नमस्कार मित्रहो,
कविता महाजन यांनी आपल्या दिवाळी अंकासाठी मुलाखत तर दिलीच, वर आपल्या काही प्रश्न आणि प्रतिक्रियांसाठीही अगदी वेळात वेळ काढून रातोरात उत्तरे पाठवली. ते प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रश्नकर्त्यांच्या नावासोबत इथे देत आहे.
प्रश्न १, प्रेषकः चिंतातूर जंतू
चळवळीतले किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्या लिखाणाबाबत नेहमी येणारा एक अनुभव म्हणजे ज्यांना तुमचं सामाजिक कार्य पटतं/आवडतं त्यांना तुमचं त्याबद्दलचं लिखाणही आवडतं. आणि ज्यांना तुमच्या कार्याविषयी काही आक्षेप/अढी असेल ते तुमच्या लिखाणालाही नावं ठेवतात. त्यामागे चळवळीतली क्षुल्लक राजकारणं, असूया वगैरे अशीही कारणं असतात. ज्यांना तुमच्या लिखाणातूनच त्या त्या सामाजिक समस्येची जाणीव झाली आणि त्यामुळे जो सकारात्मक फरक पडला त्याविषयी तुम्ही बोललाच आहात. पण 'सामाजिक समस्येवरच्या तुमच्या दृष्टिकोनाबाबत आपले मतभेद आहेत, पण कादंबरी आवडली' किंवा त्याउलट 'सामाजिक समस्येवरचा तुमचा दृष्टिकोन पटला, पण कादंबरी मात्र आवडली नाही.' अशा काही प्रतिक्रिया आल्या का? आल्या असल्यास त्यांविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.
उत्तर :
सामाजिक समस्येवरील दृष्टिकोनात मतभेद अजूनतरी कुणीही स्पष्टपणे नोंदवले नाहीत. कादंबरी आवडली / नावडली अशा प्रतिक्रिया अर्थातच पुष्कळ आल्या. 'भिन्न'च्या वेळी एका कार्यकर्त्या मैत्रिणीचे खूप सहकार्य झाले होते. ती प्रत्यक्षात भिन्न वाचून खूप दुखावली गेली. तिने पहिल्यांदा फोन केला तेव्हा तिला नीट बोलताही येत नव्हते, इतकी ती रडत होती. मी एक तरी 'पूर्ण चांगले / आदर्श' पात्र रंगवायला हवे होते. ज्यामुळे तिच्यासारख्यांना काम करताना धीर / दिलासा मिळेल, असे तिचे म्हणणे होते. "आमच्या क्षेत्रात ९० % लोक असेच आहेत, हे कबुल; पण तरीही जे १० % चांगले आहेत, त्यांच्यावरच फोकस करायला हवा होता." असे तिचे म्हणणे होते. अनिल अवचटांनी अनेक कार्यकर्त्यांची अशी केवळ चांगली बाजू मांडलेली आहे; तीच भूमिका इतर लेखकांचीही असावी, अशी तिची अपेक्षा होती. त्यानंतर बराच काळ आमचे संबंध ताणलेले राहिले, पण पुढे निवळले. :-).
सांगलीला झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी एका स्वयंसेवी संस्थेच्या लोकांनी ठरवून हल्लाबोल केला होता. "कार्यकर्त्यांची इमेज मी भिन्नमधून खराब केली आहे." असा त्यांचा आक्षेप होता.
बाकी जे त्या क्षेत्रांमध्ये रुळलेले 'सराईत' आहेत, त्यांना ना पुस्तके वाचण्याची गरज वाटते, ना चांगले-वाईट म्हणण्याची. 'दुर्लक्ष' त्यांना सोयीचे असते. 'कितीही लिहा काय फरक पडतो?' अशी त्यांची रोखठोक भूमिका असते.
मला स्वतःला अगदी नव्याने लिहीत होते तेव्हा 'प्रतिक्रियेचे कुतूहल' असायचे. नंतर ते ओसरले. आपण जे लिहिले आहे, ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि शक्य ते सर्व कष्ट घेऊन, सगळ्या किमती मोजून लिहिले आहे. हे स्वतःला माहीत असले की पुरे, असे मला वाटते. खरी मजा लेखनाच्या प्रक्रियेत असते. नंतरच्या प्रतिक्रिया, समीक्षा, पुरस्कार इत्यादी गोष्टी सोपस्काराच्या. त्यामुळे लेखन सुरू असलं की मी 'नॉर्मल' असते.
प्रश्न २, प्रेषकः ऋषिकेश
शहरीकरण आणि आदीवासी संस्कृती यांच्या पेचात कविता महाजन कुठली बाजु योग्य समजतात. जसे अंदमानच्या आदीवासींना वेगळे जंगल राखीव आहे. त्यांचा इतर जगाशी संबंधही नाहि. त्यांचे स्वतःचे असे विश्व आहे. तसेच इतर आदीवासी, जे निसर्गाला धरून राहतात, निसर्गाची जंगलाची देखभाल करतात त्यांच्या वस्तीचे गावात व पुढे शहरात रुपांतर होणे चांगले की वाईट असे महाजन यांना वाटते?
त्याच बरोबर, आदिवासींच्या वेगळ्या औषधोपचार पद्धतीवर संशोधन झाले आहे का? असल्यास त्याबद्दलही वाचायला आवडेल
उत्तरः
शहरीकरणाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. तोटे अधिक आहेत. आदिवासींना राखीव जंगल दिले आणि जसे आहेत तसे राहू दिले तरी बाहेरची माणसे तिथे जाणारच आणि त्याचे भले-बुरे परिणाम होणारच. संस्कृती, तत्त्वज्ञान, विचार करण्याची मूलभूत पद्धतच निराळी अशा गोष्टींमुळे आदिवासींचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जातो. आज झारखंड, बस्तर अशा भागांमधील आदिवासींची स्थिती बघवत नाही. किलोभर मिठासाठी चार किलो चारोळी अशी लुबाडणूक आजही आहे. आर्थिक, शारीरिक, लैंगिक अशा अनेक तर्हांनी शोषण होते आहे आणि उत्तरोत्तर ते वाढतेच आहे. बदलाच्या काळात कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. हाच एकमात्र उपाय आहे. योग्य-अयोग्य ठरवणे आपल्या हातात नसतेच.
आदिवासींच्या वेगळ्या औषधोपचार पद्धतींवर शास्त्रीय पद्धतीने अजून संशोधन झालेले नाही. मात्र काही वनौषधींची माहिती देणारी संकलने इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत. ( त्या पुस्तकांची नावे आत्ता मला आठवत नाहीयेत. पण ती माझ्या संग्रहात आहेत. सवडीने पाहून नक्की कळवेन. ) मराठीत केवळ एक पुस्तक माझ्या बघण्यात आले आहे. डॉ. राणी बंग यांचे 'गोईण.'
प्रश्न ३, प्रेषकः सागर
दिवसेंदिवस माणूस हा प्रगती करतो आहे. पण त्याच बरोबर तो निसर्गापासून दूर देखील जातो आहे. अशा वेळी आदिवासी लोकांनी जपलेली निसर्गाशी जवळीक कविता महाजन यांना कशी वाटते? आणि आदिवासींनी शहरीकरणात सहभागी व्हावे का? उत्तर हो असेल तर त्यांनी शहरी विचारधारेत कितपत सहभागी व्हावे? आणि हे आदिवासी लोक निसर्गाशी जवळीक पिढ्यान् पिढ्या उलटल्या तरी देखील कशी जपतात? त्यांच्या मुलांना वारसा जपण्यासाठी कोणते संस्कार देतात? शहरीकरण आणि प्रगतीच्या या प्रचंड झगमगाटात आदिवासींना त्याची ओढ न वाटण्याचे कारण काय?यावर मला कविता महाजन यांचे मत जाणून घ्यायला आवडेल Smile
उत्तरः
आमची प्रगतीची व्याख्या ही आज आम्ही केलेली नाहीये. आमचा विकास कशात आहे, आनंद कशात आहे, काय केले ( विकत घेतले ) म्हणजे आम्हांला सुखी वाटेल, हे सारे आज 'बाजार' ठरवतो आहे आणि त्या गोष्टींचा अभाव असेल तर "दु:खी" हे आपसुकच आले. लहानपणापासून याच वातावरणात वाढल्याने आपल्या स्वतःच्या अशा खर्या आणि खास आवडीनिवडी / गरजा आपल्याही माहीत नसतात. क्वचित कधी 'आपल्याला अमुक खरेच हवे होते का?' असा प्रश्न विचारला की साक्षात्कार झाल्यासारखी उत्तरं सापडायला लागतात. हा बाजार जसा बदलतो आणि बाजार ज्यांच्या हातात आहे ते लोक बदलतात, तसे आपले कलही बदलायला लागतात. इतके आपण त्या प्रवाहात अडकलेलो आहोत. आणि आपली मुळे कोणत्या मातीत आहेत हे विसरून गेलो आहोत.
आदिवासींनी स्वतःचे तत्त्वज्ञान जपले आहे. ते त्यांना जपता आले याचे कारण ते त्यांच्या जगण्याला कुणा 'गुरू-महात्मा-प्रेषिता'ने चिकटवलेले नाही. ते त्यांच्या अनेक पिढ्यांच्या जगण्यातून विकसित होत आले आहे. त्याचा 'ग्रंथ' न बनल्याने ते ग्रंथपूजेपुरतेच उरण्याचा धोका टळलेला आहे. ते त्यांच्या दैनंदिन जीवनाचा, रोजच्या सवयींचा भाग बनलेले आहे. पावसाळा सुरु झाला की वाटेवर उगवणार्या पालेभाज्या कुणीही उगाच तोडून खायला सुरुवात करणार नाही. विधीपूर्वक घरटी एकाने असे समुहाने जाऊन डोंगरावर जाऊन 'कौला' खुडून आणायचा. शिजवून ती भाजी प्रत्येकाच्या हातावर प्रसादासारखी देऊन सगळ्यांनी एकदम खायची. अशी एक प्रथा वारल्यांमध्ये आहे. बहुतेक आदिवासी जमातींमध्ये अशा अनेक प्रथा दिसतात. पूजा होत नाही तोवर बारकी पोरंही झाडाखाली पडलेली कैरी उचलणार नाहीत. संयम इथूनच सुरू होतो. आदर इथूनच सुरू होतो. जपणूक इथूनच सुरू होते. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांना कदाचित 'संस्कार' म्हटले जात नसेल, पण ते संस्कारच असतात. साठवणूक नाही. हावरटपणा नाही. लुबाडणे, चोरी, बलात्कार नाही. खरा आनंद, खरे सुख, जगण्यातला सोपेपणा, सहजता कशात आहे, हे ज्यांना समजले त्यांना या झगमगाटाचे काय कौतुक वाटणार? त्रासच होतो आणि उबगच येतो. नव्याचे कुतूहल वाटेल. पण हव्यास वाटणार नाही. अर्थात आता इतर जाती-जमातींच्या लोकांच्या सहवासाने ही वृत्ती विरत जाऊ लागली आहे.
मी एखाद्या आदिवासी भागातून परतते तेव्हा भिवया कोरलेल्या आणि मेकअप केलेल्या बायका पाहून मला मळमळायला लागते. कुरूप दिसतात त्या. पण हे केले नाही तर त्या गबाळ्या, मागास, स्वतःकडे लक्ष न देणार्या ( वा इतरांचे लक्ष वेधून न घेणार्या ), गावंढळ इत्यादी समजल्या जातात.हे सुंदर दिसते असे कुणी आणि कधी ठरवले हे त्यापैकी एकही बाई सांगू शकत नाही.
प्रश्न ४, प्रेषक: इंद्रराज पवार
'ब्र' पेक्षा मी ज्यावेळी 'भिन्न' चा विचार करतो त्यावेळी लेखिका म्हणतात "मी दहा टक्केच वस्तुस्थिती लिहिली आहे..." ती बाब प्रकर्षाने नजरेसमोर येते. या कादंबरीवर [त्यातील भाषेमुळे वा विषयाच्या दाहकतेमुळे] जशी प्रखर टीका झाली तसेच वाट्याला कौतुकही आली. पुरस्कारही मिळाले. इथपर्यंतचा प्रवास जनमान्य म्हणू या. पण आता प्रश्न असा आहे की, ज्यावेळी एखाद्या कादंबरीला शासकीय वा लोकमान्य पुरस्कार मिळतात त्यावेळी ती कादंबरी विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याविषयीची बीओएसची शिफारसही येते. पण इथेही झारीतले शुक्राचार्य असतात जे लिखाणावर झळझळीत कात्री चालवू इच्छितात [त्यांच्यात, कात्रीशिवाय, आपण येणार्या पिढीचे भले करू शकत नाही असा एकप्रकारचा गंड असतो]. थोडक्यात पुस्तकाचा बोर्या वाजवायचा असेल तर पुस्तक अभ्यासक्रमाला लावावं असे म्हटले जाते. आजचा विद्यार्थी 'भिन्न' कादंबरीवर [अभ्यासक्रमाला लावली असे गृहीत धरतो] लिहिण्याइतपत पक्व झाला आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर तो त्यातील भूमिकेला न्याय देऊ शकेल?
[यातच एक उपप्रश्न : विद्यार्थी - मेल्+फीमेल - वाचणार म्हणून काटछाटीला तुम्ही मान्यता द्याल?]
उत्तरः
काटछाटीला मान्यता अशा कारणांसाठी नक्कीच देणार नाही. माझे लेखन जे अभ्यासताहेत ते एमफील व पीएच.डी.चे विद्यार्थी आहेत. तिथे काटछाटीची गरज भासली नाही. झारीतील शुक्राचार्य असतात हे मान्य. मात्र ते काटछाट करण्याच्या लहान भानगडीत पडत नाहीत, ते सरळ तुमचा / तुमच्या पुस्तकाचा पत्ताच कट करतात.
शालेय पुस्तकांमध्ये माझ्या कविता असू नयेत अशी माझ्या लेकीची जबर इच्छा होती. "किमान एक लाख मुलांच्या करोडो शिव्या खायच्या असतील, तर शाळेच्या पुस्तकात कविता दे." असं तिनं मला ती इयत्ता पाचवीत होती तेव्हाच सांगितलं होतं. : -). त्यामुळे तिचं सांगणं मी आजवर तरी ऐकलेलं आहे. तुमच्या बोर्या वाजण्याच्या मताशी तिचे म्हणणे तंतोतंत जुळते.
दुसरा थोडा वेगळा मुद्दा... विद्यार्थ्यांच्या पक्वतेचा. तो कलाशाखेत जे असंख्य विद्यार्थी एमफील / पीएचडी करताहेत त्यांच्या एकुणच आकलनाबाबत संशय वाटावा अशी परिस्थिती आहे. ( या विषयावर जयदेव डोळे यांनी एक अप्रतिम प्रदीर्घ लेख लिहिला आहे. तो मिळाल्यास जरूर वाचावा.) विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर त्यांच्या प्राध्यापकांच्या बाबतही हेच म्हणता येईल. "लेखकाची परवानगी त्याच्या लेखनावर संशोधन करण्यासाठी आवश्यक" असा काही नियम असता, तर माझी मोठ्या संकटातून सुटका झाली असती. :-).
प्रश्न ५, प्रेषकः रोचीन
कुहु हे मराठीतील पहिलं मल्टिमिडिया पुस्तक आहे. त्याबद्दल मात्र कुतुहल आआहे.पुस्तक म्हंट्ल्म कि आपल्यासमोर येतेते म्हणजे बाईडेड कागदी स्वरुप! पण हे मात्र असं नाही!!असणार ती १ डिस्क फक्त! यात ऍनिमेशन, व्हिडिओ, फोटोग्राफ, पेंटिंग, कॅलिग्राफी अशी अनेक माध्यमं हाताळली आहेत. सर्वसामान्य माणूस या सर्वाचा कितपत स्वीकार करु शकेल?? तो या सर्वांना कितपत न्याय देउ शकेल?? म्हणजे या सर्वाची माहिती असणारी व्यक्तीच फक्त याचा आस्वाद घेउ शकेल ना?? रिटायर्ड व्यक्ती/ग्रुहीणी, ज्यांना संगणकांच अतिशय जुजबी ज्ञान आहे/पेन्शनर लोकं / अगदी लहान मूलं इत्यादी याचा आस्वाद कसा घेउ शकतील?? ज्यांच्याक्डे काँप्युटर नाही/जी लोकं पुस्तकं विकत घेउन वाचू इच्छित नाहित त्यांचं काय??
उत्तरः
'कुहू'ची डीव्हीडी केवळ संगणकावरच नव्हे तर डीव्हीडीप्लेअरवर देखील बघता येईल. या सुविधा आता घरोघर पोचल्या आहेत. तरी एक मोठा वर्ग यापासून वंचित आहे. तसेतर छापील पुस्तकांपासूनही वंचित असलेला खूप मोठा वर्ग आहे. "सगळ्यांसाठी" असे आपल्या समाजात काही असू शकत नाही. कारण आपण एकाच काळात अनेक काळ जगतो आहोत. वय, पेशा, गृहिणी असणं किंवा लहान असणं याचा आणि तंत्राचं ज्ञान असल्याचा काही संबंध नाही. माझी अडीच वर्षांची भाची चित्रावरून सीडी ओळखते आणि आपली आपण डीव्हीडी प्लेअर सुरू करून पाहते.हातात पुस्तक ( वयानुसार ) धरवत नाही ( मग ते हिंदूच्या निम्म्या आकाराचे असले तरी! :-)असो.) अशा एका आजींना आम्ही नॅबमधून पुस्तकांच्या सीडी ऐकायला आणून देतो. अशीही अनेक उदाहरणे सापडतील. ब्र आणि भिन्न या माझ्या कादंबर्यांच्या आणि निवडक कवितांच्या ऑडियो सीडीज ऐकून मला प्रतिक्रिया कळवणारे वाचकही मोठ्या संख्येने आहेत.
तथापि, 'कुहू' फक्त डीव्हीडीवर नव्हे तर पुस्तकरूपातही उपलब्ध होत आहे. हे पुस्तक पूर्ण रंगीत असेल. त्याचे मुखपृष्ठ ३ डी असेल. इतर तपशील तुम्हांला 'कुहू'च्या साईटवर पहायला / वाचायला मिळतील. जरूर पहावे. http://kuhoo.in
प्रश्न ६, प्रेषकः रोचीन
आपल्याकडे अजुनहि मोबीपॉकेट्/कींड्ल वगैरे गोष्टींचा एवढा प्रसार नाही. म्हणजे पुस्तक वाचायचं तर कंपल्सरी घरातच बसलं पाहीजे हि या पुस्तकाची एक मर्यादा आहे असे नाही का वाटंत??
उत्तरः
आधुनिक गोष्टी लगेच आपल्या भाषेत याव्यात असे वाटणे स्वाभाविक आहे. तसे प्रयत्नही सुरू आहेत. काही काळ त्यात जाईल हे निश्चित.
प्रश्न ७, प्रेषकः रोचीन
लेखनाच्या स्वामित्त्वहक्कांबद्दल आपलं काय मत आहे?? लेखकाला पुर्ण न्याय मिळतो असं वाटतं का तुम्हाला?? जर हो/नाही का?? नाही तर काय करता येइल?
उत्तरः
स्वामित्वहक्क असले पाहिजेतच. मुळात त्याबाबत आपल्याकडे लेखक पुरेसे जागरूक नाहीत आणि प्रकाशक त्याचा चलाखीने फायदा घेतात. अनेक मोठ्या व स्थिरावलेल्या प्रकाशन संस्थांमध्येही रीतसर करारपत्रे केली जाताना दिसत नाहीत. अनुवाद, माध्यमांतर असे काही करायचे असेल की मग पळापळ सुरू होते. त्या गडबडीत लेखक त्यातल्या अटी नीट वाचतही नाहीत. संबंध चांगले असतात तोवर सारेच ठीक असते. पण बिघडायला सुरुवात झाली की वाद सुरू होतात. व्यवहाराच्या जागी व्यवहार न ठेवता भावनिक मुद्दे अकारण मध्ये आणून करारपत्र, रॉयल्टी अशा गोष्टींबाबत काही ठरवले, केले जात नाही. 'राजहंस'सारखे व्यवहाराला चोख असलेले प्रकाशक मला मिळाले, ही व्यक्तिशः समाधानाची गोष्ट आहे.
पण त्याचवेळी इतर प्रकाशकांचा अनुभव चांगला नाही. उदा. 'रजई'ची दुसरी आवृत्ती आली हे मला मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळे यांनी कळवलेही नाही. पहिल्या संपलेल्या आवृत्तीची रॉयल्टी देणे दूरच, पण पुस्तकाच्या पाच प्रती पाठवायच्या असतात, त्याही पाठवल्या नाहीत. 'कुरीयरचा खर्च खूप होतो' म्हणून कधी दादरला / गिरगावात आलात तर प्रती घेऊन जा, असे सांगितले. वर पुन्हा "हे पुढच्या ग्राफिटीवॉल मध्ये लिहू नका" असे हसत-हसत सांगितले. ( तो विनोद होता म्हणे!).
मौज प्रकाशनानेही 'धुळीचा आवाज' ची दुसरी आवृत्ती काढली हे मला वाचकांकडून समजले. कवीला आपल्या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाल्याचे ऐकून हार्टअॅटक येईल असे त्यांना बहुतेक वाटले असावे. म्हणून काळजीपोटी त्यांनी कळवले नसावे.
मी माझ्या पुस्तकांची रीतसर करारपत्रे केलेली आहेत. आणि माझ्या मृत्यूनंतर त्यांचा हक्क माझ्या मुलीकडे जाईल, हेही सर्व लेखी कायदेशीर पद्धतीने केले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
यांखेरीज रोचीनचा आणखी एक प्रश्न होता: आपण फेसबुक वरहि आहात. तीथे येण्याचं काही खास कारण?? तीथे तुमच्या फ्रेंड्स लीस्ट मधे विविध वयोगटातील लोकं आहेत. त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो?
या प्रश्नावर मुलाखतीच्या वेळेस सुरूवातीलाच अनौपचारिक चर्चा झाली होती. आता मला अगदी त्यांच्या शब्दात सांगता नाही यायचं, पण भावना नक्की पोचवू शकते.
कविताताईंच्या मते: आपल्याला आपल्या मित्रांसोबत बरेच काही शेअर करायचं असतं. आजकालच्या जमान्यात ते शेअर करायचं मोठं आणि सोपं साधन म्हणजे, फोन किंवा मोबाईल. आता ते अशा माध्यमांतून आपल्या प्रियजनांपर्यंत पोचवायचं म्हणजे त्यासाठी आपण स्वतः वेगळा वेळ देऊन कॉल करून किंवा मेसेज पाठवून करावं लागेल. असं करताना मुख्यतः आपल्या वेळेचा मोठा प्रश्न येतो आणि थोडेफार पैशाचं गणितही येतं. हे दोन्ही जरी आपल्याकडून सांभाळता आलं, तरी किती लोकांना फोन करणार किंवा मेसेज पाठवणार यावर बंधनं आलीच. त्याहीपलिकडे जाऊन, आपण आपल्या वेळेसोबत आणखी इतरांचाही वेळ अप्रत्यक्षरित्या मागतो, जो प्रत्येकवेळी प्रत्येकाकडे तितकाच मुबलक असेलच असे नाही. आणि उत्तर देताना आपसूकच त्यांचाही खर्च होऊच शकतो. पण तेच जर फेसबुक सारख्या माध्यमाचा वापर करून केलं, तर आपण आपल्या सवडीने एखादं काम करता करताही ती गोष्ट स्टेटस मेसेज मधून लिहू शकतो, ती सगळ्यांपर्यंत पोचते, ज्याला किंवा जिला उत्तर द्यायचं, ती व्यक्तीसुद्धा तिच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार उत्तर देऊ शकते. आणि यात खर्च म्हटलं तर तसा नगण्यच!!!
फेसबुकमधल्या विविध वयोगटातील लोक असतील तरी प्रतिसाद खूपच चांगला मिळतो. एखादा नवीन स्टेटस मेजेस टाकल्यानंतर बर्याचदा पाचेक मिनिटांत किमान चाळीसभर प्रतिसाद येतात.
हा माझा देखिल अनुभव आहे. आणि प्रत्येक मेसेजला प्रत्येकाचा वेगळया दृष्टीकोनातून येणारा प्रतिसाद वाचणं म्हणजे गंमत असते. एक उदाहरण देते. एकदा कविताताईंनी एक मस्त संध्याकाळचा फोटो टाकला होता आणि त्या मूडला साजेशा अशा छानशा ओळी फोटोला कॅप्शन म्हणून होत्या. मग सगळ्यांची त्यावर कविता/गझलांच्या ओळी टाकण्याची स्पर्धाच लागली. सगळे प्रतिसाद एकसे बढकर एक होते. आणि एक प्रतिसाद आला, "बांगडा दिसतोय!!!". [फोटोत सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर दोन काठ्यांवर टांगलेले मासे होते] अर्जुनाची दृष्टी, दुसरं काय? :-)
कविताताई, या उत्तरांसाठीही मी पुस्तकविश्वतर्फे तुमचे आभार मानते.