[कोड्याचे उत्तर जाहीर केले आहेच....पण कोड्याच्या सेटअपमध्ये एकाच पुस्तकाचे नाव प्रकाशित करता येते; इथे तर ८ पुस्तकांची नावे घेणे तसे गरजेचे आहे, पण तांत्रिकदृष्ट्या तसे होणार नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात जी.ए.कुलकर्णी यांचे 'काजळमाया' हेच पुस्तक देत आहे. धन्यवाद]
आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय असलेला "ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.." या खेपेस थोड्या वेगळ्या प्रकारे द्यावा असे वाटले म्हणून सर्वश्री सागर आणि वल्ली याना 'या खेपेस मी तो देत आहे' अशी विनंती केली, जी त्यानी मानली, म्हणून हा प्रयत्न.
या कोड्याचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे मी वाचकास, [संकेत म्हणून नव्हे तर] थेट लेखकाचे नाव सांगणार आहे आणि मला खात्री आहे की या लेखकासाठी प्रत्येकाच्या हृदयी एक आदराचे स्थान आहे. साहित्य वाचले असेलच, नसले तरी या निमित्ताने त्या कथा शोधण्याची तीव्र उर्मी मनी दाटेल असाही विश्वास आहे.
कथा म्हटले की....साहजिकच मी "जी.ए.कुलकर्णी" यांचेच प्राधान्याने नाव घेईन. तर या प्रतिभावंत लेखकाच्या विविध आठ कथासंग्रहातील मी फक्त "एक ओळ...एखादे नाव....एखादा प्रसंग" इथे देईन, वाचकांनी ती कथा कुठली हे ओळखावे. (कथा कोणत्या संग्रहात समाविष्ट केली आहे हे सांगितले तर छानच, पण नसले तरी काही बिघडत नाही, कारण मी उत्तराच्यावेळी त्या त्या कथासंग्रहाचे नाव देणार आहेच.)
एकूण आठ गोळ्या आहेत....आवडेल त्यांचा स्वाद तुम्हाला :
१. "मंगल पाप !" [हे कर्नाटकी मराठीतील खास उदगारवाचक वाक्य आहे. इथे 'पाप' याचा अर्थ 'बिचारी' असा होतो. मंगल ही एक छोटी मुलगी असून ती पोलिओग्रस्त आहे.]
२. "गौतमा, मी अश्वत्थामा आहे."
३. "शप्पथ, कशी माती खाल्ली देव जाणे. बाच्या शप्पथ, पुन्हा कधी नाही..."
४. "मालक, मला तर टांगाघोडा बरा दिसतो."
५. "तिचं नावच आहे मुळी 'डॉक्टर्स व्हिस्की'. बंगळुरी माल आहे."
६. "आणि अखेरचे शब्द - बिडी एक आणा.."
७. "डोंबा, ही माझी वस्त्रे घेऊन जा...!"
८. "अल्थीया कोण म्हणून त्याने विचारल्यास मी काय सांगू?"
श्री.जी.ए.कुलकर्णी यांच्या ८ कथासंग्रहातील प्रत्येकी एका संग्रहातील वरील आठ छोटी वाक्ये आहेत. यापैकी क्रमांक ७ व ८ तर झटकन ओळखून येतील असा माझा विश्वास आहे. बाकीच्या १ ते ६ साठी 'संग्रह' चाळावे लागतील.
कोड्याचा हा प्रकार आवडेल असे वाटते.
इन्द्रा
खूपच छान कोडे
एक झक्कास कोडे घातलेत इंद्रराज तुम्ही.
जीएंचे साहित्य खूपच कमी वाचलेले असल्याने माझ्यासाठी तरी हे कोडे (कोडी) अवघडच आहे. तरी होता होईतो प्रयत्न करेनच.
अजून एक विनंती
या कोड्याच्या निमित्ताने इंद्रराज पवारांना एक विनंती की त्यांनी जी.एं. चा अधिक परिचय (जी.ए. -एक माणूस व एक लेखक म्हणून) पुविच्या इतर सभासदांना करून द्यावा. (निदान मला तरी जी.एं. बद्दल जास्त माहिती नाही व अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे)
इंद्रराज हे काम आनंदाने स्वीकारतील याची खात्रीच आहे.
In reply to अजून एक विनंती by वल्ली
जी.एं. चा अधिक परिचय
जरूर, वल्ली....हे काम मी मोठ्या आनंदाने करीन. हातात काही कामे आहेत [अर्थात पोटापाण्याशी संबंधित...] त्यातून थोडासा निवांतपणा मिळाला की लगेच या लेखाच्या मागे लागेन. शुअर !
इन्द्रा
पास...
पास...
In reply to पास... by निखिल देशपांडे
पास...??
"पास...?" अहो, तुम्ही तर संपादक मंडळाचे आधारस्तंभ आणि तुम्हीच जर झटक्यात 'पास' केलात तर बाकीच्या सदस्यांनी काय करावे?
जीए तुमचे आवडीचे असणारच....सो ट्राय ना !
इन्द्रा
सुंदर कोडे
इंद्रराज,
डोक्याला खाद्य देणारे कोडे घातलेत :)
उत्तर सवडीने पाठवेनच.
तूर्तास व्यस्ततेमुळे हा प्रतिसाद :)
In reply to सुंदर कोडे by सागर
मुळात जी. ए. हॆच मराठी
मुळात जी. ए. हॆच मराठी साहित्याला पडलॆलॆ एक मॊठॆ, गूढ-गहन कॊडॆ आहॆ! या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्यॆक संग्रहातील एकॆक संदर्भ दॆवून एक अभिनव `पुस्तककॊडॆ' तयार कॆल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
In reply to मुळात जी. ए. हॆच मराठी by विष्णु वडेर
जीए नावाचे कोडे....!
श्री.वडेर....अगदी योग्य निरिक्षण आहे तुमचे. खरंच खुद्द 'जी.ए.कुलकर्णी' हेच मराठी साहित्याला पडलेले एक गूढ पण अदभुतरम्य असे स्वप्न होते, आजही आहे....अन् उद्याही राहिलच.
कथा जर तुम्ही वाचल्या असतील (वाचल्या असणारच...ही खात्री आहेच) तर कोडे सोडविण्याचा जरूर प्रयत्न करा.
इन्द्रा
पास
(सर्वाना माहित आहेच की) मी जी ए फारसे वाचलेले नाहीत :(
तेव्हा पास
क्रमांक २ व ७
सांगण्यास आनंद होतो की, 'स्पिन डॉक्टर' यानी या कोड्यात प्रथमच भाग घेतला आणि क्रमांक २ आणि ७ च्या कथा (तसेच त्या कोणत्या संग्रहात आहेत) ओळखल्या....त्याबद्दल त्यांचे अभिनंदन !
इन्द्रा
२ ओळखले
दुसरे व सहावे सोपे होते म्हणून ओळखता आले.
अजून २ मी ओळखू शकेन असे वाटत आहे. ते उद्या कळवेन इंद्रराज यांना :)
दोन्ही उत्तरे बरोबर...!!
सागर यानी (मी अपेक्षिल्यानुसार) दोन्ही उत्तरे बरोबर दिली आहेत....अगदी 'कथासंग्रहांच्या नावासहीत.
उरलेली ६ उत्तरे देखील ते शोधून काढतील असा विश्वास आहे.
इन्द्रा
पाच वाक्य
वाक्य १: मुखवटा-निळासावळा
वाक्य ४: हिरवे रावे
वाक्य ५: सोडवण- रक्तचंदन
वाक्य ७: विदूषक-काजळमाया
वाक्य ८: इस्किलार- रमलखुणा
ही वाचताक्षणी आली.
बाकीची सांगायचा प्रयत्न करते पुस्तकं चाळून.
In reply to पाच वाक्य by मणिकर्णिका
जी.ए. यांच्या कथा.....!
मणिकर्णिका....
तुमचा इथला हा पहिलाच प्रतिसाद आणि "कोडे" प्रकारातही प्रथमच भाग घेत असल्याने थोडासा गोंधळ झाला आहे असे दिसते. कोड्याचे उत्तर इथे द्यायचे नसते, ते "व्यक्तिगत संदेश" या सोयीची उपयोग करून तिथे उत्तर देण्याचा नियम आहे. जेणेकरुन कोडे विचारणारी व्यक्ती आणि उत्तर देणारी व्यक्ती यांच्यात ते 'सिक्रेट' राहते व अन्य सदस्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत राहतात. पण असो....ही चूक तुमच्याकडून अजाणतेपणी झाल्याने त्याबद्दल आता काही करता येणार नाही.
तुम्ही दिलेली सर्व उत्तरे साहजिकच बरोबर आहेत, त्यावरून तुम्ही जी.ए.कुलकर्णी प्रेमी आहात हे सिद्धच झाले, पण आता येथील अन्य सदस्य वरील कथांचा शोध घेणार नाहीत, याचे वाईट वाटते.
असो...राहिलेल्या कथादेखील तुम्ही नक्कीच शोधुन काढाल याचा विश्वास वाटतो..
इन्द्रा
खरंच आहे. मी या संकेतस्थळावर
खरंच आहे.
मी या संकेतस्थळावर नवीन आहे. वर उत्तर मिळाले असूनही लिहीलेले नाही यावरुन मला शंका आलीच होती. पण 'व्य.नि' वगैरे प्रकार मला ठाऊक नव्हते. उत्तरं मला येत असल्याने मी ती फटकन लिहूनच टाकली मग.
पुढे हा प्रकार लक्षात ठेवीन.
तुम्ही वाटल्यास तो प्रतिसाद डीलीट करु शकता. मी प्रयत्न केला पण करता आला नाही. कदाचित धागा सुरु करणारयाकडे तसे अधिकार असतील.
In reply to खरंच आहे. मी या संकेतस्थळावर by मणिकर्णिका
नो डीलेशन...!!
"....तुम्ही वाटल्यास तो प्रतिसाद डीलीट करु शकता...."
~ अरे छोडो ये बात | डीलीट कशाबद्दल करायचे तुमचे इतके छान आणि अचूक उत्तर? खुद्द मीही ज्यावेळी 'कोडे' प्रकारात प्रथमच भाग घेतला होता त्यावेळी 'उत्तर कुठे द्यायचे?' याबाबत गोंधळलेलोच होतो, पण थेट उत्तर देण्यापूर्वी त्या कोड्याच्या मागील काही कोडी आणि उत्तर देण्याची पध्दत पाहिली आणि कळाले की, त्या त्या कोडेप्रस्तुतीकाराला 'व्यक्तिगत संदेश' मधून प्रथम उत्तर पोच करायचे आणि जर ते बरोबर असेल तर ते त्याच्यामार्फतच इथे "ओपनली" विजेत्याच्या नावासह जाहीर केले जाते. हा एक आपापसात वाचनाची आवड, लेखकाची ओळख, अधिक वाचन आदी प्रकारासाठी अत्यंत उपयुक्त असा धागाप्रकार आहे.
असो...पण या निमित्ताने एका 'जी.ए.कुलकर्णी' वाचकाची ओळख तरी झाली. तुम्ही स्वतःही त्यांच्या एक वा अनेक कथांवर वरीलप्रमाणे [वा वेगळ्यारितीने] कोडे तयार करून इथे प्रकाशित करू शकता.....ट्राय इट !
इन्द्रा
हरलो बुवा
मी तर हरलो बुवा. पण जी. एं चे साहित्य वाचण्याची उर्मी आता चांगलीच जागृत झाली आहे. हळू हळू जी. एं. ची पुस्तके घेईनच. पण सुरुवात कुठल्या पुस्तकापासून करू. बेस्ट ऑफ जी. ए. कोणते?
In reply to हरलो बुवा by वल्ली
वल्ली मित्रा, इंद्रराज
वल्ली मित्रा,
इंद्रराज सांगतीलच. पण मी वाचलेल्यांपैकी
इस्किलार- रमलखुणा
आणि काजळमाया
याने सुरुवात करायला हरकत नसावी :)
जी.ए. वाचन क्रम....!!
"....इस्किलार- रमलखुणा आणि काजळमाया याने सुरुवात करायला हरकत नसावी ...."
~ यातही प्रथम "काजळमाया" असू दे. "रमलखुणा" तर अगदी शेवटी. "काजळमाया" नंतर जी.ए. नावाचे भूत मानगुटीवर असे काही बसते की ते तुम्हाला दुसर्या झाडाला धरूच देत नाही. [मात्र यातील कथा रात्रीच्या निवांतसमयी वाचण्याचा...अन् तेही 'मोबाईल' नावाची डोकेदुखी ऑफ करून....प्रघात ठेवा....भुतालाही ते आवडतेच]. या नंतर खालील क्रम असला तरी चालेल :
१. निळासावळा, २. पारवा, ३. हिरवे रावे, ४. रक्तचंदन, ५. पिंगळावेळ, ६. सांजशकुन आणि अगदी शेवटी ७. रमलखुणा ~ यातील अल्थीया वेड लावते.
(वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व कथासंग्रह अगदी दिमाखात सर्वत्र उपलब्ध आहेत....जय पॉप्युलर भटकळ !)
इन्द्रा
In reply to जी.ए. वाचन क्रम....!! by इंद्रराज पवार
धन्यवाद
धन्यवाद सागर, इंद्रराज.
लवकरच जी..एं. ची पुस्तके विकत घेउन येईन.
अवांतर: जी. एं. नी अनुवाद क्षेत्रातही बरेच काम केलेय असे ऐकिवात आहे. विशेषतः कॉनरॅड रिश्टरची बरीच पुस्तके त्यांनी मराठीत आणली आहेत. त्यांच्या अनुवादाबद्दलही अधिक माहिती मिळाल्यास दुधात साखरच.
In reply to धन्यवाद by वल्ली
जी.ए. आणि अनुवाद....!!
"...त्यांच्या अनुवादाबद्दलही अधिक माहिती मिळाल्यास दुधात साखरच...."
~ होय, वल्ली. त्यांचे इंग्लिश वाचन अफाट म्हणजे अफाटच होते. त्याबद्दल ते म्हणतात, "माझे जे वाचन आहे, ते अगदी मनमुराद रानभटकंतीसारखे आहे. ज्या पुस्तकांना इतर माणसे काठीनेदेखील स्पर्श करणार नाहीत अशी पुस्तके, ती निव्वळ मला आवडतात म्हणून मी रानवट एकांडेपणीने वाचली आहेत. "नॅशनल जिऑग्राफिक" चे अंक तर इतर लोक, मटका अंदाज वाचतात त्या हावरेपणाने वाचले...." अशाच काही वाचनातून त्यानी मराठीत काही सुरेख अनुवादही केले आहेत. पण त्यांचे वाचन तुम्ही 'कथासंग्रह' पूर्ण केल्यानंतरच हाती घ्या.
खालील लिंकवर तुम्हाला जी.ए.कुलकर्णी यांच्या सर्वच साहित्य लेखनाची यादी मिळेल.
http://www.gakulkarni.info/pages/entirelist.html
इन्द्रा
In reply to जी.ए. आणि अनुवाद....!! by इंद्रराज पवार
सुंदर दुवा दिलात इंद्रराज
मस्तच
जी.ए.कुलकर्णी यांचे समग्र साहित्य यानिमित्ताने कळाले :)
दुव्याबद्दल धन्यवाद इंद्रराज
In reply to सुंदर दुवा दिलात इंद्रराज by सागर
+१
हेच म्हणतो.
जी.ए. कुलकर्णी कथाकोडे....!
श्री.वल्ली यानी नवीन कोडे दिले असल्याने आता 'जी.ए.कुलकर्णी कथा' या कोड्याचे उत्तर जाहीर करणे योग्य आहे असे वाटते :
१. "मंगल पाप !" ~~ 'मुखवटा' : 'निळासावळा' कथासंग्रह
२. "गौतमा, मी अश्वत्थामा आहे." : "भेट" : 'सांजशकुन' कथासंग्रह
३. "शप्पथ, कशी माती खाल्ली देव जाणे. बाच्या शप्पथ, पुन्हा कधी नाही..." : "नाग" : 'पारवा' कथासंग्रह
४. "मालक, मला तर टांगाघोडा बरा दिसतो." : "गिधाडे' : 'हिरवे रावे' कथासंग्रह
५. "तिचं नावच आहे मुळी 'डॉक्टर्स व्हिस्की'. बंगळुरी माल आहे." : "सोडवण" : 'रक्तचंदन' कथासंग्रह
६. "आणि अखेरचे शब्द - बिडी एक आणा.." : 'स्वामी" : "पिंगळावेळ: कथासंग्रह
७. "डोंबा, ही माझी वस्त्रे घेऊन जा...!" : "विदूषक" : "काजळमाया" कथासंग्रह
८. "अल्थीया कोण म्हणून त्याने विचारल्यास मी काय सांगू?" : "इस्किलार" : "रमलखुणा" कथासंग्रह
उत्तरे दिलेल्या आणि प्रतिसाद दिलेल्या सर्व जी.ए. प्रेमी सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
इन्द्रा
In reply to जी.ए. कुलकर्णी कथाकोडे....! by इंद्रराज पवार
धन्यवाद
धन्यवाद इंद्रा, आता जी. एं. च्या परिचयाची वाट पाहतोय तुमच्याकडून.
सुरेख धाग्याबद्दल धन्यवाद ...
पारवा वगळता बहुतेक सर्व पुस्तके मी वीसेक वर्षांपूर्वीं वाचली होती. फक्त डोंबाचा संदर्भ आठवला. बाकी काहीही आठवले नाही. त्यामुळे मला शून्य गुण मिळायला हरकत नाही. (मागील बाकावरील - बॅकबेंचर - विद्यार्थ्यांचा विजय असो.) पुन्हा सर्व पुस्तके पुन्हा वाचावी लागणार. पारवा चा नंबर पहिला. अर्थात ती किती वेळा वाचली तरी कमीच.
In reply to सुरेख धाग्याबद्दल धन्यवाद ... by सुधीर कांदळकर
स्वागत...!!
सुधीर जी.....पुस्तकविश्वच्या कुटुंबात तुमचे मनःपूर्वक स्वागत....अन् त्यातही तुम्ही 'जी.ए.कुलकर्णी' नावाच्या झपाटून टाकणार्या झाडाच्या सावलीतीलच असल्याने तिथे आम्हीही आहोत हे लक्षात घेतल्यास आपल्यासमवेत अशाच साहित्याची बैठक रंगतदार होत जाणार यात संदेह नाही.
केवळ प्रतिसादच नव्हे तर संबंधित विषयावर इथे नित्य लिखाणही करावे तुम्ही...अशी विनंती आहे.
इन्द्रा