गरीब, दलित, व अनाथ यांच्याबद्दल केवळ कणव व दया असून भागत नाही. तर ज्या समाजामध्ये तुम्हाला परिवर्तन घडवून आणायचे आहे, समाजातील जी दुखणी दूर करायची आहेत ती मुळात उद्भवणारच नाहीत, अशी समाजरचना निर्माण करण्यासाठी सामाजिक संदर्भाचा आणि समाजरचनेच्या जडणघडणीचा शास्त्रीय अभ्यास व विचार केला पाहिजे.
या विचाराने प्रेरित होऊन आयुष्यभर समाजकल्याणाच्या कार्याला वाहून घेतलेल्या डॉ. शरश्चंद्र गोखले यांनी आपल्या सार्वजनिक कार्याचा व कार्यासंदर्भातील चिंतनाचा आढावा माझ्या सार्वजनिक जीवनाची बखर या पुस्तकात घेतला आहे. पत्रकारितेचा वडिलांकडून मिळालेला वारसा व आवड असूनसुद्धा अगदीच 'बेभरवशा'च्या समाजकार्याची निवड त्यांनी त्याकाळी केली. शास्त्रीयदृष्ट्या विचार करून व्यवस्थितपणे नियोजन केल्यास समाजकल्याण व समाजविकास यासारख्या क्षेत्रांतही भरीव कामगिरी करता येणे शक्य आहे, याचा प्रत्यय पुस्तक वाचताना जाणवतो. भान राखून योजना आखल्या पाहिजेत व बेभान होऊन त्या अंमलात आणायला हव्यात, याप्रमाणे त्यांनी हयातभर काम केले आहे.
आपल्या सार्वजनिक जीवनाचा आढावा घेताना डॉ. गोखले, तरुण वयात त्यांच्या संपर्कात आलेल्या अच्युतराव पटवर्धन, काकासाहेब गाडगीळ, कॉम्रेड डांगे, केशवराव जेधे, प्रा. स. वा. कोगेकर इत्यादी प्रमुख विचारवंतांचा आवर्जून उल्लेख करतात. गांधीवादी व मिशनरी कार्यकर्त्यांच्या कार्याचेही त्यांना आकर्षण वाटे. या सर्वांच्या प्रभावामुळे मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत लेखकाने स्नातकोत्तर शिक्षण घेतले. याच काळात पाकिस्तानातून आलेल्या निराश्रितांच्या पुनर्वसनाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला.
शिक्षण संपवल्यानंतर गोखले यांनी समाजकल्याण खात्यात नोकरी पत्करली. त्याकाळी समाजकल्याणाचा भर कायदा व सुव्यवस्थेवरच जास्त होता. त्यासाठी गुन्हेगार जमातीवर निर्बंध लादणारा कायदा, भिक्षा प्रतिबंधनाचा कायदा किंवा अनाथ मुलांना कोर्टापुढे आणणारा कायदा हा समाजकल्याणाचा भाग मानला गेला होता. हे सर्व कायद्याचे इलाज वरवरचे आहेत, त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल दिली जाते याची जाणीव झाल्यामुळे सरकारी नोकरीत असूनसुद्धा गोखले यांनी खात्याची ध्येय धोरणे बदलण्याचा सातत्याने प्रयत्न केला. या देशातील सर्व सामाजिक प्रश्नांना दारिद्र्याची व विषमतेची चौकट असल्याने हे थातुर मातुर उपाय कामाचे नाहीत, त्यासाठी नवीन विकासतंत्र आत्मसात करायला हवे, असे त्यांना वाटत होते.
नोकरीच्या निमित्ताने गोखले यांना उन्मार्गी मुले, भिकारी, अपंग, हिजडे अशा समाजातील उपेक्षितांमध्ये प्रत्यक्षपणे काम करण्याचा अनुभव मिळाला. ब्रिटिशांच्या काळी समाजातील उपेक्षितांना दाखल करण्यासाठी रिमांड होम्स, बेगर्स होम्स सारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. तीच परंपरा स्वातंत्र्योत्तर काळातही पुढे चालवली जात होती. "प्रश्न उपेक्षित मुलांचा असो, पतित स्त्रियांचा असो, वृद्धांचा असो, अपंगांचा असो वा भिकाऱ्यांचा असो, संस्थांच्या रेफ्रिजरेटरमध्ये एकदा सामाजिक प्रश्न गोठला म्हणजे समाजाची जबाबदारी संपली असे समजले जात असे." परंतु अशा उपेक्षितांमध्ये कार्य करताना केवळ मायाळू अंतकरण असून चालत नाही, त्यासाठी शास्त्रीय ज्ञानाची जोड असली पाहिजे. हे स्वत:च्या अनुभवावरून गोखले यांनी सिद्ध केले. व्यावसायिक ज्ञान व सामाजिक बांधिलकी हे एकत्र आल्यामुळे अगदी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा काम करता येते, हे पुस्तक वाचताना कळते.
अनाथ बालकांच्या संदर्भात अनेक प्रश्नांची चर्चा लेखक करतात. प्रथमत: मूल म्हणजे मोठ्या माणसाची छोटी आवृत्ती असे समजू नये, त्यालाही स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, याची जाणीव ठेवली पाहिजे, असा लेखकाचा आग्रह आहे. 'उन्मार्गी मुलांच्या बाबतीत घरची शिक्षण पद्धती, परिस्थिती, आईबापांची वागणूक, मित्रांची संगती, प्रलोभन, गरज वगैरे अनेक कारणं त्यांच्या उन्मार्गीपणाला जबाबदार असतात. परंतु समाज मात्र ही कारणं अस्तित्वातच नाहीत अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागत असतो. मूल हे प्रेमावर जगणारे आहे हे आईला कळते, पण 'हाउसमदर'ला समजत नाही. 7-8 वर्षाच्या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवून शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे उच्च मध्यमवर्गातील आई - वडील याचा बोध घेतील अशी अपेक्षा आहे. बालपण हरवलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व वेगळेच बनते, अशी मुले अकालीच प्रौढ होतात ही लेखकाची खंत आहे. म्हणूनच लेखकाला पालकत्वाचे शिक्षण जरूरीचे वाटते.
नोकरीच्या काळात गोखले यांना काही काळ चेंबूर येथील कुष्ठरोग्यांच्या संस्थेतही काम करावे लागले. कुष्ठरोग्यांकडे एक माणूस म्हणून न पाहता एक 'केस' म्हणून पाहण्याची संकुचित दृष्टी अशा संस्थाचालकामध्ये रुजलेली असते. समाजातील संवेदनाहीनतेवर लेखकाने बोट ठेवले आहे. कुष्ठरोग्यांबद्दल समाजात असलेल्या गैरसमजाबद्दल, तिटकार्याबद्दल लेखकाने विस्तृतपणे लिहिले आहे.
चेंबूरच्या संस्थेत कुष्ठरोग्याव्यतिरिक्त अपंग, धडधाकट, वृद्ध, स्त्रिया, मुले इत्यादींना पोलीस रस्त्यावर भीक मागतात म्हणून पकडून आणून येथे सोडत. रस्त्यावरच्या माणसांना गुन्हेगार ठरविणार्या या कायद्यावर व अशा प्रकारचे कायदे पास करणाऱ्या सत्ताधारी वर्गावर लेखक आपला राग व्यक्त करतात. 'दारिद्र्याच्या, कुष्ठरोगाच्या वा अनाथ - अपंगपणाच्या आसुडाखाली झोडपली गेलेली ही माणसं रस्त्यावर आली म्हणून त्यांना गुन्हेगार ठरवणे हा काही उपाय नव्हे.' समाजमनात कायद्याने आमूलाग्र परिवर्तन होऊ शकते, हा एक जोपासलेला भ्रम आहे, असे लेखकाला वाटते.
भीक मागणार्यांबद्दल विचार करताना लेखकाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात: माणसं भीक का मागतात? आपल्याला एखादी वस्तू उसनी मागायची असेल तरी किती ओशाळवाणे वाटत असते. मग सारी लाज सोडून, सारा स्वाभिमान टाकून आपल्या व्यक्तिमत्वाचा नायनाट करत ही माणसे रस्त्यावर एकेक पैसा मागत कशी उभी राहत असतील? साऱ्या वेदना, यातना आणि विरूपता याचे जे लाजिरवाणे प्रदर्शन रस्त्यावर मांडले जाते त्यात सत्य किती आणि नाटक किती? समाज जर या प्रश्नाचे उत्तर न शोधता केवळ दयाबुद्धीने शिळेपाके अन्न त्यांच्या पदरात टाकून सामाजिक जबाबदारी झटकत असेल तर डाव उलटण्याची शक्यता आहे असा इशारा लेखक देत आहेत. अन्नाच्या एकेक घासासाठी तासन् तास रांगा लावून बसलेल्या माणसांना परिस्थितीने लाचार केलेले असते. ही माणसे कुठल्या थराला जावू शकतील याचा नेम नाही. म्हणून त्यांच्याकडे जळते निखारे म्हणूनच बघायला हवे असा धोक्याचा इशारा गोखले देतात.
भारतीय समाजकल्याण संस्थेचे कार्यकारी सचिव आणि आंतरराष्ट्रीय समाजकल्याण मंडळाचा आशिया व पॅसिफिक विभागाचा प्रमुख म्हणून काम करताना या क्षेत्रातील अनेक नामवंतांचा परिचय लेखकाला झाला. संशोधन व अनुलेखन यांची गरज किती आहे याचा आढावा लेखकाने या निमित्ताने घेतला आहे. विकासाची व्याख्या करताना ती पैशामध्ये व करता सर्वसामान्यांना विकासाची संधी कितपत मिळते व त्याचा उपयोग कितपत होतो यावर ठरवावीत, असे लेखकाला वाटते. अडचणीत असलेल्या एकट्या दुकट्या व्यक्तीचे प्रश्न सोडवणे नेहमीच सोपे असते. त्या कामाची पावतीपण लगेच मिळते. परंतु शासनाने धोरण बदलणे वा धेरणाला नवी दिशा देणे फार जिकिरीचे असते. ही एक अत्यंत सावकाश व निर्विकारपणे घडणारी प्रक्रिया आहे. शिवाय प्रस्थापितांच्या बाजूने असलेली कुठलाही बदल न स्वीकारण्याची सुस्त नोकरशाही कायम विरोध करत ओसते. अशा प्रतिकूल वातावरणातसुद्धा लेखकाने काही महत्वाचे बदल घडवून आणल्याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो.
ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची चर्चा पुस्तकात आहे. वृद्धांच्या सुविधांकडे समाजकल्याण म्हणून न पाहता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाहावे असे लेखकाला वाटते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणे घडवताना ती राबवण्याची जबाबदारीपण धोरणे ठरविणार्यांनी घेतली पाहिजे. वंचित झालेल्यांचे तातडीचे प्रश्न प्रत्यक्ष काम करून सोडवणे हे महत्वाचे आहे. दया - दान यापेक्षा स्पॉन्सरशिप ही समाजकल्याण कार्यातली नवीन संकल्पना आहे. प्रायोजिततेचे महत्व ओळखून Community Aid Sponsorship Program - CASP (समाजविकास साह्य आणि प्रतिपादन कार्यक्रम) या नावाच्या राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्यात लेखकाचा सिंहाचा वाटा आहे. स्पॉन्सरशिप म्हणजे दान वा उपकार नसून सामाजिक काम करण्याची नियोजनबद्ध पद्धती म्हणून त्याकडे बघायला हवे, असे लेखकाला वाटते. अनाथ, अपंग, मुलांसाठी अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा पुरवून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही संस्था मदत करत आहे.
साचेबंद आयुष्याच्या मागे न जाता उपेक्षितांमध्ये आशावाद व जिद्द निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा, त्यामागील चिंतनाचा आढावा लेखकाने घेतला आहे. सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्या तरुणांपुढे नेहमी संघर्षात्मक कार्य की सेवाभावी कार्य असा प्रश्न उभा राहत असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे त्याचे उत्तर शोधले जाते. गोखले यांनी दुसरा मार्ग पत्करून त्यातही भरीव कामगिरी केली आहे. या प्रकारच्या कार्याला शास्त्रीय बैठक असून नियोजनपूर्वकपणे काम करणे शक्य आहे, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक उंचीबाबत विचार करताना त्या समाजात निरोगी, अव्यंग, शक्तीशाली नागरिकांना कोणती वागणूक मिळते यापेक्षा अनाथ, अपंग व नावडत्या नागरिकांच्याकरता काय व्यवस्था केली आहे, त्यांना कोणती वागणूक मिळते यावरूनच त्याचे श्रेष्ठत्व ठरवायला हवे. असे वाटणार्या लेखकाने उपेक्षितांच्या सेवेला जीवनमूल्य मानल्यामुळे त्यांच्या या बखरीला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे.
माझ्या सार्वजनिक जीवनाची बखर
डॉ. शरश्चंद्र गोखले
श्रीविद्या प्रकाशन (1999)
मूल्य रु 250
स्पृहणीय
डॉ. शरश्चंद्र गोखले यांचे कार्य अत्यंत स्पृहणीय आहे. या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
छान ओळख
चांगल्या कार्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
ओळख आवडली
चांगल्या कार्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
हेच म्हणतो.
- नीलकांत