गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
मागच्या लेखात ( उत्तर कर्नाटकातील याना शिखरे. , https://www.misalpav.com/node/53526) कुमटा ते याना जाऊन आलो. सकाळी ट्रेनमधून उतरल्यावर हॉटेल रुम कुमट्यालाच घेतली. थोडा आराम केला आणि दुपारी यानाला जाऊन संध्याकाळी परत आलो. दुसरा संबंध दिवस गोकर्णसाठी राखून ठेवला होता. तसं तिकडेच जाऊन राहिलो असतो तर बराच वेळ वाया गेला असता. आणि परत तिसरे दिवशी कुमटाच्या दक्षिणेला साठ किलोमीटरस अंतरावरच्या मुर्डेश्वरला जायचे होते. कुमटा ते मदनगिरी पूर्ण प्रशस्त हायवे असल्याने तेवढे अंतर फार जलद पार करून गोकर्णला पाऊण तासात पोहोचलो.( एकूण तीस किलोमीटर आहे), शिवाय दर अर्ध्या तासाने बस सुरू असतात. सहा किलोमीटरवर मिरझना किल्ला आहे. तो परत येताना पाहू असं ठरवलं होतं पण ते झालं नाही.गोकर्ण हे क्षेत्र अघानाशिनी या नदीच्या मुखाजवळ आहे.
कसे जावे
१अ) मुंबईहून रेल्वे 12133. ठाणे ( 22:30)-कुमटा( 09:30)रोज
परतीसाठी 12620 मत्स्यगंधा एक्स्प्रेस भटकळ(16:56),मुर्डेश्वर(17:10)कुमटा(17:46)गोकर्ण(18:04)रोज
१ब) 12134 या गाडीने येऊ नये. बेभरवशाची गाडी आहे.
२अ)पुण्याहून 22150 पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेस (18:45) कारवार(06:48) bi weekly
२ब)परतीसाठी 22149 कारवार(15:58) पुणे(05:50)bi weekly
कारवार ते गोकर्ण बसने पन्नास किलोमीटर आहे.पुण्याहून रेल्वे जरा गैरसोयीची आहे.
फोटो (१)
कुमटा ते गोकर्ण बसने ३० किलोमीटर
गोकर्ण बस स्टँडला पोहोचल्यावर जवळच्याच एका नव्या रेस्टॉरंटात इडली वडे खाल्ले कॉफी घेतली. सर्विस चांगली होती, प्रशस्त होते. बस डेपो मात्र अपवादाने अस्वच्छ होता. टॉइलेट्स आहेत. मग कोटीतीर्थ मार्गे गावातल्या अरूंद रस्त्याने जुने वाडे, घरं पाहात महागणपती मंदिरापाशी चालत गेलो. ( दोन किमी).बाजूलाच प्रसिद्ध गोकर्ण महाबलेश्वर मंदिर आहे.
फोटो (२)
गोकर्ण बस स्टँड ते कोटीतीर्थ ते महागणपती मंदिर
फोटो (३)
जुने वाडे
फोटो (४)
जुन्या घरांच्या प्रवेशद्वारावर कट्टे होते आणि त्यावर बसून परदेशी पर्यटक योगाआसनं करून फोटो काढत होते.
फोटो (५)
कोटीतीर्थ एका बाजूने
कोटीतीर्थ तलाव खूप मोठा आहे. चहूबाजूंनी घरे किंवा मठ आणि देवळे आहेत.
फोटो (६)
रस्ता
फोटो (७)
वाड्यात ठेवलेल्या नैवेद्यासाठी -अन्नासाठी कठड्यावर वाट पाहात असलेला वानर. हा कट्टा चिऱ्यांचा बांधलेला आहे. ओबडधोबड गोल दगड रचून ठेवलेल्या कट्ट्याला आपल्याकडे कोकणात गडगा म्हणतात.
फोटो (८)
त्या वानराच्या हातातून काही अन्न खाली पडेल याची वाट पाहणारी गाय.
फोटो (९)
नागेश्वर देवळाबाहेर असणारी कार्तिकेयाची मूर्ती.
फोटो (१०)
एका वाड्यातील बिंबलीचे झाड आणि फळे. छोट्या आवळ्याच्या जातीतले आणि लांबट हिरवी फळे स्वयंपाकात आंबटपणासाठी वापरतात.
फोटो (११)
घरांच्या आजुबाजूला असणारी चौकोनी विहीर. अशा दोन तीन पाहिल्या.
साडेअकराला महागणपती मंदिर पाहिले. छोटेसे पण अगदी सुंदर मंदिर आहे.
फोटो (१२)
महागणपती मंदिर
फोटो (१३)
महाबलेश्वर मंदिराचे दक्षिण द्वार. मुख्य दार पश्चिमेला समुद्राकडे तोंड करून आहे.
गावातील जुन्या वास्तू पाहात जाण्यात खूप गंमत वाटली. पावणेबाराला महाबलेश्वर मंदिरात वेळेत प्रवेश केला आणि ते मंदिर बाराला बंद झाले. पुन्हा पाचला उघडते. हे मंदिर मात्र फार काळोखे आणि बंदिस्त आहे. [ रावणाने शंकराकडून शिवलिंग कसे मिळवले आणि ते घेऊन तो लंकेकडे { थोड्या आडवाटेने} चालला होता. ते नेऊ न देण्यासाठी मग गणपतीने त्याला वाटेतच गाठले. एका बटुच्या किंवा गुराख्याच्या वेषातल्या गणपतीला रावणाने शंकराचे आत्मलिंग हातात धरायला सांगितले आणि बजावले की "खाली भुईवर ठेवू नकोस , मी जरा 'जाऊन' येतो". पण रावणाला परतायला लागला वेळ आणि ते लिंग गणपतीने खाली ठेवले आणि ते चिकटले ते इथेच अशी गोकर्ण महाबलेश्वराची आख्यायिका आठवत आपण पुढे समुद्राकडे जातो. परंतू अगदी सकाळीच देवळाकडे गेलात तर तिथले पुजारी "जा प्रथम समुद्रावर स्नान करून या" असे सांगतात हे मी काही लोकांच्या कडून ऐकले आहे.] त्यामुळे इकडे गणपतीचे महत्त्व अधिक आहे.
ते देऊळ पाहून दर्शन घेऊन बाहेर आलो. तर समुद्राकडे जाणाऱ्या मार्गावर बाजार - मसाल्याची बरीच दुकाने आहेत आणि अन्नप्रसादमही उघडले होते. ( दुपारी १२-२). त्यात प्रसादाचे जेवण जेवलो. मुगाची गोड उसळ -पुरण, आणखी एक उसळ, भात,सांबार, भाजी आणि ताक. कढत कढत सुग्रास जेवण. जेवल्यावर जवळच्याच बीचवर गेलो. एक वाजला होता आणि ऊन तळपत होते. वाळू तापली होती. उन्हाची धग लागत होती. तिथून परत फिरलो आणि रथाचे फोटो घेऊन ओटोरिक्षा करून कुडले बीचकडे गेलो. खरं म्हणजे जायचा विचार नव्हता परंतू काय आहे हे पाहून तरी येऊ या विचाराने निघालो.
फोटो (१४)
रथ दोन आहेत. एक गणपतीसाठी आणि दुसरा शंकरासाठी. परवाच्या (१५) महाशिवरात्रीसाठी नवीन पताका लावणार असतील.
फोटो (१५)
रथ
फोटो (१६)
गणपती मंदिर ते कुडले बीच पार्किंग अंतर एक किलोमिटर आहे. रिक्षावाल्याने शंभर रुपये घेतले.आणखी सहाशे मिटर्स पायऱ्यांची वाट उतरवावी लागते. संपूर्णपणे चालतही जाऊ शकतो सकाळी. याच वाटेवर प्रसिद्ध Zostel आहे. तशी आणखीही असतील परंतू याचे विडिओ यूट्यूबवर फार आहेत.
या पार्किंगपासून पायऱ्यांची चांगली वाट उतरून कुडले बीचवर आलो. इथे अनपेक्षितपणे गारवा होता. कुडले बीचवर गर्दी नव्हती. फक्त आठ दहा परदेशी पर्यटक आणि आम्ही होतो.किनाऱ्याकडे हॉटेल्स आहेत. एके ठिकाणी टॉइलेट्स आणि आंघोळीची सोय होती. ( १०/- रुपयांत).
फोटो (१७)
कुडले बीच उत्तर टोकाकडून असे दिसते.
फोटो (१८)
काही हॉटेल्स, कुडले बीच.
कुडले बीचवर बराच वेळ घालवून दुसऱ्या टोकाला असलेल्या वाटेने चढून वर गेल्यावर बीचचे दुसरे पार्किंग लागले. इथे ऑटो होत्या. ओम बीचकडे चालतही जाता येते. दोन अडीच किलोमिटर अंतर आहे. अगदी बीचजवळ आणखी एक पार्किंग आहे. चहा कॉफीची दुकाने आहेत आणि ऑटो होत्या पाच सहा.
फोटो (१९)
कुडले बीच ते ओम बीच चालत तीन किलोमिटर. ती एक तुटक रेषेची पायवाट नकाशात दिसते आहे ती वाट नाही असं ऑटोवाल्याने सांगितले.
फोटो (१)
ओम बीच. छोटा ओम.मोठा ओम आणखी पुढे आहे. पण आता ऊन तोंडावर लागत होते. गेलो नाही.
ओम बीचला छोटा आणि मोठा ओम आहे आणि इकडे बरीच गर्दी दिसली. एका बीचसाइड हॉटेलात कॉफी घेतली आणि ऑटो रिक्षाने परत जायचा निर्णय घेतला. सवा चार झाले होते आणि परत कुमटाला जायचे होते. त्यामुळे मोठ्या ओम बीचकडे गेलो नाही. यूट्यूबवर ड्रोन शॉट्स दाखवतात त्यात ओमचा आकार दिसतो.
फोटो (२०)
ओम बीच पार्किंग ते गोकर्ण बस स्टँड साडे चार किलोमिटर ऑटोने. पण काही परदेशी पर्यटक चालतच जात होते
फोटो (२१)
गोकर्ण ते कुमटा बसने परतताना.
आम्ही एका दिवसात गोकर्ण पाहायचा प्रयत्न केला आणि तोसुद्धा कुमटाहून येऊन जाऊन. परंतू इथे दोन दिवस आवश्यक आहेत. इकडे लॉजेस, हॉटेल्स आणि होम स्टे तसेच रेस्टॉरंट्स भरपूर दिसतात. बाइक रेंटलस दुकानेही दिसली. गाव जुन्या वळणाचे रम्य आहे. घाई गडबड नाही. हॉटेल्स एजंटांचा, ऑटोवाल्यांचा त्रास नाही. गोकर्ण केवळ पौराणिक कथेचे धार्मिक स्थळ नसून समुद्रकिनाऱ्यांमुळे इथे करमणूक चांगली आहे.
[ # याच भागातील पर्यटनासंबंधी S for Satish चानेलचे ( मराठीत ) आठ विडिओ आहेत. त्यातील एकाची
लिंक
https://youtu.be/XJjUDzyYW7Q?si=htlETIA2KQy_Jxil
]
=================================================
Comments