एका धाग्यावर श्री.सागर यानी आनंद साधले यांच्या संस्कृत-मराठी 'सोनेरी मालिका' पुस्तकांची एक यादी दिली आहे. त्यात 'कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्र्' चे नाव वाचल्यावर चटकन एका कथेची आठवण झाली, जिच्यात अगदी गंमतीशीररितीने या नाटकातील पात्रांचे नाव येते. तीच कथा खालील संभाषणावरून सदस्यांनी ओळखायची आहे.

.....'नमस्कार ! नमस्कार!" कोणी तरी अगदी त्याच्याजवळच खिस्स केले. तो चमकला व त्याने मागे वळून पाहिले. हातात नेहमीची पिशवी घेऊन दाढीवाले केतकरशास्त्री उभे होते.
"का? फार दिवसांनी गाठभेट?" एक चारमिनार पेटवीत त्याने विचारले. गेल्या शनिवारीच त्यांची भेट झाली होती.
"ह्यः ह्यः काही नाही, आपला सल्ला घेणार होतो. आपण विद्वान, आपला व्यासंग दांडगा..." केतकरशास्त्री.
दमून गेल्याप्रमाणे दत्तूने धूर सोडला. बाबारे, हा सारा तमाशा कशाला? किती पैसे पाहिजेत बरे?
"उद्या मी जी कथा सांगणार आहे," बुवा सांगत होते, "ती आहे एका फेरीवाल्याची. मोठ्या दुकानातून माल घ्यायचा, गल्लोगल्ली हिंडून विकायचा. अत्यंत सज्जन, दरिद्री, पण सोन्याच्या मनाचा. पण त्याला नाव काय द्यावे हे मला समजेना. नाव कसे असावे, तर संस्कृतप्रचुर, गंगाकाठचे, कन्याकुमारीच्या छायेतले---"
त्या शब्दांनी एका अजस्त्र चिकट कोळ्याच्या जाळ्यात सापडल्याप्रमाणे दत्तूचे मन धडपडू लागले, अंग झटकू लागले. तो गुदमरू लागला.
"हो, मग त्याला तुम्ही अग्निमित्र का नाव देत नाही?' त्याने चिडून विचारले.
"वा, छान आहे नाव !" उत्साहाने पुढे सरकत बुवा म्हणाले, "पण एक नम्र प्रश्न. अग्निमित्रच का?"
"म्हणजे संस्कृतमध्ये अग्निमित्र म्हणून कुणीतरी मालविक्या आहे ना?" जळजळीत डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत दत्तू म्हणाला. बुवा गोंधळले व वरमले.....

===========================

~~ संकेत
१. कथा आहे हे तर स्पष्टच आहे.
२. ही कथा ऑगस्ट १९५९ साली प्रथम प्रकाशित झाली....म्हणजे आज तिच्या प्रसिध्दीला ५१ वर्षे पूर्ण झाली असली तरीही ती संवादातील धारेमुळे रसरशीत वाटते.

उत्तर :
कोड्यात भाग घेतलेल्या जवळपास सर्वच सदस्यांनी लेखक आणि पुस्तक ओळखले आहे.
जी.ए.कुलकर्णी यांच्या "हिरवे रावे" या कथासंग्रहातील 'माणूस नावाचा बेटा' ही ती कथा ज्यातील तो वेचा.

ज्यांच्याकडे हा संग्रह नाही पण कथा वाचावीशी वाटते त्यांच्यासाठी http://www.manogat.com/node/7709
या संकेतस्थळावर पूर्ण कथा उपलब्ध आहे. रूची असणार्‍यानी जरूर लाभ घ्यावा.

सर्वांना धन्यवाद !

इन्द्रा