वाचले असल्यास संकेताची गरज नाहीच कारण वेच्यातच कितीतरी संकेत आहेत.
गरज पडली तर अवश्य संकेत देईन.

या वेच्याचे उत्तर 'वल्ली'ने विक्रमी वेळेत ओळखल्याबद्दल त्याचे अभिनंदन
चित्रा यांचेही अभिनंदन. त्यांनीदेखील एकाच प्रयत्नात वेच्याचे उत्तर ओळखले आहे.
दिग्गज पुस्तकप्रेमी वाचक दिगम्भा यांनीही लगेच ओळखले आहे तेव्हा उत्तर जाहीर करतो आहे.

*** सर्व विजेत्यांचे अभिनंदन ***

या कोड्याला २ विजेते मिळाले असल्यामुळे संध्याकाळी उत्तर जाहीर करेन. पण बाकीच्यांसाठी एकमेव संकेत देतो आहे खाली.

एकमेव संकेतः या लेखकाची अनेक पुस्तके प्रसिद्ध असली तरी या पुस्तकातील एक पात्र त्यांची मानसकन्याच म्हणून ओळखली जाते. तिची मोहिनी एवढी आहे की सुहास शिरवळकरांसारख्या लोकप्रिय कादंबरीकारालाही या मानसकन्येबद्दल स्वतःच्या कादंबरीत उल्लेख करण्याचा मोह आवरला नाही. वेच्यात शेवटी थोडा बदल करुन शब्द ठळकवले आहेत. त्यावरुन पुस्तक ज्यांनी वाचले नाही त्यांनाही ओळखता यावे.

कोड्याचे उत्तरः
पुस्तकाचे नाव : शितू
लेखक : गो.नी. दांडेकर
वेच्याचे पुस्तकातील स्थान : प्रकरण १२ मधील (पान क्रमांक १०२- १०३)

वेचा:
---------------------
आप्पांच्या बाबतीत गावानं आपला नेम मोडला. आयाबायाही आप्पांच्या प्रेतयात्रेबरोबर चालू लागल्या. आप्पा देवमाणूस! त्यांना पोचवायला जाण्यात कसलं भय? कसली लाज?
कोळी, खारवी, भंडारी - सगळे आपापली भांडणं विसरले. गौर्‍यानं कीचकाचा मेकप काढला नव्हता अजून. तसाच तो अभंग सांगू लागला,
" आपुलें मरान पाहिलें म्या डोला |
तो जाहला सोहोला अनुपम्ये ||"
कुबडा सुडक्या एकतानतेनं नाल वाजवू लागला. पिलूबुवा मलुष्ट्यानं दुसरा अभंग सुरु केला -
" प्रेतरुप झाला शरीराचा भाव |
लक्षियेला ठाव स्मशानींचा || "

सगळी भजनी मंडळी गहिवरुन अभंग गाऊ लागली. आता भांडायचं काही कारण राहिलं नाही. ज्यांच्या जिवावर भांडणं खेळायची अन् मिटवायची ते आप्पा आता शांतपणे चौघांच्या खांद्यांवर पहुडले आहेत. त्यांच्या मुखावरलं तेज अजून मावळलं नाही. जणू काय ते रात्रभरच्या दगदगीनं थकून शांतपणे झोपले आहेत!

पाटाच्या कडेकडेनं आणि माडांच्या अन् कोकमींच्या सावल्यांतून संथपणे यात्रा चालली होती, अन् त्या यात्रेच्या अगदी शेवटी होती विसू आणि शितू
---------------------