त्र, जनुकशास्त्र, मानववंशविज्ञान, पर्यावरण या विज्ञानशाखांकडे वळायला हवे. लेखिकेच्या मते मानवी मेंदूची विशिष्ट रचना तसेच जनुकीय परिणामांची दखल घेतल्याशिवाय मानवी प्रेरणांची उकल होणार नाही. एकपेशीय प्राण्यांपासून प्रगत मानवापर्यंतच्या उत्क्रांतीचा आढावा घेत असताना त्यांच्या प्रेरणेत कशा प्रकारे बदल होत गेला याचे एक चित्र तिने उभे केलेले आहे.

मुला-मुलींच्या भावनिक विकासाकडे शिक्षक व पालक पुरेसे लक्ष देत नाहीत अशी खंत लेखिका व्यक्त करते. मुला-मुलींचे ज्ञान व बौद्धिक क्षमता यांचे मूल्यमापन नेहमी केले जाते. परंतु भावनिक विकास, त्यांचा वर्तनावर होणारा परिणाम, एखाद्या कृतीमागील प्रेरणा यांचेही मूल्यमापन होणे गरजेचे आहे. नाही तर शाळांमधून देत असलेल्या मूल्यशिक्षणाला अर्थ राहत नाही. उदाहरणार्थ, मनुष्य स्वभावानुसार राग येणे काही वेळा आवश्यक आहे. पण तो योग्य कारणासाठी, योग्य वेळी व योग्य प्रकारे व्यक्त झाला पाहिजे. योग्य कृतीत त्याची परिणती झाली पाहिजे. भावनांच्या उद्रेकामुळे उत्पन्न होणारा मानसिक त्रास कसा हाताळायचा, त्याचा मुकाबला कसा करायचा यावर भर देणे हाही मूल्यशिक्षणाचा भाग बनला पाहिजे. भावनोद्रेकामुळे उत्पन्न होणारा मानसिक त्रास केवळ वैयक्तिक बाब म्हणून दुर्लक्ष करता येत नाही. कारण त्याचे परिणाम सामाजिक मूल्यप्रणालीवर होऊ शकतात. त्यामुळे मूल्यांचे स्पष्टीकरण, मूल्यप्रणालीचा विकास व मूल्यामधील संघर्ष यांचाही परिचय मूल्यशिक्षणाचा भाग झाला पाहिजे.

25-30 पानांची ही पुस्तिका आशयघन असून आज आपल्यासमोर 'आ'वासून उभे राहिलेल्या नवीन पिढीतील मूल्यांच्या र्‍हासाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक स्तुत्य व प्रामाणिक प्रयत्न लेखिकेने केला आहे. या सुदीर्घ निबंधाबद्दल चर्चा होऊन काही ठोस पावले उचलल्यास पुढची पिढी नक्कीच आपल्याला कृतज्ञ राहील!

मूल्यशिक्षण
सुमन ओक,
प्रयास, पुणे (2001)
किं 25 रु, पृ. सं : 3०