अंडा घोटाला-बालकथा
---------------------------------------------------------
रविवार सकाळची वेळ. अनया आणि अनिलला जाम भूक लागली होती. ते आईच्या मागे लागलेच होते ,तोच आईला एक फोन आला. वरच्या आजींना बरं वाटेनासं झालं होतं. आई गडबडीने त्यांच्या घरी गेली.
आता काय करायचं ? बाबाही मित्राकडे गेलेले.
अनिल मोठा होता. तो म्हणाला , ' अने, घाबरू नकोस. मी आहे ना. मी अंड्याचं ऑम्लेट करतो.एकदम खुसखुशीत !’
‘ऑम्लेट अन खुसखुशीत ? ओके ! ते खुसखुशीत ऑम्लेट तूच खा हं. मला आपलं साधंच दे,’ तीही बोलायला भारीच होती.
अन्याने मोठया ऐटीत आईचा ऍप्रन पोटावर बांधला. काळ्या - पांढऱ्या चौकडीचा. गॅसवर तवा तापायला ठेवला. फ्रीजमधून अंडी काढली.ती मोजून तीनच होती.
त्याने एक खोलगट वाटी घेतली. अंडं फोडून टाकायला. त्याचा आत्मविश्वास तर खूप दांडगा होता. जणू काही मास्टर शेफच ! त्याने एक अंडं हातात धरलं. एकदम स्टाईलमध्ये. दुसऱ्या हाताने चमचा धरला आणि अंड्यावर एक ठोका दिला. जोरात. ठक्क ! अंडं फुटलं आणि त्यातला बलक सगळा उडाला तो मागच्या भिंतीवर. नकाशा ! नकाशा तयार झाला होता. कुठला ? ते माहिती नाही. अनयाने तर डोळेच मोठे केले. आणि तिला हसूही आलं.
ती म्हणाली,’ दादू, तुला जमत नाही. जाऊ दे. मीच करते.’
'आणि हे भिंतीवरचं म्युरल ? ' त्याने भिंतीवरचं ते उडालेलं दाखवत विचारलं. म्युरल म्हणजे भिंतीवर लेपन करून केलेलं चित्र.
'ते ? ते खाल्ल्यावर पाहू किंवा चित्रकार म्हणून तुझं नाव लिहू त्याखाली ’, ती म्हणाली.
मग तिने अंडं हातात घेतलं. त्या अंड्याने पोझिशन घेतली . ते फुटून भांड्यात उडी मारायला तयार झालं. तिने स्टाईलमध्ये चमच्याने त्यावर टक्क केलं; पण ठोका चुकला होता. तिने वरून चमचा मारला अन त्याचवेळी खालून अंडं वर चमच्यावर आपटलं. वा रे स्टाईल ! कवच पडलं खाली आणि बलक उडाला वर. वर म्हणजे अन्याच्या तोंडावर. जणू पिवळा फेसवॉशच लावला होता बेट्याने . त्यात पिवळा बलक ओघळून त्याच्या नाकावर आला. त्यामुळे तो सर्कशीतला ढब्बू नाकवाला विदूषक दिसू लागला. पण पिवळ्या नाकाचा. विदूषक तर लालनाके असतात. अनयाला पुन्हा हसू आलं.
आता एकच अंडं उरलं होतं. ते अनयाच्या हातात पडू नये म्हणून अन्याने ते उचललं आणि फ्रिजच्या डोक्यावर ठेवलं. असं नुसतं ठेवणं चुकीचं होतं. पण त्या वेड्याने ठेवलं खरं.
तेवढ्यात आई आली अन ती फ्रिजजवळच्या खुर्चीत बसली. त्यांची आई होती गब्दुल. त्यामुळे ती खुर्चीत बसली धपकन. खुर्चीचा धक्का लागला फ्रीजला आणि वरचं अंडं तिच्या मांडीवर पडलं आणि फुटलं. बापरे ! ती एवढ्या जोरात किंचाळली की ज्याचं नाव ते .
त्या अंडयामध्ये जिवंत पिल्लू असतं तर ते घाबरून छतापर्यंत वर उडालं असतं !
अनयाला पुन्हा खूप हसू आलं.
मटणाच्या एका पाककृतीला मटन घोटाला असं नाव आहे. तसा हा सगळा अंडा घोटाला होता. पण हा घोटाळा अजून कुठे जाणार होता ?
त्याचवेळी खाली बाबा आल्याचं त्यांना कळालं. त्यांच्या आवाजावरून.
आई म्हणाली,' आता घरात अंडी नाहीत ना ? त्यांना येताना अंडी आणायला सांग.'
ते सांगायला अनया खिडकीकडे धावली. कारण तिला एकटीलाच अंड्याचा प्रसाद मिळाला नव्हता. ती खिडकीतून खाली वाकली. तिने बाबांना हाक मारली. त्यांनी वर पाहिलं. आणि काय ? अनयाला वेगळंच दृश्य पहायला मिळालं.
वरच्या नीलाकाकूंच्या खिडकीमध्ये कबुतराने घरटं केलं होतं. त्यांनी रागारागाने ते घरटं वरून ढकलून खाली पाडलं, पण त्यांना हे माहिती नव्हतं की त्यामध्ये कबुतराने अंडं घातलंय म्हणून. वरून ते अंडं पडलं ते सरळ खालून आत येणाऱ्या बाबांच्या डोक्यावर. आणि घरटं हलकं होतं म्हणून ते हवेत तरंगत, उडत नंतर त्यांच्या डोक्यावर पडलं. जणू एखादी गवती टोपीच.
बाबांनी रागारागाने ती गवती टोपी भिरकावली ! तर काय ? डोक्यावरचा अंड्याचा रस ओघळला खाली. त्यांनी जणू केसांना कबुतर कंपनीचा शॅम्पूच लावलाय, असे ते दिसू लागले. त्यामुळे ते जोरात ओरडले. बिचारे !
आता तर अनयाची हसून हसून पुरेवाट झाली. तर आई आणि अन्याचं यावर एकमत झालं की ही मुलगी वेडी आहे !
हसताय काय तुम्ही ? परीक्षा जवळ आली आहे. अभ्यास करा नाहीतर तुम्हालाही पेपरमध्ये अंडीच मिळतील.
-------------------------------------
Category
Comments