लेखक, कथाकथनकार, आर्किटेक्ट, व्हायोलिन, हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेडं असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणुनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर आणि विचारांवर आधारित असणाऱ्या, मनांचे कंगोरे उत्तम निरीक्षणांमुळे मांडता येणाऱ्या , विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एक व्यक्ती, विचार-आचारांची पध्दत. वपु त्याला `पॅटर्न' म्हणायचे. वपुंनी पॅटर्न्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या अवती-भवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटर्न्सला दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता हसवता एक शल्य भिडत राहतं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तर्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. आणि मग वपु काळे ह्यांना महाराष्ट्र सरकार उत्तम लेखकाचा मानसन्मान देतं. `पु.भा. भावे' पुरस्कार त्यांना पुरस्कृत करतो. फाय फाऊंडेशन त्यांच्या साहित्याची दखल घेऊन सन्मानित करते आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद बहाल केलं जातं. अनेक `रंग मनाचे' दाखविणाऱ्या वपुंना अनेकजण आपला `पार्टनर' मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. 25 मार्च 1932 ते 26 जून 2001... आणि गणती पुढे चालूच आहे. कारण व. पु. काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा `हुंकार' अजूनही `वन फॉर द रोड' करता दिला-घेतला जातोय. हा `दोस्त' असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार