साधी सुकी भेळ

By हणमंतअण्णा शंक…, 26 February, 2026

Comments

आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक भेळ आहे. रामण्णा बुट्टी भेळ.
एका (प्लास्टिकच्या) बुट्टीत तिघा चौघांना पुरेल असा चिवडा, पातीचा कांदा, शेंगदाणे, कोथमीर, थोडं नावापुरतं फरसाण आणि मटकी शिजवून अशी भेळ देतात. वरून एक आक्खा कांदा आणि हिरव्या मिरच्या. बास. हिला मटकी भेळ असेही म्हणतात. यात चिंचेचा कोळ गूळ वगैरे काही नसते. चिवडा देखील आपले लांबडे मुरमुरे हळदीत आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेले.

आमचा आज्जा कधीतरी असे चिरमुरे फरसाण घरी घेऊन यायचा. आणि आम्ही मग कांदे चिरून कधी कधी टमेटो (पूर्वीचा उच्चार टोमॅटो) चिरून अशी सुकी भेळ करून खात असू.

एखाद्या देवळाला जाताना हमखास या भेळेचे सामान घेऊन जाऊन तिथे अशी भेळ करून खाल्ली जायची. लहान पल्ल्यांच्या सहलींच्या नियोजनात आयत्यावेळेस देखील येऊन मंच गाजवणारा यशस्वी कलाकार असावा तशी ही भेळ. किंवा एखाद्या देवस्थानात लग्नाला जायला निघालेले वर्‍हाड असो, तिथे लगेच स्केल होऊ शकणारा हा नाश्ता कुणीतरी नियोजनपट्टू हमखास एकदम टाईट बजेट मधे बसवतोच.

हिच्याबद्दल कुणी फारसे पॅशनेट नसते. हे एक बरे आहे, खरेतर अस्मितांचे गंड नाहीसे करायला भेळेवर माणसांनी एकमेकांशी बोलावं. तोंड खवळून घ्यावं पण पुढचा बकाणा भरण्यासाठी. आणि वचावचा बोलणं थांबवावं.

त्यानंतर गावी गेल्यावर Knock Out किंवा एल.पी. सारखी थर्ड क्लास सुंदर बियर घेऊन दोस्तांचे टोळके गेले की पुन्हा अशीच भेळ साथीला.

नोकरी लागल्यावर फक्त बियरचा ब्रँड बदलला मॅग्नम बडवायझर किंवा मिलर वगैरे, (उगाच आपला लायकी नसलेला शो ऑफ, लायकी एल पीचीच). पण भेळ तीच. मटकी भेळ तर खासच. आणि असल्या फाटक्या बियरपार्टीला असलीच भेळ पाहिजे. हार्ड लिकर वगैरे साठी इतर उच्चभ्रू चकणे.

मग दूर गावाबाहेर एखादा वन बीएच के किंवा अजून थोडा मोठा ब्लॉक किंवा नवं बैठं घर असो की त्याचे बांधकाम कुठवर आले आहे त्या विझिट मधे बायको पोरांबरोबर गावठी चैन करायला आपले एक मध्यमवर्गीय रिच्युअल. हा एक टप्पा पूर्ण होत असताना भेळ असते साथीला.

मग तेच चक्र पुन्हा.

मला काही कधी चौपाटी समुद्रकिनारा लाभला नाही. तिथेही हिचे प्रकार मिळत अस्तात. ओल्या भेळेला ग्लॅमर आहे, आजकाल तिच्यात कैरीपासून अननसापर्यंत काहीही टाकतात मात्र ही अजून ही एकदम रिलायबल आहे. पेपरवर खा नाहीतर कागदी प्लेटात खा किंवा थेट आमच्या सारखे बुट्टीत खा. काही नखरे नाहीत.

हा फोटो रेडिटवर पाहिला.
bhel