श्रीगणेश लेखमाला - एकल प्रवास - सोलो ट्रॅव्हल

By समर्पक, 17 September, 2018

.

एकल प्रवास - सोलो ट्रॅव्हल
एकल प्रवास! या वेळी थीमच डीआयवाय (Do it yourself) असल्याने भटकंती-प्रवासाचा या दृष्टीकोनातून विचार करू या. सेल्फ प्लॅन्ड भटकंतीतही एकल प्रवास या थीमसाठी एकदम चपखल! अर्थातच त्यामुळे एकट्याने 'पॅकेज टूर'बरोबरचा प्रवास, एकल असला तरीही येथे विचारात घेतलेला नाही. एकल प्रवासातही बॅकपॅकिंग या प्रकारावर हा लेख बेतलेला आहे, याशिवाय लोक सायकल, बाईक, स्वतःचे वाहन इत्यादी साधनांनीही एकट्याने प्रवास करतात, पण ते सर्व जरा वेगळ्या प्रकारात मोडते. परदेशात व देशातही, अलीकडे बऱ्यापैकी लोक एकट्याने प्रवास करायला लागले असल्याने "हॅ, एकटंच काय जायचं!" हा विचार बऱ्यापैकी कमी होत चालला असल्याचे लक्षात येते. एकंदरच या इंडस्ट्रीमध्ये 'एक्स्प्लोजन'सम स्थिती आहे. तुमच्यापैकी काही लोकांना अनुभव असेलही, परंतु तरीही बऱ्याच लोकांना अजूनही त्या पहिल्या 'पुश'ची आवश्यकता असते, त्यांचे धैर्य वाढवण्यासाठीही हा लेख उपयोगी यावा, व इतरांना नुसती माहिती म्हणून. फायदे-तोटे समज-गैरसमज यांच्या माध्यमातून एकल प्रवासाचा स्वानुभवाधारित हा ऊहापोह... भटकंती डन 'डीआयवाय'!!

एकल प्रवासाचे काही ठळक फायदे पाहू या..

चाकोरीबाहेरच्या जगाची ओळख
एकल प्रवासाची सर्वात मोठी देणगी म्हणजे कोषातून बाहेर पडणे ही आहे. विहिरीतल्या बेडकाच्या गोष्टीप्रमाणे आपल्या आवतीभोवतीच्या ओळखीच्या विश्वाच्या पलीकडचे जग कित्येक वेळेला ज्ञातच नसते किंवा समोर असूनही आपल्याला दिसत नाही, किंबहुना आपण पाहत नाही. परंतु बऱ्याच वेळेला एकांत, दृष्टीवरचे हे पटल दूर करून एक वेगळीच दुनिया दाखवतो. नव्या ओळखी, नवे मित्र जोडत, त्यांचे विश्व आपण आपल्या नजरेने पाहत आपली क्षितिजे नकळत विस्तारून जातात. सामान्यातिसामान्यांच्या ओळखी खरी दुनियादारी काय आहे हे दाखवतात व शिकवतात. माझा सगळ्यात पहिला एकल प्रवास हा वेरूळची लेणी पाहण्याकरता केलेला, साधारण सोळा-सतराव्या वर्षी, कमावत नसताना केलेला पहिला आणि एकच, आणि त्यामुळे काटकसरीचे आणखी वेगळे धडे देणारा. जन्मापासून मी मुंबईकर, पण त्या प्रवासाने मला ग्रामीण भागात लोक कसे राहतात याची झलक दिली. लहान वयाचा आणखी एक फायदा असतो - लोक प्रेमाने अगत्य करतात. असो, तर मुद्द्याकडे वळताना, प्रवासात 'जग जाणून घेण्यासाठी' असा एक हेतू, 'सोबत' नसली की सोबत ठेवणे सहज घडते. कोहिमा, नागालँड. ईशान्य भारत प्रवासात निनोच्या घरी मुक्काम होता. स्थानिकांच्या नजरेतून भारत दर्शन.स्वतःच्या क्षमतेची ओळख
वरच्याच मुद्द्याची ही उलट बाजू... जशी जगाची ओळख वाढत जाते, तशीच स्वतःबरोबर समय व्यतीत केल्याने स्वतःचीही ओळख होत जाते. वाक्य फार तत्त्वज्ञानयुक्त वाटू शकते, परंतु सोपे करण्यासाठी लहानसा अनुभव - पायी चालत अफगाणिस्तानची सीमा ओलांडून त्या वैदिक आर्षभूमीची गळाभेट घेऊ, हे कधी स्वप्नातही शक्य वाटले नसते. परंतु आपल्यात काय निभावून नेण्याची क्षमता आहे याची एकेका प्रवासात हळूहळू ओळख होत गेली. सामर्थ्य अचानक येत नसते, येऊही नये. परंतु प्रयत्नपूर्वक ते येते तेव्हा त्याची ओळख व त्याचा योग्य वापर यासाठी आवश्यक चिंतन हे स्वतःबरोबर समय व्यतीत केल्याने सुलभ होते, असा वैयक्तिक अनुभव. कुठल्या परिस्थितीला आपण कोणत्या प्रकारे तोंड देणे योग्य व परिणामकारक ठरेल त्याची ओळख स्वतःलाच हवी, ती असणे म्हणजेच 'प्रसंगावधान'! एकल प्रवासात नाही म्हटले तरी जाणतेपणी स्वतःला प्रसंगात टाकणे होते व त्यामुळे अवधाने सक्षम होतातच.इमं मे गंगे यमुने सरस्वति शुतुद्रिस्तोमं सचता परुष्ण्या | असिक्न्या मरुद्वृद्धे वितस्तयार्जीकीये श्रुणुह्यासुषोमया || तुष्टामया प्रथमं यातवे सजूः ससर्त्वा रसयाश्वेत्या तया | त्वं सिन्धो कुभया गोमतीं कृमुम्मेहत्न्वा सरथं याभिरीयसे || - ऋग्वेदीय नदीस्तुती सूक्ताने अफगाणिस्तानात कुभा नदीस (काबुल) अर्घ्य... मैत्र जिवांचे
एकल प्रवासाचा सर्वात मोठा फायदा... नित्य नवे मित्र! नव्या नव्या ठिकाणी भटकताना कधी गरज म्हणून, कधी विरंगुळा म्हणून, तर कधी अगदीच योगायोगाने नवे मित्र जुळत जातात. कधी आपल्याला त्यांना हुडकावे लागते, जोडावे लागते, तर कधी याउलट ते आपल्याला हुडकतात. पण जग चांगल्या लोकांनी भरलेले आहे हा विश्वास या अनुभवात नक्की बळकट होत जातो. हा अनुभव अगदी ब्राझिलच्या जंगलापासून ते अफगाणी वाळवंटापर्यंत सर्वत्र समान व सुखद आहे. कधी यात नवी नातीही गवसतात, कधी मैत्री थोड्या पायऱ्या चढून वेगळ्या उंचीवरही जाते. परंतु एकंदर नात्यांची शिकवण देणारा हा अनुभव ठरतो, यात वाद नाही. आणि यासाठी सगळे सोडून निघालात तरच हा अनुभव विशेषत्वाने मिळणार आहे हेही नक्की. माझ्यासाठी प्रवासाचे हे एक सर्वात मोठे आकर्षण आहे. जगाच्या विविध कोपऱ्यांतून येणारे लोक त्यांच्या अनुभवातून तुमची समज अधिक प्रगल्भ करतात. त्यातले कोण फक्त हाय-हॅलो पुरतेच, कोण दिवसभराचेच साथी, कोण फेसबुकवर ठेवण्यालायक, कोणाबरोबर फोन नंबर शेअर करायचा, कुठे त्रासदायक गुंतागुंत होतेय का, कुठे ती समोरून होतेय का, वन नाइट हॅण्डल होणार आहे का, आणि ते तिथेच संपणार आहे का, असे अनेक प्रश्न कुठे अनुभवाने, तर कुठे इंट्युशनने पटापट सोडवत पुढे जात राहणे ही एकल प्रवासाची मजा.ग्वाटेमालामध्ये तासाभराच्या विमानप्रवासातही अगदी नात्यातले असावेत अशी जवळची मैत्री झालेले आजी-आजोबा... भटक्या जीवनशैलीची झलक
कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी एकल प्रवास केला असेल आणि इतरांनी किमान 'क्वीन' हा चित्रपट तरी पहिला असेल, त्यातले होस्टेलवरचे जीवन आठवा. अशा एकटे भटकणाऱ्या लोकांची एक जमातच आहे असे म्हणेन मी. शेअरिंग बेसिसवर डॉर्म हॉस्टेलमध्ये राहणे, दररोज नवे मित्र बनवून त्यांच्याबरोबर भटकणे, आपली एक क्रिएटिव्ह ओळख मागे ठेवणे, त्या त्या ठिकाणची आठवण-ओळख स्वतःबरोबर घेणे, जमल्यास लहानमोठे काम शोधणे (परदेशात असल्यास व्हिसा नियमानुसार) किंवा व्हॉलंटरी कुठल्या कामात विनामोबदला मदत करणे आणि या कशातही अडकून न पडता पुढल्या मुक्कामी जात राहणे... आयुष्याकडे बघण्याची नजर यामुळे खूप सुटसुटीत होत जाते. फार गुंता न करण्याची सवय लागते. कदाचित स्थैर्याचा अभाव वाटूही शकतो यात, पण हे असे जीवन काही आयुष्यभरासाठी नाही, तर एक अनुभव म्हणून नक्की चाखावे...बोगोटा, कोलम्बिया. ल्युडो खेळत हॉस्टेल मित्रांबरोबर जागवलेली रात्र... स्वातंत्र्य
स्वतःला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्याचे स्वातंत्र्य, जशा करायच्या तशा करण्याचे स्वातंत्र्य व त्यासाठी आपल्याला हवा तितका वेळ देण्याचे स्वातंत्र्य! माझा पहिला महाराष्ट्राबाहेरचा मोठा एकल प्रवास माझ्या कायम लक्षात राहील. उभा तामिळनाडू पालथा घातला होता. प्रादेशिक, सांस्कृतिक अनुभव हा विषय होताच, पण त्याआधी माझ्या धर्माविषयी आणि देशाविषयी घरात जे शिकलो त्यापलीकडे माझी नुसतीच पुस्तकी मते होती, तेव्हा स्वतः अनुभवातून ती मते दृढ किंवा दुरुस्त करून घेणे असा एक उद्देश. पुढे देशाच्या विविध भागात भटकंती करताना तो अभ्यास चालू ठेवला. पण ज्या ज्या वेळी असा उद्देशाने प्रवास होत असे, तेव्हा त्यासाठी आवश्यक मोकळीक मिळण्यासाठी असा विविक्त प्रवास सर्वात पोषक. तशीच कथा अंकोरवट किंवा माया संस्कृतीचे अवशेष बघण्यास गेलो तेव्हाची. २-२, ४-४ तास एकेका वास्तूला, शिल्पाला, अनुभूतीला देऊ शकू असे स्वातंत्र्य हवे होते, त्यामुळे एकला चालो रे. अशा वेळी मग प्रवासी मित्रसुद्धा माझ्या तंत्राने चालणार नसतील, तर जरा लांबच ठेवतो मी.
स्वातंत्र्याचा थोडा वेगळा दुसराही अर्थ - तुम्हाला जज करणारे ओळखीचे साक्षी जग एकल प्रवासात आजूबाजूला नसते. बऱ्याच वेळा तुमचे वर्तन हे 'चार लोकांत मान्य असेल असे' किंवा त्यांना ओळखीच्या असलेल्या, तुमचे तुम्हीच साकारलेल्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असेच असावे लागते. जरा चाकोरीबाहेरील चाल, संयत व शिष्टसंमत असली तरी तुमच्या परिचित व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत नसल्यास इतरांचे कटाक्ष ओढवून घेऊ शकते. एकल प्रवासात तसे दडपण उरत नाही. त्यामुळे एक तर तुम्हाला हवा तसा अनुभव तुम्ही घेऊ शकता व शिवाय तुमच्या अनुभवातील जेवढे तुम्ही शेअर कराल तेवढेच प्रसिद्ध होणार आहे, त्यामुळे तो एक कंट्रोल किंवा फिल्टर मला आजकालच्या 'ओव्हर जजमेंटल' जगात फायद्याचा वाटतो.मंडले, म्यानमार. सायकलवर शहरातील प्राचीन वास्तू व बौद्ध विहारांना भेट... स्थानिक वेष, नैसर्गिक सनब्लॉक तनुखा...
एकांत
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असून एकांताला तो स्वभावतः घाबरतो, हे सत्य आहे. परंतु त्याचबरोबर जेव्हाही संतृप्तीमुळे म्हणा किंवा उद्विग्नतेमुळे म्हणा किंवा केवळ ज्ञानातून येणाऱ्या वैराग्यामुळे जेव्हा तो एकांत पत्करतो, तेव्हा त्याचे होणारे परिणाम फार खोलवर असतात. पण समजा, या तिन्ही स्थितींत नसताना जेव्हा मनुष्य जाणतेपणी काही क्षणांसाठी एकांत स्वीकारतो, तेव्हा एकतर त्याला ध्यान म्हणतात किंवा चिंतन. यातील चिंतनासाठी एकल प्रवास अतिशय उत्तम. रोजच्या प्रश्नांपासून जरा दूर जाऊन एक त्रयस्थ म्हणून स्वतःचेच अवलोकन करताना बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. एका क्षणाचा महिमा आणि सिद्धार्थाचा बुद्ध झाला, नरेंद्राचा विवेकानंद झाला... ही फार मोठी उदाहरणे झाली, केवळ सर्वमान्य आहेत म्हणून हे दाखले. परंतु वैयक्तिक पातळीवर स्वतःच्या क्षुद्र क्षमतेतही असे लहानमोठे उद्योतक क्षण अनुभवास नक्की येतात. परंतु अपेक्षा आहे ती एकांताची. आणि हे नेहमीच्या धकाधकीतून दूर गेल्याशिवाय साधत नाही, म्हणून थोडे उपद्व्याप. एकल प्रवासावरील आक्षेपाचे सर्वात मोठे कारण एकाकीपणाचे भय हेच आहे. पण ट्रस्ट मी, डर के आगे जीत है। :-)त्रिसूर, केरळ. दाक्षिणात्य भटकंती. आत्मविश्वास, स्वावलंबन व सकारात्मक दृष्टीकोन
हा एकंदरच डीआयवाय कन्सेप्टचा महत्त्वाचा लाभ आहे. सुरुवातीपासून आखणी व अंमलबजावणी करता करता हे लक्षात येते की एकल प्रवास हे ऑन जॉब ट्रेनिंग असल्यासारखे आहे. एकल प्रवास हे प्लॅनिंग, बजेटिंग, टाइम मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, रिलेशनशिप मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट, बॅकअप प्लॅनिंग, व्हॅल्यू अढेअरन्स, फिअर मॅनेजमेंट, शेम मॅनेजमेंट या सगळ्याचे अगदी शंभर टक्के 'रिअल लाइफ' ट्रेनिंग आहे. बऱ्याच बाबतीत स्वतः सर्व करण्याशिवाय पर्याय नसल्याने स्वावलंबन आपोआपच साधते व त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. जसजसा लोकसंपर्क व संग्रह वाढत जातो, तसे मागे म्हटल्याप्रमाणे 'जग चांगल्या लोकांनी भरलेले आहे' ही सकारात्मक भावना आपला दृष्टीकोन खूपच निर्मळ करते. वरच्या लांबलचक यादीतले तीन मुद्दे जरा विस्ताराने स्पष्ट करतो.

व्हॅल्यू अढेअरन्स : तत्त्वनिष्ठा! कितीही कठीण परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांशी ठाम राहणे जमते आहे का? याची परीक्षा, तसेच असे करण्यामध्ये एक कर्मठपणा येऊ न देता असमांतर तत्त्वांचाही आदर करता येतो आहे का? याचीही परीक्षा. लहानसे उदाहरण - साधारण अठराव्या वर्षी मी मांसाहार सोडला. त्यानंतर जिथे शाकाहार हीसुद्धा एक जीवनशैली आहे हेही माहीत नसलेल्या अनेक भागात प्रवास घडला, परंतु कोठेही अडले म्हणून नाही, काही ठिकाणी अवघड गेले आणि तीच परीक्षा. उझबेकिस्तानात एका कुटुंबाबरोबर राहत असताना इतके जवळचे नाते जडले, दुसऱ्या दिवशी मी बटाट्याचा रस्सा वगैरे बनवला त्यामुळे स्वयंपाकघरापर्यंत संचार झालेला होता व मित्राची आई एकदमच खूश. तिसऱ्या दिवशी मला रात्री जेवणाचा आग्रह करण्यात आला. आग्रह म्हणजे अगदी प्रेमाचा कडेलोट! आईंची खास पाककृती काय, तर 'बीफ सूप'... आता आले का धर्मसंकट! मलाच काय, बऱ्याच भारतीय मांसाहारींनाही हे संकटच. त्यांना समजावले की आम्ही गाईचे दूध पितो, त्यामुळे ती आम्हाला आईसारखी आहे व त्यामुळे आम्ही गाईचे मांस खात नाहीच, परंतु वैयक्तिक मत म्हणून कोणतेच मांस न खाण्याचा माझा नियम आहे. लटके रुसवे-फुगवेही झाले, पण शेवटी त्यांचा आहार त्यांनी केला, माझा मी. (वाचताना खूप सोपे आहे, पण विशुद्ध प्रेमाच्या अशा प्रसंगी नकार देणे अत्यंत कठीण. पण अगदी अनोळखीतून अशी स्निग्ध नाती जोडण्याचे योग येणे हे खरे भाग्य! त्यासाठी मी कायम ऋणी राहीन!)

तरमीझ, उझबेकिस्तान. "तू आम्हाला मुलाप्रमाणेच आहेस" असे मनमोकळेपणे सांगणारे व तशी वर्तणूकही करणारे प्रेमळ उझबेक कुटुंब त्या दिवशीचा जेवणाचा बेत - मित्रासाठी उझबेक सूप (मोठ्या प्लेटमध्ये), मला उकडलेला बटाटा व टोमॅटो-मिरचीचे सॅलड
फिअर मॅनेजमेंट : डर सब को लागता है, गला सब का सूखता है! प्राणी म्हटला की भय नैसर्गिक आहे. भीतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक उदाहरण टॅरेंटुला किंवा साप किंवा मगर हाताळायची भीती ही प्रामुख्याने काल्पनिक असते. कधी असे प्राणी प्रत्यक्षात जवळून पहिलेच नसल्याने 'तो चावला तर...' वगैरे अशा प्रकारची भीती. आता ही भीती नाही घालवली तरी बिघडत नाही. पण एक धाडस म्हणून पाहिले करून. नाही जमले, तरी कोणाला कळणारे... स्काय डायव्हिंग, बंजी जम्पिंग हे सगळे यातलेच... एक भीती - सामानाची चोरी होईल किंवा फसवले जाऊ किंवा काही इजा होईल अशा प्रकारची. त्यासाठी जपून वावरणे, सजग राहणे, फार नजरेत येईल असे वेष, वर्तन टाळणे, असे काही वावगे घडलेच तर ट्रॅव्हल इन्शुरन्स असे उपाय करता येतात व ही भीती सुरक्षित ठेवते व कमी-अधिक प्रमाणात शिकवण्याचेच काम करते. एक भीती सर्वात महत्त्वाची - स्वतःच्या अस्तित्वाची, परत नाही आलो तर काय... यासाठी, लाइफ इन्शुरन्स आहे का, महत्त्वाच्या ठिकाणी नॉमिनी किंवा वारसदार नेमलेले आहेत का, स्वतःचे मृत्युपत्र आहे का... अशा अवघड प्रश्नांची तयारी हवी. आणि खरे तर यासाठी एकल प्रवासाची आवश्यकता नाही, तर नेहमीच्या जीवनातही ही तयारी हवीच.अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतातील वाळवंटात. आजतागायत पाहिलेल्यातली सर्वात वैराण जागा...
शेम मॅनेजमेंट : काही गोष्टी न करण्यात भीतीपेक्षा लज्जा कारण असते. कराओके नाइटला बिनधास्त शंभर लोकांसमोर गाणे, इथपासून न्यूड बीचला भेट इथपर्यंत किंवा त्याही पुढे ज्या गोष्टी लाजून आपण करणार नाही, त्या एकल प्रवासात बिनधास्त करा. फक्त स्वतःच्या मर्यादा पाळल्या म्हणजे झाले. ती गोष्ट केल्यावर स्वतःला स्वतःची लाज वाटणार नाही, याचे भान ठेवलेच पाहिजे.


एकल प्रवासाविषयीचे काही समज-गैरसमजसोलो ट्रॅव्हल हे अलीकडचे फॅड आहे...
प्राचीन काळापासून 'गुरू, ग्रंथ व प्रवास ही ज्ञानार्जनाची तीन साधने' मानली गेली आहेत. बऱ्याच गुरु-शिष्य कथांमध्ये शिक्षणानंतर गुरू परिक्रमेला पाठवतात असा उल्लेख मिळतो, तर अनेक संतांच्या चरित्रातही देशाटनाचे दाखले मिळतात. आदिशंकराचार्य, समर्थ विवेकानंद आदी अनेक विचारवंतांचा प्रवास देशाटनातून आलेल्या समाजाविषयीच्या कळवळ्यातून सुरू झालेला दिसतो आणि ज्ञानी अवस्थेला पोहोचल्यानंतरही आपले कार्य करण्यासाठी अशांनी भ्रमण केले. हे त्यातले उच्चकोटीचे दाखले झाले, परंतु इब्न बतूता, अल बेरूनी, रुमी, ह्युएन त्सेंग, मार्को पोलो हे दुसऱ्या फळीतले. व्यापार, धर्मप्रसार किंवा केवळ आवड अशा अनेक कारणांनी या लोकांनी देश पालथे घातले आणि बऱ्याच प्रवासात ते एकटेच होते. त्यांची लिखाणे आज अभ्यासाचा विषय बनलेली आहेत. त्यामुळे अशा आवडी असणारे व अशा प्रवासाची गरज ओळखणारे प्रत्येक काळामध्ये होऊन गेले आहेत आणि होत राहतील. आज माध्यमांतून याविषयी अधिक जागृती आली आहे हे खरे. तसेच देशात आता बऱ्यापैकी सुबत्ता आल्याने असे प्रवास अधिक सुकर झाले आहेत.डॅलस, टेक्सास. भरपूर गप्पा मारणारे सहप्रवासी बौद्ध भिख्खू. त्यांच्यासाठी वाहतुकीची साधने प्रगत झाली, तसा प्रवासाचा आवाकाही वाढला. शतकानुशतके पौर्वात्य परंपरांमध्ये पारिव्राजक व्रत अखंड चालू आहे. एकल प्रवास म्हणजे एकटेच राहणे
एकल प्रवासात बरोबर कोणी ओळखीचे न घेता जाणे असले, तरी प्रवासात मित्र जमतातच. मित्र हमखास मिळवण्याच्या काही युक्त्या म्हणजे सर्वप्रथम होस्टेलवर शेअर्ड डॉर्म्समध्ये राहणे. अशा ठिकाणी शक्यतो सकाळची न्याहारी फुकट असते किंवा जवळच न्याहारीचे ठिकाण असते. सकाळ सकाळ अशा ठिकाणी दिवस सुरू करताना नवीन मित्र बनवणे सर्वात सोपे. त्यातले तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जाणारे तुमचे त्या दिवसाचे साथी! दुसरी युक्ती संध्याकाळी अंधार पडल्यावर होस्टेलवरचे लोक्स परत येतात, तेव्हा नव्या ओळखी करून घेणे किंवा तिसरी, जास्तकरून विकसित वा पाश्चात्त्य देशात, सोशलायझिंगसाठी लोक जमतात तिथे नवे मित्र बनवणे. इथे थोडा वैयक्तिक सवयींचा वा तत्त्वांचा प्रश्न येऊ शकतो. मी दारू पीत नसलो, तरी बारमध्ये जाऊन 'सोशलाइज' करण्यात मला काही गैर वाटत नाही. किंबहुना ‘लोक जोडणे’ ही प्रवासाची गरज आहे, तसेच नशा न करणे हेही एकल प्रवासात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक योग्य आहे. काही अनुभव अगदीच अनपेक्षित असतात, एकटे न राहण्याच्या प्रयत्नात भलतीच संगत गळ्यात पडत नाहीये ना, याचेही भान ठेवावे लागते. अलीकडेच कोलम्बियामध्ये होस्टेलच्या गच्चीवर अशाच गप्पा रंगल्या होत्या. आम्ही चार जण होतो. त्यातली एकाकडे एक पुरचुंडी चुरचुरलेली लक्षात आली होती. दुसऱ्या वेळी अधिक निर्ढावलेपणाने त्याने समोरच सफेद पूड करंगळीवर घेत जोरदार नशा चढवला. आता ह्यात थेट असा धोका नाहीही आणि आहेही. कोकेन घेणारा त्याच्या त्याच्या नादात आणि पूर्णपणे निरुपद्रवी होता, त्यामुळे धोका नाही. परंतु त्या पदार्थाचा अंश जरी विमानतळावर किंवा अन्यत्र होणाऱ्या तपासणीत आपल्या सामानावर सापडला, तर आपली चूक नसतानाही नाही त्या त्रासाला सामोरे जावे लागायचे त्याचा धोका. त्यामुळे प्रसंगाचे भान ठेवणे व कायम त्यावर ताबा ठेवता येणे फार महत्त्वाचे.

टिकाल, ग्वाटेमाला. हा एकलपेक्षा युगल प्रवास म्हणायला पाहिजे... तिन्ही ज्येष्ठांच्या जोड्या विवाहित आहेत, बाकी आम्ही चार सोलो टर्न्ड ड्युओ... एकल प्रवास प्रामुख्याने तरुण मंडळींसाठी आहे
प्रवासात तरुण मंडळी अधिक असतात हे खरे, परंतु सर्व वयोगटातील लोक मला भेटलेले आहेत. उझबेकिस्तानात एक सहप्रवासी भेटलेला, रशियामधला. लग्न लवकर झाले, मुले झाली, पुढे ती शिकली आणि मार्गी लागली, आता हा बाबा सिल्क रूट भटकत आपली हौस पूर्ण करतो आहे. तशाच टर्कीमध्ये भेटलेल्या तैवानच्या मावशी. हैदराबादच्या वास्तव्यात ओळखीच्या झालेल्या एक प्राध्यापिकाही निवृत्ती जवळ आली असताना मिळालेल्या मोकळ्या वेळात प्रवासाचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे आवर्जून कळवतात. बोस्टनमधली आणखी एक मैत्रीण सिसिलिया - नवऱ्याचे अचानक निधन झाल्यानंतर तिच्या पूर्वजांचा मागोवा घेत असताना होंडुरासमध्ये भेटलेली. माझ्या मते विशी-तिशीतल्या तरुणांनी जग समजण्यासाठी नक्कीच भटकंती करावी. पण ते वय उलटले तरीही वेळ काही गेलेली नाही, उलट पुढल्या वयात हा अनुभव नक्की पाच-सात वर्षांनी मानसिक वय कमी करेल व भोवतालच्या जगाची नव्याने ओळख होईल.

एकल प्रवास बॅचलर व त्यातही सिंगल लोकांसाठी आहे
बॅचलर व सिंगल असण्यासारखे स्वातंत्र्य नाही हे खरे. एकल प्रवासासाठी ही उत्तम अवस्था. बिनधास्त धमाल. सिंगल नसताना जोडीने भटकण्यातही खूप मजा आहे. परंतु आधीपासूनच 'मी टाइम'चे अंडरस्टॅण्डिंग असेल, तर दोघेही आपापल्या पद्धतीने अध्येमध्ये असे प्रवास नक्कीच करू शकतात. जोडीदाराला सवय नसेल तर एकदा बरोबर घेऊन जाऊन ओळख करून द्यावी, लेटर शी विल थँक यू फॉर धिस हा स्वानुभव. लेस स्ट्रिंग्स अटॅच्ड रिलेशनशिप समजूतदारपणाच्या वेगळ्याच प्रतलात नेते. अर्थात, आपापल्या जबाबदारीवर हे प्रयोग करावेत :-) प्रवासात असे इतरही अनेक जण भेटतात, मुलीला नवऱ्याबरोबर सोडून ब्रेक घेऊन आलेली ईसा, गर्लफ्रेंडला इटली भटकायला पाठवून उझबेकिस्तानात आलेला मासी, एंगेजमेंटच्या आधीची शेवटची भटकंती म्हणून आलेली मेक्सिकन हेमा असे अनेक...कोपान, होंडुरास. सिसिलिया आणि स्टेफ यांच्याबरोबर फुल मोकाट भटकंती. सिसिलियाने थोरल्या म्हणून आमची काळजी घेतलीच, पण आमच्या बरोबरीला येऊन गोष्टी एन्जॉयही केल्याने त्यांचेही दुःख जरा हलके झाले. एकल प्रवास करायचा म्हणजे सगळी उठाठेव स्वतःलाच करायला लागते
हे मात्र अगदी शंभर टक्के खरे. सगळी उठाठेव स्वतःच करायची आणि म्हणूनच डीआयवाय विभागात हा लेख. अर्थात सवयीप्रमाणे कमी-अधिक सोपे काम आहे हे. सर्वात आधी भटकंती कुठे व कशासाठी या दोन प्रश्नांवर उत्तर मिळाले की पुढचे बरेच सोपे आहे. उदाहरणार्थ, भारताचा सांस्कृतिक ठसा अनुभवण्यासाठी आग्नेय आशियामध्ये केलेला प्रवास. उद्दिष्ट ठरलेले असल्याने थायलँडमधले फुकेत, क्राबी, पट्टाया कितीही सुंदर असले तरी उद्दिष्टाशी एकरूपता नसल्याने प्रवासाच्या यादीत ते कधी आलेच नाहीत, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन टळले. आता अभ्यासाचा फोकस सुखोथाई वगैरे महत्त्वाच्या ठिकाणावर योग्य प्रकारे स्थिरावला. काही वेळा सहा सहा महिन्यांची तयारी लागते. त्यात स्थानिक भाषा, महत्त्वाच्या चालीरिती, सुरक्षेचा अभ्यास हे सर्व महत्त्वाचे घटक. अफगाणिस्तानात जाण्यासाठी ही सर्व तयारी आवश्यक होती. तर काही वेळा त्याउलट फक्त जायचे-यायचे तिकीट, बाकी सर्व जसे होईल तसे. पण सामान्य ठोकताळे द्यायचे म्हटले, तर सर्वात पहिले योग्य दरात तिकीट बुक करणे. भारतात व रेल्वेने प्रवास असेल तर तीन महिने आधी करावेच लागते, विमानाने असेल तर त्याप्रमाणे किमतींवर दोन आठवडे लक्ष ठेऊन योग्य वेळी बुक करणे. विमानासाठी मी momondo.com, skyscanner.com या साइट्स वापरतो. पुढे राहण्याची व्यवस्था, हॉस्टेल यासाठी agoda.com ही उत्तम. पण त्याआधी सोशल नेटवर्कवर झालेल्या दोस्तांचा सल्ला वापरायचा. couchsurfing.com हा स्थानिक दोस्त जोडण्यासाठी तसेच राहायची जागा फुकट किंवा स्वस्तात शोधण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग. त्याचबरोबर इथे त्या भागात येणारे सहप्रवासीही शोधता येतात. airbnb.com ही साइट स्थानिक कुटुंबाबरोबर राहण्याची इच्छा असेल तर सोयीस्कर आहे. परंतु कधीकधी येथे हॉटेलसारखीही व्यवस्था असू शकते, तेव्हा नीट माहिती वाचून मगच बुक करावे. या सगळ्याच साइट्सवर रिव्ह्यू वाचून मगच निर्णय घेणे सुरक्षित व शहाणपणाचे.कोपान होंडुरास, टिपिकल बॅकपॅकर स्वस्त हॉस्टेल. कुझको, पेरू. ऐतिहासिक इमारतीतले हॉटेल प्लस हॉस्टेल. इग्वाझू, ब्राझिल. साधी स्वच्छ मिक्स डॉर्मेटरी. बाकू, अझरबैजान. बंक बेड मिक्स डॉर्मेटरी. राहण्यासाठी स्वस्त आणि मस्त व्यवस्था, शिवाय नवे दोस्त हमखास. एकल प्रवास आवडेल, पण पण लोक काय म्हणतील...
हे आपण काहीही केले काय किंवा नाही केले काय, लोक काही ना काही तर म्हणणारच आहेत. माझ्या तर एका आत्याने फेसबुकवर ती नवीन असताना कुठल्याशा पोस्टवर #solotravel टॅग पाहून चक्क वॉलवर (जुन्या भाषेत, 'भर चौकात') विचारले, 'अजून सोलोच का?' असो. तर, लोक बोलतीलच, काही वैयक्तिक ध्येय ठेवून काही साध्य करण्यासाठी ही उठाठेव असेल, तर त्याची किंमत स्वतःला असली म्हणजे झाले. त्यामुळे प्रवासाच्या तयारीला लागून तिथे कसे लोक भेटतील याचा विचार अधिक फायद्याचा. जर कोणाच्या घरी उतरण्याइतके नाते जोडायचे असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो. अर्थात, वेगळ्या मार्गाने त्या कुटुंबाला उपकाराची परतफेड निश्चित करावी. त्यामुळे हा फुकट मार्ग नक्कीच नाही, पण सुरक्षित नक्की आहे व अतिशय सहजतेने त्या संस्कृतीत आपल्याला सामावता येते. सवयीने साधते. सॅन बेनिटो, एल साल्वाडोर. एडविन व त्याचे कुटुंबीय, एक अविस्मरणीय प्रवास. कुरीतिबा, ब्राझिल. airbnbचा माझा सर्वोत्तम अनुभव जू आणि जो च्या घरी.
लेखाचा शेवट करताना, एक विचार. आयुष्य खूप सुंदर आहे, आणि हे जग अथांग आहे. तोकडे पडणार हे माहीत असूनही या दोन हातांनी, दोन डोळ्यांनी जे जे अनुभवता येईल तितके आपल्या झोळीत भरून घ्यायचा प्रयत्न. मनुष्याला सोबत कुणीतरी आहे हा फार मोठा भ्रम सदैव असतो. तो तसाच ठेवल्याने जगराहाटी चालू आहे. पण कटू सत्य हेच आहे की येताना आणि जाताना तर एकटे असतोच, तसेच त्या दोन प्रसंगांतले जीवन नावाचे अंतर चालतानाही आपल्या ओझ्याचे आपणच मालक नि आपणच वाहक! आणि यात DIYला पर्यायच नाही! त्यामुळे आपण सारेच खरे तर एकल प्रवासी... नाही का?
शुभं भवतु।