गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात.
आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.
अगदी हलक्या आवाजात तर कधी मुक्तकंठात. चोरून केलेली निंदानालस्ती किंवा कुचाळक्या, टिंगल टवाळी असं नाव आपण गाॅसिपिंगला मराठीत देऊया. सुरुवात अशी होते.
उदाहरण पहिलं.
"ऐकलंस का गं ?! ती रेणू त्या सुरेशबरोबर पळून गेली म्हणे".
"अग बाई, हो का! मला वाटलं होतंच. दोघं चोरून जिन्यात भेटायचे. खाणाखुणा ,फ्लाईंग किसेस सगळं चालायचं."
"तुम्हांला कसं कळलं हो?"
"अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. दोघांच्याही हातात सतत मोबाईल. मेसेज काय, व्हिडिओ काय!. नजर एकीकडे पावलं दुसरीकडे. जास्त न बोललेलंच बरं"
उदाहरण दुसरं.
"अरे त्या मक्याला इतके मार्क कसे पडले रे? पहिला नंबर आला वर्गात. सरांनी शाब्बासकी दिली."
"ह्य.. ह्य.. ह्य... पहिला नंबर? अरे ,कॉपी केलीय त्यांनं. आणि सरांचा लाडका बाब्या आहे तो. ते त्याला लाइकली क्वेश्चन्स म्हणून पेपर सांगतात अख्खा."
"ओह.. आय सी.. मला शंका आलीच होती. असं असेल तर काय आम्ही पण पहिले येऊ."
तिसरं उदाहरण.
"काय हो ! त्या बेंडखळेला एका वर्षात लगेच प्रमोशन कसं मिळालं हो?"
"अरे.. काय सांगू. तुम्ही विचारू नये, आणि आम्ही सांगू नये.. बॉसची एवढी चापलुसकी करतो. आणि आपले बॉस जरा ' ह्यातले' आहेत. संध्याकाळी एकत्र बसतात..(अंगठा तोंडाकडे नेऊन पिण्याची खूण)"
"काय सांगतोस काय?"
"हो तर रोज संध्याकाळी लागते त्याला. आणि हा बेंडखळ्या बॉसचा हातही ओला करत असणार ."
"बॉस पैसे खातो अशी शंका होतीच मला, पण हे तुला कसं कळलं?"
"अरे.. कळतं बरोबर कान आणि डोळे उघडे असले किम. आपला कुलकर्णी सांगत होता कुणाला तरी वॉटर कूलरच्या तिथे उभा असताना. मी ते ऐकलं."
अशी खूप उदाहरणं देता येतील .सासू सुनेबद्दल, सून सासूबद्दल, नवरा बायको एकमेकांबद्दल, भाऊ भाऊ एकमेकांबद्दल, नणंद भावजय एकमेकींबद्दल. यात थोडं तथ्य असतं. अगदीच नाही असं नाही पण कल्पनेच्या भराऱ्या प्रचंड असतात.
आपण कबूल करूया की आपणा सर्वजणांनाच गाॅसिपिंग करायला आवडतं. आपण कबूल करूया. त्यात एक अनामिक मजा असते. मनोरंजन असतं. माहिती नसलेली अनेक रहस्यं आपल्याला कळतात. उदासीनता , नैराश्य,मरगळ, कंटाळा सर्व पळून जातं मन प्रफुल्लीत होतं. करमणूक होते. वेळ छान जातो. मग तीच गोष्ट इतकी इतकी इतकी पसरते की षटकर्णी होता होता शतकर्णी होते.
तिखट मीठ लावून लहानसा मुद्दा मोठा करता येतो. त्या व्यक्तीबद्दलचा आपला राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार, भीती, घृणा अशा अनेक भावना आपण मुक्तपणे मनमोकळ्या करतो.
आजच्या काळात तर काय मीडिया इतका प्रगत झालाय की टीव्ही, व्हॉट्सॲप, युट्युब, फेसबुक, ईमेल, इंस्टाग्राम, यांमुळे एखादा मुद्दा लाखों जणांपर्यंत पोहोचायला जराही वेळ लागत नाही. समाजात, राजकारणात, सिनेसृष्टीत, नाट्यसृष्टीतही गॉसिपिंग चालतंच. फेक नॅरेटिव्हज् पसरवली जातातच.
"रिपीट लाय इज ट्रूथ", हे वाक्य इथे सर्वात जास्त लागू पडतं. जरा खोलात जाऊन विचार करूया का? गाॅसिपिंग अपरिहार्य आणि नैसर्गिक आहे. ते थांबवता येणार नाही. अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे. असत्य, अतिरेकी, फुगवलेल्या गोष्टी सांगून कान फुंकण्यामुळे अनेक राज्यं कोसळली आहेत. बुडाली आहेत. फंदफितुरी हेही एक प्रकारचं चुकीचं, अयोग्य, तिरस्कारणीय आणि टाळलंच पाहिजे असं गॉसिपिंगच आहे. असं करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे.
पण थोडं हलक्यात घेऊन बोलायचं तर गाॅसिपिंग ही माणसाची भावनिक, मानसिक गरजही आहे. आपल्या अनेक भावनांचा त्यामुळे निचरा होतो. मन मोकळी होतात कधीकधी दुसऱ्याविषयी बोलताना आपण आपल्यातच घडायला हवे असणारे बदल मजेनं पाहू शकतो आणि ती टर खिल्ली उडवण्यासाठी नसून आपल्यात असणाऱ्या त्रुटींचा स्वीकार करणंही असतं. आपल्याबद्दल आपल्या मागे लोक काय बोलतात हे आपल्याला कळलं तर आपण ते सकारात्मक दृष्टिकोनातून बघू शकतो. स्वीकारू शकतो. चुका दूर करू शकतो. सुधारू शकतो. त्या विशिष्ट व्यक्तीच्या तोंडावर बोलण्याचं, त्याला सांगण्याचं आपल्यात धाडस नसतं म्हणून तर आपण गाॅसिपिंग करतो, हे खरं आहे.
काय करूया मग?
शक्यतो त्या व्यक्तीला सौम्य शब्दात पण तोंडावरच बोलायची सवय करूया. गाॅसिपिंग हे त्या व्यक्तीला उद्ध्वस्त करणारं, आयुष्यातून उठवणारं, कपोल कल्पित, धादांत खोटं असं नसावं याची काळजी घेऊया. त्या व्यक्तीला नैराश्य, औदासिन्य येईल, ती व्यक्ती मनोरुग्ण होईल असं ते नसावं हे पाहूया. गॉसिपिंगच्या बाबतीत दुर्दैवानं समाजातल्या स्त्रिया या नेहमीच सॉफ्ट टारगेट असतात. अगदी टाळूया आपण असं करणं. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण ही असतात. ते शोधूया. त्याकडे लक्ष देऊया. प्रत्येक व्यक्तीचा आदर करायला शिकूया.
किंवा असं केलं तर ?!
.. आपण स्वतःबद्दलच गॉसिपिंग केलं तर? आपल्यातले दोष, आपल्या चुका यांबद्दल आपणच आपल्याच कुचाळक्या करायच्या, टवाळक्या करायच्या.. नक्कीच फायदा होईल. सुधारणा होईल. आपणच आपल्यातले प्लस पॉईंट शोधूया त्यामुळे आपल्याला नवी ऊर्जा मिळेल. एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल आणि मनःशक्ती वाढेल. ओके. ठरवूनच टाकूया मग..
Comments