वारंवार ’गुदमरण्या’साठी प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९९९-उपांत्य फेरीचा सामना (एकदिवसीय सामना क्र. १४८३)
बर्मिंगहॅममधील ’एजबॅस्टन’ मैदान
बरोबरीत सुटलेला पहिला कसोटी सामना होता रिची बेनो आणि फ्रँक वॉरेल यांच्या संघातला. डिसेंबर १९६० साली ऑस्ट्रेलियात हा सामना खेळला गेला तेंव्हां मी पुण्याच्या COEP मध्ये इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो आणि हॉस्टेलमध्ये रहात होतो. सगळे विद्यार्थी रेडियोच्या भोवती गर्दी करून बसलेले. अगदी चिकटून बसलेल्यांनाच कांहीं तरी ऐकू यायचं. प्रक्षेपणही चांगलं नव्हतं. Short Wave वरचं स्टेशन सारखं जात-येत होतं. त्यात सामना संपला तेंव्हां कॉमेंट्री सांगणाराच इतका उत्तेजित होऊन ओरडत होता कीं तो काय बोलत होता तेही समजत नव्हतं. चित्रवाणी भारतात तरी अजून यायचीच होती. थोडा आरडा-ओरडा ओसरल्यावर कळले कीं सामना बरोबरीत सुटला आहे. असं होऊ शकतं? हा पहिलाच असा सामना होता.
१९९९ साली एकदिवशीय विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना झाला तोपर्यंत सामने चित्रवाणीवर पहाण्याची सोय झाली होती. त्यांचं चलच्चित्रणही खूप सुधारलं होतं. त्यामुळं बरोबरीत सुटलेल्या या सामन्याच्याबाबतीत मात्र संपता क्षणी कळलं काय झालं ते! तरी पण बरोबरीत सुटलेल्या सामन्यानंतरची अविश्वासाची भावना मात्र तशीच होती.
या सामन्यातही यशाचं पारडं सारखं एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे झुकत होतं! दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २१३ धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्या २१३ ची धावसंख्या ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटच्या षटकातले चार चेंडू झाले होते, दोन उरले होते आणि दक्षिण आफ्रिकेची शेवटची जोडी खेळत होती. दक्षिण आफ्रिकेला या दोन चेंडूत एक धाव हवीच होती, बरोबरी पुरेशी नव्हती कारण त्या आधीच्या Super-Six मधील ऑस्ट्रेलियाच्या सरस प्रदर्शनामुळे बरोबरी झाल्यास ऑस्ट्रेलियाला पुढे चाल मिळाली असती. या उलट ऑस्ट्रेलियाला बरोबरीही चालणार होती. म्हणजे त्या दोन चेंडूत एकही धाव दक्षिण आफ्रिकेला काढू द्यायची नव्हती.
सामन्याचे प्रमुख आकडे
ऑस्ट्रेलिया
फलंदाज धावा/चेंडू/धावगती
गिलख्रिस्ट २०/३९/५१
मार्क वॉ ०/४/०
पाँटिंग ३७/४८/७७
लेमन १/४/२५
स्टीव वॉ ५६/७६/७४
बेव्हन ६५/१०१/६४
टिम मूडी ०/३०
शेन वॉर्न १८/२४/७५
रायफेल ०/२/०
फ्लेमिंग ०/२//०
मॅग्रा ०/१/० (नाबाद )
इतर १६
एकूण २१३
६८ धावांवर ४ बळी पडल्यानंतर बेव्हन आणि स्टीव वॉने ९० धावांची भागीदारी केली पण १५८ वर स्टीव वॉ आणि पाठोपाठ मूडी बाद झाले. बेव्हनने एकाकी किल्ला लढवला व तो शेवटी दहावा बाद झाला.
गोलंदाजी: शॉन पोलॉकने ३६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले तर अॅलन डोनाल्डने ४ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिका
फलंदाज धावा/चेंडू/धावगती
कर्स्टन १८/४२/४३
गिब्ब्ज ३०/३६/८३
कलिनन ६/३०/२०
क्रोन्ये ०/२/०
कॅलिस ५३/९२/५८
र्होड्स ४३/५५/७८
पोलॉक २०/१४/१४२
क्लुसेनर ३१/१६/१९३ (नाबाद)
बाउचर ५/१०/५०
एल्सवर्थ १/१/१००
डोनाल्ड ०/०/-
इतर ६
एकूण २१३
गोलंदाजी: वॉर्नने चार बळी घेतले, मॅग्रा, फ्लेमिंग आणि रायफेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला तर ३ खेळाडू धावबाद झाले.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची सुरुवात बरी होती. ४८ धावांच्या सुरुवातीनंतर मात्र ६१ धावा होईपर्यंत त्यांचे चार बळी-कर्स्टन, गिब्ब्ज, कलिनन आणि कप्तान क्रोन्ये-पडले होते. त्यानंतर कॅलिस आणि जाँटी र्होड्स यांनी डाव सावरला. र्होड्स १४५ वर तर कॅलिस १७५ वर बाद झाला. त्यानंतर मात्र एकट्या क्लुसेनरने किल्ला लढवत पोलॉक, बाऊचर यांच्या बरोबर भरभर धावा काढत २१३ पर्यंत धावसंख्या आणली. दोन चेंडूत एक धाव हवी असताना पाचव्या चेंडूवर क्लुसेनरने मारलेल्या फटक्यावर एक अशक्य धाव घेण्याचा कांहींसा अनावश्यक प्रयत्न करताना अॅलन डोनाल्ड धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत जायचा मार्ग मोकळा केला.
२४ चेंडूत १८ धावा करणारा आणि चार बळी घेणारा शेन वॉर्न सामनावीर निवडला गेला.
अॅलन डोनाल्ड आजही म्हणतो तो कधी-कधी रात्री दचकून उठतो आणि असा मूर्खपणा आपल्या हातून कसा झाला याबद्दल हळहळ करत रहातो.
ऋणनिर्देश: माझे सहकारी श्री. नाफडे यांचे आकडे आणि इतर माहितीबद्दल आभार