साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्याच प्रमाणात तसाच राहतो.
साधारणपणे २०-२५ वर्षांपूर्वी इंडिया टुडेने मतदार सर्वेक्षणासाठी विरोधक एकतेचा निर्देशांक (Opposition Unity Index) अशी एक नवी कल्पना आणून त्यानुसार भाकित करण्यास प्रारंभ केला होता. या कल्पनेनुसार सत्ताधारी पक्षाविरूद्ध असलेले विरोधक जितके एकत्र येऊन निवडणूक लढवितील तितका त्यांना लाभ होतो (जरी मिळणार्या मतांच्या टक्केवारीत जास्त अंतर नसले तरीही) व सत्ताधारी पक्षाला तोटा होतो. या सिद्धांतानुसार महाराष्ट्रात विरोधक एकतेचा निर्देशांक यावेळी बराच जास्त आहे. मविआमध्ये फक्त उबाठा, काँग्रेस व राशप नसून त्यात शेकाप, सप, डावे असे २-३ जागा मिळविणारे लहानसहान पक्ष सुद्धा आहेत. हे प्रकर्षाने लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आले होत. दोन्ही आघाड्यांच्या मतांच्या टक्केवारीत नगण्य अंतर होते, परंतु जिंकलेल्या जागांमध्ये खूप अंतर होते. विधानसभा निवडणुकीतही हाच कल कायम राहण्याची शक्यता आहे.
दोन्ही आघाड्यांचा जाहीरनामा आणि आश्वासनांचा वर्षाव पाहिला तर हे नक्की आहे की यापैकी कोणीही सत्तेवर आले आणि आपापली आश्वासने पाळली तर एक-दोन वर्षात महाराष्ट्र दिवाळखोर होणार. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसने अशीच अनेक अव्यहार्य आश्वासने देऊन सत्तेत आल्यानंतर एक वर्षाच्या अवधीतच दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. याची भरपाई अर्थातच वीजशुल्क वाढविणे, इंधनावर करवृद्धी, मुद्रांकशुल्कवृद्धी, दारू व सिगरेटवर करवृद्धी, पथकरवृद्धी अश्या मार्गाने केली जाईल.
__________________________________________________________________________________________
लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत हरयानात ६४.८०% मतदारांनी मत दिले होते. त्यात भाजपने लढविलेल्या १० पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने आआपशी युती करून स्वतः ९ व आपने १ जागा लढविली होती. त्यात काँग्रेसने ५ जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसने प्रत्येकी ४४ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. ऑक्टोबर २०२४ मधील हरयानातील विधानसभा निवडणुकीत ६७.९०% मतदारांनी मत दिले होते (३.१०% वाढ). त्यात भाजपने ४८ तर कॉंग्रेसने ३७ जागा जिंकल्या. काही विश्लेषकांनी भाजप्पच्या यशाचे श्रेय वाढीव ३.१०% मतदारांना दिले. लोकसभा निवडणुकीत मोदींना बहुमतापासून दूर ठेवल्याचा मतदारांना पश्चाताप झाला, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे हिंदू मतदार पुन्हा एकवटायला सुरूवात झाली आहे असेही विश्लेषण मांडले गेले. परंतु माझ्या मते या कोणत्याही विश्लेषणात तथ्य नव्हते.
हरयानात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आआपशी युती केली नाही. स्वपक्षातील दलित नेत्या कुमारी सेलजांना पूर्ण दुर्लक्षित केले. संपूर्ण निवडणूक जाट नेते हुडांच्या हातात दिली व त्यांनी उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत फक्त जाटकेंद्रीत धोरण ठेवले. त्यामुळे अजाट जातींचे ध्रुवीकरण झाले. परिणामी भाजप लाभार्थी ठरला. वाढीव मते, हिंदू एकीकरण इ. मुद्दे हरयाना विधानसभा निवडणुकीत नव्हते.
महाराष्ट्रात २०२४ लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. काही जणांना वाटते की रा. स्व. संघ जास्तीत जास्त मतदारांनी नत द्यावे यासाठी प्रयत्न करतोय. हिंदूंनी उमेदवार न बघता हिंदू पक्षाला (म्हणजे भाजपला) मत त्यावे असा प्रचार समाजमाध्यमातून सुरू झालाय. याचा लाभ विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळणार या आशेवर भाजप समर्थक आहेत. परंतु हिंदुत्व या मुद्द्याचा प्रभाव महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अजिबात पडला नव्हता कारण महाराष्ट्रातील भाजप नेते हिंदुत्वापासून केव्हाच दूर गेलेत. येनकेनप्रकारेण सत्ता मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी हिंदुत्व, तत्वे, विचारसरणी, नैतिकता केव्हाच बासनात गुंडाळून ठेवलीये. याउलट मदरशांना देण्यात येणार्या अनुदानात वाढ करण्याचे दुष्कर्म महायुती सरकारने केले. काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष कायमच मुस्लिमधार्जिणे व हिंदूविरोधी होते. शिवसेना व मनसे ना कधी महाराष्ट्रवादी होती ना कधी हिंदुत्ववादी होती. त्यांचे भावंड शिंदे गट हा सुद्धा हिंदुत्ववादी नाही. भाजप हा एकमेव हिंदुववादी पक्ष होता. राष्ट्रीय पातळीवर भाजप अजूनही हिंदू पक्ष आहे. परंतु २०१४ नंतर महाराष्ट्र भाजपने हिंदुत्व बासनात गुंडाळून खुंटीवर टांगून ठेवले व स्वतःचे रूपांतर काँग्रेस-राष्ट्रवादीत करून घेतले. आपल्या पारंपारिक समर्थकांना गृहित धरून त्यांच्यावर अन्याय करणारे निर्णय घेतले. अत्यंत भ्रष्ट, गुन्हेगार, गुंड, खुनी, कट्टर हिंदूद्वेषी, कट्टर जातीयवादी, कट्टर ब्राहमणद्वेषी अश्या विरोधी नेत्यांना कायदेशीर संरक्षण देऊन पदराखाली आणले. भाजपचा पारंपारिक समर्थक यामुळे भाजपपासून दूर जातोय व विधानसभा निवडणुकीत दिलेल्या मतांची मतांची टक्केवारी फारशी न वाढता उलट कमी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. विधानसभा निवडणुकीत हिंदुत्व, बांगलादेश, बटेंगे, कटेंगे, लव जिहाद हे मुद्दे अजिबात चालणार नाहीत. हे मुद्दे लोकसभा निवडणुकीतही चालले नव्हते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जोरदार दणका बसूनही भाजपने ना नेतृत्वबदल केला ना कार्यपद्धती बदलली ना प्रचारातील मुद्दे बदलले. याचा फटका बसणारच.
उठा मुख्यमंत्री असताना पालघर येथे हिंदू साधूंची जमावाने हत्या केली तेव्हा राज्य सरकार निष्क्रीय होते, टिपूचे एका उद्यानाला नाव दिले, जनाब बाळ ठाकरे असे लिहायला सुरूवात केली, शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे भाजप अजूनही हिणवत आहे. परंतु भाजपने काय वेगळे केले? सत्ता मिळवून व फडणवीस गृहमंत्री होऊन २८ महिन्यांहून अधिक काळ लोटला. या कालावधीत हिंदू साधूंना ठार मारणार्यांवर यांनी काय कारवाई केली? अनंत कुरमुसे या संभाजीराव भिडेंच्या अनुयायाला घरात उचलून आणून बेदम मारहाण करणार्या आव्हाडवर कोणती कारवाई केली? कारवाई तर लांबच राहिली, उलट या प्रकरणात सीबीआय चौकशीला फडणवीसांच्या गृहमंत्रालयाने न्यायालयात विरोध करून सीबीआय चौकशी होऊन दिली नाही. हेच आव्हाड परमार या बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात प्रमुख संशयित आहेत. परंतु आजतगायत कुरमुसे व परमार या प्रकरणात आव्हाडांची साधी प्राथमिक चौकशी झाली नाही. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्याला न्याय मिळणार याचा पूर्ण विश्वास होता परंतु आता ती आशा पूर्ण मावळाली आहे, अश्या अर्थाचे हताश ट्विट कुरमुसेंनी काही काळापूर्वी केले होते.
एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी, अजित पवारांनी सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटीचा घोटाळा केला, अशी मोदींनी महाराष्ट्रात येऊन टीका केल्यानंतर केवळ ४ दिवसातच अजित पवारांना मंत्रीमंडळात घेऊन उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले व त्यांच्याबरोबर भुजबळ, मुश्रीफ वगैरे अनेकांना मंत्रीपद दिले ज्यांच्या भ्रष्ट्राचाराविरूद्ध भाजपने रान उठविले होते. राणे, अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराविरूद्धही भाजपने रान उठविले होते, परंतु त्यांनाही मंत्रीपदाचे बक्षीस दिले गेले. पूजा चव्हाण या गर्भवतीच्या आत्महत्या प्रकरणात भाजपच्या चित्रा वाघांनी खूप आक्रमक भूमिका घेऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. परंतु त्यांनाही क्लीन चिट देऊन मंत्रीमंडळात घेतले.
हे सर्व प्रकार पाहिले तर वाटतं की भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा यांच्यात काही अंतर शिल्लक आहे का? किंबहुना भाजप नीचपणात या सर्व पक्षांपेक्षाही खूप पुढे गेला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोपांची राळ उठवायची, त्यांना शरण आणून आपल्याकडे आणायचे, क्लीन चिट द्यायची आणि पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना अडगळीत टाकून नवीन आलेल्यांना लाभपदे द्यायची हेच मागील १० वर्षे सुरू आह.
_____________________________________________________________________________________________
यापुढील अंतिम लेखात माझ्या एका गणिती प्रारूपानुसार प्रत्येक पक्षाला मिळू शकणार्या मतांची टक्केवारी व जिंकणार्या संभाव्य जागा याचे भाकीत सांगेन.
Comments