![]() |
श्री.ना. पेंडसे यांचे हाक आभाळाची हे पुस्तक वाचण्यासाठी हाती घेत असताना केवळ श्री.ना.पेंडसे यांची कादंबरी व हा लेखक आपल्याला निराश करणार नाही याची खात्री असल्यामुळे वाचायला घेतली. परंतु हे पुस्तक लोकमान्य टिळक यांच्यावर बेतलेले आहे हे आधी कळले असते तर कदाचित चरित्रात्मक कादंबरी म्हणून वाचायचे धाडसही केले नसते. पुस्तक वाचत असताना, काही ठिकाणचे अपवाद वगळता, श्री.नां ची प्रतिभा आटत चालली की काय असे वाटू लागले. कदाचित मुळातच टिळकांच्या आयुष्यात तुरळक नाट्यमय प्रसंग असल्यामुळे लेखकाची कुचंबणा झालेली असेल. एक मात्र खरे की लेखकाने इतर कादंबरीकारांप्रमाणे ओढून ताणून प्रसंगांची पेरणी न करता, आहे त्याच प्रसंगाविषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे हे जाणवते. काही दुय्यम दर्जाच्या पात्रांची निर्मिती करून (बाबूराव आणि भाऊराव, अत्या) विरंगुळा देण्याचा प्रयत्न लेखकानी केल्यामुळे पुस्तक चरित्र न वाटता कादंबरी वाटू लागते. लेखकानी मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे हे चरित्र-कम-कादंबरी-कम-चरित्रात्मक कादंबरी अशी झाली आहे. मुळात लेखकाची सहानुभूती टिळकांचा भाचा, धोंडूमामा यांच्याकडेच जास्त होती असे पुस्तक वाचताना जाणवू लागते. हे पात्र प्रत्यक्षात टिळकांच्या आयुष्यात होते की लेखकाचा निव्वळ कल्पनाविलास हे कळण्यास मार्ग नाही.
टिळकांचा राजकीय मुत्सद्दीपणा, आखलेले डावपेच, त्यांची बुद्धीमत्ता, व्यासंगीपणा, ज्ञानसाधना, सामाजिक सुधारणांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन, त्यांची पत्रकारिता, कायदे-कानूनविषयीचे त्यांचे पांडित्य, हजरजबाबीपणा, (ब्रिटिशसत्ता असूनसुद्धा!) न्याय मिळण्याची खात्री, इत्यादीविषयी लेखकाने फार खुमासदारपणे वर्णन केले आहे. केसरीत त्यानी लिहिलेल्या काही अग्रलेखामुळे टिळकांच्यावर खटला भरला. त्यासाठी त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथे तुरुंगवास सोसावा लागला. न्या. दावर पुढील खटल्याच्या हकीकतीचे वर्णन व टिळकांनी स्वत:च्या बचावासाठी मांडलेले मुद्दे वाचत असताना टिळकांच्या कुशाग्र बुद्धीला दाद दिल्यावाचून राहवत नाही. न्या. दावर यांनी मात्र "टिळकांचे मन रोगट व विकृत असून ज्या तर्हेने लेख त्यानी लिहिले त्या तर्हेचा वृत्तव्यवसाय हा देशाला शाप आहे" म्हणत शिक्षा ठोठावली. परंतु टिळकांनी शांतपणे निर्णयाचा स्वीकार केला व कायद्याची लढाई लढण्यासाठी तयार झाले. पुढील काळात अशाच प्रकारच्या राजद्रोहाच्या खटल्यात गांधीजींना शिक्षा ठोठावताना न्या.ब्रूमफील्ड यानी टिळकावरील खटल्याचा संदर्भ घेतला होता. तेव्हा गांधीजी उठून म्हणाले, "लोकमान्य टिळकांवरील खटल्याचा उल्लेख करून आपण माझा फार मोठा गौरव केला आहे. लोकमान्यांच्या समवेत माझ्या नावाचा उल्लेख व्हावा हा मी माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ बहुमान मानतो". आज ब्रिटिश साम्राज्य विलयाला गेले. परंतु लोकमान्यांचे खटल्याच्या शेवटी स्वराज्याविषयी केलेले उद्गार मात्र अमर झाले.
9 जानेवारी 1909 ते 2 मे 1914 पर्यंतचे टिळकानी मंडालेहून कुटुंबियासाठी लिहिलेली पत्रे वाचत असताना आपल्या कुटुंबियावर त्यांचे प्रेम, त्याच्याबद्दलची काळजी किती होती याची कल्पना येते. याच पत्राद्वारे टिळक आपल्याला हवी ती पुस्तकं मागवून घेत. टिळकांची ज्ञानसंपादनाविषयीची कळकळ, पुस्तकं वाचून काढण्यासाठी घेतलेले कष्ट, पुस्तकसंग्रहाबद्दलची आस्था याबद्दल वाचत असताना आपण आश्चर्यचकित होतो.
ही कादंबरी वाचताना आपण वेगळेच काही तरी वाचत आहोत असे वाटू लागते. नीटशी भट्टी जमली नसली तरी पेंडसे यांचे (त्या वयातील!) प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत हे मात्र लक्षात राहते.
हाक आभाळाची
श्री.ना. पेंडसे,
परचुरे प्रकाशन मंदिर, (2007)
मूल्य 200 रु, पृ.सं. 242

ह्म्म
ह्म्म्म.. पुस्तक वाचले आहे. मला पुस्तक आवडले. पेंडसे यांची बरीचशी पुस्तके न वाचल्याने त्यांच्या प्रतिभेतले उणावलेपण (असल्यास) लक्षात आले नाही.
ह्या वाचनानंतर टिळक म्हटले की हल्ली त्यांचा गणित, खगोल आणि कायद्याचा अभ्यास आठवतो. त्यांच्या राष्ट्रभक्त या प्रतिमेबरोबरच विद्वान ही प्रतिमाही तितकीच बळकट होत आहे
परिचय आवडला
परिचय खूपच छान लिहीला आहे. गांधीजींचा प्रसंग हृदयस्पर्शी!
पेंडसे ग्रेटच
पेंडसे ग्रेटच पण कादंबरी वयाच्या नव्वदीत आणि तीही लेखनिकाच्या साहाय्याने लिहिली असल्याने किंचीत फसलेली असू शकते.
"दुर्दम्य..."
मी फार पूर्वी म्हणजे १५-२० वर्ष अगोदर लोकमान्यांच्या जीवनावर गंगाधर गाडगीळां नी लिहिलेल "दुर्दम्य" हे पुस्तक वाचलं होतं त्या तुलनेत हे नवं पुस्तक कसं आहे ?