Submitted by प्रभाकर नानावटी on

भारताला स्वातंत्र्य द्यायच्या वेळी ब्रिटिशांची मुत्सद्देगिरी भारत - पाकिस्तान अशा विभागणीपुरतीच मर्यादित नव्हती. तर देशाचा एक-तृतियांश भाग 600 छोट्या - मोठ्या संस्थानिकामध्ये वाटून पुढील राज्यकर्त्यांच्यापुढे एक जबरदस्त आव्हान देण्यातसुद्धा होती. परंतु सरदार पटेलसारख्या खंबीर व्यक्तीने हे आव्हान पेलून काही काळातच भारताला अखंडत्व प्राप्त करून दिले. ब्रिटिशांची जुलमी सत्तेचे प्रत्यंतर सर्वाना येत होते. परंतु संस्थानिकांची मनमानी कारभारात रूढी परंपरेला चिकटून बसलेल्या संस्थानातील सर्वसामान्यात स्वातंत्र्य, समता, लोकशाही इत्यादी मूल्ये रुजविणे फार जिकिरीचे काम होते. आपापल्या राजे-रजवाड्यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी प्रजेला उद्युक्त करावे लागत असे. अशाही परिस्थितीत सामाजिक व राजकीय सुधारणेच्या निकडीचे भान असलेले कार्यकर्ते नेटाने संस्थानामध्ये काम करत होते. महाराष्ट्रातील दक्षिणेकडच्या संस्थानामध्ये काम केलेल्या वामनराव पटवर्धन या भारत सेवक समाजाच्या कार्यकर्त्याच्या कार्याचा व कर्तृत्वाचा परिचय करून देणारे वामनराव पटवर्धन: कार्य व कर्तृत्व हे पुस्तक ज.शं. आपटे यांनी लिहिले आहे. या कार्यकर्त्याभोवती प्रसिद्धीचे वलय नसल्यामुळे आपल्या पिढीतील लोकांना हे नाव, कदाचित, ऐकूनसुद्धा माहीत नसणार. परंतु त्या काळात त्यानी केलेले प्रयत्न, त्यांची तळमळ, खंबीरपणा, जिद्द, हे सर्व नोंद घेण्यासारखे आहे, हे पुस्तक वाचल्यानंतर कळते.

12 जून 1905 रोजी फर्गसन महाविद्यालयाच्या टेकडीवर सूर्योदयापूर्वी भारताच्या सेवेसाठी, सुधारणेसाठी व कल्याणासाठी शपथ घेणार्‍या ना. गोखले यांच्या सोबत असलेल्या तीन सहकार्‍यामध्ये वामनराव पटवर्धन (1873-1939) होते. सुशिक्षित तरूण मंडळींनी त्यागाची व देशकार्यास समर्पण करून घेण्याची वृत्ती प्रकट करावी या गोखलेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हयातभर सेवाव्रताचे काम करणारे वामनराव यांचा भारत सेवा संघ (सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी) या संस्थेच्या कार्यामध्ये स्थापनेपासूनच फार मोठा सहभाग होता. भारतसेवकाने पार पाडावयाचा कार्यक्रम व प्रत्येक कार्यकर्त्याने पाळावयाच हवी असलेली सप्तव्रते यांचा तपशील वाचल्यास आजही त्यांची तेवढीच गरज आहे असे वाटू लागते. स्वार्थ साधण्यासाठीच राजकीय व सामाजिक कार्याचा आव आणणार्‍यांना मागच्या पिढीत निष्कामपणे व व्रतस्थवृत्तीने कार्य करणारे शेकडो कार्यकर्ते होते, यावर विश्वास बसणार नाही.

ना. गोखले यांच्याबरोबर कांग्रेसच्या इंडिया या नियतकालिकासाठी वर्गणीदार वाढविणे, संकल्पित रानडे अर्थशास्त्र संस्थेसाठी निधीसंकलन करणे, पत्र-व्यवहार करणे इत्यादी कामे भारत सेवक समाजासाठीची पहिली काही वर्षे यांनी केली. परंतु याहीपेक्षा मुद्रक व प्रकाशक म्हणून वामनराव पटवर्धन यांचे कार्य जास्त उद्बोधक आहे. मुद्रक व प्रकाशक म्हणून वामनराव यांनी 30-32 वर्षे काम केले. आर्यभूषण व ज्ञानप्रकाश या छापखान्यांचे मालकी हक्क भारत सेवक समाजाकडे आल्यानंतर या दोन्ही मुद्रणालयांच्या व्यवस्थापनाची जवाबदारी ना. गोखले यांनी वामनराव यांच्यावर सोपविली. 1936 मध्ये लागलेल्या प्रचंड आगीत संपूर्ण छापखाना भस्मसात झाला. संस्थेला फार मोठे नुकसान सोसावे लागले. तरीही नाउमेद न होता व्यवस्थापक म्हणून वामनराव यांनी मुद्रणालयाची पुन्हा उभारणी केली. त्यासाठी निधीसंकलन केले. सर्व कामागारांनी विनावेतन काम केले. कामगारांच्या श्रमातून पुण्यातील फर्गसन रस्त्यावर ही इमारत उभी राहिली. आर्यभूषणची मालकी जरी भारत सेवक समाजाकडे होती तरी वामनरावांचे सर्व राजकीय पुढार्‍यांशी व कार्यकर्त्यांशी स्नेहाचे संबंध होते. त्यांनी आपल्या संस्थेच्या व्यवसायात भेदभाव मुळीच दाखविला नाही न कोणाचीही अडचण होऊ दिली नाही.

मुद्रण व्यवसाय हाही देशसेवेचा भाग आहे अशीच त्यांची मनोमन खात्री होती. इंग्रजी, देवनागरी, गुजराथी, कन्नड, उर्दू लिपीतून छपाईचे काम केले जात असे. अनेक वर्तमानपत्रे, साप्ताहिके, इंग्रजी, मराठी, गुजराती नियतकालिके ग्रंथ इत्यादी येथे छापली जातं. म.गांधीजींच्या हरिजन या साप्ताहिकाची छपाईसुद्धा काही काळ या छापखान्यात होत असे. कामगारांसाठी पतपेढी, प्रॉव्हिडंट फंड, बोनस, वेल्फेअर फंड यांचीसुद्धा वामनराव तरतूद करत असत. मुद्रण व्यवसायातील अडचणी व पुढील कार्यक्रमांचा आढावा घेणारे, 1937मध्ये मुद्रण परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने पटवर्धन यांनी केलेले भाषण आजही मार्गदर्शक ठरणारे आहे.

वामनराव मूळचे सांगलीचेच असल्यामुळे त्यांचा सांगली, मिरज, बुधगांव, जमखंडी या संस्थानांच्या अधिपतींशी घनिष्ट संबंध होता. या संस्थानिकांच्या मुलांना शिकवत असल्यामुळे त्यांना 'मास्तर' म्हणून संस्थानिकांचा परिवार ओळखत असे. अशा संस्थानातील प्रजेला लोकशाही म्हणजे काय, संस्थानाच्या बाहेरच्या जगात काय चालले आहे याची कल्पना देण्यासाठी, त्यांचे प्रबोधन करण्यासाठी संस्थानी स्वराज्य नावाचे नियतकालिक त्यांनी चालविले. या भागातील संस्थानी चळवळीस योग्य दिशा, उठाव व कार्यक्रम देण्यात संस्थानी स्वराज्याचा व वामनरावांचा वाटा फार महत्वाचा होता. केसरीकार न.चिं. केळकर व वामनराव यानी पुढाकार घेऊन संस्थानिकांच्या अधिपत्याखाली जवाबदार राज्य पद्धती राबविण्यासाठी अखिल भारतीय संस्थान लोकपरिषदेची स्थापना केली. वेगवेगळ्या संस्थानात तिची अधिवेशने भरविण्यात आली. ब्रिटिश सरकारचा संस्थानासंबंधीचा दृष्टिकोन, संस्थानिकांची वृत्ती प्रवृत्ती, जनतेला प्रशासनात सहभाग व योग्य प्रतिनिधित्व इत्यादी अनेक महत्वाच्या प्रश्नासंबंधीची चर्चा या अधिवेशनांत होत असे. भोर, औंध, फलटण, सांगली, कोल्हापूर, जमखंडी, मिरज, बुधगांव, या संस्थानातील जनतेला लोकशाही हक्क मिळवावेत म्हणून वामनराव यांनी भरपूर प्रयत्न केले. सभा, परिषदा, संमेलने भरवून जनता व संस्थानिकांसमोर आपली मते व उद्दिष्टे निर्भिडपणे ते मांडत होते.

भौगोलिक, राजकीय व सामाजिक परिस्थितीमुळे प्रत्येक संस्थानाच्या वेगवेगळ्या समस्या होत्या. संस्थानिकांच्या लहरीप्रमाणे कारभार चालत असे. अनेक हितसंबंधांचा गुंता होता. मान सन्मानाच्या चित्रविचित्र कल्पना होत्या. परंतु वामनराव समस्येच्या मुळांशी जाऊन उत्तरं शोधत असत. स्वत: उदारमतवादी असल्यामुळे दोन्ही बाजू नीटपणे ऐकून व्यवहारी, व्यापक व प्रयोगशील दृष्टेकोनातून निर्णय देण्याकडे व कार्यवाही करण्याकडे त्यांचा कल असे. अडी-अडचणीच्या प्रसंगी तडजोडीने काम करणे व लहानांपासून थोरांपर्यंत अत्यंत प्रेमाने वागणूक देणे यावर त्यांचा भर असे.

लेखकाने संस्थानातील परिस्थिती व त्यांच्या समस्या इत्यादीबद्दल अभ्यास करून त्यावेळचे चित्र उभे केले आहे. वामनरावांची संपूर्ण ओळख व्हावी यादृष्टीने अनेक संदर्भ तपासून व आवश्यक अशी अनेक परिशिष्टे जोडून एक ऐतिहासिक दस्तावेज तयार करण्याची जवाबदारी लेखकानी पूर्ण केली आहे.

मागच्या पिढीतील कार्याकडे तुसडेपणाने बघण्याच्या दृष्टीमुळे आपण काही चांगल्या गोष्टींना मुकत आहोत याची कल्पना नसते. अनुभवांचा एवढा मोठा साठा असताना अनेक वेळा आपण उगीचच चाचपडत असतो. दरवेळी रिइन्व्हेंटिंग द व्हील करून वेळ, शक्ती व श्रम वाया घालवित राहतो. त्या दृष्टीने अशा प्रकारच्या पुस्तकांचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.

वामनराव पटवर्धन: कार्य व कर्तृत्व
ज.शं. आपटे,
हिंद सेवक संघ (1998)
किं रु 75