Submitted by प्रभाकर नानावटी on
यशोधरा

पुस्तक म्हणजे रद्दीच्या भावाने विकणारी वस्तू नव्हे किंवा केवळ आपल्या कल्पनांना वाट करून देणारे वाहकही नव्हे. त्या आपल्या भावनांना प्रतिसाद देणार्‍या चिरंतन आठवणी आहेत.

+१

Thu, 16/12/2010 - 16:12 Permalink
ऋषिकेश

आता वेळ काढून लेख एकत्र वाचले. लेख एकूणात पटले.
बाकी आधुनिक तंत्रज्ञानावरून आठवले.. परदेशात कादंबर्‍यांचे ऑडीयो-बुक बनवली जातात.. मात्र मला ती ऐकायला फारशी मजा आली नव्हती

Fri, 17/12/2010 - 19:05 Permalink

इ-पुस्तकांचे भवितव्य
संगीत क्षेत्रात Apple आय-पॉडने केलेली क्रांती किंवा गूगल कंपनीचा यू-ट्यूबद्वारे व्हिडिओला शह देण्याचे प्रयत्न यावरून इ-पुस्तकांचे भवितव्य काय असू शकेल याचा कदाचित अंदाज करता येऊ शकेल. तरुण - तरुणींमध्ये एकेकाळी लोकप्रिय असलेले म्युझिक अल्बम्स आता मृतप्राय झालेले असून काही अपवाद वगळता, त्या शेवटची घटका मोजत आहेत. आपल्याला आवडलेल्या गाण्यांची वेगळी यादी करून ती मित्र - मैत्रिणींबरोबर शेअर करणे ही सहज घडणारी अशी क्रिया आहे.

शब्दकोश, संदर्भ पुस्तकं इत्यादींच्या बाबतीतसुद्धा हळू हळू का होईना, काही स्थित्यंतर घडत आहेत. संदर्भकोशांच्या बाजारपेठेवर अतिक्रमण करत इ-पुस्तकांनी आताच आपले दास्तान बसविले आहे. एन्-सायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे ओळीने लावलेले ग्रंथ लायब्ररीतील जागा अडवून धूळ खात पडले आहेत. विकिपिडिया हा विश्वकोश ऑनलाइनवर मोफत उपलब्ध आहे. शिवाय आपण सुज्ञ वाचक म्हणून त्या माहितीत भर घालू शकतो, माहिती संपादित करू शकतो वा चुका दुरुस्त करू शकतो. विश्वकोशाची मुद्रित प्रत इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहे. जेथे संपूर्ण पुस्तकातील पान न पान वाचण्याची गरज नसते आणि अद्ययावत व अलिकडची माहिती - आकडेवारी यांची गरज भासते तेथे वाचक मुद्रित प्रतीवर विसंबून न राहता ऑनलाइनवरून लेटेस्ट माहिती शोधत असतात. विश्वकोशाप्रमाणे टेलिफोन डिरेक्टरी, शब्दकोश, क्रमिक पाठ्यपुस्तकं, व कदाचित पाककृतींची पुस्तकसुद्धा नजीकच्या काळात नामशेष होतील.

ललित व वैचारिक लेख
ललितलेख व वैचारिक पुस्तकांच्या बाबतीत स्थिती थोडीशी वेगळी आहे. अशा पुस्तकात एखाद्या कल्पनेचा आविष्कार असतो, कल्पनाविस्तार असतो, तर्कशुद्ध विचार असतो, आणि विचारपूर्वक केलेली मांडणी असते. त्यासाठी दोन - अडीचशे पानं खर्ची घातलेली असतात. फक्त पन्नास -साठ पानांमधून सांगण्याएवढी कल्पना असल्यास व त्यावरून केवळ पन्नासेक पानांचे पुस्तक काढल्यास लेखक, प्रकाशक व पुस्तक-व्यवहाराशी संबंधित इतर लोक नफा कमवू शकणार नाहीत. म्हणूनच कल्पनेचा आवाका कमी असला तरी अडीचशे पानांची पुस्तकं काढून फार मोठा गाजावाजा केला जात असतो. मग अशा पुस्तकांतील काही महत्वाची 50 पानं वाचल्या जातात व इतर पानं न वाचता पुस्तकं धूळ खात पडलेली असतात. खरे पाहता, वेळ, श्रम व पैशाच्या अपव्यय टाळण्यासाठी तरी का होईना, या पन्नास -साठ पानांच्या पुस्तकांसाठी (तसेच अर्धे-अधिक पानं कोरे सोडलेल्या कवितांच्या पुस्तकांसाठी) इ-पुस्तकाची कल्पना राबवली पाहिजे असे वाटू लागते.

वैचारिक व ललितलेख असलेल्या पुस्तकांचे अंकीकरण होत असल्यास अजून एका दृष्टीने त्याचा फायदा वाचकांना मिळू शकेल. पुस्तकातील संदर्भांची देवाण-घेवाण सुलभ होईल, उपलब्धतेत वाढ होईल. गीत - संगीतावरील अंकीकरण झालेल्या पुस्तकात रागदारीचा संदर्भ वाचताना संपूर्ण सुरावट ऐकण्याची सोय त्यात असेल. लता - तलत महमूदच्या गाण्यांवरील लेख वा पुस्तकांचा आस्वाद घेत असताना ते गाणेसुद्धा वाचता वाचता ऐकता येईल. रविशंकरच्या सतारीचा झणत्कार ऐकता येईल. एक मैफलच आपल्या डोळ्यासमोर उभी राहील. त्यातून लेखकाच्या मांडणीत स्पष्टता येईल.

आता जे काही लिंकिंग होत आहे ते संपूर्ण पुस्तकासाठी होत असल्यामुळे हाती फार लागत नाही. वाचत असलेल्या पानाच्या बाहेर जाऊन ऐकावे वा बघावे लागत आहे. या गोष्टी क्लिष्ट वाटत असल्यामुळे काही काळानंतर वाचक कष्ट घ्यायला तयार होणार नाहीत. भविष्यकाळात या अडचणावर मात करण्याचा विचार करावा लागेल.

लेखनामधील संदर्भसूची, अवतरणं, पुरवणी वाचन यासाठी अंकीकरण हा एकमेव पर्याय आहे. या गोष्टी अभ्यासू वाचकांना वरदान ठरतील. संशोधकांचा बहुमूल्य वेळ वाचेल. आठवडे न आठवडे अनेक संदर्भ ग्रंथालये पालथी घालून जी काही थोडी फार माहिती मिळण्याची शक्यता असते ती आता काही तासात माउसच्या क्लिकने घरबसल्या मिळू शकेल. छायाप्रतींची गरज नाही किंवा ग्रंथालयातील स्टाफची वा त्यांच्या निकृष्ट सेवेची आवश्यकता नाही. अशा प्रकारे अंकीकरण झालेली पुस्तकं सर्च इंजिनसाठी फार उपयोगी ठरतील. त्यातून शोधनिबंधांची गुणवत्ता वाढेल.

कादंबर्‍या व दीर्घ कथा
वाचकांना भावणार्‍या इतर प्रकारच्या पुस्तकांबद्दल काय स्थिती असेल? काही प्रकारच्या कादंबर्‍यांना हे तंत्रज्ञान नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. अद्भुतकथा, साहसकथा, रहस्यकथा इत्यादी साहित्य प्रकारांचे अंकीकरण केल्यामुळे वाचकांच्या कल्पनाशक्तीला जास्त वाव मिळू शकेल. अशा प्रकारच्या पुस्तकांतील प्रसंग व घटना आभासी जगात (virtual world) घडत असतात आणि आभासी वास्तवासाठी (virtual reality) इंटरनेट सदैव आघाडीवर आहे. विज्ञानकथा व युद्धकथांची भरारी अंकीकरणामुळे नक्कीच वाढेल.

परंतु अभिजात/मनोज्ञ कादंबरी वा मनोरंजक दीर्घ कथा यांच्या आस्वादासाठी मात्र मुद्रित पुस्तकांना पर्याय नाही, असेच म्हणावे लागेल. कथा - कादंबर्‍या वाचत असताना कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये अशी वाचकांची अपेक्षा असते. त्या दृष्टीने मुद्रित पुस्तकासारखे सोपे, सरळ व सातत्य टिकवणारे दुसरे कुठलेच माध्यम नसेल. एखाद्या विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी म्हणून कुणी कादंबरी वाचत नसतात. कादंबर्‍यांना संदर्भ ग्रंथ वा क्रमिक पाठ्यपुस्तकासारखे तात्कालिकतेचे वा कालमर्यादेचे बंधन नाही. शब्दकोश वा पाककृतींच्या पुस्तकासारखे एक-दोन पानं चाळली की काम झाले असेही होत नाही. चांगली कादंबरी वाचत असताना वाचक त्यातील घटना-प्रसंगांचा साक्षीदार म्हणून सदैव उभा असतो. संपूर्ण कथानकात त्याची भावनिक गुंतवणूक असते. परंतु अंकीकरण झालेल्या कादंबर्‍या संगणक/इ-रीडरच्या सहाय्याने वाचत असताना वाचकांना एका प्रकारची अलिप्तता जाणवू लागते. त्यामुळे रसग्रहणात अडचण येते.

लघुकथा व कविता
लघुकथा, कविता वा विनोदी वांङ्मय यांच्यासाठी मात्र अंकीकरण ही एक चांगली सोय ठरू शकेल. ऑनलाइनवर वाचण्याची सवय करून घेतल्यास कदाचित अशा प्रकारच्या पुस्तकांसाठी खर्ची घातलेल्या कागदाची बचत होऊन प्रदूषणाची पातळी कमी करता येईल. ऑनलाइनवर रोज एखादी कविता, चारोळ्या, हायकू, लघुकथा, वा विनोदी चुटके ऐकून वा वाचून दिवसाची सुरुवात केल्यास दिवसभर मन प्रसन्न राहू शकेल. कारण मुळातच या गोष्टी दीर्घकाळ टिकाव्यात किंवा पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशी अपेक्षा नसते. वाचकांनासुद्धा पहिल्यांदा वाचताना जो निर्भेळ आनंद मिळतो तो दुसऱ्या वा नंतरच्या वाचनात लाभत नाही हे माहीत असते.

कथा व कवितांचा पूर्व इतिहास तपासल्यास त्यात मौखिकतेचाच भाग जास्त होता, हे लक्षात येईल. कविता एकट्याने वाचण्याऐवजी चार चौघात म्हणून दाखविल्यास आनंद द्विगुणित होईल, हा अनुभव आहे. कथा ऐकण्यातच मजा असते. कथा-कवितांचे सादरीकरण आधुनिक तंत्रज्ञान सहजपणे करू शकेल. या प्रकारच्या ललित साहित्यप्रकारांसाठी अंकीकरण नैसर्गिक आहे, असे वाटेल. तरीसुद्धा काही जण मात्र कादंबरीप्रमाणे लघुकथा व कवितासुद्धा वैयक्तिकरित्या कुठल्याही प्रकारची घाई न करता, सवडीने, आरामात, बिछान्यावर पडून वा खुर्चीवर बसून वाचणे पसंत करतील. त्यांच्यासाठी मात्र मुद्रित पुस्तकच योग्य ठरतील. त्यामुळे कादंबर्‍याप्रमाणे कवितासंग्रह व लघुकथासंग्रह पुस्तकांच्या स्वरूपात अजून काही काळ टिकू शकतील.

पुस्तक म्हणजे रद्दीच्या भावाने विकणारी वस्तू नव्हे किंवा केवळ आपल्या कल्पनांना वाट करून देणारे वाहकही नव्हे. त्या आपल्या भावनांना प्रतिसाद देणार्‍या चिरंतन आठवणी आहेत. म्हणूनच अंकीकरण केलेल्या स्वरूपातील ग्रंथसंग्रहामध्ये आपण भावनिकरित्या कितपत तादात्म्य होऊ याबद्दल अजूनही शंका आहेत!

समाप्त