विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी - पुष्प पहिले - व्हिवियन रिचर्डस

By मृत्युन्जय, 15 February, 2011

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलिया कडे आहे. त्यांचे एकजात सगळेच खेळाडु उर्मट आहेत. अ‍ॅडम गिलख्रिस्ट सारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्यांचे सभ्यतेशी तसे वाकडेच आहे. उर्मटपणा तसा थोड्याफार फरकाने सगळ्याच देशाच्या खेळाडुंमध्येही दिसतो. तसे आपले श्रीशांत (याच्या नुसत्या नावातच 'शांत'ता आहे) आणि सरदार तरी काय कमी उद्धट आहेत का? पण ऑस्ट्रेलियाची गोष्टच वेगळी त्यांचा उर्मटपणा त्यांच्या देहबोलीतुन देखील जाणवतो. त्यासाठी त्यांना तोड उचकटायची किंवा हातवारे करायची गरज नसते.

ही लेखमाला विश्वचषकातल्या ७ महाउर्मट खेळाडुंना समर्पित आहे. काही नावे कदाचित अनपेक्षित असतील, काही नावे अपेक्षित असुनदेखील इथे दिसणार नाहीत. नाइलाज आहे. सध्या क्रिकेटमध्ये उर्मट खेळाडुंची संख्या बरीच आहे. पण हे जे ७ उर्मट उद्धट खेळाडु आहेत त्यांनी मैदानावर देखील करामत केली आहे. त्यामुळे त्यांची नावे इथे आहेत. ७ फक्त ७. बाकी लोग हमे माफ करे.

*************************************************************

व्हिवियन रिचर्डस

सर आयझेक व्हिवियन अलेक्झांडर रिचर्डस. बस नाम ही काफी है. १८७ एकदिवसीय सामन्यांमधुन ४७ च्या सरासरीने या पट्ठ्याने ६५००+ धावा काढल्या आहेत. ही फुटकळ माहिती झाली. विश्वचषकात या माणसाची बॅट बाजीरावाच्या तलवारीसारखी अजुन सटासट चालायची. ४ विश्वचषकात २३ सामन्यात ६३+ सरासरीने १०००+ धावा. ही आकडेवारी या माणसाची मैदानावरील मर्दुमकी सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. पण आकडेवारी फसवी असते. या धावा रिचर्डस बद्दल पुरेसा दरारा तयार करत नाहीत. त्याच्याबद्दल समजुन घ्यायचे असेल तर त्याला गोलंदाजी करणार्‍या दादा लोकांना विचारा. खासकरुन इंग्लिश गोलंदाजांना. औरंगजेबाच्या सरदारांना जसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसायचे तसा इंग्लिश गोलंदाजांना म्हणे रिचर्डस दिसायचा.

इम्रान खान रिचर्डस बद्दल काय बोलतो ते बघा:

"Sunil Gavaskar had the most compact defence and managed his in- nings better than any other batsman of his time. Javed Miandad and Allan Border were great accumulaters and, like Gavaskar un- derstood the art of making runs. Gordon Greenidge had an orthodox defence, yet when it came to attack was devastating. Ian Chappell was best in a crisis, pos- sessing mental strength, while his brother Greg was a powerful driver off the back foot. Barry Richards was the most orthodox batsman of my time, who never seemed out of balance and played his strokes with the minimum of effort. Zaheer Abbas was the best timer of the ball. Compared to Vivian Richards, however, all those were mere mor- tals. He was the only true genius of my time. He never had the defence of Gavaskar or the balance and poise of Barry Richards but the Almighty had gifted him with reflexes that no other had. These lightning reflexes enabled him to get into position so quickly that bowlers never quite knew what length to bowl to him."

च्युइंगगम चघळत चघळत तो नुसता मैदानात येताना दिसला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्या च्युइंगगम चघळणार्‍या चेहेर्‍यावर एक कमालीचा थंडपणा असायचा. जंगलात सिंह जसा आजुबाजुला कोण आहे याची पर्वा न करता येतो तसा तो यायचा. तो त्या मैदानावरचा राजा असायचा. उगाचच नाही त्याला किंग म्हणायचे. त्याच्या चेहेर्‍यावर येताना कमालीचे तुच्छ भाव असायचे. तोंडातुन तो एक चकार शब्द नाही काढायचा (बॅटिंग करताना. फिल्डींग करताना तो पंचांवर दबाव आणण्यासाठी प्रसिद्ध होता). पण त्याच्या चेहेर्‍यावरुन तो गोलंदाजाला किती किरकोळीत बडवणार आहे ते दिसायचे. आणि तसेच व्हायचे. रिचर्डस नावाच्या वादळात बहुतेक सगळे गोलंदाज पाल्यापाचोळ्यासारखे उडुन जायचे. लिली, थॉमसन, कपिल देव, इम्रान खान, इयान बॉथम, गार्नर, मार्शल असे दादा लोक गोलंदाजी करत असुनसुद्धा त्याने कारकीर्दीत एकदाही हेल्मेट वापरले नाही. हा या सगळ्यांचा धडधडीत अपमान होता. पण रिचर्डसकडे याच्याही पलीकडे जाउन गोलंदाजांना अपमानित करण्याची कला अवगत होती. उसका बल्ला बोलता था.

रिचर्डसची विश्वचषकीय कारकीर्द एकुण ४ स्पर्धांमधली. त्यातला पहिला विश्वचषक (१९७५) त्याच्यासाठी पुर्ण अपयशी होता. ५ सामन्यात मिळुन त्याला केवळ ३८ धावा करता आल्या. पण १९७७-१९७९ मध्ये पॅकर सर्कस सुरु झाली आणि त्यात जगातले झाडुन सगळे द्रुतगती गोलंदाज जमा झाले होते. त्या काळात हे गोलंदाज जेव्हा इतर सगळ्या क्लास फलंदाजांची (बॉयकॉट आणि गावसकर सोडुन कारण ते त्या स्पर्धेत खेळत नव्हते) डोकी फोडण्यात मग्न होते तेव्हा रिचर्डस ने त्यांची गोलंदाजी फोडुन काढली आणि त्यामुळे रिचर्डसची लार्जर दॅन लाइफ प्रतिमा तयार झाली. त्याचा त्याला अर्थातच १९७९ च्या विश्वचषकात फायदाच झाला. ४ सामन्यांत त्याने १०८.५ च्या सरासरीने २१७ धावा केल्या. यात अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध केलेल्या १३८ धावा आहेत. तो सामना इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज असा नव्हताच. तो सामना बॉथम, हेंड्रिक, क्रिस ऑल्ड आणि एडमंड विरुद्ध रिचर्डस असाच झाला (अर्थात सामन्यातील किंगच्या ८६ धावांचे आणि गार्नरच्या ५ बळींचे योगदान सुद्धा होते). विश्वचषकातला तो अंतिम सामना होता आणि कोण जि़ंकले असेल याचा अंदाज बांधाण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही. विंडीजने तो सामना ९२ धावांनी जिंकला.

१९८३ च्या विशवचषकापर्यंत तर रिचर्डस दंतकथेचा नायक झाला होता. ८ सामन्यांत ७३ च्या सरासरीने त्याने साडेतीनशे हुन आधिक धावा केल्या. त्यात त्याने कोणालाही सोडले नाही. ऑस्ट्रेलियाला बुकलला, पाकिस्तानला धुतला आणि भारताला सुद्धा तो भारीच पडला. या स्पर्धेत भारताची त्याच्याशी ३ दा गाठ पडली. २ वेळा जेव्हा तो अपयशी ठरला तेव्हा विंडीज हारले आणि एकदा जेव्हा तो बरसला तेव्हा कपिल देवसकट सगळेजण वाहुन गेले यातच सगळे आले. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो केवळ १७ धावांवर परतला. विंडीज हारले. मात्र दुसर्‍या सामन्यात विंडीजची अवस्था १ बाद १७ असताना तो आला आणि संघाच्या २४० धावा होइपर्यंत तो भारतीय गोलांदाजांची धुलाई करत होता. या २२३ धावांमधला त्याचा वाटा ११९ धावांचा. उरलेल्या १०४ धावा काढणारे दिग्गज डेस्मंड हेन्स, क्लाईव लॉईड, जेफ दुजॉ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. या सामन्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया (नाबाद ९५) आणी पाकिस्तानला (नाबाद ८०) असेच बुकलले. आणि मग ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि झिंबाब्वेच्या छाताडावर पाय रोवुन जेव्हा विंडीज अंतिम सामन्यात पोचले तेव्हा भारताच्या आणि विश्वचषकाच्या मध्ये हाच राक्षस उभा होता. तो होता तोपर्यंत भारताला काहीच आशा नव्हत्या. एकतर आव्हान १८३ सारखे मामूली होते. आणि रिचर्डस भलताच फॉर्मात होता. तो आल्यापासुन त्याने बॅट फिरवायला सुरुवात केली. २८ चेंडुत त्याने ३३ धावांचा खुर्दा पाडला. ३३ धावांवर जाउ नका. त्या ३३ धावा जीवघेण्या होत्या. तो केवळ दांडपट्टा फिरवत नव्हता तर एक जादुई खेळी खेळण्याच्या इराद्याने आला होता. कपिल देवच्या दोन जीव ओवाळुन टाकाव्यात अश्या चेंडुंना त्याने सीमापार भिरकावले होते. त्याबद्दल कपिल देव काय म्हणतो बघा:

"My line was on and outside the off stump, to get him out with my outswinger. On both occasions I threw my arms up expecting an edge, only to see the umpire waving his arm to signal a boundary."

पण शेवटी कपिलदेवनेच ती जादू केली. मदनलालच्या गोलंदाजीवर मागे मागे जात त्याने एक अविश्वसनीय झेल घेतला आणि आख्ख्या भारताने सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर विंडीजची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि भारताने विश्वचषकाला गवसणी घातली.

१९८३ चा घाव रिचर्डस च्या खुपच जिव्हारी लागला होता. १९८७ च्या स्पर्धेत तो त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच उतरला होता. पण दुर्दैवाने (त्याच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने) त्या स्पर्धेत भारत - विंडीज आमने सामने आलेच नाहीत. त्याचा राग मग रिचर्डसने इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तानवर काढला. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यात ६३ च्या सरासरीने ४०० च्या आसपास धावा काढल्या. यात ३ अर्धशतके आणि १ शतक समाविष्ट आहे. याच स्पर्धेतली त्याची श्रीलंके विरुद्धची खेळी त्याच्या विश्वचषकीय कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदु ठरली. १२५ चेंडुत १६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने त्याने तब्बल १८१ धावा कुटल्या. कुटल्या हेच विशेषण सार्थ ठरेल कारण त्याच्या त्या खेळीमध्ये डेस्मंड हेन्सच्या १०५ धावा पण झाकोळल्या गेल्या. १९९६ मध्ये कर्स्टनने १८८ धावा काढेपर्यंत ती विश्वचषकातली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. आणि आजदेखील ती बहुधा विश्वचषकातील ३ क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. याव्यतिरिक्तही त्याने इंग्लंडविरुद्ध एक आणि पाकिस्तानविरुद्ध २ अर्धशतके ठोकली. दुर्दैवाने त्याच्या वैयक्तिक कामगिरी एवढी विंडीजची सांघिक कामगिरी उल्लेखनीय नाही झाली आणि विंडीज साखळीमधूनच बाहेर पडले. एका किंगच्या विश्वचषकीय कारकीर्दीची अखेर झाली. एक पर्व संपले. पण रिचर्डस ने विश्वचषकावर आपला ठसा उमटवला आहे.

टोनी ग्रेगने एका स्पर्धेपुर्वी दर्पोक्ती केली होती की तो रिचर्डसला धावांची भीक मागायला लावेल. ते ऐकल्यावर रिचर्डस गरजला "Nobody talks to Viv Richards like that." आणि टोनी ग्रेगला स्वत:च्या व्यक्तव्यावर पश्चात्ताप करावा लागेल एवढा इंग्लिश गोलंदाजांवर बरसला. खरेच होते. Nobody then dared to talk about Sir Issac Vivian Alexander Richards like that. हा उर्मटपणा त्याला शोभायचा कारण तो या खेळाचा अनभिषिक्त सम्राट होता. म्हणुनच या उर्मट शिरोमणींवरचे पहिले पुष्प विवियन रिचर्डसला सादर समर्पित.


तळटीपः विवियन रिचर्डस निवृत्तीला आला होता तेव्हादेखील मी खुप लहान होतो. तरीसुद्धा त्याच्या खेळ्या थोड्याफार पाहिल्या आहेत. ती नजाकत तो धडाका अवर्णनीय होता. पण इथे जे काही लिहिले आहे ते जरी माझे असले तरी आकडेवारी जालावरून साभार घेतली आहे. मी हे सामने बघितलेले नाहीत. पण आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. हा लेख म्हणजे मी त्याचे जे काही थोडेफार सामने बघितले आहेत, जे थोडेफार ईएसपीएन - स्टार स्पॉर्टस वर बघितले आहे, जे वाचले आहे आणि जे मला वाटते त्याची सरमिसळ आहे.