विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प दुसरे - इम्रान खान

By मृत्युन्जय, 16 February, 2011

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलिया कडे आहे. त्यांचे एकजात सगळेच खेळाडु उर्मट आहेत. अ‍ॅडम गिलख्रिस्ट सारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्यांचे सभ्यतेशी तसे वाकडेच आहे. उर्मटपणा तसा थोड्याफार फरकाने सगळ्याच देशाच्या खेळाडुंमध्येही दिसतो. तसे आपले श्रीशांत (याच्या नुसत्या नावातच 'शांत'ता आहे) आणि सरदार तरी काय कमी उद्धट आहेत का? पण ऑस्ट्रेलियाची गोष्टच वेगळी त्यांचा उर्मटपणा त्यांच्या देहबोलीतुन देखील जाणवतो. त्यासाठी त्यांना तोड उचकटायची किंवा हातवारे करायची गरज नसते.

ही लेखमाला विश्वचषकातल्या ७ महाउर्मट खेळाडुंना समर्पित आहे. काही नावे कदाचित अनपेक्षित असतील, काही नावे अपेक्षित असुनदेखील इथे दिसणार नाहीत. नाइलाज आहे. सध्या क्रिकेटमध्ये उर्मट खेळाडुंची संख्या बरीच आहे. पण हे जे ७ उर्मट उद्धट खेळाडु आहेत त्यांनी मैदानावर देखील करामत केली आहे. त्यामुळे त्यांची नावे इथे आहेत. ७ फक्त ७. बाकी लोग हमे माफ करे.

*************************************************************

इम्रान खान


नावः इम्रान खान नियाझी, वयः ५९ वर्षे (आजमितीला), राहता: पाकिस्तान, व्यवसाय: अशक्याला शक्य करुन दाखवणे (निवृत्त)

Statistics is like a bikini. what it reveals is suggestive, but what it conceals is vital. हे वाक्य इम्रान खानपेक्षा जास्त कोणालाही सुट होत नाही. १७५ एकदिवसीय सामन्यात २६.६१ च्या सरासरीने १८२ बळी आणि १ शतक आणि १९ अर्धशतकांच्या सहाय्याने ३५०० + धावा. शिवाय ८८ कसोटी सामन्यात ६ शतकं आणि १८ अर्धशतकांच्या सहाय्याने ३५०० + धावा आणि २२.८१ च्या सरासरीने ३६४ बळी ही आकडेवारी या माणसाला कपिल देव, रिचर्ड हॅडली, इयान बोथम या त्रिकुटाबरोबर एक चांडाळ चौकडी बनवण्यासाठी पुरेशी आहे. यात विश्वचषकातल्या १८ सामन्यांमधुन ३५ च्या सरासरीने ६६६ धावा (सैतानाचा आकडा. हादेखील तसा एक सैतानच होता म्हणा) आणि १९.३४ च्या सरासरीने ३४ बळी ही कामगिरी समाविष्ट आहे. काय म्हणता? या आकडेवारीमधुन असे वाटतय ना की एक अष्टपैलु म्हणुन त्या काळात इम्रान खान चांगलाच होता पण एक गोलंदाज म्हणुन काही विशेष नव्हता. २८ सामन्यांमध्ये केवळ ३४ बळी म्हणजे काही विशेष नाही. नाही का? पण मग यातुन १९८३ चा एक आख्खा विश्वचषक वजा करा. कारण या विश्वचषकातल्या ७ सामन्यांमध्ये इम्रान खेळला पण केवळ एक फलंदाज म्हणुन. दुखापतीमुळे तो या स्पर्धेत गोलंदाजीच करु शकला नाही. आता इम्रान ची कामगिरी अजुन खुलुन दिसते आहे ना. म्हणुनच म्हणले Statistics is like a bikini.

इम्रान खान नावाच्या वादळाचा जन्म लाहोरमधल्या एका उच्च मध्यमवर्गीय घरात झाला. क्रिकेटचे बाळकडु त्याला घरातच मिळाले त्याचे २ चुलत भाउ व्यावसायिक क्रिकेट खेळायचे. त्यापैकी माजिद खान तर पाकिस्तानचा कर्णधारच होता. पठाणी रुबाब, ६ फूटापेक्षा जास्त उंची, श्रीमंती राहणीमान, इंग्लंड मध्ये शिक्षण घेतल्यामुळे आलेले साहेबी उच्चार आणि आचार आणि जबरदस्त व्यक्तिमत्व यामुळे तो लवकरच तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हटल्यावर थोडा उर्मटपणा तर अंगी येणारचा. वेळोवेळी त्याने तो दाखवुनही दिला. अ‍ॅलन लँब आणि ग्रॅहम गूच ला त्याने जाहीरपणे असभ्य, उर्मट आणि वर्णद्वेषी म्हणुन संबोधले. हा उर्मटपणा, हा अ‍ॅरोगन्सच त्याला भविष्यात उपयोगी पडला, त्यालाही आणि पाकिस्तानलाही.

१९७१ ला तो इंग्लंड विरुद्ध पहिली कसोटी खेळला. या सामन्यात त्याला गोलंदाजी तर दिली गेलीच नाही. फलंदाजी करताना देखील तो केवळ ५ धावा करु शकला. या सामन्यानंतर त्याच्या संघसहकार्‍यांनी स्पष्टपणे सांगितले की त्याला पाकिस्तानी संघात स्थान मिळणे अशक्य आहे. पण तो इम्रान खान होता. अशक्य ते शक्य करुन दाखवण्याची त्याला सवय होती, आवड होती. तो परत आला आणि त्याच सहकार्‍यांच्या डोक्यावर मिर्‍या वाटुन पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातला सगळ्यात वलयांकित खेळाडु बनला.

इम्रान खान १९७५ ते १९९२ सगळे विश्वचषक खेळला. निवृती घेउन घेउन खेळला. त्यातला सगळ्यात संस्मरणीय जरी १९९२चा विश्वचषक असला तरी त्याने सगळेच विश्वचषक गाजवले.

पहिल्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघच फारसे काही करु शकला नाही. पण इम्रान खानने त्याची चुणुक दाखवले. २ सामन्यांत त्याने १७ षटकांमध्ये ६१ धावांच्या मोबदल्यात ५ बळी मिळवले. म्हणजे प्रत्येक १२ धावांमागे १ बळी. त्यात त्याने ग्रेग चॅपेल, रॉडनी मार्श, वर्णपुरा आणि डिसिल्वाला तंबुचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याला का बसवले होते देव जाणे. पण तो सामना पाकिस्तान केवळ एका विकेटने हारला. इम्रान खान असला असता कदाचित तर हे झाले नसते.

१९७९ चा विश्वचषक सुद्धा त्याच्यासाठी काही खास संस्मरणीय नव्हता. ४ सामन्यात त्याने ५० हुन कमी धावा केल्या आणि अवघे ५ बळी मिळवले. पण त्यातही ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात त्याने १३ धावांवर सलामीवीर डार्लिंगला तंबुचा रस्ता दाखवला आणि नंतर राइटला बाद करुन संघाच्या विजयात हातभार लावला. पाकिस्तानचे मालिकेतले आव्हान मात्र परत एकदा लवकर संपुष्टात आले.

१९८३ च्या विश्वचषकाच्या आधी मात्र इम्रान खानची धूम होती. वेस्ट इंडिजला रोखु शकणारा खेळाडु म्हणुन टाइम मॅगेझिनने त्याची भलामण केली होती. वर्षाची सुरुवात तर त्याने जबरदस्तच केली होती. भारताविरुद्ध त्याने मालिकेत १४ पेक्षा कमीच्या सरासरीने ४० बळी घेतले. गावसकर, कपिल देव, अमरनाथ सकट सगळे जण त्याच्यासमोर ढेपाळले. या माणसामुळे गावसकरचे कर्णधारपद गेले. तसे त्याने बर्‍याच जणांचे करीयर बरबाद केले आहे. हा गावसकर होता म्हणुन वाचला. १९८३ चा विश्वचषक इम्रान खानला प्रसिद्धीच्या नविन शिखरांवर घेउन जाणार होता. पाकिस्तानच्या आशा त्याच्यावर केंद्रीत झाल्या होत्या. पण हाय रे दैवा, इम्रान खान पायाच्या दुखापतीमुळे १९८३ च्या विश्वचषकात एकाही सामन्यात गोलंदाजी नाही करु शकला.

पण... पण तो इम्रान खान होता. हार मानना उसकी फितरत नही थी. गोलंदाजीची कसर त्याने फलंदाजीत भरुन काढली. ७ सामन्यांत ७१ च्या सरासरीने त्याने २८३ धावा काढल्या. यात १ शतक आणि २ अर्धशतकं होती. ३ ही वेळा तो नाबाद राहिला. श्रीलंकेविरुद्ध त्याने ३३ चेंडुत त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ५६ धाव काढल्या. पण त्यात काही विशेष नाही कारण त्या सामन्यात झहीर अब्बास आणि मोहसिन खान यांनीसुद्धा लंकेला झोडपुन काढले होते. पुढच्याच सामन्यात मात्र लंका वचपा काढण्यासाठी उतरली. अवघ्या ४३ धावांत मोहसिन खान, झहीर अब्बास, मन्सूर अख्तर आणि जावेद मियांदाद परतले होते. धावगती ४ पेक्षा कमे होती. आणि त्यानंतर इम्रान खान मैदानात उतरला. १३३ चेंडुत त्याने ११ चौकारांच्या सहाय्याने १०२ धावा काढल्या. त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतले एकमेव शतक त्याने विश्वचषकात काढले जेव्हा पाकिस्तान अडचणीत होते तेव्हा. पाकिस्तानने २३५ धावा केल्या आणि हा सामनाही खिशात घातला. नंतर न्युझीलंड विरुद्धही त्याने ७४ चेंडुत नाबाद ७९ धावा काढल्या. पाकिस्तानने हाही सामना जिंकला. नंतर उपांत्यफेरीच्या सामन्यात मात्र इम्रान पार अपयशी ठरला आणि पाकिस्तान वेस्ट इंडिज कडुन हारले. पाकिस्तानच्या विजयाची नाळ जणु इम्रान खान च्या खेळाशी जोडली गेली होती.

१९८३ साली झालेल्या दुखापतीमुळे इम्रान खान नंतर २ -३ वर्षे गोलंदाजी नाही करु शकला. पण नियतीशी झुंज द्यायची त्याला सवयच होती. त्याने पुनरागमन केले आणि त्याच झोकात केले. जणु मधली २-३ वर्षे काही झालेच नव्हते. तो नंतर इतका भरात आला की १९८७ चा विश्वचषक त्याचाच होता. सबकुछ इम्रान. ७ सामन्यात त्याने १४ च्या सरासरीने सव्वदोनशे धावांच्या मोबदल्यात १७ बळी मिळवले आणि १५० च्या आसपास धावा सुद्ध काढल्या. उपांत्य सामन्यापुर्वी त्याने रिचर्ड्स, लॅम्ब, गूच, हार्पर अश्या रथी महारथींना तंबूचा रस्ता दाखवला होता. बहुतेक सामन्यांमध्ये त्याने सलामीवीरांना परत पाठवले. तरी या ६ पैकी १ सामन्यात तो दुखापतीमुळे गोलंदाजी करुच शकला नाही आणि एका सामन्यात त्याल षटक अर्धवट टाकुनच परतावे लागले. पण तो जेव्हा जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा तेव्हा त्याने समोरच्या संघाच्या फलंदाजी कंबरडे मोडले. उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. मार्श, बून, जोन्स बॉर्डर च्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजीचे कंबरडे मोडले. एकटा इम्रान खान या तडाख्यातुन सुटला. त्याने १० षटकात ३५ धावा देत मोक्याच्या क्षणी ३ बळी टिपले. त्यामुळे ३०० कडे वाटचाल करत असलेल्या ऑस्ट्रेलियाला २६७ वर समाधान मानावे लागले. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानची अवस्था ३-३८ झाली होती. परत एकदा इम्रान खान मदतीला धावून आला. जावेद मियांदादच्या साथीने त्याने ११२ धावा काढल्या त्यात त्याचा वाटा ५८ धावांचा. पण अखेर मियांदाद आणि इम्रान खान परतले आणि पाकिस्तान अवघ्या १८ धावांनी हारले.

या विश्वचषकानंतर इम्रान खानने क्रिकेटला रामराम ठोकला आणि पाकिस्तानी क्रिकेटमध्ये एक पोकळी निर्माण झाली. अखेर खुद्द राष्ट्रप्रमुखाच्या झिया उल हकच्या विनंतीने इम्रान खान परतला आणि १९९२ च्या विश्वचषकामध्ये त्याने पाकिस्तानचे नेतृत्व केले. He was a borne leader. नेतृत्व गुण त्याच्यात जात्याच होते. आधिकारीक वृत्ती होती. त्याने मरगळलेल्या पाकिस्तानी संघात नवे प्राण फुंकले. खेळाडुंची अजिबात गय नाही केली. त्याकाळात त्याचे अनेकांशी वाजले. पण जिथे त्याला खुद्द राष्ट्रप्रमुखाची साथ होती तिथे तो कोणाची काय पत्रास ठेवणार? त्याने एक नव्या दमाचा संघ बनवला आणि तो विश्वचषकात उतरला. पण इम्रान खान बहुधा देवाचा (अल्लाहचा म्हणुयात वाटल्यास) नावडता खेळाडु होता. साखळीतल्या पहिल्या ४ सामन्यांपैकी २ सामने त्याला दुखापतीमुळे मुकायला लागले. पहिल्या चारातले २ पाकिस्तान हारला आणि एका सामन्यात इंग्लंड कडुन वरूणराजाच्या कृपेने हारता हारता वाचला. यानंतर इम्रान खानने त्याच्या सहकार्‍यांना "play like cornered tigers" हा मंत्र दिला. एका मुलाखतीत तो म्हटला होता "I have told boys to play like cornered tigers. You have nothing to lose from hereon. But if you play like tigers, I don't mind whether we win or lose". इम्रान स्वतः असाही एक सिंहच होता. त्याला सहकार्यांनी प्रेमाने "Lion of Lahore" ही उपाधी दिली होती. नंतर खरोखरच पाकिस्तानच्या संघात अभूतपुर्व बदल झाला. त्यांनी उरलेले तीनही सामने जिंकले. अंतिम सामन्याच्या आधी इम्रान खानची कामगिरी काही अभूतपुर्व नव्हती त्याने सव्वाशेच्या आसपास धावा काढल्या होत्या आणि केवळ ६ बळी मिळवले होते. पण त्याचे केवळ संघात असणेच पाकिस्तान साठी महत्वाचे होते. अंतिम सामन्यात मात्र त्याने सर्व कसर भरुन काढली. स्वतः ३ क्रमांकावर फलंदाजीला येउन त्याने विकेट न गमावता धावफलक हलता ठेवला. ९ धावावर गूचने त्याचा झेल सोडला आणि जणू विश्वचषकाला तिलंजली दिली. आउट होण्यापुर्वी इम्रान खानने संयमी ७२ धावा केल्या. नंतर अक्रम, मुश्ताक आणि आकिब जावेदने ठराविक अंतराने बळी घेतले. मात्र शेवटचा बळी घेण्याचा मान जणु इम्रान खानचाच होता. आणि तेच योग्य होते. तो कप त्याचाच होता शेवटी. इलिंगवर्थचा बळी घेत इम्रान खानने आपल्या विश्वचषकीय कारकीर्दीची यशस्वी सांगता केली.

नियती इम्रान खानवर अनेकवेळा रुष्ट झाली. सुरुवातीलाच सहकार्‍यांनी खिल्ली उडवुन त्याला संघाबाहेर काढले. मग दुखापतीमुळे १९८३ ते १९८५ अशी आयुष्यातली सोनेरी वर्षे वाया गेली. मग १९८७ च्या विश्वचषकाचा घास जणू तोंडातुन काढुन घेतला. पण इम्रान खान झगडत राहिला. तो वारंवार परत येत राहिला. तो स्वत:च एकदा म्हणाला होता "The more the pressure, the stronger I got". त्याने ते सिद्ध केले. टीकाकारांच्या, विरोधकांच्या इतकेच काय नियतीच्याही मनात नसताना त्याने प्रमुख खेळाडुंच्या दुखापतींनी ग्रासलेल्या, संघभावनेचा अभाव असलेल्या, अंतर्गत राजकारणाने पोखरलेल्या आणि औदासिन्याने पछाडलेल्या पाकिस्तानी संघाला या सर्वांच्या नाकावर टिच्चुन विश्वचषक जिंकवुन दिला. नियतीला आव्हान देण्याचे औद्धत्य असलेला इम्रान खान निसंशय विश्वचषकातला आमचा दुसरा उर्मटशिरोमणी आहे. हे दुसरे पुष्प शत्रुराष्ट्राच्या नागरिकाच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करु शकणार्‍या इम्रान खानला सादर समर्पित.